Sunday, May 13, 2018

तुम्ही हे वंगाळवक्टं काम सोडा-





निळूभाऊ, तुम्ही हे वंगाळवक्टं काम सोडा- प्रा.हरी नरके

मित्रांच्या संगतीनं एकदा मोठा भाऊ पिऊन आला. आईनं रात्री त्याला शांतपणे झोपू दिलं. सकाळी उठल्यावर त्याला खडसावून विचारलं, त्यानं चूक झाल्याचं कबूल केलं. पुन्हा करणार नाही असं वचन दिलं. पण मुलावर चांगले संस्कार करण्यात आपण कमी पडलो म्हणून आईनं उपोषण सुरू केलं.
आई दररोज दिवसभर मोलमजुरीला जायची. लोकांची घरकामं करायची. तिला खुपच अशक्तपणा आला होता.
आम्ही सारे तिला विनवून थकलो.पण ती ठाम होती.

तिनं निर्धारानं दहा दिवस उपवास केला.
शेवटी मोठ्या मामानं येऊन तिला उपास सोडायला लावला.
पण ही अठवण म्हणून ती दरवर्षी दहा दिवस उपवास करायची.
आईच्या धाकानं आम्ही सगळे भाऊ मद्याच्या व्यसनापासून कायम चार हात दूरच राहिलो.

आई अतिशय तापट होती. पण अफाट कर्तृत्ववान. खुप काटक. कामाला वाघीणच. दररोज किमान 16 ते 18 तास राबायची.
वयाच्या 85 व्या वर्षीही ती कधी आराम करीत बसलीय असं झालं नाही.
सतत कसलं ना कसलं काम करणं यात ती स्वत:ला गुंतवून घ्यायची.

सुंदर गोधड्या शिवायची. कुरडया, पापड्या, पापड बनवायची. घरातली तर सगळीच कामं आवडीनं करायची.
तिचा एक जबरदस्त फंडा होता. ती म्हणायची माणसाला कधीही कष्टाची, कामाची लाज वाटता कामा नये. कोणतंही काम हलकं नसतं. लाज चोरी, शिंदळकी [ व्याभिचार] आणि आयतं खाण्याची वाटायला हवी. खोटं बोलण्याची लाज वाटायला हवी. कामाची कसली अलीय लाज?

त्यामुळं एक फायदा झाला, वयाच्या पाचव्या वर्षापासून सोळाव्या वर्षापर्यंत स्मशानात प्रेतं पुरण्याचं, स्मशानाच्या साफसफाईचं काम करावं लागलं तरी त्यात कमीपणा वाटला नाही.
दुसर्‍यांच्या शेतात मोलमजुरी करणं, बांधकामावर काम करणं, पेरू विकणं, रसवंती गृहावर किंवा हाटेलात राबणं याचीकधीही लाज वाटली नाही.

वडील मी खुप लहान असताना गेले. तेव्हा मी इतका लहान होतो की वडील गेले म्हणजे नेमकं काय झालं ते मला समजलंच नाही. पण आई रडली म्हणून मी रडलो.

निळूभाऊ [फुले] एकदा घरी आले होते. आई प्रचंड संतापली. या हलकट माणसाला कशाला घरी आणलं? असा तिचा करडा सवाल होता.
मी म्हटलं तू चहा कर. चहा घेऊन ते जातील. तर ती चहा पण करायला तयार नव्हती.
शेवटी तिनं चहा केला कसाबसा पण तो द्यायला ती बाहेर आली नाही.
पण भाऊ महावस्ताद.

ते म्हणाले, "आई, चहा एकदम फर्माश झालाय. बेस्ट. माझी आई करायची बघा असा चहा. तिचं पण नाव सोनाई होतं. परवा तुळशीराम भेटला होता.तुमची चौकशी करीत होता."
भाऊंनी थेट माझ्या सख्ख्या मामांचं नाव घेतल्यानं आई स्वयंपाक घरातून बाहेर आली.
त्यांना म्हणाली, "तुमची कशी वळख त्याच्याशी?"
मग भाऊ त्यांची मामांशी कशी आणि किती जवळची मैत्री आहे ते सांगू लागले.
आई बरीच निवळली.

मला हळूच म्हणाली, "तसा मानूस बरा दिसतोय."
मग भाऊंना म्हणाली, "तुमच्या इतक्या चांगल्या मानसांशी वळखीपाळखी असताना असलं वंगाळवक्टं काम करू ने मानसानं. सोडा तो चुकीचा धंदा."
भाऊ म्हणाले, "आई ते खोटं असतं. पोटापाण्यासाठी करावं लागतं."
आई ताडकन म्हणाली, " मी अडाणी बाय हाय. मला जास्तीचं काय कळत नाय. पण मी म्हन्ते एका सिनेमात खोटं असंल, दुसर्‍या सिनेमात खोटं असंल, पण सगळ्याच सिनेमात कसं काय खोटं असंल, सांगा बरं? दिसली बाई की लागला बाबा मागं, हे चांगलं नाय. माण्सानं इज्जत - अब्रूनं राहावं. नाय चांगलं काम मिळालं तर पोटात काटं भरावंत. पण असलं वंगाळवक्टं काम करू ने."
भाऊ जायला निघाले, तेव्हा ते गाडीत बसल्यावर ती त्यांच्याजवळ गेली आणि त्यांना कळकळीनं म्हणाली, "मी काय म्हन्ते, आमच्या हरीच्या मायंदाळ वळखीपाळखी हायती. तुम्ही हे काम सोडा. तो पवारसायबांना नाय तर टाटा सायबांना सांगून चांगलं काम देईल तुम्हाला. पण तुम्ही हे वंगाळवक्टं काम सोडाच."
पुढं भाऊ आईला शुटींग बघायला घेऊन गेले. तेव्हा कुठं आईची खात्री पटली.
मग तिचा निळूभाऊंबद्दलचा गैरसमज दूर झाला आणि ती भाऊंची फॅन झाली.
- प्रा.हरी नरके

Saturday, May 12, 2018

जाणतो मराठी मानतो मराठी-


जाणतो मराठी मानतो मराठी- प्रा.हरी नरके
पुढारी, कोल्हापूर, रविवार, बहार, 13 मे 2018 पृ. 1 व 3
सर्व शासन व्यवहारात मराठी भाषेच्या सक्तीच्या वापरासंबंधी सरकारने परवा परिपत्रक काढल्याच्या बातम्या सर्वत्र झळकलेल्या आहेत.
काही वर्तमानपत्रांनी तो आदेश असल्याचं तर काहींनी ते परिपत्रक असल्याचा उल्लेख केलेला आहे.
काहींनी ती ताकीद आहे असं छापलंय तर काहींनी तो शासन निर्णय असल्याचं नमूद केलंय.

आपण दक्षिण भारतात गेलो की तिथली सगळी माणसं त्यांच्या मातृभाषेबद्दल आग्रही असलेली दिसतात. तमीळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम हे सगळेच लोक आपापल्या मातृभाषेचा अभिमान बाळगतात. या बहुतेक सर्व राज्यांनी शिक्षण, साहित्य, संस्कृती, कला आदी क्षेत्रात फार मोठी भरारी घेतलेली आहे. मानव विकास निर्देशांकात ही राज्यं पुढं आहेत. हे सारे आपले शेजारी असूनही आपण त्यांच्याकडून मातृभाषाप्रेम मात्र शिकायला तयार नाही. तिथल्या सरकारांनी स्थानिक भाषेच्या सक्तीबाबत अतिशय कडक पावलं उचललेली आहेत. इंग्रजी आणि हिंदीच्या आक्रमणाचा प्रश्न त्यांनाही भेडसावतो आहे. पण त्यांनी त्यावर कशी मात केलीय हे आपण त्यांच्याकडून समजून घ्यायला हवं. तिथं भाषिक मतबॅंक [व्होटबॅंक] असल्यानं राज्यकर्त्यांना ठाम आणि कडक भुमिका घ्यावीच लागते.

आपल्याकडे मुदलात मराठी माणूसच जिथं मराठीबाबत उदासिन आहे तिथं नेत्यांना तरी काय पडलंय? सरकार काही का म्हणेना! आम्ही ऐकणार थोडेच आहोत? ते त्यांना सोयीचे आवाज काढतात, आम्ही सोयीस्कर आणि रितसर दुर्लक्ष करतो! जनता उदासिन म्हणून सरकार आणि सर्वपक्षीय नेते अतिउदासिन. मराठीचं हे दुर्दैव कधीच संपणार नाही का?
आज दररोज तीन मराठी शाळा बंद पडत आहेत. ग्रामीण भागातसुद्ध आता इंग्रजी शाळांचं पेव फु्टू लागलं आहे. मुलं मराठी शिकली नाहीत तर मराठी वाचू शकणार नाहीत. वाचकच नसला तर मराठी वर्तमानपत्रं, साहित्याची पुस्तकं यांचं काय होईल? आज मराठी अत्यवस्थ असताना आपण स्वस्थ बसलेलंच बरं. मरू द्या मेली तर. आपल्याला काय करायचंय?
एखादी भाषा मरते तेव्हा एक संस्कृती संपते. तिच्या निर्मिती आणि संवर्धनासाठी शेकडो वर्षे लाखो लोक राबलेले असतात.

मराठी शाळांचा दर्जा चांगला नसतो अशी टिका केली जाते. मराठी शाळांचा दर्जा वाढवायला हवा याबाबत दुमत नाही. परंतु काही मोजक्या ईंग्रजी शाळा सोडल्या तर उरलेल्या शाळांना दर्जा सुमार असतो. पण संस्कृतीकरणाचा सिद्धांत सांगतो, सामान्य लोक अभिजनांचं, महाजनांचं अनुकरण करीत असतात. महाराष्ट्रात ज्या दिवशी बुद्धीजिवी मध्यम आणि उच्च मध्यम वर्गानं मराठीचं बोट सोडलं, त्यादिवसापासून मराठीचा वनवास सुरू झाला. त्यांना मराठीची गरज वाटत नाही.
सावरकरांची क्षमा मागून सांगायचं झालं तर, ते जणू म्हणताहेत, "सागरा प्राण तळमळला, ने मजशी ने इंग्रजी शाळेला."

आज सर्वपक्षीय नेत्यांची, प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या वलयांकित महनीयांची म्हणजेच मराठीत ज्यांना आपण सेलीब्रिटी म्हणतो त्या सेलीब्रिटींची, मराठी लेखकांची, माध्यमकर्मींची मुलं, नातवंडं इंग्रजी माध्यमात शिकत आहेत.

दुसरीकडे आज परमादरणीय असलेले, ज्यांनी ज्ञाननिर्मिती केली, त्याच्या जोरावर देश बदलला असे बहुतेक सर्वजण मातृभाषेतून शिकलेले आहेत. परम महा संगणक बनवणारे विजय भटकर, मोबाईलची क्रांती घडवून आणणारे सत्यनारायण गंगाराम पित्रोदा, महान शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, रघुनाथ माशेलकर, वसंत गोवारीकर, माधव गाडगीळ, ज्ञानपीठ विजेते खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा, नेमाडे, राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिवाजी सावंत, तेंडूलकर, सुर्वे, एलकुंचवार, यशस्वी सनदी अधिकारी शरद जोशी, माधव गोडबोले, माधव चितळे, स.गो.बर्वे, राम प्रधान, ज्ञानेश्वर मुळे ते भूषण गगरानी हे सारेच मातृभाषेतून शिकलेले आहेत.

माणसाचं जीवसृष्ठीतील आगळंवेगळं वैशिष्ट्य म्हणजे माणूस हा विचार करणारा प्राणी आहे.
त्यानं साहित्य, संस्कृती, कला, तत्वज्ञान यांची निर्मिती केली. माणसं संस्कृतीची जनुकं एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडं पोचवत असतात.
माणूस मातृभाषेतून विचार करतो. मातृभाषा ही एकप्रकारे माणसाच्या अस्तित्वाला विचारांचा प्राणवायू पुरवत असते. ते त्याचे ओळखपत्र असते. मातृभाषा ही माणसाची अस्मिता आणि अस्तित्वखूण असते.

शहरी, महानगरी मराठी माणूस बहुभाषिक आहे. रोजगार, उद्योग, व्यापार, आर्थिक प्रगतीसाठी त्यानं बहुभाषिकतेची कास धरलेली आहे. पोटासाठी त्यानं इतर भाषा शिकायला कोणाचाच विरोध नाही. परंतु मराठी ही हलकी भाषा आहे, डाऊन मार्केट आहे म्हणुन त्याला तिची लाज वाटत असेल तर मात्र ती शरमेची बाब आहे. इंग्रजीतून, हिंदीतून बोलण्याला आज सार्वजनिक जीवनात विशेष प्रतिष्ठा आहे. समोरच्या माणसाला मराठी येत नसेल तर त्याच्याशी त्याला समजेल अशा भाषेत बोलयला काहीच हरकत नाही. पण मराठी माणूस बोलायला सुरूवातच मुळात हिंदी किंवा इंग्रजीतून करतो. त्यामुळे अनेकदा बराच वेळ बोलल्यानंतर लक्षात येते की दोघेही मराठीच असूनही ते उगीचच हिंदी किंवा इंग्रजीतून बोलत होते.
मराठी माणसाला मराठीची लाज का वाटते?

1907 साली ग्रियरसनने भारतीय भाषांचे सखोल सर्व्हेक्षण केले. तो म्हणतो की जी भाषा रोजगार देते तीच जगते. जी भाषा रोजगारक्षम नसते ती मरते. नष्ट होते. इंग्रजी आणि हिंदीच्या तुलनेत मराठीची रोजगार देण्याची क्षमता कमी आहे असं मराठी माणसाला मनोमन वाटतं, त्यामुळं तो आपल्या मुलाला मराठी माध्यमात घालायला तयार नसतो.

मराठी मरणार अशी काळजी राजवाड्यांनी शतकापुर्वीच व्यक्त केली होती.

पण बोलीभाषांची विविधता हे मराठीचं खरं वैभव असून, त्याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. मराठीला ५२ बोलीभाषा आहेत. जिला जास्त ओढे ती नदी मोठी, याच न्यायाने मराठीला रसद पुरवणार्‍या या सर्व बोली महत्वाच्या आहेत. या सर्वच बोलीभाषांतील साहित्य खूप सकस आहे. बहिणाबाई, उद्धव शेळके, भुजंग मेश्राम, सदानंद देशमुख, रंगनाथ पठारे, व्यंकटेश माडगूळकर, लक्ष्मण गायकवाड, लक्ष्मण माने, राम नगरकर, आनंद विंगकर, राजन गवस, मच्चिंद्र कांबळी, प्र. ई. सोनकांबळे, बा. भ. बोरकर, नामदेव ढसाळ आदींमुळेच मराठी समृद्ध झालेली आहे. दलित साहित्यानं मराठीला सामाजिक दस्तऎवज देऊन तिला खुप श्रीमंत केलेलं आहे.

"एक होता कावळा नी एक होती चिमणी..." ही प्रत्येक मराठी घरात आजही सांगितली जाणारी गोष्ट आहे. ती पहिल्यांदा ग्रंथात लिहिली गेली ८०० वर्षांपुर्वी. लिळाचरित्रात धानाई नावाच्या हट्टी मुलीला श्री चक्रधरांनी ती सांगितली असली तरी ती त्याआधी हजारबाराशे वर्षे मराठी लोकजीवनात सांगितली जात होती. ती विलक्षण लोकप्रिय होती.
तमिळ भाषेला अभिजात दर्जा मिळण्यात "संगम साहित्याचा" मोठा वाटा आहे. हे साहित्य २३०० वर्षे जुने आहे. कावेरी नदीवर धरण बांधले जात असल्याचा प्रसंग त्यात आला आहे. या धरणाच्या कामासाठी जगभरातून तज्ञ मागवण्यात आलेले होते. महाराष्ट्रातील मराठी गवंडी मोठे कुशल असल्याचे वर्णन त्यात आले आहे.

इसवी सनाच्या २ र्‍या शतकात वररूचीने "प्राकृतप्रकाश " हा व्याकरण ग्रंथ लिहिला. त्यात त्याने शौरसेनी, मागधी, पैशाची व महाराष्ट्री या प्राकृत भाषांचे व्याकरण सिद्ध केले. आधीचे सगळे नियम सांगून झाल्यानंतर शेवटचा नियम सांगताना तो म्हणतो, " शेषं महाराष्ट्रीवत." यावरून देशाच्या वेगवेगळ्या भागात प्रचलित असलेल्या सगळ्या भाषांना मराठीचे नियम लागू पडत होते. यातून मराठीची प्रतिष्ठा, मान्यता आणि श्रेष्ठता स्पष्ट होते.

संस्कृत महाकवी कालिदास आणि शूद्रक यांच्या "शाकुंतल" आणि "मृच्छकटिक" या नाटकांमध्ये अनेक संवाद मराठीत आहेत. महाभारत या जगप्रसिद्ध महाकाव्यात अनेक मराठी शब्द आलेले आहेत. यज्ञाच्या वेळी पंडीतांना मराठीत बोलायला बंदी घालण्यात आल्याची नोंद भागवत यांनी दाखवून दिलेली आहे. संस्कृत ही धर्मभाषा असली तरी हे पंडीत खाजगीत मराठीत बोलत असत हे यातून उघड होते. संत एकनाथांनी "संस्कृत वाणी देवे केली मग प्राकृत काय चोरापासोनी झाली?" असे संतप्त उद्गार काढले होते. "विंचू चावला..." ही  एकनाथांची भारूडांची मराठी आजची अस्सल मराठी असूनही ते तिला प्राकृत म्हणतात कारण महाराष्ट्री प्राकृत हीच मराठी आहे. रघुनाथराव गोडबोले यांनी १८६३ साली प्रकाशित केलेल्या मराठी शब्दकोशाला "महाराष्ट्रीय भाषेचा" कोश म्हटले आहे, ते यामुळेच.
संत ज्ञानेश्वर मराठीची गोडी अमृताहूनही जास्त असल्याचे प्रतिपादन कोणाला उद्देशून करीत होते? याचा अर्थ तेव्हाही मराठी माणसाला मराठीचा न्यूनगंड होताच.

जुन्या काळात धर्मग्रंथांची भाषा होती संस्कृत. पण तिचा जन्म झाला वैदीक भाषेपासून आणि वैदीकची आई होती वैदीकपुर्व बोली भाषा. हार्वर्ड विद्यापिठाचे डॉ. मायकेल विट्झेल यांनी आपल्या "ट्रेसिंग दि वैदीक डायलेक्ट्स" या ग्रंथात हे दाखवून दिले आहे. तेव्हा संस्कृत ही सर्व भाषांची मूळ भाषा होती ही माहिती खरी नाही. पाणिनीने जेव्हा या भाषेचे व्याकरण लिहिले तेव्हा तो तिला "छंद" भाषा म्हणतो. महाराष्ट्री प्राकृत किंवा महारठ्ठी या नावाने दोन-अडीच हजार वर्षांपुर्वी प्रचलित, लोकप्रिय व मान्यताप्राप्त असलेली भाषा ही संस्कृतपेक्षाही जुनी असल्याचे म.म. राजारामशास्त्री भागवत, विदुषी दुर्गा भागवत यांचे आजोबा, यांनी १८८५ सालीच दाखवून दिले होते. त्यांचा "मराठ्यासंबंधी चार उद्गार" हा ग्रंथ जिज्ञासूंनी अवश्य वाचावा. त्यांचा "मराठीची विचिकित्सा" हाही ग्रंथ महत्वाचा आहे. १९२७ साली ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास दोन खंडात लिहिला. त्यात त्यांनी मराठीचे वय किमान अडीच हजार वर्षे असल्याचे पुराव्यानिशी दाखवून दिले आहे.

मुल लहान असताना, रांगत असताना पीएच.डी. करू शकेल का? नाही.
मग कोणतीही भाषा बालवयातच "ज्ञानेश्वरी, लिळाचरित्र आणि विवेकसिंधू"  यांसारखे जागतिक दर्जाचे श्रेष्ठ ग्रंथ कसे प्रसवू शकेल? आठशे वर्षांपुर्वी मराठीत हे ग्रंथ लिहिले गेले तेव्हा मराठी बालभाषा नव्हती, तर ती एक परिपक्व झालेली समृद्ध भाषा होती.
ज्ञाननिर्मिती, साहित्य, विचार, तत्वज्ञान आणि संस्कृतीची त्याआधीची फार मोठी परंपरा मराठीला होती.

मग मराठीतला आद्यग्रंथ कोणता? आणि मराठीचं नेमकं वय किती?
मराठीतला आज उपलब्ध असलेला पहिला ग्रंथ आहे, " गाहा सत्तसई " { गाथा सप्तसती} गाथा म्हणजे कविता. सातशे लोककवितांचा संग्रह म्हणजे हा ग्रंथ होय. पैठणच्या हाल या सातवाहन राजाने सुमारे दोन हजार वर्षांपुर्वी पन्नास कवींच्या या कविता संकलित केल्या.
सातवाहनांची राजभाषा मराठी असल्याने त्यांचे जिथे जिथे राज्य होते, तिथे तिथे या ग्रंथाची हस्तलिखिते मिळालेली आहेत. सातवाहनांचे संपुर्ण भारतावर तर राज्य होतेच परंतु पार अफगाणिस्तानपर्यंत राजभाषा मराठीची पताका फडकत होती.

तिला अभिजात दर्जा अधिकृतपणे मिळणे म्हणजे मराठीच्या जागतिक प्रतिष्ठेवर शिक्कामोर्तब होणे. त्यामुळे मराठी माणसाचा न्यूनगंड कमी होईल. मराठी शिकवण्याची सोय देशातील 450 विद्यापीठांमध्ये होईल. मराठीच्या समग्र विकासासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी 500 कोटी रुपये मिळतील. मराठी शाळा, शिक्षण, शिक्षक यांची दर्जावाढ, वाचन संस्कृती वाढणे, ग्रंथालये संवर्धित केली जाणे, मराठी पुस्तके स्वस्तात मिळणे, मराठी मुलामुलींना अधिकाधिक रोजगार मिळणे यासाठी या दर्जामुळे खुप मदत होईल.
मराठीचे गोमटे व्हायला अभिजात दर्जा गती देईल.

गाथा सप्तसती, पादलिप्त, हरिभद्राची समरादित्याची कथा, उद्योतन सुरीची कुवलयमाला, चक्रधरांचे लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, तुकारामगाथा, एकनाथांची भारूडे, माझा प्रवास, गावगाडा, धग, कोसला, बनगरवाडी, बॅरिस्टर अनिरूद्ध धोपेश्वरकर, गोलपिठा, शांतता कोर्ट चालू आहे, हे ग्रंथ इतके चिरेबंदी आहेत की मराठीची श्रेष्ठता स्वयंस्पष्ट आहे. फुले-आंबेडकर, टिळक - आगरकर, राजवाडे-केतकर, राजारामशास्त्री भागवत, प्रबोधनकार ठाकरे यांचे वैचारिक लेखन श्रेष्ठ प्रतीचे आहे.

राजारामशास्त्री भागवतांच्या संशोधनाचा निष्कर्ष सांगताना दुर्गा भागवतांनी म्हटले आहे, की जुनी माहाराष्ट्री संस्कृतपेक्षा जुनी व खरी जिवंत भाषा आहे हे त्यांनी दाखवले आहे. मराठी संस्कृतोद्भव नाही. ती संस्कृतपेक्षा जुनी भाषा आहे. नात्याने ती संस्कृतची मावशी आहे.
गाथा सप्तसतीतील मराठी, जे महाराष्ट्री प्राकृत या नावाने ओळखले गेले, हरिभद्र, भद्रबाहू, उद्योतन सुरी आदींचे लेखन आणि चक्रधर, ज्ञानेश्वर, चोखा, चोंभा, सावतामहाराज, नामदेव, संत बहिणाबाई, एकनाथ, बखरी, ते फुले-आंबेडकर, अण्णाभाऊ, लोकहितवादी, आगरकर, रानडे, टिळक, विष्णुभट गोडशे, लक्ष्मीबाई टिळक, साने गुरूजी, बेडेकर, भाऊ पाध्ये, नेमाडॆ, ढसाळ, कोलटकर, चित्रे, यांच्या साहित्याची महत्ता आणि त्यांचे "जैविक नाते" महत्वाचे आहे.

अभिजात मराठी भाषा म्हणजे श्रेष्ठ मराठी भाषा. "इथे कुलेजातीवर्ण हे अवघेचि गा अकारण!"

अनेक जाती धर्माचे लोक मराठी बोलतात. अनेक पंथ, धर्म, प्रांत, संस्कृती यांना मराठीने पोटात सामावून घेतलेले आहे. त्यामुळे खांद्यावर मायमराठीची पताका घेतलेल्या साडेबारा कोटींची ती "भाषांमाजी भाषा साजिरी आहे." संत एकनाथ म्हणतात, ती चोरांपासून जन्मलेली नाही. ती कष्टकर्‍यांची-ज्ञानवंतांची भाषा आहे. ही श्रमाची-घामाची, निर्मितीची भाषा आहे. मराठी ज्ञानभाषा आहे. धर्मभाषा आहे. अक्षरभाषा आहे. अजरामर भाषा आहे. जगातील सर्व भाषा मेल्या आणि अवघ्या चार जगल्या तरी मराठी जगणार आहे हे लक्षात ठेवा.

अमृतातेही पैजा जिंकणारी, स्वत:चे राज्य आणि श्रेष्ठ साहित्य असलेली मराठी ही जगातली चौथ्या क्रमांकाची राज्य भाषा आहे. मराठीतले कोश वांड्मय तर जगातले दुसर्‍या क्रमांकाचे कोश वांड्मय आहे.

नव्या शासन परिपत्रकात खरं काय आहे ?

आदेश म्हणजे order, परिपत्रक म्हणजे circular, ताकीद म्हणजे warning, शासन निर्णय म्हणजे Government Resolution. या प्रत्येक शब्दाचे अर्थ वेगळे आहेत; अर्थ वेगळे असल्यानं त्याच्या अंमलबजावणीच्या 'त-हा'ही वेगळ्याच असणार हे ओघानं आलंच.
एकूण काय तर बातमी देणाऱ्या पत्रकारांना शासन व्यवहारात मराठी वापराच्या संदर्भात नेमकं काय झालंय याची खातरजमा करून घेण्याची गरज वाटलेली नाही.

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची आपली मागणी दहा वर्षे जुनी असताना हा आदेश आल्यानं एकुण उत्साहाचं वातावरण आहे.
हा संभ्रम दूर व्हावा म्हणून खातरजमा केली असता उत्तर मिळालं यात नविन काहीही नाही. जुन्याच परिपत्रकांची ती उजळणी आहे.
[This is compilation of all previous circulars.Nothing new.]

भटोबास हे तेराव्या शतकातले ख्यातनाम विद्वान, लेखक आणि धर्मचिंतक होते.
त्यांच्याशी बोलताना जर कोणी अन्य भाषेत बोलू लागला तर ते त्याला म्हणत, " तुमचे अस्मात कस्मात मी नेणेगा. मज श्री चक्रधरे निरूपिली मर्‍हाठी. तियाचि पुसा." मला तुमचे अस्मात कस्मात समजत नाही. माझ्याशी मराठीतच बोला.
आपण नेमके कोण आहोत? या भटोबासांचे वंशज की वैरी?

-प्रा.हरी नरके
harinarke@gmail.com
[लेखक अभिजात मराठी भाषा समितीचे समन्वयक आहेत.]

Thursday, May 10, 2018

जोतिराव फुलेंच्या 'महात्मा' पदवीला १३० वर्षे पूर्ण



दिव्य मराठी, नाशिक सिटी, शुक्रवार, दि. 11 मे 2018, पृ. 5
जोतिराव फुलेंच्या 'महात्मा' पदवीला १३० वर्षे पूर्ण

स्त्री-पुरुष समता, जातीनिर्मूलन, संसाधनांचे फेरवाटप, ज्ञाननिर्मिती, धर्मचिकित्सा, आंतरजातीय विवाह आणि सामाजिक न्याय या कार्यक्रमपत्रिकेच्या आधारे आधुनिक भारताच्या पायाभरणीचे काम करणारे जोतिराव फुले यांना ११ मे १८८८ रोजी मुंबईकरांनी 'महात्मा' ही पदवी बहाल केली. सामान्य माणसांनी आपल्या उद्धारकर्त्याला अशी पदवी देऊन सन्मानित करण्याची ही देशातील पहिलीच घटना होती. आज (दि. ११ ) या घटनेला १३० वर्षे पूर्ण होत आहे. यानिमित्ताने महात्मा या पदवीची पार्श्वभूमी, जोतिरावांचे अंगभूत गुण यांचा 'दिव्य मराठी'ने घेतलेला विशेष आढावा...

महात्मा फुले समग्र वाङमयाचे संपादक तथा महात्मा फुलेंविषयक अनेक पुस्तकांचे लेखन करणारे प्रसिद्ध साहित्यिक - प्रा. हरी नरके यांनी खास 'दिव्य मराठी'साठी संकलित केलेली ही माहिती.

१९५१ ला नाशकात पहिला पुतळा बाबासाहेब आंबेडकर त्यांना आपला गुरू मानत असत. १९५१ साली त्यांनी फुल्यांचा पहिला पुतळा नाशिकमधील पंचवटीत उभारला.
महान व्यक्ती काय म्हणतात -
महात्मा गांधी : 'जोतिराव फुले देशके पहले महात्मा थे. असली महात्मा थे'.
स्वातंत्र्यवीर सावरकर : फुले हे 'समाज क्रांतिकारक' होते.
ख्यातनाम इतिहासकार डॉ. रामचंद्र गुहा : जोतिराव हे आधुनिक भारताचे शिल्पकार
१८७३ साली त्यांनी आपला गुलामगिरी हा ग्रंथ अमेरिकेतील निग्रो चळवळीला अर्पण केला होता. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या भारतभेटीत ही अर्पणपत्रिका बघून या महात्म्याला 'सलाम' केला. जागतिक सामाजिक चळवळींना असा पाठिंबा देण्याचे त्या काळातले असे दुसरे उदाहरण सापडणार नाही.

अशी दिली पदवी -
जोतिरावांच्या वयाला ६१ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ११ मे १८८८ रोजी मुंबईतील भायखळ्याजवळच्या मांडवी-कोळीवाडा येथे आग्री, भंडारी, कोळी कामगार बांधव हजारोंनी एकत्र जमले. मांडवी-कोळीवाड्यातील रघुनाथ महाराज सभागृहात हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. भायखळ्याच्या परिसरात या दिवशी सणासुदीचा उत्साह होता. नारायण मेघाजी लोखंडे, दामोदर सावळाराम यंदे, स्वामी रामय्या व्यंकय्या आय्यावारू, रावबहादूर वंडेकर, मोरो विठ्ठल वाळवेकर, भाऊ डुंबरे पाटील आदींनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी उपस्थित आग्री, कोळी, भंडारी समाजातील बांधवांनी जोतिरावांना 'महात्मा' ही पदवी बहाल केली.

या संचितामुळे जोतिराव झाले महात्मा -

जोतिरावांनी त्या काळी मांडलेले विचार-

१८८२ मध्ये प्राथमिक शिक्षण मोफत, सक्तीचे आणि सार्वत्रिक झाले पाहिजे अशी त्यांनी सरकारकडे मागणी केली होती. अशी मागणी करणारे ते संपूर्ण आशिया खंडातले पहिले शिक्षणतज्ज्ञ होते.
१८८३ मध्ये त्यांनी शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव मिळाल्याशिवाय शेती आणि शेतकरी यांचे दैन्य संपणार नाही असे 'शेतकऱ्याचा आसूड'मध्ये सांगून या समस्येकडे देशाचे लक्ष वेधले होते.

आधुनिक पद्धतीची शेती करणे, बांध बांधून पाणी अडवावे, म्हणजे जमीन सुपीक होईल. धरणे बांधून नद्या आडवाव्यात. शेतीला नळाद्वारे पाण्याचा पुरवठा करणे, शेतीला जोडधंदे, पूरक उद्योग यातून शेती किफायतशीर बनविण्याचा नकाशा त्यांनी मांडून दाखवला होता.

बांधकाम व्यावसायिक अन् उद्योगपती -
स्वत: फुले एक बांधकाम व्यावसायिक होते. पुण्यातील कात्रजचा बोगदा, बंडगार्डनचा पूल, डावा कालवा, रस्ते, इमारतींची अनेक कामे त्यांच्या पुणे व्यावसायिक आणि कंत्राटदार कंपनीद्वारे करून पुण्यातील एक यशस्वी उद्योगपती म्हणून त्यांनी नावलौकिक कमावलेला होता. ते नेशन बिल्डर होते याबाबत दुमत होऊ शकत नाही.

कृषी अर्थशास्त्रज्ञ : ज्या काळात ९० टक्के भारतीय शेतीवर उपजीविका करीत होते त्या काळात शेतकऱ्यांच्या समस्या देशाच्या ओपिनियन मेकर्ससमोर ऎरणीवर आणणारे पहिले कृषी-अर्थशास्त्रज्ञ फुलेच होत.

मुला-मुलींना वयाच्या सहाव्या वर्षापासून शेती, उद्योगाचे शिक्षण सक्तीचे केले होते. त्यांनीच प्रथम त्रिभाषा सूत्र सुचवले. शैक्षणिक गळती रोखण्यासाठी गरीब मुलांना विद्यावेतन देण्याचा उपाय अमलात आणलेला होता.

पुण्याचे आयुक्त म्हणून केले सात वर्षे काम -

१८७६ ते १८८३ याकाळात ते पुण्याचे आयुक्त होते. घरोघरी नळाद्वारे पाणी पुरविण्याची योजना यशस्वी करण्यासाठी ते झटले. उत्तम रस्ते, शाळा, आरोग्य यावर त्यांचा भर होता. गव्हर्नरच्या स्वागतावर पैसा उधळण्याला तसेच मंडईच्या बांधकामाला त्यांनी विरोध केला. या पैशाचा वापर शिक्षणासाठी करावा असा आग्रह होता. आज सर्वच शहरांतील बेकायदा बांधकामांच्या प्रश्नाने अक्राळविक्राळ रूप धारण केलेले आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त फुले यांनी आपल्या घरातील स्नानगृहाच्या अंतर्गत बांधकामात सुधारणा करण्यासाठीसुद्धा नगरपालिकेकडे परवानगीसाठी अर्ज केलेला बघून चकित व्हायला होते.

मांडवी-कोळीवाडा परिसरातील याच सभागृहात १३० वर्षांपूर्वी जोतिरावांना महात्मा ही पदवी देण्यात आली.

सर्वच बाबतीत अव्वल -

भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण लोखंडे यांना पहिली कामगार संघटना बांधायला जोतिरावांचेच प्रोत्साहन होते. टिळक-आगरकरांना पहिल्या तुरुंगवासात त्या काळात (१८८२) जामीन द्यायला आणि सुटकेनंतर त्यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यातही तेच पुढे होते.

१८६९ साली जोतिरावांनी मराठीतले पहिले शिवचरित्र लिहिले.

१८८o साली त्यांनी देशात पहिल्यांदा शिवजयंती उत्सव सुरू केला. रायगडावरील शिवसमाधीची डागडुजी केली आणि शिवरायांना महानायक म्हणून लोकमानसात प्रस्थापित केले. पुण्यात हिराबागेत आणि मुंबईला लालबाग-परळ भागात करण्यात आलेल्या शिवजयंती कार्यक्रमांच्या नोंदी उपलब्ध आहेत. फुले चरित्रकार पंढरीनाथ सीताराम पाटील, माधवराव बागल, धनंजय कीर यांनी त्याबाबतचे पुरावे दिलेले आहेत.

आजच्या काळातील महत्त्व-
शिक्षणहक्क कायद्याद्वारे २०१० साली ही मागणी पूर्ण झाली.
शेती उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव देण्याचाच पर्याय विविध पातळ्यांवर आणि व्यासपीठावर दिला जातो. सरकारही या मताशी आता अनुकूल होत आहे.
जलयुक्त शिवार, पाणी अडवा - पाणी जिरवा, ठिबक सिंचन यांसारख्या सिंचन योजनांचे बीजच जोतिरावांच्या विचारातून आले.
त्यांनी दाखवलेल्या गळतीबाबतच्या इतर १५ कारणांचा आणि उपायांचा अभ्यास आजही मार्गदर्शक ठरावा.

शेअर बाजाराच्या टिप्स दिल्या कवितेतून -

शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी कोणती दक्षता घ्यावी यावर त्यांनी कविता लिहिल्या.

ते ग्रंथप्रकाशनाच्या व्यवसायात होते. सोन्याच्या दागिन्यांचे साचे विकण्याची त्यांच्याकडे एजन्सी होती.

सामाजिक न्यायाचे सूत्र -
सामाजिक न्यायासाठी त्यांनी शुद्र-अतिशुद्रांना आरक्षण देण्याची मागणी केली.

आजचे सगळे राजकारण विकास आणि सामाजिक न्याय याच सूत्रांच्या भोवती फिरत आहे.
जोतिरावांचे राजकारण समजून घेण्यासाठी "सत्तेवाचून सकळ कळा झाल्या अवकळा" हे जोतिसूत्र समजून घेतले पाहिजे.

-प्रा.हरी नरके
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/nashik/nashik-city/248/11052018/0/5/
दिव्य मराठी, नाशिक सिटी, शुक्रवार, दि. 11 मे 2018, पृ. 5
..........................
जोतिराव फुलेंच्या 'महात्मा' पदवीला १३० वर्षे पूर्ण
.........................
http://digitalimages.bhaskar.com/divyamarathi/epaperpdf/11052018/10NASIK%20PULLOUT-PG5-0.PDF
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/nashik/nashik-city/248/11052018/0/5/

Published on 11 May-2018

Saturday, May 5, 2018

मराठीला कशाला पाहिजे अभिजात दर्जा?


जगातली चौथ्या क्रमाकाची सर्वश्रेष्ठ भाषा असलेल्या मराठीला कशाला पाहिजे अभिजात दर्जा?
- प्रा.हरी नरके

कशाला पाहिजे अभिजात दर्जा? असा प्रश्न बडे साहित्यिक विचारतात तेव्हा मला खुप दु:ख वाटतं.
माध्यमं ज्यांचं नित्यनेमानं छापत असतात अशा प्रसिद्धमुल्य असलेल्या थोरामोठ्यांनी असली अडाणी वक्तव्यं करावीत ही मला चिंतेची बाब वाटते.
गेल्या दहा वर्षात ह्या विषयावर उदंड चर्चा झालेली आहे. त्यातलं काहीही ज्यांनी वाचलेलं, ऎकलेलं नसतं, मात्र प्रसिद्धीचं वलय असल्यानं वारेमाप मुक्ताफळं उधळायची हौस असलेले हे लोक आपल्या या अवसानघातकी वक्तव्यांनी मराठीचं नुकसान करीत असतात.

तुम्ही कितीही हुशार असलात म्हणून कशाला पाहिजे ड्रायव्हींग लायसन्स? कशाला पाहिजे मॅरेज सर्टीफिकेट? कशाला पाहिजे शाळा सोडल्याचा दाखला किंवा पदवी प्रमाणपत्र असं विचारून चालतं का? ह्या "थोर" लोकांनी शिवरायांना विचारलं असतं कशाला पाहिजे स्वराज्य? त्यांनी लो. टिळक, म.गांधी,पं. नेहरूनांही विचारलं असतं कशाला पाहिजे स्वातंत्र्य? स्वराज्यानं किंवा स्वातंत्र्यानं असं काय भलं होणारेय?

निरक्षर किंवा अल्पशिक्षितांचा अडाणीपणा परवडला पण अशा ह्या उच्च शिक्षितांचा अडाण**पणा फार महागात पडतो.
स्वत:च्या अज्ञानाची जाहीरात करण्याची ही चढाओढ बघितली की हसावं की रडावं तेच कळत नाही.

होय, आम्हाला मराठी भाषेला अभिजात दर्जा हवाय ते मराठीचं गोमटं व्हावं म्हणून.
मराठी ही स्वतंत्र, स्वयंभू आणि जागतिक भाषा आहे ह्यावर शिक्कामोर्तब होण्यासाठी.
गुलामीच्या प्रथेत मालकाचा फायदा असेलही पण गुलामाचा कोणता फायदा असतो?

आमची मायबोली दुसर्‍या अमूकतमूक भाषेची गुलाम आहे, तिची प्रतिकृती [ झेरॉक्स ] आहे, आश्रित किंवा सालगडी आहे अशा वल्गना करणारे लोक मराठीचे सुपुत्र आहेत की मराठीचे मारेकरी?

मराठीला अडीच हजार वर्षांचा वैभवशाली इतिहास असताना मराठीचं वय चोरणारे, ती अवघी 800 वर्षांची भाषा आहे असं पसरवणारे हे महाभाग नेमके कोणाचे हस्तक आहेत?
संस्कृत वाणी देवे केली मग मराठी काय चोरापासून झाली? असा रोकडा सवाल विचारणारे संत एकनाथ आज असते तर त्यांनी आपला सोटा कोणाच्या टाळक्यात हाणला असता?
"माझा मराठाची बोलू कौतुके, अमृतातेही पैंजा जिंके" असं संत ज्ञानेश्वर कोणाला बजावत होते?

जागतिक किर्तीचे भाषातज्ञ प्रा. गणेश देवी ज्या मराठीला जगातली चौथ्या क्रमाकाची सर्वश्रेष्ठ भाषा ठरवतात, ज्ञानपीठ विजेते भाषाशास्त्रज्ञ भालचंद्र नेमाडे ज्या मराठीच्या
अभिजाततेचे पोवाडे गातात, गुलजारही जिथे मराठीची ही मागणी उचलून धरतात तिथे हे विरोध करणारे तथाकथित महाभाग कोण?

तुमचा अस्मात-कस्मात मी नेणेगा,.... माझ्याशी बोलायचं असेल तर मराठीतच बोला असं महापंडीत भटोबास कोणाला ठणकावत होते?

हाल, पादलिप्त, प्रवरसेन, हरिभद्र, उद्योतन सुरी, आणि आपल्या इतर अनेक पुर्वजांनी इ.स.पुर्व 500 ते इ.स. 1200 अशी सतराशे वर्षे मराठी जपली, वाढवली, समृद्ध केली ती पराभूत मानसिकतेसाठी?

पुढे संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकारामांनी, गोडसे भटजी, लोकहितवादी, फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ साने गुरूजींनी जिच्या वैभवात जागतिक भर घातली ती मराठी हलकी किंवा हिनकस आहे म्हणून?

केंद्र सरकारनं ज्या चार निकषांच्या आधारे सहा भारतीय भाषांना हा दर्जा दिलाय ते चारही निकष मराठीने जर पुर्ण केलेले आहेत, तरी हा दर्जा केंद्र सरकार का देत नाही असा जाब सरकारला विचाराना?
त्याऎवजी कशाला हवा हा दर्जा? 
मराठीला दिला तर इतरांनाही तो द्यावा लागेल,
अभिजातमुळे मराठीचं काय भलं होणार आहे?

असले तेजोभंग करणारे प्रश्न विचारणारे हे लोक कोणाचे हस्तक आहेत?

-प्रा. हरी नरके