Thursday, August 13, 2015

आवर्जून वाचावीत अशी पुस्तकं -- प्रमिती नरके





http://epaper.mimarathilive.com/story.aspx?id=2047&boxid=160517472&ed_date=2015-8-13&ed_code=820009&ed_page=1
मी मराठी, लाईव्ह, गुरुवार, दि.१३ आगष्ट, २०१५, पृ. १
बुकमार्क
आवर्जून वाचावीत अशी पुस्तकं -- प्रमिती नरके
[ कलर्स मराठी या वाहिनीवर प्रसारित होणार्‍या "तू माझा सांगाती " या मालिकेतील आवलीची भुमिका करणारी अभिनेत्री.]

माझे बाबा प्रा. हरी नरके हे लेखक आणि संशोधक असल्याने आमच्या घरी सुमारे २० हजार पुस्तकं आहेत. त्यात सतत भर पडत असते. मी त्यातली निवडक पुस्तकं वेळ काढून वाचते. माझ्या अभिरुचीनुसार मी अनेक प्रकारच्या साहित्याचं नेहमी वाचन करते. त्यात कथा, कादंबऱ्या, चरित्र, आत्मचरित्र, वैचारिक लेखन, नाटक अशा अनेक साहित्य प्रकारांचा समावेश असतो.

अलीकडील काळात मी वाचलेली, लक्षात राहिलेली आणि इतरांनीही आवर्जून वाचावीत अशा पुस्तकांमध्ये मी पहिलं नाव अभिराम भडकमकर यांच्या अॅट एनी कॉस्ट या पुस्तकाचं घेईन. राजहंस प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे.अभिराम भडकमकर हे नाट्य-चित्रपट आणि वाहिन्यांच्या विश्वातील एक महत्त्वाचं नाव. त्यांनी लिहिलेल्या अॅट एनी कॉस्ट या कादंबरीत विविध वाहिन्यांवर सादर केल्या जाणाऱ्या मालिका, रिअॅलिटी शोज, त्यातले ताणतणाव, जीवघेणी स्पर्धा, त्यातलं प्रचंड अर्थकारण, यात सहभागी असलेले विविध मानवी स्वभाव यांचं रंगतदार चित्रण केलं आहे. या विश्वात वावरताना जे-जे जाणवलं, त्याचं प्रांजळ चित्रण आणि चिंतन करणाऱ्या या कादंबरीची चार महिन्यांत पहिली आवृत्ती संपली आहे. एका वाहिनीवरील हेड एक महिला आहे. विकास सरदेशमुख हा निर्माता एका खेड्यातील ब्रेन ट्युमरने मरत असलेल्या धनंजय चांदणे या कलाकाराच्या जगण्यावर आणि मरणावर रिअॅलिटी शो सादर करतो. त्या वेळी धनंजयची आई, बहीण, मालिकेत काम करणाऱ्या इतर महिला कलाकार या साऱ्यांच्या वर्तनातले बदल टिपत त्यावर प्रकाशझोत टाकणारी ही कादंबरी आहे. हा शो बघणाऱ्या देशभरातल्या प्रेक्षकांवरही कादंबरी भाष्य करते. सध्याचा ताजा आणि महत्त्वाचा विषय भडकमकरांनी उत्तम प्रकारे मांडला आहे.

स्पर्श मानव्याचा हे विजया लवाटे यांचं पद्मगंधा प्रकाशन यांनी प्रकाशित केलेलं पुस्तक वाचकाला चटका लावणारं आहे. हे पुस्तक म्हणजे विजयाताईंचं आत्मकथन आहे. मृणालिनी ढवळे यांनी त्याचं शब्दांकन केलं आहे. विजयाताई पुण्यातील वेश्या आणि एच.आय.व्ही. (एड्स) झालेल्या त्यांच्या लहान मुलांसाठी काम करायच्या. पुण्यातील एक मध्यमवर्गीय बाई सामाजिक बांधिलकीतून किती मोठं काम उभं करू शकते, याचा थक्क करून सोडणारा आलेख या पुस्तकात मांडलेला आहे. आजवर शेकडो एड्सबाधित मुला-मुलींच्या आयुष्यात गोकुळ फुलवणाऱ्या विजयाताई आणि त्यांचे सहकारी यांची ही कहाणी चटका लावणारी आहे. नग्नसत्य - बलात्काराच्या वास्तवाचा अंतर्वेध हे मुक्ता मनोहर यांचं पुस्तक मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेलं आहे.

सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता मनोहर यांनी बलात्काराच्या प्रश्नावर सखोल अभ्यास करून लिहिलेलं हे पुस्तक आहे. आयटीमध्ये काम करणारी नयना पुजारी, राजस्थानची भंवरीदेवी अशा अनेक बलात्कारित स्त्रियांच्या यात मांडलेल्या कथा मन सुन्न करणाऱ्या आहेत. अनेक स्त्रियांवर झालेले बलात्कार, त्यामागची पुरुषसत्ताक मानसिकता, जातीय दंगली, लढाया, शस्त्रस्पर्धा, सामुदायिक बलात्कार यांची भीषण कहाणी या पुस्तकात रेखाटलेली आहे. वेताळ पंचविशी प्रमाणेच बलात्काराच्या वेताळाबरोबर लेखिकेने मारलेल्या गप्पांतून देश-विदेशातील स्त्रीवास्तव समोर येतं. दिल्लीच्या निर्भया केसच्या निमित्ताने देशभरातील तरुणांमध्ये खूप जागृती झाली. त्याबद्दलचं भान देणारं हे पुस्तक आहे.

रोश विरुद्ध स्टॅनले अॅडॅम्स हे  डॉ. सदानंद बोरसे यांनी केलेलं मराठी अनुवादित पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे. हे पुस्तक म्हणजे अनुभवकथन आहे. एक अवाढव्य बहुराष्ट्रीय औषध कंपनी रोश ही जेव्हा अनैतिक मार्गाने, गैरप्रकार करून अमाप नफा मिळवू लागते, तेव्हा कंपनीतील एक सज्जन अधिकारी स्टॅनले अॅडॅम्स त्याविरुद्ध सरकारी आयोगाला माहिती कळवतो. त्यावर कंपनी चिडते आणि सुरू होतो एक जीवघेणा संघर्ष. कंपनी चक्क सरकार आणि पोलिस यांचं बळ वापरून अॅडॅम्सचा अपार छळ करते. त्याला तुरुंगात टाकते. त्या धक्क्याने त्याची पापभिरू बायको आत्महत्या करते. त्याच्या तीन कोवळ्या मुलींची जी ससेहोलपट होते, ती काळीज पिळवटून टाकणारी आहे. सत्यासाठी किंमत मोजणारा अॅडॅम्स, त्याची कोवळी लेकरं आणि त्याची पत्नी यांची ही कथा खूप वेदना देणारी आहे. डॉ. सदानंद बोरसे यांनी या पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद अतिशय दर्जेदार आहे. या विषयावरील चित्रपटही खूप गाजला होता. ही लढाई अद्यापही चालूच आहे.

तसंच सुप्रिया दीक्षित यांचं मौज प्रकाशनाने प्रकाशित केलेलं अमलताश हे आत्मकथन आणि प्रसिद्ध लेखक प्रकाश नारायण संत यांचं वनवास ही पुस्तकंही मला खूप आवडतात. सुप्रिया या प्रकाश नारायण संत यांच्या पत्नी आणि सुप्रसिद्ध कवयित्री इंदिरा संत यांच्या सुनबाई. हे अतिशय संयत, संवेदनशील आणि मध्यमवर्गीय स्त्रीची कुतरओढ, तिचा संघर्ष यांचं नेमकं वर्णन करणारं आत्मकथन आहे. लेखकाची लेखन निर्मितीप्रक्रिया, त्या कुटुंबातले स्नेहबंध, प्रतिभावंत प्रकाश संत यांच्याबद्दलचे उत्कट, हळुवार चित्रण यात वाचायला मिळतं. तक्रार नाही; पण घुसमट आहे असं नोंदवणारं हे चांगलं आत्मकथन आहे.

मलाला या बाबा भांड यांनी लिहिलेल्या साकेत प्रकाशनने प्रकाशित केलेल्या पुस्तकात नोबेल पुरस्कार विजेत्या धाडशी मलालाचं छान चरित्र आहे. बाबा भांड यांनी पाकिस्तानात मुलींच्या शिक्षणासाठी मलालाने अतिरेक्यांशी दिलेला लढा अतिशय प्रेरणादायी पद्धतीने या पुस्तकात मांडला आहे.

 श्रुती आवटेचं लॉगआऊट हे पुस्तक मॅजेस्टिक प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे. वयाच्या १६ व्या वर्षी कादंबरीकार झालेल्या श्रुती आवटेची ही अतिशय प्रसन्न, जिवंत, उत्कट आणि आजच्या युवकांचं अनुभवविश्व चितारणारी मस्त कादंबरी आहे. वयात येणं, कोवळं प्रेम, आजूबाजूचं जग यांचं या पुस्तकात केलेलं चित्रण अवाक करणारं आहे. पौगंडावस्थेतील जान्हवीचे विचार, हळवं आणि संवेदनशील जगणं वाचताना एक सुंदर कादंबरी वाचल्याचा आनंद मिळतो.
................................

No comments:

Post a Comment