Friday, December 2, 2016

नोटाबंदी - रद्दीवाल्याची चूल आठवड्यातून 4 दिवस बंद



गेली 25 वर्ष आमच्या घरातील वर्तमानपत्रांची रद्दी विकत घ्यायला 70 वर्षे वयाचे एक म्हातारेबाबा सायकलवर येतात. ते राहतात, वडकी नाल्यावर. दररोज किमान 30 ते 35 किलोमीटर सायकलीची दौड मारून सुमारे 100 किलो रद्दी घरोघर जाऊन विकत घेतात. ती रद्दी मोठ्या विक्रेत्याला विकली की त्यांना 30 दिवसांचे [महिन्याचे] सुमारे पाच ते सहा हजार रूपये मिळतात.
पैसे मिळतात मात्र दररोज. हातावरचे पोट. त्यावर त्यांचे घर चालते. घरात एक मुलगा आहे. सून आणि दोन नातवंडं आहेत. एक अपंग अविवाहीत मुलगी आहे. मुलगा कामाला गेला तर चारदोन दिवस जातो नाहीतर घरीच बसून असतो. सायकल चालवायला त्रास होतो म्हणतो. बाबा गेली 40 वर्षे हा रद्दी खरेदी-विक्रीचा व्यवसाय करून पोट भरतात.
त्यांचे आजही बॅंकेत खाते नाही. सगळा व्यवहार रोखीचा.
नोटाबंदी आली आणि बाबांची चूल आठवड्याला चार दिवस बंद राहू लागली. रद्दीचा दर थेट 10 रूपयांवरून आठ रूपयांवर घसरला. मोठे दुकानदार त्याला म्हणतात, तुझी रद्दी घेतो, पण तुला द्यायला आमच्याकडे सुट्टे पैसे नाहीत. आठवड्याला दोन किंवा तीनच दिवस पैसे मिळतात. उरलेले दिवस फाके पडतात.
बाबा आधी झोपडपट्टीत राहत होते.
शेजारच्या झोपडीदादाने रातोरात झोपडी बळकावली. उलट मारहाणीच्या बनावट तक्रारीतून या गुंडाने पोलीसांशी संगनमत करून बाबाला आणि त्याचा मुलाला पोलीस कोठडीत घातले. सुटून आल्यावर बाबाने कोर्टात केस टाकली. 7-8 वर्षे कोर्टात दरमहा हेलपाटे मारल्यावर नुक्ताच निकाल बाबाच्या बाजूने लागला.
झोपडी दादाने आता वरच्या न्यायालयात अपिल केलेय. दरमहा कोर्टाचे हेलपाटे चालूयत. दोन महिन्यांपुर्वी बाबाला काम करताना हार्टअ‍ॅटॅक आला. दररोज पाचपंचवीस इमारतींचे पाचसहा मजले चढउतार करून रद्दीचे ओझे वाहतावाहता.
"डाक्टर म्हणले बाबा रेस्ट घ्या. आता कशाची आलीयं वो रेस्ट? वर गेल्यावरच मिळल बघा रेस्ट. आमच्या समाजातली सगळी माणसं भिका मागून जगतात. म्या म्हणलं, आपन नाय मागायची भिक. मेहनत करू. कस्ट करू. पण जिवात जिव हाय तवर भिक नाय मागायची. अडीच महिन्यापुर्वी माणसं [बायको] गेली. आता जगावसंच नाही वाटत. असाच परत  हाडाट्याक यावा आन जावं पटदिशी. "
कोणतीही विश्रांती न घेता दवाखान्यातून बाबा थेट रद्दी जमा करायला घरोघर फिरू लागले.
मी विचारलं, "नोटाबंदीबद्दल काय अनुभव आहे तुमचा?"
बाबा म्हणाले, "काय सांगू दादा, म्हणतात काळ्या पैशेवाल्यांनी उच्छाद मांडलाय. त्यांचा बंदोबस्त करा ना. नको कोण म्हणतोय? त्यांना हातकड्या टाका. सरकार त्यांच्यावर धाडी टाकायच्या सोडून त्यांच्या पायाशी गालिचे अंथरतंय. काळा पैसा 50% सरकारात द्या आणि उरलेला सगळा पांढरा करून घ्या. हेच करायचं होतं तर मग आम्हा गरिबांच्या पोटावर का पाय देताय?
माझ्याकडे हजार पाचशेची एकबी नोट नव्हती. कामच पडत नाय ना.
पण रद्दीचे भाव 20% नी पडले. दररोज अर्धीकोर भाकरी खायचो आता सक्तीचा उपास घडतो आठवड्याला चार दिवस. सरकारनं हे लईच पुण्याचं काम केल्यालं हाय म्हणायचं. गेली 50 वर्सं गळ्यात तुळशीची माळ होती. पंढरीची वारी बी केली लई वर्सं. आता झेपत नाय. कालच गळ्यातली ती माळ मुळामुठंत फेकून दिली. म्हणलं न्यानोबा, तुकोबा, तुमचं आता काय खरं राहिलं नाय. या जगात गरिबांचं कोणीच नाय!"
बाबांच्या डोळ्यात पाणी होतं. गळा भरून आल्यानं त्यांना पुढं बोलता येईना.
........................

No comments:

Post a Comment