Monday, November 3, 2014

सदाशिव अमरापूरकर

सदाशिव अमरापूरकर हे सामाजिक प्रश्नांवर पोटतिडकीने बोलणारे कलावंत होते. कार्यकर्त्यांना मदतीचा हात  मिळावा यासाठी स्थापन करण्यात आलेल्या "सामाजिक कृतज्ञता निधी" ची संकल्पना कृतीशीलपणे उचलून धरणारा आणि गेली २५-३० वर्षे सामाजिक चळवळींची पाठराखण करणारा मित्र चळवळींनी गमावला आहे.
अमरापूरकर "अर्धसत्य" मधील भुमिकेने प्रकाशझोतात आले. त्यांची कन्यादान मधील कामगिरी लक्षणीय होती. मात्र त्यांच्या हिंदी चित्रपटातील नंतरच्या बहुतेक खलनायिकी भुमिका बर्‍याचशा एकसाची आणि भडक होत्या.
सामाजिक प्रबोधनासाठी उभ्या राहिलेल्या "लोकशाही प्रबोधन मंचा" च्या निमित्ताने अमरापूरकरांशी जवळून संबंध आला. औरंगाबाद, नगर, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, राजापूर ते मुंबई अशा दौर्‍यात गावोगाव लोकशाही बचाव च्या भुमिकेतून आम्ही मांडणी करण्यासाठी फिरलो होतो.
डा.श्रीराम लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर, डा. नरेंद्र दाभोळकर यांच्या टिममध्ये मी सर्वात ज्युनियर आणि बडबड्या. प्रवासात अमरापूरकर मला त्यांच्या कारमध्ये घ्यायचे. अतोनात गप्पा व्हायच्या. अनेक प्रश्नांवरील भुमिका त्यांना समजाऊन घ्यायच्या असायच्या. प्रसिद्धीच्या झोतात असलेला हा रंगकर्मी माझ्यासारख्याशीही अतिशय जिव्हाळ्याने गप्पा मारायचा. अनेक मुद्दे टिपून घेऊन त्यांचा ते भाषणात वापर करायचे. भाषणात सतत नवा कंटेंट असावा यासाठी ते प्रयत्नशील असायचे.
प्रसिद्धीचे अफाट वलय असूनही त्यांचे पाय कायम मातीत घट्ट रुजलेलेच राहिले.
सुमारे दहा दिवसांचा तो दौरा अविस्मरणीय होता. मी सभेचा पहिला वक्ता असायचो. डा.लागू सर्वात शेवटी बोलायचे. डा.लागू, निळूभाऊ आणि अमरापूरकरांना बघायला तुफान गर्दी व्हायची. सभेनंतर झोळी फिरवली जायची. कार्यक्रमाच्या खर्चासाठी सभेला आलेल्या लोकांकडूनच निधी मागितला जायचा. ते न लाजता झोळी फिरवायचे.लोक भरभरून मदत करायचे. डा. दाभोलकर आमचे व्यवस्थापक होते.
रात्री मुक्कामी सगळे एकत्र जेवायचो, गप्पांचे फड रंगायचे.
खरेच तो प्रवास किती सुंदर होता!...
त्यांनी अहमदनगरला अ.भा.मराठी नाट्यसंमेलन घेतले. त्यांनी मला अगत्याने निमंत्रित केले. परिसंवादात बोलायला लावले. महात्मा फुले हे मराठीचे पहिले आधुनिक नाटककार असल्याचे आम्ही याच नाट्यसंमेलनात आवर्जून मांडले. ते पुढे रुजले. अमरापूरकरांचा त्याकामी आग्रह आणि पुढाकार होता.
पुढे त्यांची कायम भेट होई. भरभरून बोलत. विचारपूस करीत.
एक जवळचा मार्गदर्शक आणि हितचिंतक गेल्याचे अपार दु:ख आहे.
विनम्र श्रद्धांजली.

No comments:

Post a Comment