Monday, January 16, 2017

बापमुलीच्या निखळ नातेबंधाची वैश्विक उंचीवर जाणारी कथा



Daughter, Dir. Reza Mirkarimi, Iran, 2016,Social Awareness,
अनेक इराणी चित्रपट उत्तम असतात याचा प्रत्यय पुन्हापुन्हा येत असतो. खरं तर तिथे अतिशय जाचक सेन्सारशिप असतानाही काही दिग्दर्शक सातत्याने उत्तमोत्तम कलाकृती सादर करीत असतात. Reza Mirkarimi यांच्या Daughter या चित्रपटाचा समावेश Social Awareness विभागात करण्यात आला होता.

सितारा ही एक अत्यंत गुणी, आज्ञाधारक आणि सुसंस्कृत मुलगी आपल्या अजिझी या पित्याविरूद्ध बंड करते त्याची चटका लावणारी अत्यंत प्रभावी चित्रकथा या चित्रपटातून उलगडत जाते. अगदी पहिल्या मिनिटापासून शेवटपर्यंत एखाद्या थरारकथेच्या अंगाने जाणारा हा चित्रपट, चित्रभाषा, सादरीकरण, कलाकारांचा अभिनय, दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद या सार्‍याच बाजूंनी दर्जेदार आहे. निखळ, नितळ मानवी नात्यांची उब आणि जिव्हाळा यांनी ओतप्रोत असलेल्या कुटुंबात बाप एकाधिकारशाही गाजवू लागल्याने निर्माण झालेले ताण आणि एकारलेल्या नातेसंबंधातील मानसिकता यांचे कलात्मक दर्शन हा चित्रपट देऊन जातो. एखाद्या एरवी सनातनी वाटणार्‍या कुटुंबातही नात्यांचे बंध किती घट्ट असतात ते यातून दिसते.

सिताराला तिच्या महाविद्यालयीन मैत्रिणीने तेहरान येथे निरोपाच्या पार्टीला बोलावलेले असते. वडील तिला पाठवायला नकार देतात. ती बंड करून विमानाने जाते. वडील घरी यायच्या आत ती विमानाने परतणार असते. पण ऎनवेळी खराब हवामानामुळे विमानाचे उड्डाण रद्द होते. वडीलांकडे तिचे बिंग फुटते. वडील संतापाच्या भरात कार काढतात आणि रात्रभर प्रवास करून सिताराला घ्यायला तेहरानला पोचतात.

तिला घेऊन येताना रस्त्यात एक अपघात होतो. त्या गडबडीत सितारा गायब होते. सिताराचे काय होते?
वडीलांना ती परत सापडते का? असल्यास कुठे सापडते?

या सार्‍या शोधात अजिझीतला सच्चा पिता कशाप्रकारे जागा होतो? लहानपणी आपल्या मुलींशी मित्राप्रमाणे वागणारा अजिझी, पण मुली मोठ्या होताच त्याचे अचानक एका सनातनी, हुकुमशाही करणार्‍या पित्यात का आणि कसे रूपांतर झालेले असते?

त्याचा भुतकाळ काय असतो? त्याचे वडील, त्याची प्रेमळ बहीण यांच्याशी घट्ट नाते असलेला अजिझी कशामुळे कोरडा आणि करडा झालेला असतो?

निखळ नातेबंधाची वैश्विक उंचीवर जाणारी कथा.

या चित्रपटाला गोवा महोत्सवात पुरस्कार मिळाल्याचे समजते.

मुळात सज्जन आणि प्रेमळ असलेला अजिझी, त्याची सुसंस्कारित मुलगी सितारा यांची ही कथा काळजाला स्पर्शून जाते.

Daughter, Dir. Reza Mirkarimi, Iran, 2016,Social Awareness,
......................
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव..4..
PIFF, 15th Edition, [12 to 19 Jan. 2017] पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव [12 जाने. ते 19 जाने. 2017]

No comments:

Post a Comment