Wednesday, March 8, 2017

मैत्रिण--

विद्यापिठात शिकत असताना वर्गात एक हुशार मुलगी होती. गरिब घरातली होती. तिची आई एकल पालक असल्याने व वडीलांनी आईला घट:स्फोट दिलेला नसल्याने अनेक कायदेशीर अडचणींना तिला सामोरं जावं लागे. उदा. फी माफी मिळण्यासाठी उत्पन्नाचा दाखला द्यावा लागायचा. कार्यालय वडीलांच्या नावे दाखला हवा म्हणुन तिची अडवणूक करायचे. तिने एकदा तिची समस्या मला सांगितली. मी तातडीने अधिकार्‍यांना भेटून तिची अडचण सांगितली. त्यांनी सुचवलेल्या तोडग्यानुसार स्थानिक नगरसेवक व आमदार यांची प्रमाणपत्रे जोडून तिला दाखला मिळवून दिला.
तिला येण्याजाण्याच्या प्रवासासाठी बस व रेल्वेचा खर्च परवडायचा नाही. खुपदा मी तिला माझ्या स्कूटरवरून सोडायचो.
तिला घरात मदत करायला लागायची.शिवाय काही घरगुती कामे करून ती घरखर्चाला आईला मदत करायची.त्यामुळे तिचे अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायचे. मग माझ्या नोट्स ती वापरायची.
तिला एक धाकटा भाऊ होता. तोही गुणी होता. त्याचाही मी अभ्यास घ्यायचो. आधीमधी त्याला सिनेमा दाखवायचो. इतर कामात त्यांच्या आईला मदत करायचो.
छान दोस्तीचे नाते होते.
सतत आम्हाला एकत्र बघून वर्गातले काही मित्र चिडवायचे, पण त्यात काही तथ्य नव्हते.
ती नेहमी तुझी खूप मदत होते, वगैरे बोलून दाखवायची.
पुढे तिला लेक्चररची नोकरी मिळवून देण्यासाठीही माझ्या ओळखीचा उपयोग झाला. तिला नोकरी मिळाल्याने त्यांच्या कुटुंबाला बरे दिवस आले.
एक दिवशी ती रेल्वेत अचानक भेटली. तिचे लग्न चांगल्या घरी जमले म्हणून सांगू लागली. मी तिचे अभिनंदन केले आणि मुलगा काय करतो? लग्न कधी आहे? असे विचारले.
तिने तारीख सांगिेतली. त्याकाळात माझे खूप व्याख्यान दौरे असायचे, विसरायला नको म्हणुन मी डायरीत तारीख लिहून घेऊ लागलो. ती म्हणाली,काय करतोस?
म्हटलं, लग्नाची तारीख विसरायला नको म्हणून लिहून ठेवतोय.
ती तुटकपणे म्हणाली, "तू येऊ नकोस. त्याचे कायय की मी फक्त आमच्या समाजातील मंडळींनाच माझ्या लग्नाला बोलावलेय."
खरं म्हणजे तिनं कोणाला बोलवावं आणि कोणाला बोलवू नये हा संपुर्णपणे तिचा प्रश्न आणि अधिकार होता. पण तरीही एव्हढ्या वर्षांची कौटुंबिक मैत्री असल्यामुळे आणि तिच्या कुटुंबातल्या प्रत्येक अडचणीत ती मला मदतीची हाक देत असल्याने बहुधा मी तिच्या लग्नाला यावे असे तिला वाटत असणार असे मी समजलो होतो. खरंतर ही माझी चुकच होती.
मी ठिकाय म्हणालो आणि तिचा निरोप घेतला.
दरम्यान माझे लग्न ठरले. मी तिला बोलावले होते. ती आणि तिचा भाऊ दोघेही आले होते.
एकदा तिची आई एका कार्यक्रमात भेटली. संगिता काय करते असे त्यांनी विचारले? ती पुढे शिकतेय असं मी सांगितल्यावर त्या पटकन म्हणाल्या," अरे, तुम्हा लोकांना काय करायचेय पुढचे शिक्षण?"
मला वाईट वाटले. पण मी गप्प बसलो. शक्य झालं असतं तर मला त्यांना तीव्र उत्तर द्यायला आवडलं असतं. मैत्रिणीची आई असल्याने मी सहन केलं.
पुढे तिचा घटस्फोट झाला. तिची नोकरीही काही अडचणींमुळे गेली. तेव्हा तिने मला फोन केला. तिचे वडील आणि जवळचे नातेवाईक तिला मदत करीत नसल्याचे ती म्हणाली.
तिचा जिकडे नविन महाविद्यालयात इंटरव्ह्यू होता ते संस्थाचालक नेमके माझ्या ओळखीचे असल्याचे तिला समजले होते, तिला माझी चिठ्ठी हवी होती.
मी तिला चिठ्ठी दिली. त्या संस्थाचालकांना शिफारस करणारा फोनही केला. तिचे काम झाले.
त्यानंतर लवकरच तिचे दुसरे लग्नही जमले.
तेव्हा मात्र तिने तुम्हाला लग्नाला यावेच लागेल असे मला व संगिताला आग्रहाने सांगितले.
आम्ही लग्नाला गेलो, तेव्हा ती म्हणाली, "आधीचा मुलगा नात्यातलाच होता, पण त्याला वाईट सवयी होत्या. तेव्हा आता मी जातपात न बघता मला मदत करणार्‍या सर्वांना लग्नाला बोलावलेय. तसे लग्न मी जातीतच करतेय, पण तसेही जातीपातीत काय ठेवलेय नाही का? माझा आता जातीपातीवरचा विश्वासच उडालाय!

No comments:

Post a Comment