Tuesday, December 2, 2014

नेमाडेसरांच्या सहवासात


नेमाडे, इंग्रजी शाळा, साहित्य संमेलन आणि मी






हा आठवडा अतिशय संस्मरणीय गेला. कायम आठवत राहिल असा.
महात्मा फुले समता पुरस्कारासाठी डा.भालचंद्र नेमाडेसर पुण्यात आले होते. नेमाडे सर आणि सौ.प्रतिभाताईंच्या समवेत चार दिवस पोटभर गप्पा झाल्या.

 तासभर फुले वाडा दोघांनी फुरसतीने आणि आस्थेने पाहिला. सरांचे वाचन -पुस्तकांचे आणि माणसांचे अतिशय भन्नाट आहे. आरपारच घुसतात. विपर्यास करणारे, कांगावा नी कोल्हेकुई करणारे यांना ते छटाकभरही दखलपात्र मानत नाहीत. जबरदस्त झेप आणि भक्कम आत्मबळ यांचे प्रतिकच.

वाड्यावर दहाबारा वाहिन्या आणि विसेक वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी आलेले. त्यांना सरांशी बोलायचे होते. सर त्यांच्याशी बोलायला फारशे उत्सुक नव्हते. पत्रकार मित्रांनी मला गळ घातली. फक्त पुरस्काराबद्दलच विचारायचे या अटीवर मी सरांना विनंती केली.  पुरस्काराबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करायला सर तयार झाले. सर वाड्यातच त्यांच्याशी उभ्याउभ्या बोलले. अनेकांनी सरांचा बाईट घेतला. पुरस्काराबद्दल सर म्हणाले, "आजवर मला अनेक पुरस्कार मिळाले पण महात्मा फुले यांच्या नावाचा पुरस्कार फुल्यांच्या वाड्यावर त्यांच्या स्मृतीदिनी मिळणं हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा सन्मान आहे. मी फुलेवादी आहे. फुलेंकडून मला तरूण वयात दिशा आणि उर्जा मिळाली. समाज व्यवस्थेचं फुल्यांनी केलेलं विश्लेषण आम्हाला भारतीय समाजाची रचना समजाऊन घ्यायला कायम मार्गदर्शक ठरलं. जात,वर्ग, स्त्रीवाद यांचं फुल्यांचं आकलन द्रष्टेपणाचं आणि खर्‍या अर्थाने देशाला आधुनिक बनवणारं आहे......" सर भरभरून खूप बोलत होते.

जाता जाता एकाने सरांना साहित्य संमेलनाबद्दल विचारलं. सर म्हणाले, "मी त्या विषयावर बोलणार नाही. त्यावर मी खूप बोललोय.  त्याबद्दल बोलणं म्हणजे केवळ वेळ वाया घालवणं आहे. पुन्हापुन्हा बोलून काय उपयोग होणारेय? हा महामंडळाच्या चार रिकामटेकड्या लोकांचा उद्योग आहे. त्यातून साहित्याचं काहीही भलं होत नाही."

पत्रकार म्हणाले, "पण महात्मा फुल्यांनी साहित्य संमेलनाचं निमंत्रण नाकारलं होतं. तुमचं काय?"
सर म्हणाले, " मीही त्याच मताचा आहे. मी संमेलनाला जातच नाही. मला बोलऊ नका असंच मी त्यांना सांगितलय." सर बोलायला तयार नसतानाही त्यांना छेडलं गेलं. जाताजाता त्यांनी मी याविषयावर का बोलू इच्छित नाही म्हणून नकार देण्याचं कारण सांगताना जे म्हटलं त्यालाच अवास्तव आणि भरमसाठ  प्रसिद्धी दिली गेली. गदारोळ माजवला गेला.

सरांच्या संपूर्ण भाषणात या विषयाला त्यांनी स्पर्शही केलेला नाही. ते उत्स्फुर्तपणे फुल्यांवर बोलले. सामाजिक-सांस्कृतिक प्रश्नांचं त्यांनी विश्लेषण केलं. इंग्रजी शाळा आणि साहित्य संमेलनं यावर या भाषणात ते अवाक्षरही बोललेले नाहीत. तरिही जणु काही ते हे विषय आपल्या भाषणातच  बोलले असा भास निर्माण केला गेला. ही अर्धसत्य आणि अर्धवट पत्रकारिता कोठे चाललीय?

कार्यक्रमानंतर उशीरा आलेले काही वाहिन्या आणि वर्तमानपत्रांचे मित्र मला भेटले.

पुन्हा मागचीच आवृत्ती झाली.एकानं विचारलं,  "मराठी भाषेबद्दल काय सांगाल? इंग्रजी शाळांचं गावोगावी पेव फुटतय, मराठी शाळा बंद पडताहेत यावर उपाय काय?"

यावर सर म्हणाले, " शिक्षण मातृभाषेतूनच झालं पाहिजे. त्यातूनच बुद्धीचा विकास होतो.माणूस मातृभाषेत विचार करतो.त्याला स्वप्नंही आपल्याच भाषेत पडतात. मी भाषाशास्त्रज्ञ आहे. गुलामीच्या मानसिकतेतून इंग्रजीचं स्तोम माजवलं गेलंय. इंग्रजी भाषा शिकायला हवी. माझा तिला विरोध नाही. पण मराठी शाळांमधून उत्तम इंग्रजी शिकवण्याची सोय करा. इंग्रजी शाळांचं गावोगावी पेव फुटतय, मराठी शाळा बंद पडताहेत त्यासाठी प्रसंगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांवर बंदी घाला. मराठीतून शिकलेलेच लोक मोठे झाले.  महाराष्ट्रात इंग्रजी माध्यमातून शिकून श्रेष्ठ शास्त्रज्ञ, लेखक, विचारवंत, नेते झाल्याचं मला एकतरी उदाहरण दाखवा. त्यातून सारे हमाल तयार होतात आयटीतले. इंग्रजी माध्यमात मुलांना घालणं म्हणजे त्यांना पाण्यात बुडऊन मारणं आहे. त्यांची वाढ खुंटते. ते इकडचे ना तिकडचे बनतात. ..........."

बर्‍याच पत्रकारांनी संदर्भ सोडून, विपर्यस्त स्वरूपात सरांना पेश केले. अनेक फेसबुकवीरांनी त्यावर आधारित मुक्ताफळं उधळली. अग्रलेखही  खरडले गेले. नेमाडेंची खिल्ली उडवली गेली. महाराष्ट्र एव्हढा कृतघ्न केव्हा नी कसा बनला?

अनेक वाहिन्यांनी त्यांना यावरच्या चर्चेला निमंत्रित केले. सरांनी सगळ्यांना स्पष्ट नकार दिला. ग्रेट भेटी नाकारणारे नेमाडे या विद्वानांना झेपणारे नाहीत हेच खरे.

नेमाडेसर मला म्हणाले, " बघ, यासाठी मी या लोकांशी बोलत नसतो. ज्यांना मी अनेकदा भेटी नाकारल्यात ते माझ्यावर चवताळणारच ना. जाऊ दे. फुल्यांनी मराठी पत्रकारिता ही "पोटभरू" पत्रकारिता आहे असं तेव्हाच सांगून ठेवलय. साहित्य संमेलन आणि इंग्रजी शाळांचे सारे लाभार्थी लोक नेमाडेंवर तुटून पडलेले, आरडाओरडा नी कांगावा करीत असलेले बघून सर हसत म्हणाले, "यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करणार? हे एकजात इंग्रजीची गुलाम मनोवृत्ती हाडीमाशी भिनलेले लोक आहेत.

मराठीचा न्यूनगंड असलेले हे पोटार्थी लोक आपण संपूर्ण अदखलपात्र मानले पाहिजेत. त्यांना कसलेही उत्तर देण्याच्या फंदात पडू नकोस. मी फुल्यांबद्दल जे बोल्लो ते फारसे पुढे येऊ नये म्हणुन ते त्याला फाटे फोडतील, शब्दच्छल करतील. विषयांतर नी विपर्यास करतील. ते वाट्टॆल तो कांगावा करतील. हाच यांचा लाडका उद्योग आहे. त्यात त्यांना रमू द्यावं. या विद्वान लोकांना बिच्यार्‍यांना पोटासाठी असलं थोर काहीबाही करावच लागतं.  आपण आपल्या आवडीच्या कामात बुडून जावं."

चला हवा येऊ द्या.

...............................................

No comments:

Post a Comment