Friday, September 29, 2017

त्याला कसं समजावून सांगावं आम्हाला कळतच नव्हतं-

आमच्या जवळची औषधं संपली म्हणून एका दुकानात चौकशी केली. एक फाटक्या कपड्यातली अल्पशिक्षित गरीब म्हातारीबाई ते दुकान चालवित होती. तिनं औषधं काढून दिली. त्या सगळ्यांची Expiry Date 2015 मध्येच संपलेली होती. तिला विचारलं, कधी आणलीस ही औषधं?
ती म्हणाली, गेल्याच आठवड्यात औषध कंपनीचा माणूस येऊन देऊन गेला.
तिच्याकडं बिस्कीटं मागितली तर त्यावरचीही Expiry Date एक वर्षापुर्वीची होती.
आपण शिकले-सवरलेले, चतुर शहरी लोक असं सारं Expiry Date संपलेलं जर या मागास प्रदेशातल्या सीमा भागातल्या गरिबांना पुरवत असू तर आग लागो त्या शिक्षणाला!

इकडचे लोक हिल एरिया [पर्वतीय-डोंगराळ प्रदेश] आणि प्लेन एरिया [सपाट प्रदेश] असं वर्णन करतात. उदा. मनीपूरची राजधानी इम्फाळ आणि त्रिपुराची राजधानी आगरताळा ह्या प्लेन एरियात असल्यानं एसपैस पसरलेल्या आहेत. रस्ते मोठे आहेत. उंच इमारती आहेत.
मात्र नागालॅंडची राजधानी कोहिमा आणि मिझोरामची राजधानी ऎजावल ह्या हिल एरियात असल्यानं रस्ते अतिशय अरूंद, त्यामुळे सतत ट्राफिक जाम.
या प्रदेशातली सरकारं भाजपाची असोत की काँग्रेसची रस्त्यांची पार वाट लागलेली. मात्र कम्युनिस्ट असलेल्या माणिक सरकारांनी त्रिपुरातील रस्ते अतिशय उत्तम जपलेले आहेत. हा फरक तीव्रपणे जाणवतो.
आणखी एक प्रकर्षानं जाणवणारी गोष्ट म्हणजे अनेक राज्यात सायकल रिक्षा आहेत. सायकल चालवणारांची पोटं पार खपाटीला गेलेली असतात. हाडांचा सापळा दिसत असतो. अशा रिक्षात बसावं तर त्या सायकलवाल्याच्या कष्टांनी हृदय पिळवटून जातं. न बसावं तर त्याला रोजगार कसा मिळायचा? सर्व राज्यांमध्ये आता आपल्या बजाज रिक्षा आलेल्या आहेत. सायकल रिक्शांचा धंदा बसलाय. त्रिपुरा सरकारनं मात्र एक भली गोष्ट केलीय. सायकल रिक्षांना बॅटर्‍या बसवून त्यांचंच रूपांतर यांत्रिक सायकल रिक्षात केलंय. देशातील सर्वात साध्या राहणार्‍या आणि संपत्तीनं सर्वात गरीब असलेल्या मुख्यमंत्री कॉमरेड माणिक सरकार यांना त्यासाठी लाखलाख धन्यवाद.
तीन राज्यं ख्रिश्चन बहुल, दोन राज्यं हिंदु बहुल, एकात मोठ्या संख्येनं मुस्लीम तर दुसर्‍यात बौद्ध अशी सर्वधर्मिय प्रजा.
सिल्चर आगरताळा रस्त्यावर त्रिपुरात "हॉटेल धाबा" असं लिहिलेलं एक टपरीवजा रेस्टॉरंट दिसलं. आजवरच्या प्रवासात सापडलेलं हे एकमेव शाकाहारी हॉटेल. त्यानं उत्तम जेवन दिलं. रात्री 12 वाजेपर्यंत हॉटेल चालू असतं असं तो म्हणाला. राज्यात सर्वत्र शांतता असल्यानं हॉटेलं, दुकानं उशीरापर्यंत चालू ठेवता येतात असंही त्यानं सांगितलं. पुढं तो अगदी सहजपणानं म्हणाला,  "इधर सब हिंदु हैं ना इसलिए कोयी गरबड नहीं हैं." तो हे आमच्या अतिशय सज्जन आणि कर्तव्यदक्ष ड्रायव्हरला सांगत होता. त्याला काय माहित हा गुणी छोकरा मुस्लीम आहे म्हणून!
आपल्याकडे गणपतीच्या वर्गणीसाठी जशी दादागिरी चालते तशा बेकार युवकांच्या झुंडीच्या झुंडी दुर्गापुजेच्या वर्गणीसाठी रस्ते अडवून उभ्या असायच्या. विशेषत: हिंदुबहुल आसाम, त्रिपुरात ही लूट सर्रास चालू होती. प्रत्येक गावाच्या बाहेर अशी ही रोजगारहमी योजना राजरोस चालू असायची. अत्यंत अरेरावीनं ते वर्गणीच्या नावावर खंडण्या वसूल करायचे. वर दमही द्यायचे. या अर्थानं सगळा भारत एकच आहे. हीच तेव्हढी राष्ट्रीय एकात्मता.
आसामात रस्त्यात कायस्थग्राम नावाचं रेल्वे स्टेशन लागलं. तिथल्या हायवे रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वे आली तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूला चक्क साखळ्या अडकवून रस्ता बंद केलेला. चौकशी केली तर दोन्ही फाटकं गेल्या दोन वर्षांपासून बिघडल्यानं बंद असल्याचं रेल्वे कामगारानं सांगितलं. तक्रार करून थकलो पण वरिष्ठ अधिकारी काहीच दखल घेत नाहीत असंही तो म्हणाला.
आसाम, मनीपूर, नागालॅंड, मिझोराम मधले रस्ते एव्हढे खराब का? असा प्रश्न मी तिथल्या अनेक स्थानिक लोकांना विचारला. आश्चर्यकारकरित्या सर्वांनी एकच उत्तर दिलं. इथले राजकारणी चोर आहेत. रस्त्यांचे पैसे दर 6/8 महिन्याला उचलतात.100% पैसे खातात पण रस्ता दुरूस्ती करीत नाहीत. शेकडो किलोमीटर अंतरवरच्या सर्वांचंच उत्तर एकच कसं? यालाही राष्ट्रीय एकात्मताच म्हणायची का?
इथल्या सगळ्याच राज्यात पावलापावलावर एकाच महापुरूषाच्या प्रचंड बड्याबड्या फोटोंचे प्रचंड मोठेमोठे फ्लेक्स लागलेले दिसतात. ग्रामीण महिलांना गॅस दिला, शौचालयं बनवून सन्मान दिला, याव नी तॅव.
प्रत्यक्षात सगळीकडेच चुली दिसतात. गो एनीव्हेयर ऑल वावर इज आवर असा मामला असतो. गॅस नी शौचालयांचा कुठेच पत्ता नसतो.
मिझोरामला जाताना दुपारी जेवायला एक हॉटेल बरं आहे असं संभाजीदादाला वाटलं. पण तोवर आमची गाडी बरीच पुढं आलेली होती. आता परत कुठं मागं जाता? बघू पुढंच एखादं असा विचार करून आम्ही पुढं निघालो. तर नॅशनल हायवेचा पार चुथडा झालेला. आख्खा ट्रक बुडेल असे ऎतिहासिक खड्डे पडलेले. आम्हाला गाडीतनं खाली उतरवून कडंकडंनं, रस्त्याच्या कोपर्‍यातनं सर्कस करीत ड्रायव्हरनं कशीबशी गाडी पुढे काढली तर पुढचा सगळाच रस्ता दरीत कोसळून नष्ट झालेला. आता काय करावं? ना पुढं ना मागं जाता येणार.
इतक्यात मागनं येणार्‍या गाडीवाल्यानं आम्हाला सांगितलं, मी इकडंच राहतो, एक महिन्यापुर्वी पुढचा सगळाच नॅशनल हायवे वाहून गेलाय. पायवाटही शिल्लक नाही. परत मागे फिरा. दुसर्‍या नॅशनल हायवेनं ऎजावलला जा.
परत फिरताना आमची गाडी अडकून पडली. स्थानिकांच्या मदतीनं आमची गाडी कशीबशी काढता आली.
परत बरंच मागं यावं लागलं. तर संभाजीदादाचं ते लाडकं हॉटेल दिसलं. या शाहीर माणसाची इच्छाशक्ती किती प्रबळ असावी? गेलो त्या हॉटेलात. हॉटेलच्या पुढे नॅशनल हायवे आणि मागे हजारो फूट खोल दरी. हॉटेलला मागून बांबूचे टेकू लावलेले. अफलातून निसर्ग. आपण दरीत तरंगतोय अशी अवस्था. इतकं सुंदर हॉटेल बघूनच अर्धी भूक निवली.
हॉटेलवाला म्हणाला व्हेजमध्ये फक्त भात मिळेल. अंडी होती पण त्याला ऑमलेट करता येत नव्हतं. मग काय संभाजीदादानं किचनचा ताबा घेतला. हवी तशी ऑमलेटं बनवली. कोरड्या भाताबरोबर ऑमलेटं झिंदाबाद. संभाजीला सर्वप्रकारचं नॉनव्हेज अतिप्रिय. त्यामुळं मासे, चिकन, बीफ,पोर्क अशी त्याची चंगळच चंगळ होती.
आम्ही भातवाल्यांनी विचारलं, दाल हैं क्या? हॉटेलवाला म्हणाला हैं. आम्ही खुष.
बघतो तर पठ्ठ्यानं आमच्या पुढ्यात दारू आणून ठेवलेली. हे कायय? असं विचारलं तर म्हणाला, दारू चाहियें ना? बोंबला च्यायला, आम्ही दाल म्हणतोय नी हा दारू आणून देतोय.
आमची जेवनं झाल्यावर किती पैसे झाले असं विचारलं, तर म्हणाला, द्या तुम्हाला काय द्यायचे असतील ते! म्हटलं असं कसं? तुझे दर सांग ना? तो म्हणाला, तुम्ही भली माणसं दिसताय. मी बघितलंच नाही तुम्ही कायकाय घेतलं ते! द्या समजून उमजून. आम्ही त्याला एकेका पदार्थाचे पैसे विचारत गेलो, हिशोब केला. झालेले पैसे दिले तर तो म्हणाला, हे फार जास्त आहेत. एव्ह्ढं तुम्ही खाल्लंच नाहीये. मी जास्त पैसे घेत नसतो.
आम्ही सारे प्राध्यापक, शिक्षकवर्गीय प्राणी असतानाही आता त्याला कसं समजावून सांगावं आम्हाला कळतच नव्हतं.
- प्रा.हरी नरके

No comments:

Post a Comment