Thursday, March 7, 2013

बाईमाणुस....



"असे म्हणतात की,ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली होती!
माझी आई म्हणते,चार भिंतींचे घर मी एकटी चालवते!"
भारत हा गार्गी मैत्रेयीचा देश असल्याचे अभिमानाने सांगितले जाते.आपल्या काही राज्यांमध्ये पुर्वी मातृसत्ताक पद्धती होती असेही सांगितले जाते.इ.स.पुर्व ३७५ मध्ये मनुस्मृतीचा जन्म झाला.ते केवळ धार्मिक पुस्तक नव्हते तर ते एक प्रकारचे संविधानच होते.मनु तिसर्‍या अध्यायातील ५६व्या श्लोकात स्त्रियांची पुजा करायला सांगतो आणि पुढे नवव्या अध्यायाच्या तिसर्‍या श्लोकात मात्र स्त्रियांना स्वातंत्र्य नसते असेही सांगतो.पुजेचा अर्थ आणि अधिकार स्पष्ट करताना मनुस्मृतीच्या भाष्यकारांनी लेणे नेसणे, नटणे मुरडणे यांचे स्वातंत्र्य असे स्पष्टपणे सांगितले आहे.त्यात सत्ता,संपत्ती,प्रतिष्ठा,मालकीहक्क आदी समाविष्ट नाहीत हेही स्पष्ट केले आहे. भारताचा इतिहास चिकित्सकपणे तपासला असता भारतातील काही राज्ये "मातृपुजक" होती "मातृसत्ताक" नव्हेत हे दिसुन येते.
स्त्रीपुरुष विषमता हा संपुर्ण जगभरचा प्रश्न आहे.भारतीय संस्कृतीने त्यात खुप गुंतागुंत आणि जटीलता यांची भर घातलेली आहे.म्हणायला देवी आणि वागवायला दासी असा दुटप्पी व्यवहार सर्रास आढळतो.नवर्‍याने मारले आणि पावसाने झोडपले तर तक्रार करायची नसते अशी म्हणच आपल्याकडे प्रचलीत होती.बायकोला मारहाण करणे हा आपला खाजगा मामला आहे,त्यात इतरांनी पडु नये असे नवरे म्हणत आणि शेजारीपाजारीही ते मान्य करीत.वास्तविक पाहता लग्न ही सामाजिक मान्यतेने घडणारी गोष्ट आहे. {म्हणुन तर वाजतगाजत,डामडौलात आणि दुष्काळातही अफाट संपत्तीचे हिडीस प्रदर्शन करीत लग्ने लावली जातात आणि "भास्कराच्या" प्रकाशात माफ्याही मागितल्या जातात} या विवाहातुन झालेल्या  पोराबाळांच्या वाढदिवसाला लोक आपल्या नातेवाईकांना-मित्रांना बोलावतात.त्यामुळे पत्नीला मारहा्ण हा हिंसाचाराचा आणि मानवी हक्कांचे उल्लंघन करणारा मुद्दा आहे.त्यात समाज आणि सरकार{पोलीस} यांनी हस्तक्षेप करणे अपरिहार्य आणि आवश्यकच आहे.
नेहमी एक युक्तीवाद केला जातो की सासुच सुनेला छळते, ननंद-भावजयाच भांडतात.पुरुष बिचारे उगीच बदनाम होतात. खरे तर सत्ता-संपत्ती-प्रतिष्ठा सारे घरातील पुरुषाच्या नावे असते.तो जिच्या ताब्यात तिला समाजात प्रतिष्ठा असा लोकव्यवहार असल्याने सासु आणि सुन यांच्यात त्यासाठी रस्सीखेच चालते.म्हणजे भांडण जरी बायकांचे असले तरी भांडणाचा मुद्देमाल पुरुष असतो आणि जोवर स्त्रियांना स्वतंत्र अस्तित्व असत नाहीत तोवर ही भांडणे हा मालकीहक्काचे राजकारण असते हे समजुन घेतले पाहिजे.स्त्री-पुरुष नाते हे परस्परविरोधी नसुन परस्परपुरक आहे.दोघे मिळुन जग बनते. नवनिर्मितीसाठी दोघांचीही गरज असते.आज स्त्री भृणहत्येच्या प्रश्नाने उग्र रुप धारण केले आहे. मुलींना जन्मच नाकारला जात आहे. त्यामुळे समाजस्वास्थ बिघडेल, मुलांना लग्नासाठी पुढे मुलीच मिळणार नाहीत अशा पुरुषकेंद्री पद्धतीने न बघता मुलत: स्त्रियांच्या जन्म घेण्याच्या मानवी हक्कांचे उल्लंघन यातुन होत आहे,ते थांबले पाहिजे,अशा पद्धतीने या प्रश्नाकडे बघण्याची गरज आहे.मुख्य प्रश्न मानसिकता बदलण्याचा आहे. स्त्री आणि पुरुष अशा दोघांचीही मानसिकता बदलली पाहिजे.एकाच गोष्टीकडे हितसंबंध बदलले की कसे बघितले जाते त्याचे अनेक नमुने आपल्यापुढे असतात.उदा. एखादी आई मुलाबद्दल म्हणते,"माझा मुलगा पार वाया गेला, बायल्या झाला.बायकोच्या तालावर नाचतो" आणि तीच आई जावयाचे  कौतुक करताना म्हणते, "कसा सोन्यासारखा जावई मिळालाय, माझ्या मुलीच्या शब्दाबाहेर नाही!"
ब्रिटीशकाळात आपल्या पारंपरिक दृष्टीकोनात मुलभुत बदल होऊ लागला. सतीबंदीचा कायदा{१८२९}, विधवेच्या पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा{१८५४},विवाह नोंदणी कायदा{१८७१},संमती वयाचा [शारदा] कायदा{१९२९}, पोटगीचा कायदा{१९४०} करण्यात आले. महात्मा फुले, सावित्रीबाई, महर्षि कर्वे, आगरकर,रानडे,रमाबाई, गांधीजी, लोहिया आणि डा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातुन आपला दृष्टीकोण हळुहळू बदलू लागला.संविधानाने दोघांनाही समान अधिकार दिले.राज्यघटनेला मान्यता देणार्‍या याच खासदारांनी स्त्रियांना अधिकार देणार्‍या हिंदु कोड बिलाला मात्र विरोध केला.बाबासाहेबांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. पुढे हा कायदा तुकड्यातुकड्याने अंशत: पास करण्यात आला.
स्त्री शिक्षणात आपण बरीच मोठी झेप घेतली असली तरी आजही सर्वच समाजात मुलांच्या तुलनेत मुलींची साक्षरता आणि शैक्षणिक गळती अधिक आहे.इ.पहिली ते दहावीपर्यंत खुल्या गटातील ६१%मुलगे आणि ६५% मुलींची गळती आहे.तर अनुसुचित जातींमध्ये हेच प्रमाण ७४%आणि ७१% असे आहे. १९६१ साली खुल्या गटातील ३४%पुरुष आणि १३% स्त्रिया साक्षर होत्या तर अनुसुचित जातींमध्ये हे प्रमाण अनुक्रमे १७% आणि३% असे होते. २००१ साली खुल्या गटातील ७५%पुरुष आणि ५४% महिला साक्षर होत्या.अनु.जातीतील ६७%पुरुष आणि ४२% स्त्रिया साक्षर होत्या.
स्त्रिया आर्थिक बाबतीत स्वावलंबी झाल्या की त्या अधिक सक्षम होतात हे खरेच आहे.घर चालवण्यात त्यांचाच पुढाकार असला तरी घरांची मालकी मात्र पुरुषांच्या नावे असते.जमीन कसतात बायका पण सातबाराला मालक म्हणुन पुरुषाचे नाव असते. हे चित्र बदलले पाहिजे. देशाच्या सर्वोच्च पदांवर महिलांनी आपला ठसा उमटवलेला आहे. अहिल्याबाई होळकर,सावित्रीबाई फुले आणि ईंदिरा गांधी यांचा वारसा सांगणार्‍या मुली आज कुठेच मागे नाहीत."मुलगा म्हणजे वंशाचा दिवा", "मुलीलाच माना मुलगा" हे सारे आपण सोडले पाहिजे.मुलगा आणि मुलगी हे दोघेही माणुस आहेत.मानवप्राण्याने प्राणीविश्वातुन मानसात यायला हवे.प्राणी कधीही बलात्कार करीत नाहीत,माद्यांना मारुन टाकीत नाहीत.त्यामुळे विकृत पुरुषांना पशू म्हणायचे सोडुन दिले पाहिजे.दोघांनीही पुरुषप्रधान मानसिकता सोडुन  समतावादी झाले पाहिजे.तरच आपण सुखी, संवादी आणि संपन्न होवू. त्यासाठी कडक कायदे, समाजाचे मानसिकता परिवर्तन आणि स्त्रीहक्काची चळवळ यासाठी पावले उचलावीच लागतील.
........................................................................................................................................................................








1 comment:

  1. लेख वाचला भारतात अजूनही बाईला नावापुरतच मन दिला जातो . सर्व व्यवहार मात्र पुरुषच करतात. लेखात मांडलेले विचार खुप आवडले.

    ReplyDelete