Wednesday, March 22, 2017

डोंगर कोसळला


[ गोविंदराव तळवलकर - एक निर्भय आणि विद्वान संपादक ]
माझे मित्र ग्रंथालीचे दिनकर गांगल यांना "महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन " या माझ्या पहिल्या पुस्तकाची प्रत भेट द्यायला मी मुंबईच्या टाइम्सच्या इमारतीत गेलो होतो.
ते म्हणाले, "किती प्रती आणल्यास?"
"तुम्हाला द्यायला एकच आणलीय," मी सांगितलं. ते म्हणाले, " अरे आणखी दोन हव्या होत्या. एक म.टा. ला पुस्तक परीक्षणासाठी द्यायला आणि दुसरी संपादक गोविंदरावांना द्यायला."
मी म्हटलं, "आपली त्यांची काय ओळख नाही. शिवाय माणूस फार खडूस असल्याचं सारेच सांगतात."
त्यांनी शू केलं. " अरे, इकडं म.टा. च्या कार्यालयात असं बोलू नकोस. माझी काय नोकरी घालवतोस काय?" गोविंदरावांना सारेच टरकून असायचे.
त्यांनी फारच आग्रह केला. तू ही प्रत आज गोविंदरावांना भेटून दे म्हणून. ते मात्र माझ्यासोबत यायला तयार नव्हते. तू एकटाच जा असं त्यांनी सांगितलं. प्रशांत
दीक्षित गोविंदरावांचे सेक्रेटरी होते. त्यांनी गोविंदराव कामात आहेत, भेटायचं असेल तर बसावं लागेल असं सांगितलं.
मी थांबलो.
अर्ध्या तासानं त्यांनी गोविंदरावांच्या केबीनमध्ये मला सोडलं. मी आत गेलो तेव्हा ते संगणकावर काहीतरी लिहित बसले होते. मी नमस्कार केला. माझी ओळख करून दिली. गोविंदराव माझ्याकडं बघायलासुद्धा तयार नव्हते. चेहरा एकदम कोरा. मी त्यांच्याशी बोलत असलो तरी संपुर्ण कोरा. हं नाही. की हू नाही. मला वाईट वाटलं. माणूस फारच माणुसघाणा असावा असं वाटून गेलं. आलोच आहे तर पुस्तक दिलं. त्यांनी हातानं खूण करून ते तिकडं ठेव असं सुचवलं. मी पुस्तकाबद्दल दोन वाक्यं बोललो आणि माझा धीरच खचला. आता फुटा असा त्यांच्या चेहर्‍यावर भाव होता. मी नमस्कार केला आणि बाहेर पडलो. मला फार वाईट वाटलं होतं. इतक्या खडूस माणसाकडं कशाला पाठवलं गांगलांनी आपल्याला? म्हणुन गांगलांकडं जाऊन त्यांना मी विचारलंही.
ते म्हणाले, "काय झालं, त्यांनी तुला गेट आऊट म्हटलं का?"
"नाही. ते तसं काय म्हणाले नाहीत. मुळात ते अवाक्षरही बोललेच नाहीत. माणूस फारच तुसडा दिसतोय."
गांगल म्हणाले, " हे बघ जर त्यांनी तुला गेट आऊट म्हटलं नसेल तर त्यांनी तुला खुपच सन्मानाची ट्रीटमेंट दिलीय. गैरसमज, मान अपमान मनातून काढून टाक."
मी तिथनं बाहेर पडलो. पुण्याला आलो. तो मंगळवार होता.
गुरूवारी सकाळी त्याकाळात म.टा. मध्ये पहिल्या पानावर रविवारच्या मैफील पुरवणीची मोठी जाहीरात यायची.
ती वाचली आणि उडालोच.
पहिलाच लेख असणार होता गोविंदरावांचा. "समर्पक युक्तीवाद - तरूण संशोधक हरी नरके यांनी साप्ताहिक सोबतचे बाळ गांगल यांच्या लेखनाचं समर्पक युक्तीवादांनी केलेलं वस्त्रहरण... "
मी शनिवारीच पेपर टाकणाराला सांगुन ठेवलं, " उद्याचा पेपर टाकायचं चुकवू नकोस. महत्वाचा लेख येणार आहे."
पण रविवारी पहाटेच जाग आली. पेपर आमच्याकडे सकाळी आठ वाजता यायचा. मला धीर धरवेना. सायकल काढली आणि दामटत पिंपरीला गेलो. त्याकाळात म.टा. मुंबईहून येत असल्यानं उशीरा म्हणजे सातपर्यंत यायचा. तिकडं वाट बघत थांबलो. पेपर आल्यावर बघतो तो काय मैफिलच्या पहिल्या पानावर पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा कलर फोटो आणि गोविंदरावांचा भला मोठा लेख.
गोविंदराव कोणत्याही विषयावर लिहिताना चार चांगल्या गोष्टी सांगून झाल्या की एकदोन तरी उणीवा- त्रुटी किंवा दोष दाखवणारच. हाच पायंडा होता. पण गोविंदरावांचा हा लेख त्याला अपवाद होता. त्यांनी पुस्तकाचं तोंड भरून कौतुक केलेलं होतं.
मी पेपरवाल्याकडचे म.टा.चे सगळे जादा अंक घेतले. त्याकाळात त्याच्याकडं दहा जादा अंक यायचे.
मी गोविंदराव तळवलकरांना आभाराचा फोन केला तेव्हा मात्र ते अतिशय जिव्हाळ्यानं बोलले. त्यांनी मला मुंबईला भेटायला बोलावलं.
भेटीत त्यांनी चक्क चहा दिला. घरची, मी कायकाय करतो या सगळ्यांची आपुलकीनं चौकशी केली.
त्या दिवशीचे गोविंदराव आणि आजचे गोविंदराव एकदम वेगळे होते. किती फरक.
भेटत जा. म.टा.साठी लिहा म्हणाले. त्यांनी माझं पुस्तक टाइम्सचे संपादक दिलीप पाडगावकर यांना वाचायला दिलं. त्यांनीही टाइम्समध्ये पुस्तकावर लिहिलं.
आठवडाभरात एका कार्यक्रमात पुन्हा तळवलकरांची भेट झाली. सौम्य हसले. हो, ते कधीतरी माफक हसायचेसुद्धा!
मी त्यांना टेल्कोच्या संपाबद्दल बोललो. आमच्या कंपनीत तेव्हा राजन नायर नावाच्या नेत्यानं फार उतमात चालवला होता. त्याला कामगारांची साथ होती. नायरबद्दल त्याचे अंडरवर्ल्डबरोबर संबंध असल्याचं खाजगीत बोललं जायचं. त्यानं अनेक अधिकार्‍यांवर हल्ले केलेले होते. ते ऎकून गोविंदराव काळजीत पडले. मला म्हणाले, "हे सारं जरी खरं असलं तरी मी नायर आणि कामगारांविरूद्ध फारसं लिहू शकणार नाही. या सगळ्यांच्या मागं राज्याचे सीएम असल्याचं त्यांनी स्पष्टपणे मला सांगितलं. त्यांना भेटा आणि हे मिटवा अन्यथा हे आणखी वाढू शकतं असा निरोप तुमच्या वरिष्ठांना द्या, असं म्हणाले. गोविंदरावांसारखा दणकट संपादकसुद्धा सीएमसमोर आपण हतबल असल्याचं सांगतो हे मला नवं होतं. धक्कादायक होतं.
मी म्हटलं, " पण सीएम तर आम्हाला सहानुभुती दाखवतात."
ते म्हणाले, " सीएमचा राग टाटांवर नाही. तुमची मिडल मॅनेजमेंट त्यांना आणि त्यांच्या पक्षाच्या स्थानिक नेत्यांना फारसा भाव देत नसल्यानं मिडल मॅनेजमेंटला चांगला धडा शिकवण्यासाठी आणि कामगार नेते दत्ता सामंत यांना पुणे, पिंपरी, चिंचवडमध्ये शिरकाव मिळू नये यासाठी सीएम राजन नायरला मोठा करीत आहेत."
एसेम जोशी यांच्या अंत्ययात्रेला गोविंदराव पुण्याला आले होते तेव्हा भेट झाली. बोलले. मला म्हणाले, "तुम्ही काय भाषणं वगैरे देता म्हणे?"
मी चपापलो. हो म्हणालो. त्यांच्या कपाळावर आठ्या उमटल्या. वक्त्यांविषयीचा तिटकारा स्पष्ट दिसत होता. मला म्हणाले," भाषणं तात्काळ बंद करा. लिहा. भाषणं वार्‍यावर उडून जातात. लेखन टिकतं. व्यक्त होण्याची उर्जा बोलून संपते आणि मग हातून फारसं लेखन होत नाही. तुम्ही तरूण आहात. तुमच्या गुरूजींचं अनुकरण करा."
ते म्हणत होते ते खरंच होतं. पण मी त्यांचं ऎकू शकलो नाही.
व्याख्यानांची सतत निमंत्रणं यायची. कितीही नाकारली तरी काही घ्यावीच लागायची. त्याच्या बातम्या छापून आलेल्या बघितल्या की गोविंदराव चिडायचे. बोलायचे.
गोविंदराव लेखक, संपादक म्हणून अव्वल दर्जाचे होते. पण त्यांचं वक्तृत्व सामान्य होतं. त्यांना फारसं बोलता यायचं नाही. त्यामुळं असेल पण त्यांना वक्त्यांबद्दल नफरत होती किमान अढी तरी होतीच. शिवाजीराव भोसले हे वक्ते त्या काळात तुफान लोकप्रिय होते. पण गोविंदराव संधी मिळेल तिथे त्यांना ठोकायचे. फारच वाभाडे काढायचे. इथपर्यंत ठीकच होतं. पण माझे आवडते वक्ते आणि लेखक, विचारवंत नरहर कुरूंदकर यांच्यावरही गोविंदराव घसरायचे. त्याचं कारण बहुधा त्यांना एकुणच वक्त्यांविषयी घृणा असावी असा माझा कयास आहे. त्यांची मतं एकदम ठाम असत. त्यात बदलाची सुतराम शक्यता नसे. एखादा माणुस नाही आवडला तर ते त्याच्याशी कायम तिटकार्‍यानंच वागायचे. आकसानं म्हटलं तरी चालेल.
माझी भाषणं थांबत नाहीत म्हटल्यावर त्यांनी फडकेसरांना सांगितलं. सर पण माझ्यामागं हरी भाषणं कमी कर अशी भूणभूण लावायला लागले आणि एकदा दोनदा तर गोविंदरावांनी म.टा.त माझ्याविरूद्ध प्रखर लिहायला लावलं अशोक जैन आणि शशिकांत सावंतांना. यामागं त्यांची सद्भावनाच होती. पण माझाही नाईलाज होता. पुढच्यास ठेच मागचा शहाणा हे खरं नाही. स्वत:ला ठेच लागल्याशिवाय शहाणपण येतच नाही.
शरद पवार आणि यशवंतराव चव्हाण यांच्यावर त्यांचे निहायत प्रेम होते. त्यांना सर्व गुन्हे माफ. या समकालीन दोन राजकीय नेत्यांच्या बाबतीत ते अतिव मवाळ होते. तसं ते जाहीरपणे मान्यही करायचे. अर्थात तरीही पवारांनी यशवंतरावांना सोडल्यानंतर गोविंदरावांनी त्यांच्यावर प्रचंड झोड उठवली होती.
पुण्याच्या मॅजेस्टीक गप्पांमध्ये त्यांची मुलाखत प्रा.ग.प्र.प्रधान यांनी घेतली होती. "प्रॅक्टीकल सोशँलिझम" या नवाकाळच्या निळकंठ खाडीलकर यांच्या पुस्तकावर तुमचं मत काय आहे या प्रश्नावर ते फटकळपणे म्हणाले, "मी बाल वांड्मय वाचत नसतो."
गोविंदराव विद्वान संपादक होते. त्यांची विद्वत्ता प्रकांड आणि अभिरूचि तालेवार होती. त्यांचा व्यासंग दांडगा होता. दरदिवशी काहीतरी लिहावं आणि वाचावं हा त्यांचा परिपाठ होता.मराठी पत्रकारितेत आणि राजकारणी मंडळींमध्ये त्यांचा दरारा फार मोठा होता. 
त्यांची सगळी पुस्तकं हा त्यांच्या दर्जेदार लेखनाचा धडधडीत पुरावाच आहेत. दमदार लिहायचे गोविंदराव. त्यामागे संशोधन आणि स्वतंत्र चिंतन असायचे.
यदिसरांच्या मुलाच्या लग्नाला ते आले होते. माधव साठेंनी त्यांना छेडलं. "काय गोविंदराव आज तुमचा चेला [अशोक जैन] तुमच्यासोबत दिसत नाही."
ते म्हणाले, तो माधव गडकर्‍यांची जागा भरून काढायला गेलाय. [माधवराव उत्तम वक्ते असल्यानं गोविंदराव त्यांच्यावर संतापून असायचे. अशोक जैन 
कुठंतरी भाषणाला गेले होते, त्याचा राग ] माझ्याकडं बघत म्हणाले, "काय तुमचे भिकेचे डोहाळे आत्ता तरी कमी झाले की नाहीत? लिहा. अहो, त्या बोलण्याचा काडीमात्र फायदा नसतो. सारं वार्‍यावर उडून जातं. नंतर पश्चाताप करीत बसाल. फार तरूण वयात तुम्हाला अभ्यासाची शिस्त मिळालीय ती अशी वाया घालवू नका."
एक प्र.के.अत्रे सोडले तर बाकी सार्‍या वक्त्यांवर त्यांची खुन्नसच होती. अत्रे गेले तेव्हा मात्र त्यांनी अग्रलेखाला शीर्षक दिलं होतं, "कडा कोसळला."
खरंच आज गोविदरावांचं जाणं म्हणजे एक डोंगर कोसळणंच आहे .......

No comments:

Post a Comment