Tuesday, January 17, 2017

धर्मवेड,धर्मांधता आणि तरूणाईचा विनाश यांची रशियन कथा.

धर्मवेड,धर्मांधता आणि तरूणाईचा विनाश यांची रशियन कथा.
The Student, Dir. Kiril Serebrennikov,Russia,2016, WC.
Veniamin हा शाळकरी मुलगा अचानक कट्टर धार्मिक बनतो. मुलींनी पोहताना बिकिनी घालू नये, स्त्रियांनी पुर्ण पोशाखच घातला पाहिजे, शाळेत लैंगिक शिक्षण दिले जाऊ नये, वर्गात उत्क्रांतीचा सिद्धांत शिकवू नये अशी भुमिका तो हट्टाने रेटू लागतो. एरवी रशियातील कम्युनिष्ट विचारसरणीमुळे सेक्युलर असलेल्या त्याच्या आई, प्राचार्या, वर्गशिक्षिका, मित्र, मैत्रिणी
यांच्याशी तो वाद घालू लागतो. त्याचे हे धर्मवेड अतिशय टोकाला जाते. एलेना या त्याच्या जिवशास्त्राच्या शिक्षिकेचा आपल्या या विद्यार्थ्यावर जीव असतो. ती विज्ञाननिष्ठेपोटी या मुलाला या वेडातून मुक्त करण्यासाठी झटते. त्याच्या आईलाही मुलाची काळजी वाटू लागते. तो आईलाही तिचा घटस्फोटीत नवरा [व्हेनिमिनाचा बाप] जुळवून घेण्याबद्दल आग्रह धरतो. उठसूठ बोलताना तो बायबलचा सोयिस्कर संदर्भ देत असतो. 2000 वर्षांपुर्वीच्या या धार्मिक विचारांचा आदर जरूर करावा पण त्याला समकालीन आयुष्यात प्रमाण मानून जगू नये असा त्याच्या शिक्षिकेचा आग्रह असतो. तो शिक्षिकेवरच आरोप करू लागतो.ती ज्यू असल्याने ती या धर्माचा तिरस्कार करते असा बिनबुडाचा आरोप तो वारंवार करू लागतो. हळूहळू आजुबाजूचे सारेच त्याच्या प्रभावाखाली कसे येतात आणि या विज्ञाननिष्ठ, ध्येयवादी शिक्षिकेला कसे एकटे पाडतात, तिला वेडे ठरवतात, याची वैश्विक कहाणी हा चित्रपट मांडतो. शेवटी एकटी पडलेली ही शिक्षिका आरोपांना कंटाळून धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास करते आणि सप्रमाण प्रतिवाद करते, मात्र हा धर्मांध मुलगा तिच्यावर अतिप्रसंग केल्याचा धादांत खोटाच आरोप करतो, आणि तिला ठार मारण्याचा कट रचतो. सारेच लोक तिच्याविरूद्ध जातात, त्यामुळे त्या शिक्षिकेवर कोणती वेळ येते त्याची रशियन की भारतीयही? कथा सांगून हा चित्रपट सुन्न करतो.
The Student, Dir. Kiril Serebrennikov,Russia,2016, WC.
....................................
सेवाभाव जगण्याचे बळ वाढवतो..
Home Care, Dir. Slavek Horak, Czech Republic,2015, G.C.
व्लास्ता ही एक समर्पित नर्स आहे. घरोघर जाऊन ती वृद्ध नागरिकांच्या आजारपणात त्यांची मनोभावे सेवा करते. तिच्या या कामातून ती थकली तरी तिला या जगण्यातून अपार आनंद आणि उर्जा मिळत असते. तिचा नवरा लाडा आणि तिची तरूण मुलगी असे हे अतिशय सुखी कुटुंब असते.
अचानक एके दिवस व्लास्ताला असाध्य आजाराने गाठल्याचे आणि ही आजाराची अंतिम अवस्था असल्याचे आढळून येते. सारे कुटूंबच हादरून जाते. व्लास्ताला अवघे सहा महिनेच आहेत असे डाक्टर सांगतात. ही सेवाभावी बाई याही परिस्थितीला धिराने कशी सामोरी जाते, तिला आवडणारे नृत्य शिकायचे कामाच्या धबडग्यात राहून गेलेले असते. ती त्याही स्थितीत नृत्य शिकते. अत्यंत  वेदना सोसूनही ती सेवाकार्य चालूच ठेवते. निसर्ग, प्राणी, पक्षी या सार्‍यांवर तिचा विलक्षण जीव असतो.
विधायक कामांची पुण्याई तिच्या वेदना कमी करू शकत नसली तरी तिची प्रबळ इच्छाशक्ती आणि असाधारण उमेद यांच्या जोरावर व्लास्ता आजारावर कशी मात करते याची सुंदर आणि प्रेरक कथा सांगणारा सहजसुंदर चित्रपट. दर्जेदार दिग्दर्शन, श्रेष्ठ अभिनय, उत्तम पटकथा, मानवी आयुष्याचे अनेकविध आयाम खुले करणारी कहाणी. सेवाभावी, समर्पित जगण्याच्या उर्जेचा विधायक परिणाम आणि निसर्गाची आस यांचा परिणामकारक गोफ.
...................
The Tip of the Iceberg, Dir. David Canovas, Spain, 2016, Social Awareness,
सोफिया ही एका मल्टीनॅशनल कंपनीतली उच्च पदावरील कार्यक्षम अधिकारी असते. तिच्या कंपनीतील दुसर्‍या शहरातील युनिटमधील तीन अधिकार्‍यांनी लागोपाठ आत्महत्त्या केल्याने कंपनी अडचणीत येते. या आत्महत्त्यांच्या कारणांचा शोध घेऊन अंतर्गत अहवाल तयार करण्याचे काम सोफियाकडे सोपवले जाते.
सोफिया संबंधित अधिकारी,कर्मचारी, सहकारी यांना भेटून सखोल चौकशी करते.
नफा,नफा, त्यासाठी सगळे मार्ग वापरण्याची कार्यपद्धती असलेल्या मल्टीनॅशनल मॅनेजमेंटच्या गंभीर चुकाच या आत्महत्त्यांना कारणीभूत असल्याचे तिला आढळून येते.
तिने खरा अहवाल न देता थातूरमातूर अहवाल दिल्यास तिला बढती आणि इतर लाभ दिले जातील अशी लालूच तिला दाखवली जाते. उच्चपदस्थ तिच्यावर दबावही आणतात. पण ती निर्भयपणाने सत्यशोधन करते आणि मॅनेजमेंटला धैर्याने सामोरी जाते. परिणामी तिची हकालपट्टी केली जाते.
अशावेळी ही धाडसी महिला अधिकारी दांभिक मल्टीनॅशनल मॅनेजमेंटची लक्तरे कशी वेशीवर टांगते याची वेधक कथा हा चित्रपट सांगतो.
जगभरचे राजकारणी असोत की भांडवलदार हे सगळे किती क्रूर, दांभिक आणि लबाड असतात, थंड डोक्याने ते कशी कटकारस्थाने करतात, दु्र्घटना झाल्यावर चौकशी समिती नेमणे वगैरे हे कसे फार्स असतात याची वैश्विक कथा हा चित्रपट उलगडतो
अतिशय प्रभावी मांडणी, सुंदर टेकिंग, अप्रतिम अभिनय, भव्य चित्रण. औद्योगिक जगतातील ताणतणाव बारकाईने टिपणारा आणि वरवर समाजहिताचा घोष करून आर्थिक लूट करण्यातली भांडवलदारांची क्रूरता सप्रमाण सांगणारा उत्तम चित्रपट.
.......................
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव..5..
PIFF, 15th Edition, [12 to 19 Jan. 2017] पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव [12 जाने. ते 19 जाने. 2017]
......................

No comments:

Post a Comment