Thursday, March 30, 2017

सूप हा शब्द इंग्रजीतला नसून संस्कृतमधला


सूप हा शब्द इंग्रजीतला नसून संस्कृतमधला आहे.
महाभारत हे वैश्विक साहित्यातले सर्वाधिक लोकप्रिय महाकाव्य.
पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने तीन पिढ्या, सलग 55 वर्षे यावर संशोधन केले.
318 जागतिक भाषांमधील 1132 हस्तलिखितांचा तौलनिक अभ्यास करून महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीचे 19 खंड प्रकाशित करण्यात आले.या कार्यासाठी खुद्द डा. भांडारकर, डा.सुखटणकर, डा.बेलवलकर, डा.दांडेकर, डा.मेहेंदळे आदींनी अपार मेहनत घेतली.

शान्तिपर्व मध्ये रन्तिदेव नावाच्या राजाची कथा आहे.
त्याचा [स्वयंपाकी] खानसामा अतिशय चवदार मांसाहारी जेवन बनवायचा.
त्याची किर्ती देशोदेशी पसरली.
एके रात्री अचानक एक हजार ब्राह्मण जेवायला आले.
त्यांना "विशिष्ट्य प्राण्याचे" मांस भोजनात हवे होते.
[स्वयंपाकी] खानसामा म्हणाला, "ब्राह्मणहो, मला क्षमा करा. आता खूप रात्र झालेली असल्यानं माझे सगळे नोकर आपापल्या घरी गेलेले आहेत. मी तुम्हाला मांसाहारी जेवन देऊ शकत नाही, मात्र  मांसाहारी सुप माझ्याकडे भरपूर आहे. त्याच्यावर तुर्तास भागवून घ्या. त्यानं विशिष्ट प्राण्यांच्या कोवळ्या वासरांपासून बनवलेलं सूप त्या विप्रांना वाढलं.

तत्र स्म सूदा: क्रोशन्ति सुमृष्टमणिकुण्डला:!!
सूपभूयिष्ठमश्रीध्वं नाद्य मांसं यथा पुरा!! 120 !!

ते संतुष्ट झाले आणि त्यांनी त्याला व त्याच्या राजाला आशीर्वाद दिले."

......................
[महाभारत, खंड, तिसरा, शान्तिपर्व, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, पुणे, 1974, पृ.2023/24]

Wednesday, March 29, 2017

एस.टी.स्टॅंडसारखा एअरपोर्ट

तुम्ही कधी नेपाळमधील जनकपुरला गेलायत?
मस्त गाव आहे. रामायणातला राजा जनक याचं हे गाव असं तिथले लोक मानतात. तर तिथल्या गावाबाहेरच्या विमानतळावर आम्ही तिघे उभे होतो.
आम्हाला जायचं होतं काठमांडूला, नेपाळमध्ये. महाराष्ट्रातल्या कुठल्याही मोठ्या शहराच्या एस.टी.स्टॅंडच्या बाहेर जसे खाजगी ट्रॅव्हल कंपन्यांचे एजंट अमूक रूपयात अमूक गावी जाणारी बस लगेच सुटणार आहे असं ओरडत उभे असतात अगदी तसंच चित्र होतं त्या विमानतळाबाहेरचं. चलो,चलो, हिमालया एअरलाईन्स, बुद्धा एअरलाईन्स, काठमांडू एअरलाईन्स, अवघ्या बाराशे रूपयात काठमांडूला नेणार म्हणून तिकडचे एजंट ओरडत होते. आम्ही तिघं आहोत म्हटल्यावर त्यानं प्रत्येकी दोनशे रूपये कन्सेशन दिलं.
आम्ही त्याच्यासोबत आत गेलो, त्यानं स्वत:च्या हातानं लिहून आम्हाला बोर्डींग पास दिले. तिथलं सिक्युरिटी चेक म्हणजे नेपाळी पोलीसवाला आपल्याला बॅगा उघडायला सांगतो. स्वत:च्या डोळ्यांनी बघतो आणि पुढे जा म्हणुन सांगतो. तो एजंट आमचं सामान घेऊन आम्हाला आत विमानजवळ घेऊन गेला. आमचं सामान त्यानं आत टाकलं. छोटं विमान होतं. जेमतेम 16 सीटर. त्यानं आम्हाला आत बसवलं आणि नविन पॅसेंजर आणायला गेला. अशाप्रकारे अर्ध्या तासात विमान फुल झालं.
त्यानं आत येऊन आम्हाला सर्वांना ज्युस दिला. सुचना दिल्या आणि तो उतरून गेला. दुसरा एक कर्मचारी आला आणि तो आत जाऊन पायलटच्या सीटवर बसला. तोच आता आमचा "कॅप्टनवा" किंवा "पायलटवा" होता.
हिमालयातला तो हवाई प्रवास मात्र अविस्मरणीय होता. अगदी हाताच्या अंतरावर एव्हरेस्ट दिसत असतो. भन्नाट.
काठमांडूला राजधानी असल्यानं जरा बरा विमानतळ आहे. बाहेर आलं की चौकाचौकात राजघराण्यातील कोणाचे तरी पुतळे असतात. पण त्यांची कोणाचीही उंची अवघी फुट दीडफुट असते.
काठमांडूमध्ये एका चौकाला संत ज्ञानेश्वरांचे नाव दिलेले दिसले. तिथल्या भाषेत, चहा,भात,चेहरा असे मराठी शब्द  ऎकताना छान वाटत होतं.
तिथले पशुपतीनाथाचे मंदिर फार फेमस. तिकडे गेल्यावर आम्हाला सांगण्यात आले, तुम्ही दुसर्‍या देशातून आलात म्हणून तुम्हाला तिकीट काढावे लागेल. दरडोई सत्तर रूपये तिकीट. मंदिरात जायला तिकीट ही कल्पनाच भारी वाटली.
तिकीट घेऊन आत गेलो तर पंडे लोकांनी चक्क घेराव घातला. अमूक रूपयात अभिषेक, अमूक रूपयात तमुक पुजा वगैरे.
आम्ही नाही म्हटलं तरी जाम सोडायला तयार नाहीत. वैताग.
मला एक आयडीयाची कल्पना सुचली. एक पंड्या फारच गळ्यात पडत होता. मी त्याच्याशी थोडं बोललो. त्याला वाटलं गिर्‍हाईक पटलं. गडी खुष.
मला म्हणाला, "साब तुम्हारा गोत्र कौनसा हैं?"
मी म्हटलं, " फुले-आंबेडकर."
तो म्हणला, "यह क्या होता हैं? तुम्हारी जाती कौनसी हैं?"
मी म्हटलं, "महादलित." तो जो 120 च्या स्पीडनं पळाला. तो परत काही फिरकला नाही. त्यानं बाकीच्यांना काय सांगितलं, माहित नाही पण त्यानंतर एकही पंडया आमच्या आसपासही फिरकला नाही. तिकडची नदी म्हणजे पुण्याचा आंबीलओढा मोठा म्हणावी अशी मरतुकडी. मुंबईच्या समुद्रात असतं तसं किंवा पुण्याच्या मुळामुठेत असतं तसं गटाराचं पाणी वाहून नेणारा ओढा जेमतेम. सगळीकडे अतिशय घाण. अस्वच्छ वातावरण. आम्ही आणखी थांबलो तर उलटी व्हायची म्हणुन तिकडनं पळालो.
बाकीचा नेपाळ दौरा मात्र एकदम झकास. हिमालयाचा काय वरदहस्त. निसर्गाची मनमुराद सोयरिक. वा.
आम्ही परत जनकपुरला आल्यावर सीतामढीला जिल्ह्याच्या ठिकाणी माझं व्याख्यान होतं. सीतामढी म्हणजे जनक राजाला शेतात जिथं सीता सापडली ते ठिकाण अशी श्रद्धा.
मैदानात खुर्च्या मांडलेल्या. सारे वयस्कर लोक खुर्चीवर मांडी घालून बसलेले. स्टेज सुमारे 20 फूट उंचीचे. त्यावर चढायला चक्क एक शिडी लावलेली. कार्यक्रम चांगला झाला.
हाटेलवर आलो तर रात्रभर एक लाऊडस्पीकर कसली कसली देवीची गाणी किंचाळत होता. मी चौकशी केली की बुवा इकडं रात्री 10 च्या पुढं लाऊडस्पीकरला बंदी नसते का? पोलीस काही कारवाई का करीत नाहीत वगैरे.
हाटेलवाला माझ्याकडं तुम्ही "येडे का खुळे" अशा नजरेनं बघायला लागला. त्यानं दिलेल्या माहितीतून समजलं ते इतकंच की आज डीवायएसपी साहेबांच्या बंगल्यावर पुजा होती आणि म्हणून तो लाऊडस्पीकर रात्रभर बोंबलत राहणार होता. तिकडे बहुतेक वेगळंच सुप्रीम कोर्ट असणार.
सीतामढी ते पाटणा कारचा प्रवास अवघा तीनचार तासांचा. पण येतानाचा अनुभव जमेला धरता आम्ही आपलं 12 तास आधीच निघालो होतो.
मुंबई ते पाटणा फ्लाईटने आलो होतो. प्रमितीचा हा पहिलाच बिहार प्रवास होता. संगिता व प्रमितीची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी माझ्या नेहमीच्या सवयींना काट देऊन चारचार वेळा पाटण्याला आम्हाला न्यायला संयोजक वेळेवर पोचतील याची खात्री करून घेतलेली होती.
संयोजक सकाळीच पाटण्याला रवाना झाल्याची मुंबईतून फोन करून पुन्हापुन्हा खातरजमा करून घेतलेली होती.
आम्ही ऎतिहासिक पाटलीपुत्र उर्फ पाटणा विमानतळावर पोचलो तर कार अद्याप आलेली नव्हती. मोबाईलवर फोन केला तर संयोजक म्हणाले, "साबजी, बस पहुंचही रहे हैं.
क्या करे जॅम लगा हुवा हैं. उसने फंसे हैं."
किती वेळ लागेल या माझ्या प्रश्नावर ते म्हणाले, जॅम निघाला तर फक्त अर्धा तास. आणि नाही सुटला तर मग मात्र कितीही तास."
मी म्हटलं, "म्हणजे किती?"
ते म्हणाले, "काहीच सांगता येणार नाही. कदाचित सहा तास, कदाचित बारा तास. कितीही."
बापरे. मी टरकलो. आता काय करायचं? ते म्हणाले, पहिलं म्हणजे शेजारच्या हाटेलात जाऊन जेवून घ्या. फेरफटका मारा. शहरातील म्युझियम बघा आणि तरिही टाईम उरला तर एखादा सिनेमा बघा.
तर अशाप्रकारे संध्याकाळी म्हणजे आम्ही एयरपोर्टवर पोचून अवघे आठ तास झालेले असताना ते आम्हाला घ्यायला पोचले.
आम्ही सीतामढीला निघालो. गंगा ओलांडली आणि संयोजक म्हणाले, "आगे खतरा है. हमारे साथ बिटीया और भाभीजी है इसलिए इतनी देर रात आगे जाना ठीक नही होगा."
आम्ही हाजीपुरला मुक्काम करायचे ठरवले. रेल्वे स्टॆशनच्या समोर असलेल्या सबसे बढीयां हाटेलात त्यांनी आम्हाला नेले. ते तिथले कायम खासदार आणि कायम केंद्रीय मंत्री असलेल्या रामविलास पासवान यांचे होते. अत्यंत भिकार आणि गलिच्छ. पासवान महोदय गेली 30 वर्षे कोणत्याही पक्षाचे सरकार केंद्रात असले तरी हे मंत्री असतातच.
त्यांचे हे हाटेल म्हणजे आपल्याकडे एखाद्या किरकोळ गावात असणार्‍या चाळीपेक्षाही भिकार होते.
आमच्या खोलीत सगळी मिळून साधारणपणे आठ बाय आठ फूट जागा. स्वच्छतागृह आपल्या एस.टी.स्टॅंडवर असते त्याच्याहीपेक्षा घाण.
संगिता आणि प्रमिती जाम वैतागल्या. पण रात्र झालेली होती. कशीबशी रात्र काढली आणि पहाटेच मार्गस्थ झालो.
सीतामढी...
एक थोर शहर.
तर आता आम्ही सीतामढीहून पाटणा आणि तिकडून रेल्वेने पुणे असा परतीचा प्रवास करीत होतो. गंगेच्या पुलावर आम्ही पोचलो तेव्हाच आम्ही सुमारे सहा तास आधीच पाटण्यात पोचू असे आमच्या लक्षात आले. हरकत नाही. पाटण्यात फिरता येईल. रात्री दहाची ट्रेन होती. कोणतीही धावपळ न करता आरामात ती पकडता येईल.

गंगासागरवर पुलाच्या दुरूस्तीचे काम चालू होते. पुलावरचा रस्ता गर्दीने फुललेला होता. पण काळजीचं कारण नव्हतं कारण आमच्या हातात सहा तास होते. थोडं पुढे काय गेलो तर वाहतुक ठप्प झालेली. जॅम लगा हैं. कधी मुंगीच्या स्पीडनं तर कधी एकाच जागेवर तासतासभर प्रतिक्षा करीत आम्ही तिकडे अडकलो होतो.
वाट बघुनबघुन आम्ही थकलो. जॅम खुलनेकी कोई गुंजाइश नही थी. आम्हाला सांगण्यात आलं की अजून साडेतीन किलोमीटर पुल बाकी आहे. हा पुलच मुळी साडेपाच किलोमीटर लांबीचा आहे. एकदा पुल ओलांडला की मग काय दहा मिनिटात रेल्वे स्टेशनवर.
शेवटी रात्रीच्या नऊ वाजता आम्ही तिघे कारमधून खाली उतरलो. आमच्या बॅगा घेतल्या आणि पायी चालत अंधारात ठेचकाळत एकदाचा साडेतीन किलोमीटरचा पुल ओलांडला. पुढे मात्र रस्ता एकदम मोकळा होता.
एका रिक्षावालाल्या विचारलं. तो प्रामाणिक होता. आपणहून म्हणाला, गेले सहा तास तो बसून होता. त्यामुळे एरवी तो या अंतराला पन्नास रूपये घ्यायचा पण आज तो अडीचशे रूपये घेणार होता.
आम्ही घासाघीस करत बसलो असतो तर ट्रेन चुकली असती. मे महिना असल्यानं सार्‍या रेल्वेगाड्या फुल होत्या. कसंबसं आमचं रिझर्वेशन कन्फर्म झालेलं होतं. ट्रेन आम्हाला चुकवायची नव्हती.
आमच्या हातात फक्त 5 मिनिटं होती. त्यानं रिक्षा फुलस्पीडनं मारली. रस्ता पुर्ण मोकळा होता. आम्ही रेल्वेस्टेशनला पोचलो तेव्हा गाडी सुटत होती. रिक्षावाला स्वत: आमच्या दोन बॅगा घेऊन धावला. माझ्याकडे दोन बॅगा होत्या. आम्ही धावत सुटलो.
शेवटच्या डब्यात त्यानं संगिता अन प्रमितीला चढवलं. मीही आत घुसलो. त्यात पायातली एक चप्पल खाली पडली. रिक्षावाल्याला तीनशे रूपये दिले. त्याला काय वाटलं माहित नाही. तो म्हणाला, " बाबुजी, ऎसा करते हैं, मैनें आपको ढांईसौ रूपया बोला था. मगर ये गलत हैं. मैं सौ रूपये रखुंगा. बाकी यह आप ले लो. बिटीयाको मिठाई खिला देना."
...................
टीप : गेल्या सातआठ वर्षात मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमध्ये रस्त्यांचं जाळं इतकं उत्तम उभारलंय की आमचा हा 2008 सालचा हा अनुभव आज काल्पनिक वाटावा. आता बिहार ओळखू येऊ नये इतका बदललाय. रस्त्यांच्या बाबतीत महाराष्ट्रासारखाच चकाचक झालाय.

Tuesday, March 28, 2017

जेआरडी टाटा यांचा विमानप्रवास

जेआरडी टाटा यांचा विमानप्रवास
जेआरडी टाटा एअर इंडीयाचे चेअरमन होते. एकदा त्यांना कलकत्त्याला जायचे होते. ते बोर्डींग पास घेत असतानाच एक प्रवासी धावतपळत आला. त्याला अर्जंट कलकत्त्याला जायचं होतं. विमानात तर एकही जागा शिल्लक नव्हती. जेआरडींनी आपले तिकीट कॅन्सल केले आणि ते त्या प्रवाशाला द्यायला लावले. त्यानं जाताना जेआरडींचे खुपखुप आभार मानले.
काऊंटरवरचा कर्मचारी जेआरडींना म्हणाला, "सर, तुम्ही तिकीट रद्द करून त्यांना का दिले?"
जेआरडी म्हणाले, "अरे ते संघानिया नावाचे उद्योगपती आहेत. त्यांची आई आजारी आहे. तिला भेटायला तातडीनं कलकत्त्याला पोचणं आवश्यक होतं त्यांना. माझं काय मी नंतरच्या फ्लाईटनं गेलो तरी चालण्यासारखं आहे. शिवाय मी चेअरमन असल्यानं मला तिकीट मोफत आहे. पण ते पैसे भरणार होते. तेव्हा गरजू ग्राहकाला प्राधान्य द्यायचं हे नेहमी लक्षात ठेव."
.............
एकदा जेआरडी दिल्ली-मुंबई फ्लाईटनं प्रवास करीत होते. ते स्वच्छता गृहात जाऊन बराच वेळ झाला म्हणून हवाई सुंदरीला काळजी वाटली. चेअरमन आहेत, शिवाय म्हातारं माणूस आहेत. तेव्हा बघितलेलं बरं म्हणून तिनं जाऊन दरवाजावर टकटक केलं.
जेआरडींनी दरवाजा उघडला, तिनं पाहिलं, त्यांच्या हातात कापडाचे रूमाल होते, ते नीट लावून ठेवत होते.
ते तिला, म्हणाले, "हे बघ ग्राहकांसाठी ठेवलेले हे सगळे रूमाल खाली पडले होते. ते खराब झाले असते ना. म्हणून मी ते परत उचलून ठेवत होतो."
ती संकोचून म्हणाली, "अहो, तुम्ही कशाला असलं हलकं काम करताय? मला सांगायचंत, मी केलं नसतं का?"
जेआरडी म्हणाले," एकतर तू कामात होतीस. आणि काम कोणतंही हलकं वगैरे नसतं. मी चेअरमन असलो तरी शेवटी या कंपनीचा मीही एक भाग आहे, तेव्हा माझ्या घरचं काम करण्यात कसला आलाय कमीपणा?"
...............

दिलीपकुमारचा विमानप्रवास

सुपरस्टार दिलीपकुमारचा विमानप्रवास
अभिनेता दिलीपकुमार लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाचा काळ होता. एके दिवशी त्याला मुंबईचे शूटींग संपवून संध्याकाळच्या फ्लाईटने दिल्लीला 
जायचे होते. सामान्यपणे विमान कोणासाठीही थांबवून ठेवले जात नाही, परंतु खुद्द कॅप्टन आणि विमानातले सगळेच कर्मचारी दिलीपकुमारचे फॅन होते. आणि दिलीपकुमारची इंट्री झाली. सगळ्यच प्रवाशांनी त्याचे जोरदार स्वागत केले. त्यानं सर्वांना अभिवादन केलं.
बिझनेस क्लासमध्ये तो बसला तेव्हा त्याच्या लक्षात आलं आख्खं विमान आपल्याकडं बघतय. मात्र शेजारच्या म्हातार्‍याला त्याची काहीच खबर नव्हती. तो पेपर वाचत बसला होता.
दिलीपकुमारनं मुद्दामच उठून खाली बसताना तोल गेला असं दाखवत म्हातार्‍याला धक्का मारला. पेपरमधून डोकं बाहेर काढत म्हातारा दिलीपकुमारकडं बघून हसला आणि परत पेपर वाचू लागला. हा अपमान दिलीपकुमारला फारच झोंबला. बघून परत पेपर वाचत बसतो काय? त्यानं पुन्हा तसंच केलं. म्हातार्‍याकडं बघत सांगितलं, "मी सुपरस्टार दिलीपकुमार."
ते वृद्ध गृहस्थ अतिशय नम्रतेनं म्हणाले, " हो का. धन्यवाद. बाय दे वे काय करता आपण?"
दिलीपकुमार म्हणाला, " तुम्ही सिनेमे पाहात नाही?"
ते म्हणाले, "नाही हो, मी या वयात फक्त अठराच तास काम करू शकतो. अनेक वर्षांपुर्वी मी शाळेत असताना माझ्या आईसोबत एक बघितला होता. तोच एकमेव."
दिलीपकुमारचा इगो दुखावला गेला. " तुम्ही आहात तरी असे कोण?"
ते वृद्ध अतिशय आपुलकीनं म्हणाले, " तरूण मुला, माझं नाव जे. आर. डी. टाटा. मी एक सामान्य उद्योजक आहे."

दोन तर्‍हा

दोन तर्‍हा
एक नेते पहिल्यांदा जेव्हा राज्यमंत्री झाले, तेव्हा ते मलबार हिलवर एका मोठया पदावरील व्यक्तीला भेटायला गेले. सोबत एक मोठा हार. 2 किलो पेढे, शाल असा सगळा जामानिमा घेऊन ते गेले होते. त्यांनी नेत्यांना हार घातला, शाल पांघरली, पेढे दिले, म्हणाले, "साहेब तुमच्या आशीर्वादानं आज मला हे राज्यमंत्रीपद मिळालं." त्यांनी आभार वगैरे मानले.
सरकारी बंगला असल्यानं प्रोटोकाल म्हणून आता चहा येईल, मग चहा येईल अशी वाट बघितली, पण चहा काही आला नाही.
शेवटी त्यांनी चुळबूळ करून बघितली. आणि मग हिय्या करून म्हणाले, "साहेब आम्ही निघावं का आत्ता?"
तेव्हा ते साहेब शांतपणे म्हणाले, "अहो, तुमचं काम 15 मिनिटांपुर्वीच संपलेलं आहे, तरीही तुम्ही का बसलाय मला माहित नाही. निघा आता, मलाही पुण्याला जायचंय मुलाला भेटायला."
......................
एका केंद्रीय मंत्र्यांच्या सेक्रेटरींचा दिल्लीहून फोन आला.
"अमूकतमूक विषयावर मंत्री महोदयांना तुमच्याकडून काही माहिती हवीय. दिल्लीला भेटायला येऊ शकाल का?"
मी म्हटलं, "मला आवडलं असतं, पण मी आज परदेशात चाललोय. महिना भरानं परत येईन, तेव्हा ठरवू या भेटायचं. चालेल ना?"
ते मंत्रीमहोदयांना विचारून सांगतो म्हणाले.
महिनाभरानं त्यांचा परत फोन आला. म्हणाले," स्वत: मंत्रीमहोदयच पुणे दौर्‍यावर येत आहेत. कधी भेटू शकाल?"
वेळ, ठिकाण सारं निश्चित झालं.
ठरल्याप्रमाणे मी आपली स्कूटर दामटत क्विन्स गार्डनच्या सरकारी विश्राम गृहावर गेलो. तिकडे सामसूम होती.
सामान्यपणे केंद्रीय मंत्री येतात तेव्हा त्यांचा लवाजमा, बडेजाव फार मोठा असतो.
मला वाटलं, बहुधा मंत्र्यांचा दौरा रद्द झाला असणार.
तरीही आलोच आहोत तर स्वागत कक्षात चौकशी करावी म्हणून गेलो. तिथले कर्मचारी डुलक्या घेत होते. मी विचारलं, तर म्हणाले, "मंत्री आलेत. वर एक नंबर व्ही आय पी कक्षात आहेत."
वर जाऊन मी बेल वाजवली. पायजमा, बनियानमध्ये खुद्द मंत्र्यानीच दरवाजा उघडला. स्वागत केलं. चहा विचारला. तेच स्वत: चहा घेऊन आले. मग चहा घेता घेता आमच्या गप्पा झाल्या. ते छोटी वही हातात घेऊन टिपणं घेत होते.
केंद्रीय मंत्री इतका साधा असू शकतो?
एका खासदारांच्या पादुका प्रसादाची साता उत्तराची कहाणी सध्या देशभर गाजत असल्यानं हा अनुभव सहज आठवला.

एकेक किलो वजनाचे मोठठे मोठठे असंख्य टोमॅटो

एकेक किलो वजनाचे मोठठे मोठठे असंख्य टोमॅटो
एका राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आपल्या मंत्रीमंडळातील सहकार्‍यांना घेऊन गारपिटीची पाहणी करायला गेले होते. एका शेतकर्‍याची ते आस्थेवाईकपणे विचारपूस करीत असतात.
" अरे वा, छान टोमॅटो लावलाय तुम्ही. मला खुप आवडतात टोमॅटो. मी दररोज खातो. मी आता थेट अमेरिकेत टोमॅटो निर्यात करण्याचा निर्णय घेणार आहे. आपण त्याला युरिया, सुफला झालंच तर नेटवर मी बघतो आणि अधिकार्‍यांना तशा सुचना देतो, लागेल ते खत घालू, त्याच्या जोरावर ह्या झाडाला प्रत्येकी एकेक किलो वजनाचे मोठठे मोठठे असंख्य टोमॅटो येतील अशी व्यवस्था करू. कालच माझं केंद्रीय कृषीमंत्री आणि मा. पंतप्रधान यांच्याशी बोलणं झालंय. ते शेतकर्‍यांच्या पाठीशी आहेत. ते ट्रंपसाहेबांशी चर्चा करणारेत. मला सांगा, यावर तुमचं काय मत आहे?"
शेतकरी म्हणाला, " साहेब, आम्ही अडाणी माणसं, आम्हास्नी काय कळतंया? हा आता एव्हढं मात्र खरं की या झाडाला अगदी माह्यावाल्या हाडांचं जरी खत घातलं ना तरी त्याला टमाटे काय यायचं नाहीती."
"काय बोलताय? आमच्या राज्यात काय अशक्य आहे? कालच कॅबिनेटमध्ये आम्ही तसा निर्णय घेतलेला आहे, का नाही येणार टोमॅटो?"
"त्याचं कायंय की, शीएमसाह्यब, हे वांग्याचं रोपटं हाय!"
..................
ओळखा पाहू हे डिजिटल सीएम कोणत्या राज्याचे सीएम असतील?
....................
आपला देश आणि राज्य कृषीप्रधान आहे, मात्र देशाच्या आणि राज्याच्या प्रधानांना कृषीचं ज्ञान आहे का? असा प्रश्न प्रमोद महाजन विचारायचे, यानिमित्तानं त्याची आठवण झाली.
.....................

मुख्यमंत्री तेही..आणि मुख्यमंत्री हेही..

राज्याचे एक सीएम अतिशय लोकप्रिय होते. अनुभवी. मधाळ हसणारे आणि जिभेवर साखर असलेले. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षानं सार्वत्रिक निवडणुक जिंकली. आता परत तेच मुख्यमंत्री होणार यात शंकाच नव्हती. पक्षातल्या त्यांच्याच मित्रानं, ["दो हंसोका जोडा" मधल्या ] अशा काही चाव्या फिरवल्या की पक्षानं सी.एम.ना पदावरून दूर करून त्यांच्या मित्राला नविन सी एम करायचा निर्णय घेतला. हायकमांडचा निर्णय सीएमनी बिनबोभाट मान्य केला. नविन सी.एम.च्या नावाचा प्रस्ताव त्यांनाच मांडावा लागला. पायउतार झालेले सी.एम. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील आपल्या सहकार्‍यांचा निरोप घ्यायला आले. सर्व स्टाफला भेटले. आणि त्यांनी त्यांच्या सर्व सचिवांना, पीएसना बोलावलं. म्हणाले, "मला जरा पैसे हवेत. तुमच्या खिशात असतील ते सगळे द्या. मी घरी गेल्यावर तुमचे परत करीन." सी.एम.च्या खिशातले काही आणि सचिवांकडचे सगळे पैसे त्यांनी एकत्र केले, सगळ्या शिपायांना आणि सफाई कर्मचार्‍यांना बोलावलं. हातात हात घेऊन प्रत्येकाचे आभार मानले आणि प्रत्येकाच्या हातात एकेक पाकीट दिलं. शिपायांच्या आणि सफाई कर्मचार्‍यांच्या डोळ्यात पाणी होतं.
मुख्यमंत्री तेही..आणि मुख्यमंत्री हेही..

तुम्ही लोक आहात म्हणून तर मी मुख्यमंत्री आहे

तुम्ही लोक आहात म्हणून तर मी मुख्यमंत्री आहे
शेतकरी रामेश्वर भुसारेचे दात पाडणार्‍या सीएम कार्यालयाला अर्पण...
माझ्या मित्रानं महाविद्यालयात शिकत असताना उद्योगपती शंतनूराव किर्लोस्कर यांचं भाषण ऎकून आपणही उद्योग काढायचा निर्धार केला.
घरची परिस्थिती अतिशय बेताची. आईवडील अल्पभुधारक शेतकरी. पोरानं लवकर नोकरीला लागावं ही त्यांची इच्छा. उद्योगाची कोणतीही पार्श्वभुमी नसल्यानं खूप अडचणी आल्या. बॅंकेच्या कर्जावर त्यानं एम.आय.डी.सी.त जागा घेतली. कारखान्याचं बांधकाम होत असताना सिमेंट टंचाई आणि अंतुलेंच्या काळातलं परवाना राज सुरू झालं. सिमेंट मिळत नसल्यानं बांधकाम अडलं. दरम्यान सिमेंटला परवाना आणणारे अंतुले गेले. त्यांच्यानंतर बाबासाहेब भोसले आले कधी आणि गेले कधी तेही समजले नाही.
सिमेंटची टंचाई त्यानंतरही कायम होती.
मित्र पायात फाटक्या चपला, मळलेले कपडे , वाढलेली दाढी अशा अवतारात मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटायला गेला. आपली अडचण सांगितली.
सी.एम. नी त्याच्या गावाकडची चौकशी केली. माहिती घेतली. पी. ए. ला बोलावलं, "यांना सिमेंटच्या किती बॅगा हव्यात तेव्हढा परवाना द्या." असा आदेश दिला.
आमच्या मित्रानं हिशोब केला आणि म्हणाला, "मला सतरा पोती सिमेंट हवं."
पी.ए.ला सी.एम.नी सांगितलं, " यांना एक हजार सातशे सतरा बॅगांचा परवाना द्या."
मित्र घाबरला, "म्हणाला, सी.एम.साहेब, एव्हढी पोती घेऊन मी काय करू?"
सीएम म्हणाले, "तुला उद्योगपती व्हायचंय ना? 1700 पोती बाजारभावानं मार्केटमध्ये विकून जे पैसे येतील त्यातनं बॅंकेचा हप्ता फेड. उरलेल्या 17 बॅगा वापरून बांधकाम पुर्ण कर आणि उत्पादन सुरू करशील, चार पैसे कमावशील तेव्हा आजुबाजूच्या चार गोरगरिबांना अशीच मदत कर."
" आणि हे बघ, कोणतीही अडचण आली तर मंत्रालयाचा हा सहावा मजला तुमच्यासाठीच आहे, हे लक्षात ठेवून कधीही न संकोचता भेटायला ये. अरे बाबा, तुम्ही जनता जनार्दन लोक आहात म्हणून तर मी मुख्यमंत्री आहे. जाताना चहा घेतल्याशिवाय जाऊ नकोस."
शेतकरी रामेश्वर भुसारेचे दात पाडणार्‍या सीएम कार्यालयाला अर्पण...
.........................
अनेक फे.बु.मित्र /मैत्रिणी यांच्या आग्रहावरून नावे देत आहे.
मुख्यमंत्री होते वसंतदादा पाटील
आणि या माझ्या उद्योगपती मित्राचे नाव, सदाशिव बोराटे, कोरेगाव, सातारा व पिंपरी चिंचवड

भारतीय संस्कृती ही गंगाजमना तहजीब

हिंदु - मुस्लीम संबंध आणि सेक्युलर संविधान, भाग 6 :-
भारतीय संस्कृती ही गंगाजमना तहजीब
1. हमीद दलवाईंनी 80 वर्षांपुर्वीची एक आठवण सांगितलेली आहे.
कोकणात चिपळूणला काही मुस्लीम नेते व कार्यकर्ते एकत्र जमले व त्यांनी हमीदभाईंच्या वडीलांना मुस्लीम लिगची शाखा स्थापन करण्याचा आग्रह केला.
ते तयार झाले. मोठ्या उत्साहात शाखेचे उद्घाटन करण्यात आले, ते गावच्या मारूतीला नारळ फोडून. ग्रामदैवत म्हणून मारूती आणि कोकणचे प्रतिक असलेला नारळ.
2. अजमेरचा दर्गा असो की आणखी कुठलाही, तिथली जत्रा करण्यात हिंदूच पुढे असतात. अगदी गावोगाव हेच चित्र असते.
3. शिर्डीचे साईबाबा हेही एक महत्वाचे उदाहरण आहेच.
4.संत तुकाराम यांचे समकालीन संत बाबा शेख महंमद हे वारकरी होते.
5. सुफी संगीत आणि संगितातली अनेक घराणी यात, तसेच चित्रपटसृष्टी, खेळ, साहित्य, कला, व्यापार अशा अनेक क्षेत्रात अशी देवाणघेवाण / सरमिसळ झालेली आहे आणि ती सर्व भारतीयांनी मनोमन स्विकारलेली आहे.
"मन तड़पत हरि दर्शन को आज" हे गीत, राग - मालकंस, संगीत- नौशाद, गीत - शकील बदायुनी, गायक- मुहम्मद रफी,
तर दुसरे गीत, "रसुल अल्लाह, कर दो बेडा पार", राग - पुरिया धनश्री, संगीत- मास्टर दीनानाथ मंगेशकर, गीत - मास्टर दीनानाथ मंगेशकर, गायक- पंडित हृदयनाथ मंगेशकर, असा सुंदर मिलाफ एका मित्राने अलिकडेच फे.बु.वर लक्षात आणून दिलेला होता.
6. कोणी कोणाचे काय घेतले याचा हिशोब मांडण्याची आज गरज नसली तरी एक उदाहरण बघितले तरी हा मुद्दा पुरेसा स्पष्ट होईल. आज हिंदुंचा कोणताही कार्यक्रम समई पेटवूनच सुरू होतो. ही समई अरबी व्यापार्‍यांनी भारताला दिली. हिंदूंचा मुळचा लामणदिवा होता. आता ती इतकी हिंदूंची झालीय की तिचे मूळ सगळे विसरूनच गेलेत.
हिंदुंचा रक्षा बंधनाचा [नारळी /राखी पौर्णिमा] सण आता सामान्य मुस्लीम कुटुंबात आवर्जून केला जातो. 
 7. औरंगजेब हा कट्टर बादशहा पण त्याच्या अगदी जवळचे मानले जाणारे अनेक सरदार हिंदू होते आणि छ. शिवरायांच्या अनेक विश्वासू पदांवर मुस्लीम होते.
8. महाराजांचे एक पत्र मोठे बोलके आहे. 
ते म्हणातात, दक्षिण भारताची सत्ता आदिलशहा, कुतुबशाहा आणि शिवाजी राजे यांच्या ताब्यात राहावी आणि औरंगजेबाला सर्वांनी मिळून रोखावे असा राजकीय डावपेच आम्ही सर्वांनी एकत्र येऊन आखलेला आहे. आजच्या भाषेत याला महायुती किंवा महाआघाडी जे काही म्हणायचे ते म्हणा.
" आपली पातशाही वाढवू यें तितकी वाढवणे, पठाणाची [ औरंगजेबाची ] नेस्तनाबूद करणे. दक्षिणेची पातशाही दक्षिणीयांच्या हाती राहे ते करावे." [ पाहा, छ. शिवाजी राजे, दि.वि. काळे, पुणे विद्यापीठ, पुणे, 1950, पृ. 271 ]
8. सोमनाथाचे मंदीर अनेक वेळा मुस्लीम बादशहांनी लुटले. गझनीचा महंमद याच्या स्वार्‍यांचे वर्णन अल्बेरूनी या इतिहासकारानं करून ठेवलंय. हे मंदीर म्हणजे संपत्तीचं कोठार
असल्यानं ते लुटलं गेलं असावं असं त्यावरून म्हणता येतं. नाहीतर दिल्ली आणि आग्रा येथून आलेले मुस्लीम लुटारू रस्त्यातल्या एकाही हिंदू मंदिराला हात लावत नाहीत, ते 1100 किलोमीटर चालत येतात, सोमनाथ लुटतात आणि परत जातात, याची संगती कशी लावणार?
9. शिवरायांनी सुरत लुटली तेव्हा त्यांनी आजच्या किमतीत सुमारे 25 लाख कोटी रूपये किमतीची संपत्ती लुटल्याच्या नोंदी मिळतात.
10. नागपूरचे भोसले आणि इतर मराठा सरदार ओरिसा, बंगाल प्रांतात वर्षानुवर्षे लूट करीत. अगदी 1950 सालापर्यंत लहान मूल जर रडत असेल तर त्याला धाक दाखवण्यासाठी, त्याची आई म्हणायची, "गप्प बस, नाहीतर मराठा [बारगी] येईल" अशी भिती दाखवली जाई.
11. मध्ययुगीन इतिहासात अनेक मतभेदाच्या जागा आहेत. मात्र सर्व राजे आणि बादशहा अशी लूट करीत असत यावर एकमत आहे.
12. ब्रिटीशांच्या कुटील नितिमुळे भारतात हिंदु-मुस्लीम दंगली होऊ लागल्यानंतर 1893 ते 1984 या 91 वर्षात सर्वाधिक दंगली झालेले शहर म्हणजे भिवंडी.
आपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी तिथे हिंदु-मुस्लीम समाजात मोहल्ला कमिट्या स्थापन करून चर्चा, संवाद आणि भाईचारा स्थापन केल्यानंतर गेल्या 33 वर्षात भिवंडीत एकही धार्मिक दंगल झालेली नाही. अगदी बाबरी मशिद विवादात 1992/93 साली सारा भारत पेटला असतानाही भिवंडी शांत होती, कारण संवाद असतो तिथे जातीय विद्वेषाला थारा मिळत नाही.

उर्दू ही भारतात जन्मलेली महान भाषा आहे

हिंदु - मुस्लीम संबंध आणि सेक्युलर संविधान, भाग 5 :-
उर्दू ही भारतात जन्मलेली महान भाषा आहे
उर्दूचा जन्म भारतातला आहे. ही अतिशय गोड आणि काव्याला जवळची भाषाय. एखाद्याच्या प्रेमपत्रात एकही उर्दू शेर नसेल तर ते प्रेमपत्र कसलं?
ही भाषा अनेक भाषांच्या प्रभावातून तयार झालीय. त्यात पर्शियन, फारशी, अरेबिक, हिंदी, प्राकृत भाषा आणि संस्कृत यांचा समावेश आहे.
मात्र पाकिस्ताननं ही राष्ट्रभाषा म्हणून स्विकारली आणि दोन विचोइत्र गोष्टी घडल्या. एक -अनेक हिंदूंना ही भाषा पाकची म्हणुन दूरची वाटायला लागली. दोन- काही जुनाट विचारांच्या मुल्ला, मौलवींना ती भाषा अचानक जवळची वाटायला लागली.
खरं तर इस्लामची धर्मभाषा उर्दू नाही. कुराण अरेबिकमध्ये आहे, उर्दूमध्ये नाही.
पाकीस्तानचा जन्म धर्मराष्ट्र म्हणून झाला खरा पण अवघ्या वीसेक वर्षात पाकीस्तानची फाळणी झाली, ती भाषेच्या वादातून.
आजच्या बांगला देशाची राष्ट्रभाषा बंगाली आहे. आमार सोनार बांगलो.
महाराष्ट्रातील अनेक मुस्लीमांनी मराठीपेक्षाही उर्दू भाष आपली मातृभाषा असल्याचं जनगणनेत नोंदवलंय. खरंतर अनेकांना ती येत नाही. उर्दू माध्यमाच्या मदरशांना सरकारनं अधिक अनुदान द्यावं यासाठीही हा संघटित प्रयत्न असू शकतो.
राजकीय साठमारीत एखाद्या गोड भाषेचा गळा कसा आवळला जातो, त्याचं अतिशय चांगलं उदाहरण म्हणजे उर्दू होय.
भारतातल्या अनेक प्रांतातल्या मुस्लीमांना उर्दू येत नाही. उदा. केरळ, तमीळनाडू इ.
उर्दू साहित्यातले सर्वश्रेष्ठ प्रतिभावंत म्हणुन गालिब आणि प्रेमचंद यांची नावं घेतली जातात.
रामानंद सागर [रामायण मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक] हे फार मोठे उर्दू लेखक होत. त्यांची "और इन्सान मर गया" ही अजरामर साहित्यकृती आहे.
राजेंद्र बेदी, विष्णु खरे, गुलजार, भीष्म सहानी, कृष्णचंद्र, हे जसे उर्दूतले महान साहित्यकार तसेच कवी महंमद इक्बाल, [सारे जहांसे अच्छा हिंदुस्ता हमारा वाले,]
साहीर लुधियान्वयी, कमाल अमरोही, ख्वाजा अहमद अब्बास, इस्मत चुगताई, कैफी आझमी, निदा फाजली, सआदत हसन मंटो, बसीर बद्र, जावेद अख्तर आणि आणखी कितीतरी हे या भाषेतले महत्वाचे प्रतिभावंत.
भाषेला अशा प्रकारे धर्माच्या चष्म्यातून बघणं किंवा केवळ ती पाकीस्तानची राष्ट्रभाषा आहे म्हणुन तिचा रागराग करणं म्हणजे आपल्याच लेकराला केवळ शेजार्‍यांनी नावाजलं म्हणुन त्याचा जळफळाट करण्यासारखं आहे.
मुद्दा एव्हढाच आहे की जसं उर्दूचा द्वेष करणं चुक तसंच उर्दूचा ओ की ठो माहित नसताना तिला मातृभाषा म्हणणंही चुकच होय.

मुस्लीम समाज आणि देशभक्ती



हिंदु - मुस्लीम संबंध आणि सेक्युलर संविधान, भाग 4 :-
मुस्लीम समाज आणि देशभक्ती
कारगीलची अटीतटीची लढाई चालू होती.
टायगर हिल जर भारतानं जिंकलं तर भारताचा विजय होणार होता.
लढाऊ आणि ज्येष्ठ अधिकारी अजित सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्यानं पाक सैन्यावर हल्लाबोल केला. भारतीय सैन्यानं पराक्रमाची शर्थ केली. जिवाची बाजी लावून आपले सैनिक लढले. पण पाकची कुमक मोठी होती. त्यांनी बाजी मारली. आपले जवान एकतर शहीद झाले किंवा गंभीर जखमी तरी.
अजित सिंग यांना माघार घ्यावी लागली.
हा पराभव जवानांच्या लढाऊपणाला, मनोबलाला आरपार छेदून गेला.
जाकीर हुसेन नाईक नावाचा अवघ्या 27 वर्षे वयाचा एक जवान अजित सिंगांना भेटला. त्यानं गनिमी काव्यानं परत हल्ला करण्याची परवानगी मागितली.
रिस्क फार मोठी होती. उरले सुरले सर्व जवान कामी आले असते.
अजित सिंग तयार नव्हते. एव्हाना रात्रीचे अडीच वाजले होते. जाकीर हुसेन नाईक परत परत विनंती करीत होता. त्याचा प्लॅन बढीया होता. अजित सिंग यांनी परवानगी दिली.
आता जाकीर हुसेन नाईक लिड करीत होता.
त्यानं आरोळी ठोकली, "बोलो, अल्ला हो अकबर!"
सार्‍या भारतीय जवानांनी प्रतिसाद दिला, "अल्ला हो अकबर!"
सगळे पाक सैनिक एव्हाना विजयोत्सव साजरा करण्यात मश्गूल होते. खात होते, पित होते, नाचत होते. ते सारेच बेभान झाले होते. त्यांनी हे नारे ऎकले, त्यांची समजूत झाली की पाकीस्थानी सैनिकच येत असणार. ते गाफिल राहिले आणि म्हणता म्हणता भारतीय जवानांनी पाकची सेना कापून काढली. ठार केली. त्यांना सावरायला वेळच मिळाला नाही.
आणि भारताचा तिरंगा टायगर हिलवर डौलानं फडकू लागला.
भारतानं कारगीलचं युद्ध जिंकलं होतं.
जाकीर हुसेन नाईक घोषणा देत होता, "बोलो, भारत माता की जय."
प्रतिसाद मिळत होता, "भारत माता की जय."
सारा आसमंत रात्रीच्या त्या अंधारात घोषणा देत होता, "भारत माता की जय."
स्वातंत्र्याच्या चळवळीत असफाक उल्ला फासावर गेला.
सोलापूरचा कुर्बान हुसेन शहीद झाला.
भारत पाक लढाईत परमवीर अब्दुल हमीद यांनी पराक्रमाची शर्थ केली. त्यांना मरणोत्तर "परमवीर चक्र" दिले गेले.
शहानवाज हुसेन हे सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचे वरिष्ठ सेना अधिकारी होते. सरहद्द गांधी उर्फ बादशाह खान, मौलाना आझाद आणि आणखी कितीतरी यांची स्वातंत्र्य चळवळीतली कामगिरी केवळ अभिमानस्पद होती.
हो, पाकीस्तानच्या हिंसक कारवायांनी भारत संतप्त आहे. भारतात सतत अतिरेकी घुसवणं, भारतीयांच्या संरक्षण यंत्रणा पोखरून काढणं, भारतावर वारंवार हल्ले करणं पाककडून चालूच आहे. त्याचा मुकाबला करायलाच हवा.
हो, अतिरेक्यांची नावं वाचताना त्यात बरीच नावं मुस्लीम असल्याचं वारंवार वाचनात येतं, पण म्हणून सरसकट सर्व मुस्लीमांच्या देशभक्तीवर शंका घ्यायची?
सगळे मुसलमान अतिरेकी नसले तरी सगळे अतिरेकी मुसलमान कसे? असल्या अफवा पसरावयाच्या? यामुळे नेमके काय साधेल?
याला उत्तर म्हणुन हिंदूंमधील अतिरेकी किंवा देशद्रोह्यांची नावं पुढं आणायची?
मला हे मान्य नाहीए.
अतिरेकी मग तो कोणीही असू द्या, त्याची गय करता कामा नये, पण उठसूठ कोणाही देशप्रेमी माणसाच्या देशप्रेमावर शंका घेऊन आपण आपल्याच पायावर दगड पाडून घेत नाही आहोत काय?
.......................................
[संदर्भ पाहा- डोमेल ते कारगिल, मेजर जनरल शशिकांत पित्रे, राजहंस प्रकाशन,पुणे,2013, पृ. 243/244]

भारतीय मुस्लीम परके आहेत काय?

हिंदु - मुस्लीम संबंध आणि सेक्युलर संविधान, भाग 3 :-
भारतीय मुस्लीम परके आहेत काय?
सामान्यपणे मुस्लीम समाजाबद्दल बोलताना काही मंडळी जाणीवपुर्वक मुस्लीम हे परके असल्याचं, ते बाहेरून आल्याचं सांगतात. त्यात किती तथ्य आहे हे तपासायचं तर मग जे 99% धर्मांतरीत मुस्लीम आहेत त्यांना कसं परकं म्हणता येईल? फार तर 1% अश्रफ - अ - बाबत असं म्हणता येऊ शकेल. उरलेले 99% तर धर्मांतर केलेले इथलेच आहेत.
पण तरीही एक प्रश्न शिल्लक राहतोच.
हे विश्व सुमारे 1400 कोटी वर्षांपुर्वी तर आपली पृथ्वी 450 कोटी वर्षांपुर्वी अस्तित्वात आल्याचे शास्त्रज्ञ सांगतात. असेही सांगितले जाते की माणसाच्या आधीचा माणसाचा जो पुर्वज आहे तो 1 कॊटी वर्षांपुर्वी जन्माला आला.
माणसाच्या आधीच्या या पुर्वजाची हाडं केनिया आणि टांझानिया या दक्षिण आफ्रिका प्रांतातील देशात सापडतात ती सामान्यपणे 22 लाख वर्षांपुर्वीची आहेत.
भारतीय उत्खननात मात्र अशी इतकी जुनी हाडं सापडलेली नाहीत. याचा अर्थ असा असू शकतो की कधीतरी आपले पुर्वज अन्न,पाणी यांच्य शोधात या प्रातांत आले असतील. पुर्वी असे मानले जायचे की आर्य सुमारे साडेसहा ते साडेतीन हजार वर्षांपुर्वी भारतात आले. लोकमान्य टिळक ते इतिहासाचार्य राजवाडे यांना हा शोध मान्य होता. मात्र डा.बाबासाहेब आंबेडकर व अन्य संशोधकांनी हा सिद्धांत नाकारलेला आहे.
शक, हुण, रठ्ठ अशा अनेक टोळ्या बाहेरून आल्याचं मानलं गेलं. आक्रमणं होत राहिली.
रोम आणि इतर प्रांतांशी भारताचा व्यापार दोन हजार वर्षांपुर्वींपासून असून त्याचे पुरावे आता तेर, उस्मानाबाद, लोथल [गुजरात] उत्खननात मिळतात.
प्रेषित महंमद पैगंबर यांनी इस्लामची स्थापना ज्याकाळात केली त्याच लगतच्या काळात केरळमध्ये पहिली मशिद उभारली गेल्याचं सांगितलं जातं.
पार्शीसुद्धा असेच भारतात बाहेरून आले.
याचा अर्थ सतत बाहेरून लोक येत राहिले. फार तर काही आधी आले तर काही नंतर आले इतकाच फरक.
अशा परिस्थितीत कोण मुळचा आणि कोण परका हे कळायचं कसं?
एक मार्ग आहे.
बाबर आला, इंग्रज आले, फ्रेंच आले, पोतुगीज आले, अन्य काही आले.
काहींनी इथं राज्य केलं. संपत्ती लुटली आणि आपल्या देशाला ती घेऊन गेले. इंग्रज परत गेले, फ्रेंच परत गेले, पोर्तुगीज परत गेले. असे जे परत गेले ते परके. जे इथेच राहिले, इथेच त्यांनी लग्नं केली, इथंच मेले. इथल्याच मातीत त्यांची कबर उभारली गेले त्यांना या न्यायानं परकं कसं म्हणायचं?
या दीडदोन हजार वर्षात अनेक गोष्टी एकमेकांनी एकमेकांच्या स्विकारल्या. संगित, आर्कीटेक्ट, खाद्य पदार्थ, कला, कौशल्यं, ज्ञान, केशभुषा, वेशभुषा, भाषा, संस्कृती, तत्वज्ञान कितीतरी.
त्यातून एक गंगाजमना तहजीब म्हणजे "गंगाजमुना" संस्कृती जन्माला आली.
राजकीय सत्तेसाठी जरूर लढाया झाल्या, पण याकाळात सामान्य माणूस मात्र एकमेकांशी गुण्या गोविंदानं नांदत होता.
भारतात पहिली हिंदुमुस्लीम दंगल इंग्रज सरकारनं जाणीवपुर्वक "फोडा आणि झोडा" नीती वापरून घडवली ती 13 आगष्ट 1893 मध्ये.
हिंदू आणि मुस्लीम या देशात 1400 वर्षे एकत्र राहात असताना राज्यकर्त्यांमध्ये सत्तेच्या लढाया जरूर झाल्या पण जनतेमध्ये जातीय-धार्मिक दंगल झाली नाही, ती इंग्रजांनी घडवली 1893 साली, याचाही विचार आपण करायला हवा.
अकबराच्या नाण्यांवर तो राम सीता यांचं चित्र कोरतो. हैदर अली हा टिपूचा बाप आपल्या नाण्यांवर शंकर पार्वतीचं चित्र कोरतो. का कोरतो? पेशवे आपली नाणी फारशी आणि पर्शियनमध्ये कोरतात हे पुरावे अतिशय बोलके आहेत.
गणिताच्या विकासातून आज आपण फार मोठी प्रगती केलेली आहे.
शून्याचा शोध भारतात लागतो, पण "हिसाब अल्जब्र" मात्र "अल झफर मोहम्मद ख्वारिझ्मी" [ इ.स.780 ते 850] हा अरब व्यापारी लिहितो, काय आपल्याला हे माहित आहे?
क्रमश:--

हम पांच हमारे पच्चीस हा प्रचार खोटा

हिंदु - मुस्लीम संबंध आणि सेक्युलर संविधान, भाग 2 :-
हम पांच हमारे पच्चीस हा प्रचार खोटा ---
भारतीय संविधानाच्या कलम 44 मध्ये स्पष्टपणे आदेश देण्यात आलेला आहे की," The State shall endeavour to secure for the citizens a uniform civil code throughout the territory of India."
माझ्या माहितीप्रमाणे गोव्यात पोर्तुगिज सरकारने असा uniform civil code केलेला आहे आणि तो तिथल्या मुस्लीमांनी मान्य केलाय. इंग्रज सरकारने 1939 साली शरियत कायद्यात बदल केलेले चालतात पण भारत सरकारने केलेले चालत नाहीत हे मला तरी अनाकलनीय आहे. माझ्या माहितीप्रमाणे खुद्द इस्लामिक देशांमध्येही तोंडाने तीन वेळा तलाक म्हटले की झाला घट:स्फोट ही जुबानी तलाक पद्धत नाही. भारतात मात्र ती आजही आहे. याच्या विरोधासाठी मुस्लीम स्त्रियांनी उभे राहायला हवे.
मुस्लीमांमध्ये एकाचवेळी चार बायका करण्याची असलेली पद्धत ही सुद्धा मुस्लीम स्त्रियांवर अन्याय करणारीच आहे.
हिंदू पुरूष मात्र जणू काही त्यामुळे हिंदू पुरूषांवरच अन्याय होतो अशा पद्धतीने बोलतात, "त्यांना चारचार बायका करायची परवानगी आणि आम्हाला मात्र..." ही तक्रार चुकीचीच आहे.
मुस्लीमांमध्ये केरळ राज्यात शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या चांगल्या सोयी असल्यानं तिथले मुस्लीम कुटुंब नियोजनात खुप पुढे आहेत. मात्र अन्यत्र मुस्लीम समाज गरीबी, निरक्षरता, अनारोग्य आणि बेरोजगारी यांनी पिडलेला असल्यानं आणि जन्माला येणारं प्रत्येक मुल हे कमावणारे हात असल्यानं मुस्लीम समाजात कुटुंब नियोजन कमी होते. परिणामी मुस्लीमांची लोकसंख्या इतर समाजांच्या तुलनेने वाढते हे खरेय. 2001 आणि 2011 या जनगणनांमध्ये हिंदूंचे जन्म दर वाढीचे प्रमाण 16.8% आहे तर मुस्लीमांचा याचकाळात तो 24.6% आहे. मुस्लीमांनीही कुटुंब नियोजन करायला हवे हे मान्यच आहे.
मात्र ते चार बायका करतात आणि म्हणून "हम दो हमारे दो" तर ते "म्हणजे हम पांच हमारे पच्चीस" अशाप्रकारे भरमसाठ [पाचपट वाढतात ] लोकसंख्या वाढते असे जे अवाजवी चित्र रंगवले जाते ते मात्र खरे नाही.
मी चार शादीया करण्याचा समर्थक नाही. मात्र चार लग्नांमुळे मुस्लीमांची लोकसंख्या वाढत नाही तर ती गरीबी, निरक्षरता, बेरोजगारी आणि कुटुंब नियोजनाबाबतची योग्य ती जागृती नसणं यातून वाढते हे समजून घेतलं पाहिजे.
लोकसंख्या शिक्षणाचा हा मुद्दा आपण जरा नीट समजाऊन घेऊया.
हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही समाजात 1000 पुरूषांमागे 922 स्त्रिया आहेत. समजा त्या 1000 आहेत असे गृहीत धरूया.
एक हजार स्त्रियांनी एक हजार पुरूषांशी विवाह केले आणि त्यांना प्रत्येकीला पाच मुलं झाली असं समजलं तर लोकसंख्या पाच हजारानं वाढणार.
आता असं समजा की प्रत्येक मुस्लीम पुरूषानं चार बायका केल्या तर 250 च पुरूषांची लग्नं होणार. त्या मुस्लीम पुरूषाला प्रत्येक बायकोपासून पाच मुलं झाली तर त्याला वीस मुलं होतील. परंतु प्रत्यक्षात 250 च पुरूषांची लग्नं झालेली असल्यानं 20* 250= 5000 एव्हढीच लोकसंख्या वाढणार आहे.
काही मुस्लीम पुरूष एकापेक्षा जास्त बायका करतात हे खरं असलं तरी सरसकट सगळे मुस्लीम पुरूष चार बायका करतात हे खरं नाही. तेव्हढ्या स्त्रियाच नसल्यानं ते शक्यही नाही. मात्र तरीही एक पुरूष : एक स्त्री हेच सुत्र न्यायाचं आहे यात शंका नाही.
क्रमश:---

हिंदु - मुस्लीम संबंध आणि सेक्युलर संविधान, भाग,1

हिंदु - मुस्लीम संबंध आणि सेक्युलर संविधान, भाग,1 :-
उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती आणि मा. सर्वोच्च न्यायालयाने बाबरी मशीद विवाद चर्चेने सोडवावा अशा सुचना दिल्यानंतर या चर्चेला पुन्हा तोंड फुटले आहे.
यात हमखास आढळणारी गोष्ट म्हणजे धर्मवादी जोरात [आक्रमक] आणि सेक्युलर [गारठलेले] बचावात्मक पवित्र्यात दिसत आहेत.
1. खरं म्हणजे हिंदु आणि मुस्लीम यांच्यातला हा गुंता किमान 1400 वर्षांचा आहे. किमान 800 वर्षांची मुस्लीम राज्यकर्त्यांची राजवट, इस्लाम हा बंदिस्त धर्म असणं, उर्दू भाषा, शरियत, 1857 चे युद्ध, इंग्रजांचे फोडा आणि झोडा राजकारण, त्यामुळे 1893 पासून घडवण्यात आलेल्या धार्मिक दंगली, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, महमद अली जिना, सर सय्यद अहमद, मौलाना आझाद, डा. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल आणि विनायक दामोदर सावरकर व गोलवलकर गुरूजी यांच्या भुमिका, पाकीस्तानची निर्मिती, फाळणीच्या वेळी झालेल्या दंगली, कत्तली, जम्मू - काश्मीरचा प्रश्न, दहशतवाद, 370 कलम, एकसारखा नागरी कायदा, जुबानी तलाक, चार लग्नं, कांग्रेस पक्षाने आजवर व्होट बॅंकेच्या राजकारणासाठी वापरलेला आणि बदनाम केलेला "सेक्युलर" विचार, पाकीस्तानचे भारतावर असलेले "अतिविशेष प्रेम", आजवर झालेली भारत पाक युद्धे, हमीद दलवाईंचे मुस्लीम सत्यशोधक आंदोलन, शाहबानो खटला आणि इतर अनेक पैलू आहेत. भारत हा "गंगाजमुना तहजीब" म्हणजे विविधता, समन्वय आणि बंधुतेचा सन्मान करणारा देश आहे.तीच आमची खरी संस्कृती आहे.
आज त्यातल्या फक्त एका पैलूवर चर्चा करणार आहे. बाकीचे पैलू आपण नंतर क्रमश: बघू...
हिंदू समाजाची विभागणी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा चार वर्णात आणि 4635 जाती/जमातींमध्ये झालेली आहे.
मुस्लीम समाजातही शिया, सुन्नी, अहमदिया आणि इतर असे भेद आहेतच.
पण भारतीय मुस्लीम समाजात आणखी चार महत्वाचे घटक आहेत.
1. अश्रफ - अ - जे स्वत:ला बाहेरून आलेले उच्चकुलीन मानतात असे, इराक,इराण, अफगाणिस्तान, वा अन्य देशातून आलेले आणि नबाब, बादशहा, अमीर, उमराव म्हणून प्रतिष्ठा व मानमरातब असलेले, [ज्यांची लोकसंख्या भारतीय मुस्लीमांच्या संख्येत 1% पेक्षा कमी आहे.]
2. अश्रफ - ब - हिंदूंमधील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्यातून धर्मांतर करून मुस्लीम झालेले, [ज्यांची लोकसंख्या भारतीय मुस्लीमांच्या संख्येत 2% पेक्षा कमी आहे.]
3. अजलफ - हिंदूंमधील शूद्र वर्णातून धर्मांतरीत झालेले,
4. अर्जल - हिंदूंमधील अतिशूद्र किंवा दलित, आदीवासी यांच्यामधून मुस्लीम झालेले,
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे क्र.3 व 4 यांची लोकसंख्या भारतीय मुस्लीमात 97% + आहे. मात्र गेल्या 70 वर्षात या समुहांमधून केवळ 20% नेतृत्व उभे राहिले. या उलट 3% पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या क्र.1 व 2 मधून मात्र 80% पेक्षा अधिक नेतृत्व उभे राहिले.
परिणामी मुस्लीम लिडरशीप कायमच इस्लाम खतरेमें असल्याचा बागुलबुवा करीत राहिली.
शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सुरक्षितता हे मुस्लीम समाजाचे खरे अग्रक्रमाचे प्रश्न आहेत. शिवाय विविध प्रादेशिक आणि भाषक संस्कृतींचा तिथल्या मुस्लीमांवरचा प्रभावसुद्धा महत्वाचा घटक आहेच. त्यांच्याकडे मात्र या उच्चभृ नेतृत्वाने जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले.
क्रमश: --

Wednesday, March 22, 2017

डोंगर कोसळला


[ गोविंदराव तळवलकर - एक निर्भय आणि विद्वान संपादक ]
माझे मित्र ग्रंथालीचे दिनकर गांगल यांना "महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन " या माझ्या पहिल्या पुस्तकाची प्रत भेट द्यायला मी मुंबईच्या टाइम्सच्या इमारतीत गेलो होतो.
ते म्हणाले, "किती प्रती आणल्यास?"
"तुम्हाला द्यायला एकच आणलीय," मी सांगितलं. ते म्हणाले, " अरे आणखी दोन हव्या होत्या. एक म.टा. ला पुस्तक परीक्षणासाठी द्यायला आणि दुसरी संपादक गोविंदरावांना द्यायला."
मी म्हटलं, "आपली त्यांची काय ओळख नाही. शिवाय माणूस फार खडूस असल्याचं सारेच सांगतात."
त्यांनी शू केलं. " अरे, इकडं म.टा. च्या कार्यालयात असं बोलू नकोस. माझी काय नोकरी घालवतोस काय?" गोविंदरावांना सारेच टरकून असायचे.
त्यांनी फारच आग्रह केला. तू ही प्रत आज गोविंदरावांना भेटून दे म्हणून. ते मात्र माझ्यासोबत यायला तयार नव्हते. तू एकटाच जा असं त्यांनी सांगितलं. प्रशांत
दीक्षित गोविंदरावांचे सेक्रेटरी होते. त्यांनी गोविंदराव कामात आहेत, भेटायचं असेल तर बसावं लागेल असं सांगितलं.
मी थांबलो.
अर्ध्या तासानं त्यांनी गोविंदरावांच्या केबीनमध्ये मला सोडलं. मी आत गेलो तेव्हा ते संगणकावर काहीतरी लिहित बसले होते. मी नमस्कार केला. माझी ओळख करून दिली. गोविंदराव माझ्याकडं बघायलासुद्धा तयार नव्हते. चेहरा एकदम कोरा. मी त्यांच्याशी बोलत असलो तरी संपुर्ण कोरा. हं नाही. की हू नाही. मला वाईट वाटलं. माणूस फारच माणुसघाणा असावा असं वाटून गेलं. आलोच आहे तर पुस्तक दिलं. त्यांनी हातानं खूण करून ते तिकडं ठेव असं सुचवलं. मी पुस्तकाबद्दल दोन वाक्यं बोललो आणि माझा धीरच खचला. आता फुटा असा त्यांच्या चेहर्‍यावर भाव होता. मी नमस्कार केला आणि बाहेर पडलो. मला फार वाईट वाटलं होतं. इतक्या खडूस माणसाकडं कशाला पाठवलं गांगलांनी आपल्याला? म्हणुन गांगलांकडं जाऊन त्यांना मी विचारलंही.
ते म्हणाले, "काय झालं, त्यांनी तुला गेट आऊट म्हटलं का?"
"नाही. ते तसं काय म्हणाले नाहीत. मुळात ते अवाक्षरही बोललेच नाहीत. माणूस फारच तुसडा दिसतोय."
गांगल म्हणाले, " हे बघ जर त्यांनी तुला गेट आऊट म्हटलं नसेल तर त्यांनी तुला खुपच सन्मानाची ट्रीटमेंट दिलीय. गैरसमज, मान अपमान मनातून काढून टाक."
मी तिथनं बाहेर पडलो. पुण्याला आलो. तो मंगळवार होता.
गुरूवारी सकाळी त्याकाळात म.टा. मध्ये पहिल्या पानावर रविवारच्या मैफील पुरवणीची मोठी जाहीरात यायची.
ती वाचली आणि उडालोच.
पहिलाच लेख असणार होता गोविंदरावांचा. "समर्पक युक्तीवाद - तरूण संशोधक हरी नरके यांनी साप्ताहिक सोबतचे बाळ गांगल यांच्या लेखनाचं समर्पक युक्तीवादांनी केलेलं वस्त्रहरण... "
मी शनिवारीच पेपर टाकणाराला सांगुन ठेवलं, " उद्याचा पेपर टाकायचं चुकवू नकोस. महत्वाचा लेख येणार आहे."
पण रविवारी पहाटेच जाग आली. पेपर आमच्याकडे सकाळी आठ वाजता यायचा. मला धीर धरवेना. सायकल काढली आणि दामटत पिंपरीला गेलो. त्याकाळात म.टा. मुंबईहून येत असल्यानं उशीरा म्हणजे सातपर्यंत यायचा. तिकडं वाट बघत थांबलो. पेपर आल्यावर बघतो तो काय मैफिलच्या पहिल्या पानावर पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा कलर फोटो आणि गोविंदरावांचा भला मोठा लेख.
गोविंदराव कोणत्याही विषयावर लिहिताना चार चांगल्या गोष्टी सांगून झाल्या की एकदोन तरी उणीवा- त्रुटी किंवा दोष दाखवणारच. हाच पायंडा होता. पण गोविंदरावांचा हा लेख त्याला अपवाद होता. त्यांनी पुस्तकाचं तोंड भरून कौतुक केलेलं होतं.
मी पेपरवाल्याकडचे म.टा.चे सगळे जादा अंक घेतले. त्याकाळात त्याच्याकडं दहा जादा अंक यायचे.
मी गोविंदराव तळवलकरांना आभाराचा फोन केला तेव्हा मात्र ते अतिशय जिव्हाळ्यानं बोलले. त्यांनी मला मुंबईला भेटायला बोलावलं.
भेटीत त्यांनी चक्क चहा दिला. घरची, मी कायकाय करतो या सगळ्यांची आपुलकीनं चौकशी केली.
त्या दिवशीचे गोविंदराव आणि आजचे गोविंदराव एकदम वेगळे होते. किती फरक.
भेटत जा. म.टा.साठी लिहा म्हणाले. त्यांनी माझं पुस्तक टाइम्सचे संपादक दिलीप पाडगावकर यांना वाचायला दिलं. त्यांनीही टाइम्समध्ये पुस्तकावर लिहिलं.
आठवडाभरात एका कार्यक्रमात पुन्हा तळवलकरांची भेट झाली. सौम्य हसले. हो, ते कधीतरी माफक हसायचेसुद्धा!
मी त्यांना टेल्कोच्या संपाबद्दल बोललो. आमच्या कंपनीत तेव्हा राजन नायर नावाच्या नेत्यानं फार उतमात चालवला होता. त्याला कामगारांची साथ होती. नायरबद्दल त्याचे अंडरवर्ल्डबरोबर संबंध असल्याचं खाजगीत बोललं जायचं. त्यानं अनेक अधिकार्‍यांवर हल्ले केलेले होते. ते ऎकून गोविंदराव काळजीत पडले. मला म्हणाले, "हे सारं जरी खरं असलं तरी मी नायर आणि कामगारांविरूद्ध फारसं लिहू शकणार नाही. या सगळ्यांच्या मागं राज्याचे सीएम असल्याचं त्यांनी स्पष्टपणे मला सांगितलं. त्यांना भेटा आणि हे मिटवा अन्यथा हे आणखी वाढू शकतं असा निरोप तुमच्या वरिष्ठांना द्या, असं म्हणाले. गोविंदरावांसारखा दणकट संपादकसुद्धा सीएमसमोर आपण हतबल असल्याचं सांगतो हे मला नवं होतं. धक्कादायक होतं.
मी म्हटलं, " पण सीएम तर आम्हाला सहानुभुती दाखवतात."
ते म्हणाले, " सीएमचा राग टाटांवर नाही. तुमची मिडल मॅनेजमेंट त्यांना आणि त्यांच्या पक्षाच्या स्थानिक नेत्यांना फारसा भाव देत नसल्यानं मिडल मॅनेजमेंटला चांगला धडा शिकवण्यासाठी आणि कामगार नेते दत्ता सामंत यांना पुणे, पिंपरी, चिंचवडमध्ये शिरकाव मिळू नये यासाठी सीएम राजन नायरला मोठा करीत आहेत."
एसेम जोशी यांच्या अंत्ययात्रेला गोविंदराव पुण्याला आले होते तेव्हा भेट झाली. बोलले. मला म्हणाले, "तुम्ही काय भाषणं वगैरे देता म्हणे?"
मी चपापलो. हो म्हणालो. त्यांच्या कपाळावर आठ्या उमटल्या. वक्त्यांविषयीचा तिटकारा स्पष्ट दिसत होता. मला म्हणाले," भाषणं तात्काळ बंद करा. लिहा. भाषणं वार्‍यावर उडून जातात. लेखन टिकतं. व्यक्त होण्याची उर्जा बोलून संपते आणि मग हातून फारसं लेखन होत नाही. तुम्ही तरूण आहात. तुमच्या गुरूजींचं अनुकरण करा."
ते म्हणत होते ते खरंच होतं. पण मी त्यांचं ऎकू शकलो नाही.
व्याख्यानांची सतत निमंत्रणं यायची. कितीही नाकारली तरी काही घ्यावीच लागायची. त्याच्या बातम्या छापून आलेल्या बघितल्या की गोविंदराव चिडायचे. बोलायचे.
गोविंदराव लेखक, संपादक म्हणून अव्वल दर्जाचे होते. पण त्यांचं वक्तृत्व सामान्य होतं. त्यांना फारसं बोलता यायचं नाही. त्यामुळं असेल पण त्यांना वक्त्यांबद्दल नफरत होती किमान अढी तरी होतीच. शिवाजीराव भोसले हे वक्ते त्या काळात तुफान लोकप्रिय होते. पण गोविंदराव संधी मिळेल तिथे त्यांना ठोकायचे. फारच वाभाडे काढायचे. इथपर्यंत ठीकच होतं. पण माझे आवडते वक्ते आणि लेखक, विचारवंत नरहर कुरूंदकर यांच्यावरही गोविंदराव घसरायचे. त्याचं कारण बहुधा त्यांना एकुणच वक्त्यांविषयी घृणा असावी असा माझा कयास आहे. त्यांची मतं एकदम ठाम असत. त्यात बदलाची सुतराम शक्यता नसे. एखादा माणुस नाही आवडला तर ते त्याच्याशी कायम तिटकार्‍यानंच वागायचे. आकसानं म्हटलं तरी चालेल.
माझी भाषणं थांबत नाहीत म्हटल्यावर त्यांनी फडकेसरांना सांगितलं. सर पण माझ्यामागं हरी भाषणं कमी कर अशी भूणभूण लावायला लागले आणि एकदा दोनदा तर गोविंदरावांनी म.टा.त माझ्याविरूद्ध प्रखर लिहायला लावलं अशोक जैन आणि शशिकांत सावंतांना. यामागं त्यांची सद्भावनाच होती. पण माझाही नाईलाज होता. पुढच्यास ठेच मागचा शहाणा हे खरं नाही. स्वत:ला ठेच लागल्याशिवाय शहाणपण येतच नाही.
शरद पवार आणि यशवंतराव चव्हाण यांच्यावर त्यांचे निहायत प्रेम होते. त्यांना सर्व गुन्हे माफ. या समकालीन दोन राजकीय नेत्यांच्या बाबतीत ते अतिव मवाळ होते. तसं ते जाहीरपणे मान्यही करायचे. अर्थात तरीही पवारांनी यशवंतरावांना सोडल्यानंतर गोविंदरावांनी त्यांच्यावर प्रचंड झोड उठवली होती.
पुण्याच्या मॅजेस्टीक गप्पांमध्ये त्यांची मुलाखत प्रा.ग.प्र.प्रधान यांनी घेतली होती. "प्रॅक्टीकल सोशँलिझम" या नवाकाळच्या निळकंठ खाडीलकर यांच्या पुस्तकावर तुमचं मत काय आहे या प्रश्नावर ते फटकळपणे म्हणाले, "मी बाल वांड्मय वाचत नसतो."
गोविंदराव विद्वान संपादक होते. त्यांची विद्वत्ता प्रकांड आणि अभिरूचि तालेवार होती. त्यांचा व्यासंग दांडगा होता. दरदिवशी काहीतरी लिहावं आणि वाचावं हा त्यांचा परिपाठ होता.मराठी पत्रकारितेत आणि राजकारणी मंडळींमध्ये त्यांचा दरारा फार मोठा होता. 
त्यांची सगळी पुस्तकं हा त्यांच्या दर्जेदार लेखनाचा धडधडीत पुरावाच आहेत. दमदार लिहायचे गोविंदराव. त्यामागे संशोधन आणि स्वतंत्र चिंतन असायचे.
यदिसरांच्या मुलाच्या लग्नाला ते आले होते. माधव साठेंनी त्यांना छेडलं. "काय गोविंदराव आज तुमचा चेला [अशोक जैन] तुमच्यासोबत दिसत नाही."
ते म्हणाले, तो माधव गडकर्‍यांची जागा भरून काढायला गेलाय. [माधवराव उत्तम वक्ते असल्यानं गोविंदराव त्यांच्यावर संतापून असायचे. अशोक जैन 
कुठंतरी भाषणाला गेले होते, त्याचा राग ] माझ्याकडं बघत म्हणाले, "काय तुमचे भिकेचे डोहाळे आत्ता तरी कमी झाले की नाहीत? लिहा. अहो, त्या बोलण्याचा काडीमात्र फायदा नसतो. सारं वार्‍यावर उडून जातं. नंतर पश्चाताप करीत बसाल. फार तरूण वयात तुम्हाला अभ्यासाची शिस्त मिळालीय ती अशी वाया घालवू नका."
एक प्र.के.अत्रे सोडले तर बाकी सार्‍या वक्त्यांवर त्यांची खुन्नसच होती. अत्रे गेले तेव्हा मात्र त्यांनी अग्रलेखाला शीर्षक दिलं होतं, "कडा कोसळला."
खरंच आज गोविदरावांचं जाणं म्हणजे एक डोंगर कोसळणंच आहे .......

Tuesday, March 21, 2017

आपली बॅग आपल्याच हाती बरी..


कार्यक्रमाच्या संयोजकांच्या हातात आपली बॅग द्यायची नाही असा त्या दिवसापासून मी फायनल निर्णय घेतला.
आपण कुठेही व्याख्यानाला गेलो की रेल्वेस्टेशनवर आयोजक घ्यायला येतात. त्यांच्यासोबत काही अतिउत्साही स्वयंसेवक असतात. ते पहिली आपल्या हातातली बॅग ताब्यात घेतात. आपण कितीही नाही म्हटलं तरी ते असं काही खनपटीला बसतात की शेवटी बॅग द्यावीच लागते.
एकदा शिक्षक संघटनेचा राज्यव्यापी अधिवेशनाचा कार्यक्रम होता. स्टेशनवर मला घ्यायला शिक्षक नेते जीभौ आले होते.
त्यांच्यासोबत किमान 25 ते 30 तरी शिक्षक असतील.
हारतुरे झाले. एकाने तर खोबर्‍याच्या वाट्या आणि खारकांचा मोठ्ठा हार करून आणलेला. गंमतच सारी.
एकानं बॅग मागितली. मी नेहमीप्रमाणं नाही म्हटलं.
पदाधिकारी म्हणाले, "सर द्या की बॅग. काही मोठी रक्कम वगैरे आहे का बॅगेत?"
मी म्हटलं, " नाही हो. बॅग हलकी तर आहे. मला सवय आहे."
त्यांनी फारच आग्रह केला म्हणून बॅग दिली. बाहेर बर्‍याच कार, सुमो उभ्या होत्या. मला एकीत बसवलं गेलं. आमची वरात रेस्ट हाऊसला पोचली. रूम ताब्यात आली. रात्रभर प्रवास, जागरण झालेलं होतं. लवकर फ्रेश व्हावं म्हणुन बॅगेची चौकशी केली. तर बॅग नेमकी कोणी नेली होती तेच त्यांच्या त्यांच्यात नक्की ठरेना.
पदाधिकारी म्हणाले, " प्राब्लेमची काही अडचण नाय बघा. गेली बॅग तर गेली. आपण नविन घेऊ. कायकाय होतं बॅगेत ते सारं नवं घेऊ. आत्ता दोनेक तासात शहरातील दुकानं उघडली की समदं नवं घेऊन येतो. तुम्ही तोवर फ्रेश व्हा."
माझ्या नोट्स आणि पुस्तकं गेली म्हटल्यावर मी चिडलो. "तुम्ही एव्हढे ढीगभर लोक सोबत असताना अनोळखी माणूस माझी बॅग पळवतो म्हणजे काय?"
"त्याचं कायय की आपूण सगळे सेल्फी घेत होतो ना तव्हा तो माणूस सटकला असणार. आपुण शोधुत त्याला. मायला जातोय कुठं?"
बर्‍याच वेळानं एक शिक्षक घामाघुम होऊन धावत पळत आलेले. "माफ करा सर, तुमची बॅग माझ्या गाडीत ठेवली होती. पण सरांनी मला डायरेक्ट कार्यक्रमाच्या मंडपात पिटाळलं. तिकडं कामात मी विसरूनच गेलो बघा. आता थोड्यावेळापुर्वी संघटनेची पावतीपुस्तकं काढायला डिकी उघडली तर बघतो तो काय तुमची बॅग. माफ करा एकडाव."
दीड दोन तास मी ताटकळून गेलेलो. आत्ता त्या प्राथमिक शिक्षकावर वैतागून तरी काय करणार? बॅग मिळाली ना बस झालं.
कार्यक्रम छानच झाला. दुपारची ट्रेन होती. ती पकडून मला पुढं नागपूरला जायचं होतं.
परत पोचवायला आठदहा जण सोबत आले. मी माझी बॅग घट्ट पकडून ठेवलेली होती. द्या सर बॅग, मी घेतो, असा कितीही आग्रह झाला तरी मी ती कुणालाही दिली नाही.
आम्ही स्टेशनला पोचलो. प्लॅटफार्मवर पोचल्यावर पदाधिकारी म्हणाले, " सर, तुमच्या दोन्ही हातात बॅगा घेऊन कसे चढणार तुम्ही? द्या माझ्याकडं. मी कुठंही जात नाहीये. कार्यक्रमाचे स्मृतीचिन्ह, खोबर्‍याच्या वाट्या आणि खारकांचा मोठ्ठा हार, भेट मिळालेली पुस्तकं यामुळे दुसरी एक पिशवी सोबत घ्यावी लागली होती.
अनाऊंसमेंट झाली. आम्ही गप्पा मारत होतो. गाडी आली. आमचा डबा बरोबर आम्ही उभे होतो तिथेच आला. लोक उतरले. जीभौंनी माझ्या बॅगा दरवाजातून आत टाकल्या. मला बसवलं की गाडी लगेच निघाली.
माझा सीट नंबर शोधत गेलो तर तिकडे एक माणूस आधीच बसलेला होता. तो म्हणाला, "हे रेल्वेवाले लब्बाड आहेत. एकाच सीट नंबरचं तिकीट दोघांना मुळात देतातच कसं?"
टीसीची वाट बघत मी थांबून राहिलो. शेजारचा एकजण म्हणाला, " टेका तुमचं बूड तोवर. या टीशीवाल्यांचं काय खरं नसतय. आला तं येतोय. नायतर बसा बोंबलत."
मी वाईच टेकलो. तर टीसी आलाच. मी त्याला माझी अडचण सांगितली. तो म्हणाला, "खरं म्हणजे असं व्हायला नको. पण कायय की होते कधीतरी अशी चुक. मी करतो तुमची पर्यायी व्यवस्था."
चांगला होता बिचारा.
त्यानं माझ्याकडे तिकीट मागितलं. पाह्यलं. मला परत दिलं. म्हणाला, "बसा मी आलोच व्यवस्था करून."
पण लगेच तो परत आला. त्यानं माझ्याकडे परत तिकिट मागितलं. तिकीटाकडं बघत तो हसायलाच लागला. मला म्हणाला, "तुम्हाला जायचंय कुठं?"
मी म्हटलं, "नागपुरला." तो म्हणाला, "सर ही गाडी नागपुरला जात नाही. ही दिल्लीला जाते. भुसावळवरून हिचा ट्रॅक बदलतो. तुम्ही चुकीच्या गाडीत बसलाय."
बापरे!
ह्या मास्तर मंडळींनी पुन्हा घोळ केला होता. घाईगडबडीत मला चुकीच्याच गाडीत बसवलं बेट्यांनी.
पण आपलीही चुक आहेच ना. आपण गाडीवरचं नाव, गाडीनंबर का नाही बघितला? पण अनाऊन्समेंट तर आपल्याच गाडीची झाली होती. काय चुकलं नेमकं?
आता काय करायचं?
टीसी म्हणाला, "काळजी करू नका. भुसावळला उतरा. तुमची गाडी मागनं येतेच आहे."
मला काळजी ही की जळगावला पॅसेंजर आला नाही म्हणून त्या टीसीनं समजा माझा बर्थ वेटींगवरच्या दुसर्‍याच पॅसेंजरला दिला, तर झाली का पंचायत?
मी पदाधिकार्‍यांना फोन केला. ते म्हणाले, " हौ ना, तुमच्यावाली गाडी हल्ली ना हल्ली तोवर त्याच प्लॅटफार्मवर मागनं गाडी आली. तवाच माह्यावाल्या लक्षात आलं की भौ गडबड झाल्याली हाय. मंग तिकडंच थांबून त्या टिसीवाल्याला भेटून अशानं असं झाल्यालं है. मिस्टेक जरा सांबाळून घ्या म्हणलं. तुमच्यावाली जागा मोकळीच ठेवायला सांगितली. काळजीचं काम नाय. तुम्ही भुसावळले उतरून घ्या. मागनं तुमच्यावाली गाडी येऊन राहिली."
मी म्हटलं, "तुमच्या लक्षात आल्यावर मला लगेच फोन करून का नाही कळवलं तुम्ही?"
ते शांतपणे म्हणाले, "त्याचं असंय की हिकडून भुसावळला गाडी पोचाले किती टाइम लागतो, ते आम्हाला बिल्कुल माहितीए. आधी सांगून तुमची बीपीशुगर वाढणार. तुम्ही गाडीतून तर उडी मारू शकत नाय. मी दोन मिंटात फोन करणारच होतो. सर आपलं समदं परफेक्ट प्लॅनिंग असतंया."

Monday, March 20, 2017

आणि महाराष्ट्र एका बापूला मुकला

शाळेत असताना पुण्याच्या गिता धर्म मंडळाने घेतलेल्या गिता पाठांतर स्पर्धेत मला पुरस्कार मिळाला होता. पुरस्कार वितरण समारंभात मंडळाचे अध्यक्ष म्हणाले,
"या मुलाचे आडनाव जरी नरके असले तरी हे लघुरूप आहे. मूळ आडनाव "नरकेसरी" असणार. तेव्हा आजपासून त्याने आडनाव बदलून घ्यावे व नरके ऎवजी नरकेसरी लावावे.
आमचं घराणं वारकरी. पायी चालत देहू, आळंदी, पंढरी करणारं.
चातुर्मासात घरी दररोज संध्याकाळी एक गुरूजी येऊन जाहीर ग्रंथवाचन करायचे. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, भागवत, नवनाथ, हरीविजय, रामविजय, पांडवप्रताप, शिवलिलामृत, दासबोध, गुरूचरित्र असं सतत चाललेलं असायचं.
गुरूजी थकल्यावर त्यांचा मुलगा यायला लागला.
श्रावण महिन्यात त्या मुलाकडे खूप निमंत्रणं असायची. त्याची दमछाक व्हायची. श्रीमंत असाम्या झाल्या की मगच आम्हा गरिबांचा नंबर लागायचा. त्यामुळे कधीकधी रात्री अकरा साडेअकरा वाजता तो यायचा. घरातली लहान मुलं भुकेनं रडायची. पण पुजा झाल्याशिवाय जेवन मिळायचं नाही. पाहुणेरावळे बाहेरगावाहून आलेले असायचे ते वैतागायचे. असं दरवर्षी चालायचं.
एका वर्षी रात्रीचे बारा वाजायले आले तरी तो मुलगा आला नाही. माझा मोठा भाऊ संतापला. गावात ओळखीचं एक धार्मिक पुस्तकांचं दुकान होतं. भावानं दुकानदाराला अर्ध्या रात्री उठवलं. सत्यनारायणाची पोथी विकत घेतली.
घरात शिकणारा मीच असल्यानं मला आदेश देण्यात आला. त्या रात्री मी पुजा सांगितली. जमलेले लोक खुष झाले.
आणि रातोरात एका शाळकरी गुरूजीचा जन्म झाला.
गोरगरिब मलाच पुजेला बोलवायला लागले. सरावानं सफाई येत गेली. मग मीपण टणाटण पुजा सांगत फिरायचो.
भलताच भाव मिळायचा. थोरमोठेसुद्धा पाया पडायचे. पुजेचं साहित्य आणि वर आणखी दक्षिणा मिळायची. एका महिन्यात वह्यापुस्तकं, नवे कपडे, सारं काही व्हायचं.
परिसरात माझं नाव होऊ लागलं. दुर्दुरवरून पुजेच्या सुपार्‍या यायच्या.
बरं, गोरगरिब म्हणायचे, पुजेला अमूक एक वस्तू नाही मिळाली. मी म्हणायचो, काळजी करू नका. मनी भाव आहे ना मग तो पुरेसा आहे. त्यामुळं लोकप्रियता भराभर वाढू लागली. कधी जर आमच्या गुरूजींच्या मुलाला जमणार नसेल तर तोच माझं नाव सुचवायचा.
खरी अडचण श्रावणात नसायची.
ती यायची ते नियमित पोथीवाचन करताना. समोर बसलेल्या श्रोत्यांना श्लोकांचा वा ओव्यांचा अर्थ समजाऊन सांगावा लागायचा. माझा मोठा भाऊ निरक्षर असला तरी त्याचा व्यासंग फार मोठा होता. तो ओव्यांची फोड करून सांगायचा. काहीकाही ओव्या भलत्याच अवघड असायच्या. जाम अर्थबोध व्हायचा नाही. मग काय खूप झटापट चालायची.
समोर बसलेले चाळीसपन्नास श्रोते दिवसभर शेतमजुरी करून थकलेले असायचे. त्यांना झोप अनावर व्हायची. त्यांचे डोळे मिटले जायचे.
कधीकधी तळटिपा, शब्दार्थ बघून काही अर्थ लावावे लागायचे. मग भाऊ थकायचा. तो म्हणायचा आता तूच सांग. मग मी जमेल तेव्हढा अर्थ लावायचा प्रयत्न करायचो.
त्याकाळात चांदोबा हे माझं अतिशय आवडतं मासिक होतं. त्यातल्या बोधकथा, चुटकुले, काही कथा यांचा अशावेळी उपयोग व्हायचा.
शाळेच्या ग्रंथालयातले ग्रंथ आरपार वाचायची सवय लागल्यानं अर्थ सांगण्याचं काम चांगलं जमू लागलं. ऎकणारे अगदी खुष असायचे.
वर्षानुवर्षे काही पोथ्या अनेकवार वाचल्यानं अगदी तोंडपाठ झालेल्या असायच्या.
एकुण अगदी झकास चाललेलं होतं.
डा. बाबा आढाव आणि सामाजिक चळवळीतल्या इतर मंडळींमुळं कुरूंदकर, सरदार, विनोबा, ढेरे, साने गुरूजी, फुले, आंबेडकर, ह.ना. आपटे, नाथमाधव, फडके, खांडेकर, दांडेकर, पुल, शिवाजी सावंत, जीए असं काहीबाही वाचनात यायला लागलं आणि कोश फुटायला लागला.
पुढे पुणे विद्यार्थी गृहात, एका राज्य पातळीवरील गिता लेखन-पाठांतर स्पर्धेत भाग घेतला. आमचे अण्णा म्हणजे डा.ग,श्री.खैर हे गितामहर्षी. त्यांचं सारं वाचलेलं होतं. त्यांना अनेकदा ऎकायची संधी मिळत असे. ते खुपदा घरी बोलवून मायेनं विचारपूस करायचे. शिकवायचे. पाठांतरासाठी त्यांनी एका शास्त्रीजींचं नाव सुचवलं. त्यांना जाऊन भेटलो. त्यांनी शिकवायला होकार दिला. संध्याकाळी शाळा सुटली की त्यांच्या घरी जायचो. ठरल्याप्रमाणं आधी घरातली कामं करावी लागायची. किराणा, दळण, भाजीपाला-फळं, पुजेचे हार घेऊन येणं, घरात झाडू मारून फरशी पुसून काढणं, घरातली भांडीधुणी करणं असं दररोज दोन तास काम केलं की मग ते अर्धा तास शिकवायचे. मी खेड्यातून आलेला असल्यानं लहेजा ग्रामीण होता. वळण अगदीच गावठी वगैरे.
शास्त्रीजी चिडायचे. एक उच्चार चुकला की सुरूवातीला चार छड्या अशी शिक्षा असायची. नंतर छड्या वाढत जायच्या. एकदा एका चुकलेल्या उच्चारासाठी चढत्या क्रमाने 52 छड्या खाव्या लागणार होत्या. एकाच दिवशी तेव्हढ्या छड्या खाल्ल्या तर दुसर्‍या दिवशी धुणीभांडी करताना अडचण होईल म्हणून त्यांनी पुढचे चार दिवस त्या छड्या विभागून दिल्या आणि कोटा पुर्ण केला. पण ते शिकवायचे मात्र मनापासून.
नंतर ते थकले की माझे उच्चार सुधारले माहित नाही, पण छड्या फारशा खाव्या लागल्या नाहीत.
लेखी परीक्षेत मी राज्यात पहिला आलो.
पाठांतराच्या आणि मुलाखतीच्या परीक्षेला तीन शास्त्रीजींचं परीक्षक मंडळ होतं.
मी सभागृहात प्रवेश केला. संयोजक आणि 3 परीक्षक समोर बसलेले होते. माझं नाव विचारलं गेलं.
मी हरी नरके असं सांगताच अंगावर पाल पडावी तसे एक शास्त्रीजी किंचाळले, " शी...शी.. कसली कसली गलिच्छ नावं असतात या लोकांमध्ये. याला आपण मुळात प्रवेशच का दिलाय?"
संयोजक म्हणाले, " अहो, तो लेखी परीक्षेत राज्यात पहिला आलाय."
"काय सांगताय?" म्हणुन शास्त्रीजी माझ्याकडे वळले. " सांग बघू, गितेत तुझ्या आडनावाचा उल्लेख एका श्लोकात आलाय तो तुला माहित आहे का?"
मी हो म्हणालो. त्यांनी तोच श्लोक म्हणून दाखवायला लावला. पुढे अठरा अध्यायातले सातशे श्लोकातले सुमारे 70 श्लोक उलटसुलट क्रमानं त्यांनी मला म्हणायला लावले.
शेवटी ते दमले असणार.
मग इतर दोघांनी मायेनं माझी विचारपुस करीत काही प्रश्न विचारले. त्यांच्या बोलण्यातील जिव्हाळा आणि अगत्य मला सुखावून गेलं.
एकुण पुढचा हा भाग छानच झाला.
आणि निकाल वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला. मी राज्यात पहिला आलो होतो.
पुरस्कार वितरणाचे प्रमुख पाहुणे आदरणीय अण्णा, गितामहर्षी डा. ग. श्री.खैर होते.
संयोजक आणि 2 परिक्षक बोलले आणि शेवटी माझ्यावर ज्यांचं "विशेष प्रेम" होतं ते शास्त्रीजी बोलायला उभे राहिले.
त्यांनी आयोजकांना पहिलीच सुचना केली, ते म्हणाले, "यापुढे फक्त पाठांतर स्पर्धा घेत चला. या लेखी परिक्षेमुळं शुद्ध उच्चार नसूनही दोन्हींच्या बेरजेत काहीजण पुढे जातात आणि त्यांना नाईलाजानं पुरस्कार देणं भाग पडतं. उच्चार जर लखलखीत नसतील तर पुरस्कार दिला जाता कामा नये."
अण्णांनी अचानक विचारलं, "पुरस्कार विजेत्यांपैकी कोणाला मनोगत व्यक्त करायचं आहे का?"
मी हात वर केला. सुरुवातीला संयोजक, मला शिकवणारे शास्त्रीजी, माझे सगळे गुरूजन, अण्णा या सगळ्यांचे आभार मानून मी म्हटलं, "होय माझे उच्चार पुरेसे शुद्ध नसावेत. मी खेड्यातून आलोय. शिकणारी पहिलीच पिढी आहे. या देशात अर्थ समजून न घेता पाठांतर करण्याची, पोपटपंचीची परंपरा फार मोठी आहे. पण लेखी परीक्षेमुळंच खरा कस लागतो असं मला वाटतं. आयोजकांनी लेखी परीक्षा घेतली म्हणूनच मी पहिला येऊ शकलो. पण लेखी परीक्षा घेण्यावर एक परीक्षक इतके नाराज आहेत की त्यांनी ती नाराजी जाहीरपणे व्यक्त केलीय. मी पुरस्काराबद्दल आपले सर्वांचे जाहीर आभार मानतो आणि हा पुरस्कार घ्यायचं मी नाकारतो. परीक्षकांच्या इच्छेविरूद्ध दिला गेलेला हा पुरस्कार मला नको."
सभेत खळबळ माजली.
अध्यक्ष असलेल्या अण्णांनी त्यांच्या भाषणात त्या शास्त्रीजींची जाहीरपणे खरडपट्टी काढली. पाठांतरापेक्षाही अर्थ समजून घेऊन आकलन करणं किती महत्वाचं ते समजावून संगितलं. या स्पर्धेत या दोन्हींची का गरज आहे तेही स्पष्ट केलं. आणि अण्णा गरजले," शास्त्रीजी, तुम्ही असभ्यपणा केलेला आहे. तुम्ही एकटेच परीक्षक नव्हतात. तुमच्या तिघांच्या गुणपत्रिकेच्या बेरजेत हा मुलगा पहिला आलेला आहे. केवळ लेखीतच नाही. विद्यार्थ्याला त्याच्या आडनावावरून तुम्ही हिणवल्याचं मला संयोजकांनी सांगितलेलं आहे. इतर परीक्षकांकडूनही मी खातरजमा करून घेतलेली आहे. तेव्हा विद्येच्या प्रांतात तुम्ही जातीयवाद आणून चुक केलेली आहे. तुम्ही जाहीरपणे माफी मागायला हवी."
शास्त्रीजी उठले. त्यांनी औपचारिक खुलासेवजा खेद व्यक्त केला.
अण्णा म्हणाले, "बाळा, तुला आता पुरस्कार स्विकारावाच लागेल."
त्या स्पर्धेने आणि कार्यक्रमानं किंवा असं म्हणू या की त्या शास्त्रीमहोदयांनी माझा पुढचा रस्ता बदलून टाकला.
ते तसं ना वागते तर कदाचित मी आज एक किर्तनकार, बुवा, बापू, गुरूजी, प्रवचनकार, महाराज किंवा योगी असलं काही झालो असतो. त्यांच्यामुळे महाराष्ट्र एका बुवा, बापूला मुकला किंवा महाराष्ट्राची असल्या बुवाबापूच्या तावडीतून सुटका झाली.
पण त्या प्रसंगानं बरंच काही शिकवलं. त्यावेळी ग.श्री. खैरांसारखा भला माणूस जाहीरपणे माझ्या बाजूनं उभा राहिला.माणसं मोठी असली तरी अनेकदा भुमिका घ्यायचं टाळतात.
तेव्हा "हरीदास नरकेसरी" होण्यातून वाचलो ते बरंच झालं.

Sunday, March 19, 2017

सुपारीबाज, संवाद आणि सहिष्णूता

अतिशय समतोल लिहिले, सप्रमाण लिहिले, आक्रमकता टाळून, युक्तीवाद करीत मुद्देसूद लिहिले, विश्लेषणासाठी संयत सूर आणि नजर बाळगून लिहिले तरी, अशा पोस्टवर सामान्यपणे चार प्रकारच्या विरोधी प्रतिक्रिया येतातच.
1. तुम्ही त्यांच्याविरूद्ध [म्हणजे मुस्लीम] का लिहित नाही? तुमचा विरोध आम्हालाच का? तुम्ही काँग्रेसप्रेमी आहात. त्यांनी भ्रष्टाचार केला,त्यांनी चुका केल्या त्यावर का लिहित नाही?
2. ते लोकशाही मार्गाने निवडून आलेत. तुम्हाला जनादेश मान्य नाही का? तुम्ही लोकशाही मानता की नाही ?
3. तुम्ही सेक्युलर लोक ढोंगी आहात. तुम्हाला पोटशूळ उठलाय वगैरे.
4. व्यक्तीगत चिखलफेक करीत शिवराळ भाषेत लिहिलेला गलिच्छ मजकूर.
मतभेद, मतभिन्नता यांचं स्वागतच आहे. चर्चा जरूर व्हायला हवी.
पण ती मुद्द्यावर हवी. आणि तो मुद्दा मांडायची पद्धत/तर्‍हा पण महत्वाची.
ती सभ्य, सुसंस्कृत हवी.
मी मुस्लीम समाजाचा कधीही आणि कसलाही अनुनय केलेला नाही. त्या विषयावरही मी आवश्यकता असेल तर आणि संधी मिळेल तिथे निर्भयपणेच लिहिलेले आहे. मुस्लीम समाजातील अतिरेकी विचारधारेच्या संघटना आणि नेत्यांना मी कठोर विरोधच केलेला आहे. करीन.
मात्र आंधळ्या मुस्लीमविरोधाचा गंडा बांधलेला नाही. माझ्यावर बालपणापासून समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुतेचे संस्कार आहेत, द्वेषाचे आणि विखाराचे नाहीत. शालेयवयापासून हमीद दलवाई, नरहर कुरूंदकर, प्रा.गं.बा.सरदार, प्रा.राम बापट, डा.य.दि.फडके अशांच्या प्रभावाखाली वाढलोय. सहिष्णू आहे. कठोर चिकित्सा करतो. मात्र जळाऊ लाकडाच्या वखारी चालवित नाही.
भारतीय संविधान आणि धर्मशास्त्राचा अभ्यासक आहे. भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेचा गेली अनेक वर्षे उपाध्यक्ष असल्याने धर्मशास्त्र या विषयाचे ज्ञान मी जडीबुटीवाल्यांकडून घेऊ इच्छित नाही. ते मी डा. रा.गो. भांडारकर, राजारामशास्त्री भागवत, भारतरत्न पां. वा.काणे, डा.रा.ना. दांडेकर, धर्मानंद कोसंबी आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींकडून घेतले आहे. घेत असतो.
राज्यघटनेने मला विवेकाचे स्वातंत्र्य दिलेले आहे. त्याच मार्गाने मी जातो. जाईन.
काँग्रेसचा मुर्दाडपणा, भ्रष्टाचार, अकार्यक्षमता आणि ढोंगी सेक्युलर बतावणी यांच्यावर मी घणाघाती टिकेचे आसूड ओढलेत. ओढीन. मी त्यांचा काडीमात्रही सहानुभुतीदार नाही.
लोकशाहीवादी आहे मी . राहीन. जनादेश मी मानतो. अर्थात भल्याबुर्‍या मार्गाने निवडून आलेले सर्वच पवित्र वगैरे असतात, असं मी मानत नाही. त्यांचेही सामाजिक परीक्षण व्हायला हवे असे मी मानतो. लोकप्रतिनिधींवर जनमताचा अंकुश हवा असेच मी मानतो. आगरकर म्हणतात तसं आम्ही विचारकलहाला घाबरत नाही, उलट त्याचं स्वागतच करतो.
आम्ही आदेशावर नाही विवेकावर चालतो.
तुम्ही ढोंगी, दांभिक वगैरे आहात असले हेत्वारोप करणारांना मी उत्तरे देत नाही. देणार नाही. त्यांना मला डिवचायचे असते, मुद्दे निरूत्तर करणारे असल्याने त्यांना बगल देऊन वितंडवाद घालायचा असतो, मारामारीच करायची असते.
व्यक्तीगत चिखलफेक करणारे, असभ्य, शिवराळ भाषेत लिहणारे आणि हेत्वारोप करणारे यांना का द्यायची उत्तरे?
काही लोक तर पगारी/पढवलेले/ सुपारी देऊन पाठवलेले असतात. अंगावर सोडलेले असतात. गावात जसे गावावरून ओवाळून टाकलेले वळू असतात किंवा
आजकाल टोलनाक्यावर जसे गुंड पाळलेले असतात तसे. अशा निर्बुद्ध गुडघ्यांशी चर्चा करण्यात मला अजिबात रस नाही.
प्रतिक्रिया पण यांना इतरांनी लिहून दिलेल्या असतात. त्यात कानामात्रा वेलांटीचाही फरक नसतो. एकाला ब्लॉक केले की मिन्टात दुसरा तीच प्रतिक्रिया पेस्ट करतो. असल्या सुपारीबाजांशी वाद घालण्यात काय हशील? त्यांना सरळ ब्लॉक केलेले उत्तम. निदान मी तरी करतो. मग कोणी त्याला असहिष्णुता म्हणो की विखार म्हणो.
ते संविधानच्या आधारे निवडून जरी आले असले तरी ते संविधानाला मानणारे नाहीत. ते हिंसक आणि भ्रष्टबुद्धीचे लोक आहेत. त्यांच्यामुळे आपला देश उलट्या पावलांचा प्रवास करतोय. ते संविधानाला मानणारे असते तर त्यांनी हिंसाचार केला नसता. त्यांची धृवीकरणाची विचारधारा संविधानाशी सुसंगत नाहीये.
यांच्या धर्मवादी मांडणीमुळे हिंदुंचा तरी विकास कसा होईल? आपल्याला आधुनिक बनायचेय की परत द्वापारयुगात जायचेय? मला हा उलट्या पावलांचा प्रवास वाटतो. यात आपलेच नुकसान आहे.
आम्ही आपल्याच समाजावर अधिक टिका का करतो? तर आम्हाला असे वाटते की, आज आपला समाज जो इथपर्यंत आलाय त्यामागे या कुपमंडुकांचा शून्य वाटा आहे. यांनी त्या त्या काळात प्रागतिक विचार करणारांचा अमाप छळच केलेला आहे. मी प्रामाणिकपणे सांगतो, की आपल्या संतांनी, समाजसुधारकांनी, समाजक्रांतिकारकांनी आपल्याला आधुनिक बनवले, सहिष्णू बनवले. ती पुण्याई वाया जाऊ नये यासाठी या एकांगी, बुद्धीविरोधी, तर्कविरोधी, संविधानविरोधी शक्तीवर आम्ही टिका करणारच. तो आमचा संवैधानिक हक्क आहे. आम्हाला कुपमंडुक बनून आत्मघात/आत्मनाश करायचा नाहीये.
आम्ही सेक्युलर का आहोत?
कारण आपला धर्म कितीही महान वगैरे असला तरी धर्मानं लाभार्थी आणि शोषित अशी समाजाची विभागणी केलीय. स्त्रिया, दलित, आदीवासी, शूद्र, कष्टकरी यांच्या नजरेने बघा, त्यांचे कायम शोषणच झालेय. तुम्ही वर्चस्वाच्या नजरेने बघत असल्याने धर्माच्या सर्वच बाबींचे समर्थन करीत आहात. धर्माच्या काही बाबींचे उदात्तीकरण करायचे आणि शोषितांबद्दल मौन बाळगायचे असा दुटप्पीपणा फार झाला. बास झाला. देशात धर्माचे कायदे लागू केले तर सर्वाधिक अन्याय स्त्रिया, दलित, आदिवासी आणि बलुतेदार - अलुतेदार, शूद्र यांच्यावर होईल. आणि म्हणून आम्ही धर्माचे कायदे लागू करण्याच्या विरोधात आहोत. होय म्हणूनच आम्ही सेक्युलर आहोत.
एकच लक्षात ठेवा आम्ही संत तुकारामांचे वारसदार आहोत. "सत्य असत्याशी मन केले ग्वाही! मानियले नाही बहुमता!"
"इतर आपली स्तुती करतात का निंदा यापेक्षा आपल्याला जे मनापासून व तीव्रतेनं करावसं वाटतं ते निष्ठेने करा." -- मोझार्ट
.......................
भुवन, आपल्या अंगणात झाडलोट करीत होता. स्वच्छता करीत होता.
शेजारच्या सोहनकाकांनी त्याला छॆडलं. म्हणाले, " अरे, शेजारच्या वसाहतीत बघा किती अस्वच्छता आहे. त्याविरूद्ध आधी मोहीम हाती घ्या. त्यांना शिकवा स्वच्छतेचं महत्व. उठसुठ आपल्याच अंगणावर तुमचा डोळा. तिकडं सफाई करायची आहे का तुमच्यात हिम्मत?"
भुवन म्हणाला, " काका, माझं घर मीच साफ करणार ना? सफाईची सुरूवात स्वत:पासूनच व्हायला हवी. स्वत:च्या अंगाला घाण असेल तर स्वत:च आंघोळ करायला हवी नाही का? आजारी पडलात तर डाक्टरांना म्हणता का, मलाच काय औषध देता? शेजार्‍यांना द्या. माझं काय मी तसाच बरा होईन, नाही ना? जो आजारी त्यालाच औषध तसंच आमच्या घरादारातली घाण आम्हीच आधी हटवायला नको? पंतप्रधानांनीसुद्धा भारतातच स्वच्छता अभियान हाती घेतलं ना? की बांगलादेश, पाकीस्तान, अफगाणिस्थान, नेपाळ, श्रीलंका आणि भुतानला घेतलं?
कोणतीही चांगली सुरूवात स्वत:पासूनच व्हायला हवी. समजलं?"

साधूचा वेश..

राणी एकदा आजारी पडली.
राजा काळजीत पडला.
त्यानं राजवैद्याला हरप्रकारे प्रयत्न करा, राणी बरी झालीच पाहिजे असा हुकुम सोडला.
राजवैद्यानं खूप प्रयत्न केले, पण यश काही मिळत नव्हतं.
राजा चिडला.ओरडला. तुम्हाला जमत नसेल तर नोकरी सोडा म्हणाला. राजवैद्य म्हणाले महाराज एक उपाय आहे. शेजारच्या राज्यातले वैद्य अतिशय निष्णात आहेत.त्यांना पाचारण करावे.
दूत दौडले.
शेजारच्या राज्यातले राजवैद्य यांचे आगमन झाले.
त्यांनी सगळ्या तपासण्या केल्या. म्हणाले, "आजार गंभीर आहे. आता एकच उपाय, राणीला दररोज राजहंसाचे मांस घाऊ घातल्रे तरच राणी जगेल."
राजानं हुकुम सोडला. सैनिक सरोवरावर धावले. त्यांनी राजहंस मारून आणला. राणीला मांस खाऊ घातले.
चार दिवसात सैनिक हिरमुसले होऊन रिकाम्या हातानं परतले. "महाराज, आम्हाला येताना बघितलं की राजहंस दुर पळून जातात. शिकार काही मिळत नाही."
राजानं राजपुरोहितांना बोलावलं.
सल्लामसलत केली.
नवा निर्णय झाला.
सैनिकांचा गणवेश बदलण्यात आला. सैनिकांनी साधूंचा वेश परिधान केला.
साधूच्या वेशात सैनिक निघाले.
राजहंसांनी बघितलं. म्हणाले," चिंतेचं कारण नाही.हे साधू आहेत. सर्वसंगपरित्याग केलेले. त्यांच्यापासून आपल्याला धोका नाही."
साधूनं लपवलेला धनुष्यबाण बाहेर काढला. राजहंसाची शिकार केली.
राणी राजहंसाच्या मांसावर ताव मारू लागली.

Saturday, March 18, 2017

नवे योगीपर्व धर्मसंसदेचे --



श्रीमान अजय सिंग उर्फ योगी आदित्यनाथ यांची निवड युपीच्या मुख्यमंत्रीपदी झाली आहे.
बहुसंख्य लोकशाहीवादी या निवडीने संतप्त आहेत तर धर्मवादी तिचे स्वागत करीत आहेत. यापुढे धर्मसंसद हीच लोकसंसद. युपीत भाजपाला 325 जागा मिळाल्यात. त्यांनी अव्वल लोकशाहीचे सकारात्मक, प्रामाणिक आणि पारदर्शी पालन करून ही निवड केलेली आहे, आपण तिच्याविरूद्ध ब्र  उच्चाराल तर याद राखा.

या निवडीमुळे देशातली धर्मसंसद अधिक मजबूत होणार आहे. उत्तरप्रदेश हे देशातले सर्वात मोठे राज्य आहे. एव्हढे मोठे की तो जर स्वतंत्र देश मानला तर जगातील 233 देशातला तो आठव्या क्रमांकाचा देश असेल. आदित्यनाथ यांच्या मते प्रत्येक हिंदूने किमान दहा मुले जन्माला घातली पाहिजेत. हे टार्गेट ठेवून त्यांनी ही पाच वर्षे काम केले तर युपी लवकरच जगातला किमान चौथ्या क्रमांकाचा देश बनेल.

युपीने देशाला सर्वाधिक पंतप्रधान दिलेत. 2019 सालचा पंतप्रधानही देण्याची महत्वाकांक्षा युपीला बाळगता येईल. सलग पाचव्यांदा खासदार झालेला नेता सहाव्यांदा खासदार होऊन पीएम बनू शकतो.तसेही मोदी जरी गुजरातचे असले तरी निवडून युपीतूनच आलेत.

ज्या देशात 600 पैकी 100 जिल्हे असे आहेत की ज्यात मुस्लीमांना वगळून निवडणु्काच जिंकता येत नाहीत.  उ.प्र.मध्ये त्यातले सर्वाधिक जिल्हे असूनही एकही मुस्लीम उमेदवार न देता भाजपाने लोकसभेला 73 आणि आता विधानसभेत 325 आमदार निवडून आणण्याचा हा राजकीय चमत्कार कसा घडवला? हे एक कोडेच आहे. त्या यशाचे खरे शिल्पकार योगीच आहेत. त्यामुळे हे धर्मसंसदेचे नवे योगीपर्व आहे.

ते हिंदु-मुस्लीम धृवीकरणावर आधारित वादग्रस्त राजकारण करतात, त्यांनी धर्म परिवर्तन विरोधात मोहीम सुरू केली, ते घरवापसी अभियानाचे प्रणेते आहेत,
ते गोवंश संरक्षक आहेत आणि म्हणूनच त्यांना युपीचे मुख्यमंत्री करण्यात आलेय.

त्यांनी जातीय दंगली घडवल्या, त्यांनी मुस्लीमांना टार्गेट केले, ते मसिद पाडण्याचे कट्टर समर्थक आहेत असे आणि इतर गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले आहेत. आता एकतर ते सर्व गुन्हे मागे तरी घेतले जातील किंवा त्यांना रितसर क्लीनचिट तरी मिळेल. लोकशाही जिंदाबाद!

योगी सतत वादग्रस्त आणि झंजावाती वक्तव्ये करतात आणि प्रकाशझोतात राहतात.
लव जिहाद प्रकरणी ते गरजले, एका हिंदू मुलींचे धर्म परिवर्तन केले तर आम्ही १०० मुस्लिम मुलींचे धर्मपरिवर्तन करू [आगस्ट २०१४]

दादरी तथाकथित मांस प्रकरणात ते वदले, अखलाक पाकिस्तानात गेला होता त्यानंतर त्याच्या वर्तणूकीत फरक पडला.
देशांतील सर्व मशिदीत गणेशमूर्ती स्थापन करू अशीही त्यांची संघगर्जना आहे. ते म्हणतात, मक्केमध्ये जर बिगरमुस्लिम जाऊ शकत नाही, वॅटिकन सिटीत बिगरख्रिश्चनांना प्रवेश वर्जित आहे, मग आमच्याकडेच सर्वांना प्रवेश कशाला?  [फेब्रुवारी २०१५]

हरिद्वारमधील 'हर की पौडी' येथे बिगरहिंदूंना प्रवेशबंदी घालावी. [आगस्ट २०१५]

योगाला विरोध करणा-यांनी भारत सोडून जावे. सुर्यनमस्कार न घालणा-यांनी समुद्रात उडी मारून जीव द्यायला पाहीजे. यापुढे सांगितले जाईल योगीला विरोध करणारांनी पाकीस्थानात जावे.

अशी धर्मवादी, प्रक्षोभक, वादग्रस्त आणि एकांगी विचारधारा असणारा नेता "लोकशाहीच्या" आधारे देशातल्या सर्वात मोठया धर्मसंसदेच्या प्रयोगभुमीचा स्वामी [ सीएम ] बनतोय. काय बोलणार? लोकशाही जिंदाबाद!

युपीला आत्महत्त्या न करण्याची मागितली होती हमी?

युपीला आत्महत्त्या न करण्याची मागितली होती हमी?
राज्याला पावसाची हमी देता का देवेनभाऊ?
पाऊस राहू द्या निदान सिंचनाची देता भाऊ?
बाजारभावाची हमी कधी देता सीएमभाऊ? 
स्वामीनाथनची घोषणा करता देवेनभाऊ?
लोडशेडींग न होण्याची हमी आहे सीएमभाऊ?
दुष्काळाची अन गारपिटीची हमी घेता का देवेनभाऊ?
चोर्‍या न होण्याची हमी देता का सीएमभाऊ?
महिलांना सुरक्षिततेची हमी आहे देवेनभाऊ?
अपघात न होण्याची हमी देता का सीएमभाऊ?
शाळा कालेजात शिकवण्याची हमी आहे का देवेनभाऊ?
रोजगार, आरोग्य, निवारा हमी कधी सीएमभाऊ?
सन्मानानं जगण्याचा हक्क कधी सरकारभाऊ?
महाराष्ट्राला विचारता, युपीची देता का हमी देवेनभाऊ?

प्रामाणिक आणि पारदर्शक

"शेतकर्‍याच्या मदतीसाठी आम्ही पैसा कमी पडू देणार नाही, प्रसंगी तिजोरी खाली करू, लागलं तर वर्ल्ड बॅंकेकडून कर्ज काढू पण शेतकर्‍याला वार्‍यावर सोडणार नाही," हे निवडणुकीतलं भाषण होतं अध्यक्षमहाराज, ते खरं थोडंच मानायचं असतं?
आम्ही आज खरच जर कर्जमाफी केली तर सातवा वेतन आयोग कसा लागू करणार ? हजारो कोटींची स्मारकं कशी उभारणार ? जाहीरातीवर कोट्यावधी कसे उधळणार? आणि एका आर्थिक वर्षात 35000 कोटी रूपये तूट असताना राज्य कसं चालवणार अध्यक्षमहोदय?
तेव्हा विरोधक जर हे राज्य चालवायची हमी घेत असतील अध्यक्षमहोदय, तर सकारात्मक, प्रामाणिक आणि पारदर्शक विचार करता येईल अध्यक्षमहाराज!"

अभिजात मराठी भाषेचा अहवाल

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी पठारे समितीने केंद्र सरकारला सादर केलेल्या मराठी अहवालाचा संक्षिप्त मसुदा, पीडीएफ, पृष्ठे 128, जुलै 2013.
https://marathibhasha.maharashtra.gov.in/…/%E0%A4%85%E0%A4%…आजवर हा अहवाल 85000 लोकांनी वाचला आहे.
[मुख्य अहवाल इंग्रजीत असून त्याची सुमारे 500 पृष्ठे आहेत. तो अद्याप अभ्यासकांना खुला करण्यात आलेला नाही.यथावकाश तो खुला करण्यात येईल.]

प्राधान्य कशाला?


बुद्ध आपल्या अनुयायांसह श्रावस्तीला निघाले होते. रस्ता जंगलातला होता.
इतक्यात एका भिक्कूला एक बाण येऊन लागला.तो जखमी झाला.
एक भंतेजी म्हणाले, " अरे,पळा आणि त्या बाण मारणाराचा आधी शोध घ्या. पकडा त्याला. आपण त्याला चांगला जाब विचारला पाहिजे."
दुसरे म्हणाले, "पण आधी मुळात असा बाण पुन्हा मारला जाणार नाही याची आपण कायमस्वरूपी व्यवस्था करायला हवी."
तिसरे म्हणाले, "माणसातली ही हिंसेची प्रवृत्ती मुळात येते कुठून याचा आधी शोध घेतला जायला हवा."
त्यांचं ऎकुन बुद्ध म्हणाले," आधी त्या जखमीवर उपचार करा. ते सध्या सर्वात महत्वाचं आहे. बाकी नंतर बघता येईल."

सांगा तुम्हाला पहिला नंबर हवा की दुसरा?

सध्या परीक्षांचे दिवस आहेत.
आम्हा नवमध्यमवर्गीयांना मुलामुलींच्या प्रथम क्रमांक मिळवण्याचं भलतंच वेड असतं.
जिथंतिथं पोरांनी पहिला नंबर मिळवायलाच हवा यासाठी सारा आटापिटा.
केल्व्हीन हा जागतिक किर्तीचा शास्त्रज्ञ. आज विज्ञानजगत त्याचे नाव अतिशय आदराने घेते.
एकदा एका प्रवेश परीक्षेत तो पास झाला, पण त्याला दुसरा नंबर मिळाला.
पहिल्या आलेल्या पार्कीन्सनला परीक्षकांनी बोलावलं,
"अरे मी फार अवघड आणि नविन गणितं घातली होती पेपरात, तुला कसं काय जमलं उत्तर?"
तो म्हणाला, "त्याचं कायय सर, मी सतत अवांतर वाचन करतो. गेल्या महिन्यातच यावरचा एक शोधनिबंध माझ्या वाचनात आला होता, सर."
"शाब्बास. मीही त्याच शोधनिबंधावरून पेपर सेट केला होता."
सरांनी केल्व्हीनला बोलावलं."तू नक्कल केलीस ना पार्कीन्सनची? तो नवनवं वाचतो. तुही मला वाचतो म्हणून खोटं सांगू नकोस."
"सर, मी खोटं बोलत नाही. मी नक्कल केलेली नाही."
"मग तुला कसं उत्तर आलं?"
"सर, तो शोधनिबंध मी लिहिलेला आहे." केल्व्हीननं शांतपणे सांगितलं.
पण त्याचा दुसरा नंबर आला. आज पहिला आलेला पार्कीन्सन जगाला माहितही नाही. केल्व्हीननं मात्र असंख्य शोध लावले. तो जगाला वंदनीय झाला.
सांगा तुम्हाला पहिला नंबर हवा की दुसरा?