Wednesday, December 3, 2014

संधी चालून येते तेव्हा..

http://epaper.eprahaar.in/#
प्रहार,मुंबई, दि. २९ नोव्हेंबर, २०१४ शनिवार पृ.२
http://prahaar.in/relax/269517
November 29, 2014 03:45:17 AM | Author प्रतीक्षा चौकेकर


टीव्ही इण्डस्ट्रीत आपल्याला काम मिळावं, दिग्गजांबरोबर काम करण्याची संधी आपल्यालाही नशीबी यावी असं स्वप्न या इंडस्ट्रीत येणा-या प्रत्येक नवोदित कलाकाराचं असतं. त्यांना ही संधी मिळते तेव्हा त्यांच्या आयुष्यात काय बदल होतात, हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. पुण्यातून मुंबईत कामाच्या शोधात आलेल्या प्रमीतीला जेव्हा ही संधी मिळते तेव्हा तिचं आयुष्य कसं बदलल याची ही गोष्ट..

pramiti Narake   अभिनयाचं शिक्षण घेतल्यानंतर प्रत्येक कलाकार शोधात असतो तो एका मोठय़ा ब्रेकच्या. काम मिळावं म्हणून हवी तेवढी मेहनत घ्यायला ते तयार होतात आणि जेव्हा अशी मोठी संधी चालून येते तेव्हा त्यांना काय वाटतं ही जाणून घ्यायची उत्सुकता मला होती, त्यातून प्रमीतीचा चेहरा समोर आला. ‘तू माझा सांगाती’ संत तुकाराम आणि आवलीची संसारगाथा या नावानं संत तुकाराम महाराजांच्या संसाराची कथा ई-टीव्हीवर सुरू झाली. संत तुकाराम यांचं नुसतं वारकरी संप्रदायाशीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राशी एक वेगळंच नातं जोडलं आहे. त्यामुळे या मालिकेचा प्रेक्षकवर्गही मोठा आहे.

या मालिकेत आवलीची म्हणजे तुकाराम महाराजांच्या दुस-या पत्नीची भूमिका साकारलीय ती पुण्याच्या प्रमीती नारके हिनं. लहानपणापासून सगळ्याच गोष्टीत पुढे असणा-या प्रमीतीनं आपल्याला मोठं झाल्यावर अभिनेत्री व्हायचं हे पक्क ठरवलं होतं. ती म्हणते ‘लहानपणापासून मला अभिनेत्री बनायचं होतं. कॅमेरासमोर काम करायचं होतं. या क्षेत्रात आल्यावर काम मिळेल की नाही याची खात्री नसते, आणि काम मिळालं तरी याच क्षेत्रात चांगलं करिअर बनेल की नाही याची शाश्वती कोणच देऊ शकत नाही. त्यामुळे माझे बाबा मला सांगायाचे तू यापेक्षा काहीतरी दुसरं करं. पण मला याच क्षेत्रात यायचं होतं त्यामुळे शिक्षण संपल्यानंतर ललीत कला केंद्रातून अभिनयाचं शिक्षण घ्यायला सुरूवात केली.’

दर महिन्याला नवं नाटक बसवं, मोठ मोठय़ा दिग्गजांकडून अभिनयाचे धडे गिरव असं करत करत तीन वर्ष तिची ललीतमध्ये निघून गेली, पण शिक्षण संपल्यानंतर पुढे काय असा प्रश्न तिच्यासमोर होताच यासाठी लवकरात लवकर कामही मिळवायचं होतं म्हणून कमाच्या शोधात पुण्याहून तिनं मोर्चा थेट मुंबईकडे वळवला. मुंबईत आल्यानंतर इतर नवोदितांसारखी पहिली कोणती गोष्ट करायची तर काम शोधायचं हे तिन मनाशी पक्क केलं. ती म्हणते ‘मला काम मिळवायचं होतं, मुंबईत आल्यानंतर मी लगेचच काम शोधायला सुरू केलं. कामाच्या शोधात दिवसातून किमान चार ऑडीशन माझ्या असायच्याच. महिनाभर कामाच्या शोधात मी फार वणवण केलीय. एका महिन्यात मी इतक्या ऑडीशन दिल्यात की त्यांची संख्याही मला आठवत नसेल. एके दिवशी आवलीच्या भूमिकेसाठी ऑडिशन सुरू आहेत असं कळलं आणि तिथे गेल्यावर या भूमिकेसाठी किमान पाचशेच्यावर ऑडीशन झाल्याचं कळलं. आता आपल्याला काही काम मिळणार नाही असं मला वाटलं पण शेवटी हो नाही करत आवलीच्या भूमिकेसाठी मला घेण्यात आलं.’

संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर ही मालिका असल्यानं मालिकेतील कलाकारांचा गोतावळा खूपच मोठा आहे. यात अनेक अनुभवी कलाकार आहेत. या सगळ्या कलाकारांबरोबर काम करण्याची मोठी संधी प्रमीतीकडे आली तेव्हा तिला काय वाटत होतं हे सांगता ती म्हणते ‘माझ्या जोडीला सहकलाकार म्हणून चिन्मय मांडलेकर होता. तो इतका आभ्यासू आहे की त्याच्या सोबत काम करायचं म्हणजे थोडं दडपण होतं, कॅमेरासमोर याआधी मी शॉर्ट फिल्म केल्या होत्या त्यामुळे कॅमेराची भिती नव्हती. पण आपण नवोदित कलाकार त्यामुळे कॅमेरासमोर अभिनय करताना चुकलो तर आपल्यामुळे इतर कलाकारांनाही थांबावं लागणार. त्यांनाही तोच सिन पुन्हा पुन्हा करावा लागणार अशी भिती मला होतं. पण या सगळ्याच कलाकारांनी खूपच सांभाळून घेतलं त्यामुळे काम करताना आणखी मज्जा आली. ’

कलाकारांसोबत काम करताना प्रमीतीनं चिन्मय मांडलेकरचीही खूप स्तुती केली आपल्याला त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली तीही पहिल्याच झटक्यात यासाठी ती स्वत:ला खूपच भाग्यशाली मानते ‘ती म्हणते चिन्मयकडून खूपच शिकण्यासारखं आहे आणि कामाची सुरूवात त्याच्यासोबत करायला मिळणं हे भाग्याच आहे, त्याचं वाचनही इतक अफाट आहे. आमच्यापेक्षा तोच जास्त काम करतो, तरी तो त्या कामातून स्वत:साठी वेळ काढतो. खूप वाचन करतो. दर चार दिवसांनी त्याच्या हातातलं पुस्तक बदलतं आणि आपण मात्र काहीच करत नाही, त्यामुळे थोडी स्वत:ची चिड येते पण नेहमी काही वेगळ शिकायला मिळतं याचा आनंद वाटतो.’

आवलीची भूमिका करताना प्रमीतीला काय अनुभव आले असं विचारल्यावर ती म्हणते ‘मला आवली यांच्याविषयी माहिती आधीपासून वाचण्यात आलं होतं, तुकाराम महाराजांच्या आयुष्यावर जी काही पुस्तक लिहली होती त्या पुस्तकातून जी आवली समोर आली ती एक फटकळ, चिडीचिडी, रागीट अशा काहीशा स्वभावाची होती. पण हे पात्र जेव्हा मी स्वत: करायला घेतलं तेव्हा आवलीविषयी जे काही पूर्वग्रह माझे किंवा इतर लोकांचेही असतील ते एका फटक्यात दूर झाले. तिच्या वागण्याची खरी कारणं काय होती ही त्यानिमित्तानं मला कळली आणि ती लोकांनाही कळतील.’

आवलीची भूमिका साकारताना प्रेक्षकांकडून आलेला एक गंमतीदार किस्साही तिनं सांगितला ती म्हणते ‘टीव्हीवर मी नववारी साडीत आणि पारंपारिक दागिने अशा प्रकारची माझी वेशभूषा दाखवण्यात आली आहे त्यामुळे प्रेक्षकांना मला तसंच बघायची सवय झालीय जेव्हा मी बाहेर फिरायला जाते तेव्हा काहीजण पटकन बोलतात तुम्ही आवली आहात मग नववारी साडीत फिरलं पाहिजे. पण त्यांना कळत नाही मी आवलीची भूमिका फक्त पडद्यावर साकारते ते काम संपल्यानंतर माझं वेगळं आयुष्य सुरू होतं.’

प्रमीतीचा या इण्डस्ट्रीतला प्रवास या मालिकेपासून सुरू झालाय, अर्थात या भूमिकेनंतर तिचे काही वेगळ्या योजना असतील पण पुढे व्यवसायिक नाटक आणि सिनेमा तिला करायचा आहे.
.................................

No comments:

Post a Comment