Saturday, April 7, 2018

आणि महात्मा फुले जयंती रूजू लागली-



[महात्मा जोतीराव फुले यांचे अस्सल निगेटिव्हवरून विकसित केलेले कृष्णधवल छायाचित्र.]

थोर सत्यशोधक केशवराव विचारे गुरूजी यांच्याकडच्या दुर्मिळ पुस्तकांमध्ये आणि कागदपत्रांमध्ये सातत्यानं शोध घेतल्यावर मला एक खजिना सापडला.
.....................

आपल्या देशात एखादी चांगली गोष्टही रुजायला किती काळ जावा लागतो. त्यासाठी धडपडणारी व्यक्ती अगदी थकून जाते. नाउमेद होते. 25/30 वर्षांपुर्वी तुमच्यापैकी कोणाला महात्मा फुले जयंतीचा कार्यक्रम झाल्याचे आठवतेय?
नाही ना?
अहो, होतच नव्हती तर आठवणार कुठून?

फुले जयंती ही अगदी ताजी घटनाय, प्रथाय. एक स्फुर्तीदायक उपक्रमाय.
पण त्यासाठी किती रक्त आटवावं लागलं माहितीय?

महात्मा जोतीराव फुले यांच्या महत्वाच्या चरित्रकारांपैकी म्हणजे, पंढरीनाथ सीतराम पाटील, धनंजय कीर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रा.गं.बा.सरदार, प्रा.भा.ल.भोळे, प्रा.य.दि.फडके, प्रा.मा.गो.माळी, बा.ग.पवार, प्रा.गजमल माळी यातल्या कोणाच्याही पुस्तकात महात्मा फुलेंची जन्मतारीख दिलेली नाही. त्यांचं 1827 हे जन्मवर्ष फक्त माहित होतं. तारीख सपाडतच नव्हती.

महात्मा फुले यांची जन्मतारीख माहितच नसल्यानं देणार तरी कशी आणि कुठून?
या महात्म्याचं महापरिनिर्वाण 28 नोव्हेंबरला झाल्यामुळे त्यांची पुण्यतिथी किंवा त्यांचा स्मृतीदिन 28 नोव्हेंबरला गंभीरपणे पाळला जायचा. जिभेला/लेखणीला वळण पडल्यामुळे पत्रकार मित्र स्मृतीदिवस साजरा झाला असं लिहीतात/ म्हणतात, जे चुकीचं आहे.

1969 साली महात्मा फुले समग्र वाड्मयाच्या प्रथामावृत्तीच्या प्रस्तावनेत संपादक धनंजय कीर आणि प्रा. स.गं.मालसे यांनी फुल्यांच्या जन्माची एक आठवण नमूद केलेली होती. शनिवारवाड्याला लागलेली आग या घटनेच्या आधारे त्यांनी फुले यांचा जन्म 20 फेब्रुवारी 1828 ला झाला असावा अशी एक शक्यता वर्तवून ठेवली होती. त्याबाबत मी त्या दोघांशी प्रत्यक्ष भेटून चर्चाही केलेली होती.

तथापि यात एक अडचण होती. फुल्यांच्या सर्वच चरित्रकारांनी फुले जन्मवर्ष 1827 दिलेले असल्यानं 1828 ची ही नोंद सदोष वाटत होती.पटत नव्हती.
माझं "महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन" हे पुस्तक 1989 ला प्रकाशित झालं. त्यातून कमलताई विचारे यांचा माझा परिचय झाला. थोर सत्यशोधक केशवराव विचारे गुरूजी यांच्या त्या सुनबाई. त्यांच्याकडच्या दुर्मिळ पुस्तकांमध्ये आणि कागदपत्रांमध्ये सातत्यानं शोध घेताना मला एक खजिना सापडला.

1891 साली सावित्रीबाई फुले यांच्या हस्ते प्रकाशित झालेलं "महात्मा फुले यांचे अमर जीवन" हे चरित्र मला त्यात मिळालं.
स्मृतीशेष कॉ. गोविंद पानसरे यांचे पणजोबा नारायण बाबाजी पानसरे यांनी लिहिलेले हे चरित्र. ते अतिशय मौलिक आणि विश्वासार्ह आहे.
त्यांच्या हस्ताक्षरातील काही पत्रंही मिळाली. ते आपलं नाव भलं मोठं लांबलचक लिहित असत. महाधट नारायण बाबाजी पानसरे पाटील."

या चरित्रात पानसरेंनी महात्मा फुले यांची जन्मतारीख 11 एप्रिल 1827 ही दिलेली सापडली.

महात्मा फुले यांच्या जन्माची नेमकी तारीख मिळाली तो क्षण माझ्यासाठी अक्षरश: युरेका ! युरेका! चा क्षण होता.

गुरूवर्य डॅा. य. दि. फडकेसर, डॅा. बाबा आढाव, डॅा. भा. ल. भोळेसर,प्रा.गो.पु.देशपांडे या सार्‍यांशी त्याबाबत बोललो. खात्री करून झाल्यावर त्यांचा पाठींबा मिळवला आणि मगच तत्कालीन मुख्यमंत्री श्री.शरद पवार यांना मी पत्र लिहिलं. सातत्यानं त्याचा पाठपुरावा करावा लागला.खातरजमा करण्यात बराच वेळ गेला.

फुले जन्मतारखेबाबत मी म.टा., तरूण भारत आणि इतर अनेक वर्तमानपत्रात लेख लिहिले.
या जन्मतारखेबाबत शासकीय समितीच्या मान्यतेची सर्व प्रक्रिया पुर्ण करून घेतली.
तेव्हा कुठे मान्यता मिळाली.

मग तातडीनं सर्व शासकीय पुस्तकं आणि दस्तावेजात ही तारीख नोंदवली.
मुख्य म्हणजे विधानभवनातील महात्मा फुले पुतळ्याखाली ही नोंद करून घेतली.

महात्मा फुले यांची शासनस्तरावर तोपर्यंत झळकलेली रंगीत तैलचित्रं चुकीची होती.
गोपीनाथराव पालकर, डॅा. बाबा आढाव आणि विजय व सरोजा परूळकर यांच्या सहकार्यानं महात्मा फुले यांच्या काचेच्या अस्सल निगेटिव्हवरून त्यांचा अस्सल कृष्णधवल फोटो विकसित करण्यात आम्हाला यश आलं. त्यासाठी अनेकांचं सहकार्य मिळालं.

28 नोव्हेंबर 1992 ला शासनातर्फे या अस्सल कृष्णधवल छायाचित्राचे प्रकाशन करून त्यावर ही तारीख नोंदवली.
सदर फोटो हजारोपट मोठा करून फुलेवाड्यात बसवला.

सातत्याने गेली 25/30 वर्षे चिकाटीनं पाठपुरावा आणि धडपड, प्रयत्न केल्यानंतर आता कुठं महात्मा फुले जयंती साजरी होऊ लागलेली आहे.
कालच देशातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षांनी या वर्षीपासून महात्मा फुले जयंती देशभर करणार असल्याचं जाहीर केलं.
या वर्षीपासून ही जयंती अनेक ठिकाणी होईल असं चित्र आहे.

अर्थात ती नाचगाणी, फ्लेक्स, डि.जे. उन्मादी जल्लोश, नाच तमाशे असल्या ओंगळवाण्या पद्धतीनं होऊ नये. शिक्षण, प्रबोधन, संवाद,जनजागरण, साहित्य,कला यांच्या माध्यमातून ही जयंती संस्मरणीय व्हायला हवी.
एकुण काय?

एखादं चांगलं काम रुजायलाही खुप काळ लोटावा लागतो. खुप पाठपुरावा करावा लागतो.
पण सत्य आणि कळकळ असेल तर यश मिळतंच.
-प्रा. हरी नरके
............................................

No comments:

Post a Comment