Sunday, December 11, 2016

एकेरी आणि धमकावणीची भाषा कितपत योग्य?


महाराष्ट्र 1 वाहिनीवरील कालची आणि आयबीएन लोकमतवरील परवाची मराठा आरक्षणावरील चर्चा ऎकताना असे जाणवले की वाहिन्या या चर्चेला मराठा समाजाचे 4 वक्ते आणि इतर एखादाच अशा पद्धतीने निमंत्रित करतात.

परम आदरणीय माजी न्या. बी.जी. कोळसेपाटील महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत प्रा.डा.रावसाहेब कसबे यांच्याबद्दल चक्क एकेरी भाषेत बोलत होते. "कोण रावसाहेब कसबे?त्याचा काय संबंध?तो काय तज्ञ आहे काय?" ही त्यांची भाषा ऎकून धक्का बसला.विशेष म्हणजे त्याचवेळी मा. कोळसे पाटील त्यांच्या समाजातल्या एका पोरसवदा नेत्याला मात्र "अहो जाहो " करीत होते.

भाजपाचे मा. आमदार आशिष शेलार यांची प्रा.कसबे यांच्याबद्दलची भाषा सत्ताधार्‍यांच्या रितीला धरून अतिशय उद्दाम आणि अवमानकारक होतीच.

काल मा.आमदार विनायक मेटे यांनी तर कडीच केली. ते रावसाहेब कसबे यांच्या समोर जी धमकीची भाषा वापरत होते ती तर अत्यंत निंद्य होती. " कसबे तुमच्यासारख्या विचारवंतांची महाराष्ट्राला गरज नाही. तुमच्या पापाची फळे तुम्हाला भोगावी लागतील" अशा शब्दात ते पुन्हापुन्हा धमकावत होते.

सुत्रसंचालन करणारे आमचे स्नेही वाहिनीचे कार्यकारी संपादक आशिष जाधव त्यांना किमान त्यावर अशा धमकावणीच्या भाषेत बोलू नका अशी सुचना तरी करतील अशी मी शेवटपर्यंत अपेक्षा बाळगून होतो.

मराठा समाजाचे सगळे वक्ते एकत्र मिळून उरलेल्याची कोंडी करतात. त्यांना बोलूच दिले जात नाही.
मतभेद असले तरी सभ्य भाषेत ते व्यक्त करता येणार नाहीत काय?

महाराष्ट्राला बलदंड वैचारिक वारसा लाभलेला आहे. मतभिन्नता, मतभेद, वैचारिक वाद, ज्याला आगरकर "विचारकलह" म्हणायचे त्याची फार मोठी परंपरा आपल्याकडे राहिलेली आहे. फुले - रानडे, टिळक - आगरकर,गांधी - आंबेडकर यांच्या वादातून फार मोठे वैचारिक प्रबोधन झालेले आहे. लोकहितवादी, र. धों. कर्वे, भालेकर, लोखंडे, महर्षि वि.रा.शिंदे आणि आणखी कितीतरी यांनी ही परंपरा श्रीमंत केलेली आहे.

आपल्या आधीही समाज होता, आपल्यानंतरही तो राहणार आहे यान भान ठेवले गेले पाहिजे. वेगळे मत म्हणजे शत्रुत्व हे समीकरण पुढच्या पिढ्यांचे नुकसान करणारे आहे.

फुले-आगरकर - शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा अशा पद्धतीने उधळला जात असताना व्यथित व्हायला होते ना?

मराठा समाजातील लेखक - विचारवंतांच्या याबद्दलच्या प्रतिक्रिया काय आहेत? म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावतोय त्याचे काय?

रावसाहेब कसबे यांच्यासारख्या ज्येष्ठ विचारवंताबद्द्ल अशा भाषेत बोलले जात असताना खटकणारच ना?

बहुजन ऎक्य वगैरे चिराऊ होवो!
......................

No comments:

Post a Comment