Monday, October 20, 2014

उग्र आणि मुजोर जातीयवादाला चपराक?


सर्वप्रथम मी या सत्तांतराचे जाहीरपणे स्वागत करतो. विजयी मंडळींचे अभिनंदन करतो आणि पराभुतांचे सांत्वन करतो.

राज्याच्या सत्तेचा चेहरा बदलतोय. तो अधिक सर्वसमावेशक होतोय. बहुजनवादाचा बुरखा घालून पेरलेला  उग्र आणि मुजोर  सत्ताधारी जातीयवाद पराभवाच्या दिशेने जाताना दिसतोय. काही मस्तवाल नी जातीयवादी नेत्यांना लोकांनी नाकारले आहे. नवे जागृत मतदार तयार होत आहेत. आम्हाला गृहीत धरणे आणि विद्वेषासाठी वापरून घेणे गेले ५०वर्षे चालूये, ते  आम्ही यापुढे खपऊन घेणार नाही, असे सांगत विद्यमान जातीय मतब्यांकांना भगदाडे पडत आहेत.

पैसा, पेड माध्यमांचा उपयोग करणे, "नोटा"चा वापर, हे वाढत आहेत. मतदारांनी निर्धार केला तर काही मुजोर जातीयवादी असे सरदार, मनसबदार, जहागिरदार, पाटील, देशमुख आणि संस्थानिक पराभूतही होऊ शकतात. पर्याय असेल तर मतदार नक्की तिकडे वळतात, असे राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या  निकालातून स्पष्ट होते असे मला वाटते.

सत्यशोधक चळवळीच्या पुण्याईवर महाराष्ट्राचा सामाजिक चेहरामोहरा बदलला गेला. त्याचेही एक समाजशास्त्रीय महत्व जरूर होते. मात्र लवकरच निवडणुकीच्या तंत्रावर पकड मिळवलेल्या सत्ताधारी, उग्र आणि मुजोर  जातीयवादी टोळ्यांनी  बहुजनवादाचा मूळ विचार आणि सामाजिक ध्येयवाद  बाजूला ठेऊन शिवछत्रपती आणि  फुले-शाहू-आंबेडकर यांचे केवळ नामस्मरण करीत वाटचाल सुरू केली. त्यांना या महापुरूषांच्या  विचारधारेशी काहीही देणेघेणे नव्हते. वापर तेव्हढा करायचा होता. ही केवळ तोंडपाटीलकी होती.

त्यातून सत्तेचा पाया आकुंचित झाला. एकजातीय चेहरा आक्रमक बनू लागला. पण हे लोक चतूर असल्याने त्यांनी चोराच्या उलट्या बोंबा या न्यायाने विरोधी छावणीच जातीयवादी असल्याचा जोरदार डांगोरा पिटला. राज्यात तीनचार समाजाच्याच संघटित मतब्यांका होत्या. त्याच्या जोरावर कधी त्यात युतीच्या नावावर आघाडी नी आघाडीच्या नावावर युती करण्यात आली नी सत्तेच्या चाव्या नी तिजोर्‍या कब्ज्यात ठेवण्यात आल्या.

१९८० च्या दशकात प्रथमच नव्या जाणीवांचा मतदार तयार होऊ लागला. १९९५ ला त्याचा परिणामही दिसला. पण त्याला अवघ्या ५ वर्षात कोप्च्यात ढकलण्यात जुनेजाणते यशस्वी झाले. त्यानंतर  गेल्या १५ वर्षात राज्य ज्या दिशेने जात होते ती नवी मोगलाईच होती.

या निवडणुकीत जाहीरपणे  विदर्भातील काही नेत्यांची नावे घेऊन राज्य "त्यांच्या" ताब्यात देणार काय? अशी उग्र जातीयवादी मांडणी केली गेली. तिला मतदारांनी धुडकाऊन लावले हे बरे झाले. बाबा-दादा-आबा परत आले असले तरी ते मतदारांनी दिलेल्या या फटकार्‍याचा गर्भित अर्थ समजू शकतील काय?

राज्यातील स्वत:ला पुरोगामी/परिवर्तनवादी म्हणवणार्‍या अनेक पढीक पंडीतांना राज्यातील सामान्य मतदारांना जे दिसते ते अजुनही दिसत नाही. हे महाभाग आजही १८१८ ते १९६० याच काळात वावरत आहेत. ते ज्यांना जातीयवादी म्हणून ठोकीत आहेत ते समावेशक बनलेत  नी ज्यांना पुरोगामी म्हणून  ते डोक्यावर मिरवीत आहेत ते जातीयवाद्यांचे आश्रयदाते नी पोशिंदे बनलेले आहेत.

 राज्याची शिक्षण, माध्यमे, प्रशासन, राजकारण या सगळ्यांची सुत्रे आज ज्यांच्या हातात एकवटली आहेत ते जेव्हा उघड नी जहरी जातीयवादाचे प्रवक्ते बनतात तेव्हा संतुलन ढासळते आणि मग परिवर्तन अटळ बनते. तथापि या परिवर्तनाचे आकलन करण्याची क्षमता विद्यमान तथाकथित पुरोगाम्यांकडे आहे काय? याचे उत्तर लवकरच मिळेल.

 मी या सत्तांतराचे जाहीरपणे स्वागत करतो.

No comments:

Post a Comment