Saturday, December 16, 2017

सावित्रीबाई किती देखण्या होत्या ना?


"सावित्रीबाई किती देखण्या होत्या ना? महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांच्या सहजीवनाबद्दल मला अधिक माहिती सांगा"- सोनिया गांधी
-प्रा.हरी नरके
संसदेच्या प्रांगणात उभारलेल्या महात्मा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या उद्धाटन समारंभाला देशातील सर्वोच्च पदांवरील अनेक नेते उपस्थित होते. त्यांना या दांपत्याच्या जीवन, कार्य आणि विचारांचा परिचय करून देणारे एक भव्य प्रदर्शन कार्यक्रमाच्या ठिकाणी उभारलेले होते. त्या प्रदर्शात सोनियाजी सुमारे एक तास रमल्या होत्या. त्यांनी त्यासाठी दिलेला एव्हढा वेळ बघून त्यांच्यासोबत असलेले डॉ.मनमोहन सिंग आणि मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनाही आश्चर्य वाटले. प्रत्येक छायाचित्र काळजीपुर्वक पाहिल्यानंतर त्या त्याबद्दल अधिक माहिती विचारत होत्या. महात्मा फुले यांचा मूळ फोटो पाहिल्यावर त्यांनी विचारले, "हा फोटो कधी काढलेला आहे? यावेळी जोतीरावांचे वय काय होते?"
मी त्या फोटोची तारीख, वार आणि वेळ सांगताच त्या म्हणाल्या, " ही नेमकी माहिती तुम्हाला कशी कळली?"
फोटोशेजारच्या टेबलवर असलेले कॅलेंडर, घड्याळ आणि टेबलावरचा टाइम्स ऑफ इंडीयाचा अंक त्यांना दाखवताच त्यांनी अगदी जवळून त्याचे बारकाईने निरीक्षण केले.
सावित्रीबाईंचे छायाचित्र बघून त्या म्हणाल्या, "सावित्रीबाई किती देखण्या होत्या ना? त्यांच्या डोळ्यातले तेज बघा. त्यांच्या चेहर्‍यावरची प्रसन्नता आणि त्यातला गोडवा बघा. जोतीराव खुपच लकी असले पाहिजेत, त्यांना अशी धाडशी, प्रतिभावान आणि कर्तबगार पत्नी मिळाली."
त्या दोघांचे एकत्रित तैलचित्र बघितल्यावर त्या म्हणाल्या, "प्रोफेसर, मला त्यांच्या सहजीवनाबद्दल तपशीलवार अधिक माहिती सांगा."
त्यांचे लग्न बालपणात झाले होते, जोतीरावांनी सावित्रीबाईंना घरात शिक्षण दिले, ही माहिती ऎकताना त्या सहजपणे म्हणाल्या, "किती रोमॅंटिक ना?"
जोतीरावांना लोकांनी महात्मा ही पदवी दिली हे ऎकताच त्या म्हणाल्या, "जोतीराव महानच होते. पण सावित्रीबाईंचाही असाच गौरव झाला असेल ना?"
"नाही झाला," असं मी म्हटल्यावर त्या हळहळल्या.
त्यांनी विचारलं, "त्यांनाही समाजाने का बरं अशी एखादी पदवी नाही दिली?"
मी निरूत्तर होतो. त्याच म्हणाल्या, " असो, आजतर त्यांना आपण राष्ट्रमाता मानतोय!" 
त्या दोघांनी 50 वर्षे संसार केला हे ऎकल्यावर त्या म्हणाल्या, " गोल्डन हाफ सेंच्युरी! सिंपली ग्रेट." त्याक्षणी त्या काहीशा भावूक झाल्यासारख्या दिसल्या. पण लगेच त्या सावरल्या.
सावित्रीबाईंच्या प्रत्येक कामाबद्दल त्या समरसून माहिती घेत होत्या.
शेवटी त्यांनी शेरेबुकात लिहिले, " आज आपण थरारून गेलो आहोत. महात्मा गांधींनी ज्यांना खरा महात्मा म्हटले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना आपले गुरू मानले, त्या महापुरूषाचे जीवनकार्य समजावून घेताना मला अभिमान वाटला. सावित्रीबाई या भारतीय स्त्रियांच्या प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांचं सहजीवन कृतार्थ होतं. या प्रतिभावंत जोडप्याला माझे विनम्र अभिवादन!"
आम्ही त्यांना भॆट दिलेला दोघांचा पुतळा आणि त्यांच्यावरची पुस्तकं गाडीत ठेवलीयत ना? याची निघताना त्यांनी पीएकडे आवर्जून चौकशी केली.
मुख्यमंत्र्यांना त्या म्हणाल्या, "माझ्या पुढच्या महाराष्ट्र भेटीत मला महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या घरी जायचंय. माझ्या कार्यक्रमात ते नक्की घ्या."
मला म्हणाल्या, "त्या दोघांच्या घरात जाऊन मला त्यांची आणखी माहिती समजून घ्यायला आवडेल. थॅंक्स अ लॉट प्रोफेसर!"
त्या प्रदर्शनाला पंतप्रधान अटलजी आणि उपराष्ट्रपती व अन्य मान्यवरांनीही भेटी दिल्या. मी त्यांनाही माहिती सांगितली पण त्या भेटी धावत्या आणि केवळ औपचारिक होत्या. त्यात फक्त शिष्टाचार होता. खोलवरची आत्मियता होती असं वाटलं नाही. त्या प्रदर्शनात खर्‍या अर्थानं मनापासून रमल्या त्या एकट्या सोनियाजीच!
-प्रा.हरी नरके

No comments:

Post a Comment