Wednesday, March 6, 2013

मराठीच्या विकासासाठी कडवे बना!


Sakal,Pune, Today..05 Feb.2013

--मनीष कांबळे - manishvkamble@gamil.com
Tuesday, March 05, 2013 AT 04:00 AM (IST)
Tags: dr. hari narake, interview, pune

भाषेची विविधता हे मराठीचे वैभव असून, त्याचा अभिमान बाळगला पाहिजे. त्याला प्रमाणभाषेचे लेबल लावून मिटवून टाकणे, हा वेडेपणा आहे. या भेदाचा दोष धुरिणांकडे जातो. त्यांनी आतातरी सुधारले पाहिजे; नाहीतर फार उशीर झालेला असेल. दलित साहित्यामुळे मराठीची पताका जगात फडकली. 

एक दिवस मराठी भाषा दिन साजरा करून काय साध्य होणार?

याबाबत तातडीने चार-पाच गोष्टी केल्या पाहिजेत. मराठीतील 52 बोलीभाषांचे शब्द, म्हणींचा ठेवा संकलित केला पाहिजे. त्यासाठी विद्यार्थी, शिक्षकांना प्रोत्साहन व फेलोशिप दिली पाहिजे. बोलीभाषा संपन्न झाली, तरच मराठी समृद्ध होईल. मराठी ही जगातील दहाव्या क्रमांकाची भाषा आहे. त्यामुळे किमान शंभर भाषांमध्ये मराठी साहित्य जाईल, यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. बायबल दोन हजार भाषांमध्ये गेले आहे; तर आपले मौलिक ग्रंथ, संतसाहित्य, मोठ्या लेखकांचे साहित्य विविध भाषांमध्ये अनुवादित झाले पाहिजे. मराठीत आतापर्यंत एक लाख ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. त्यातील एक हजार ग्रंथ तरी वीस ते पन्नास रुपये एवढ्या रास्त किमतीत उपलब्ध झाले पाहिजेत. मराठीतील प्रसिद्ध लेखकांची पुस्तके रास्त किमतीत उपलब्ध झाल्यास त्यावर उड्या पडतील. फुले-आंबेडकरांचे साहित्य अशा पद्धतीने उपलब्ध केल्यावर, एक-दोन किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्या होत्या. राज्यात छोटी-मोठी सुमारे अडीचशे साहित्य संमेलने होतात. त्यांनाही राज्य सरकारने निधी देऊन ताकद दिली पाहिजे. राज्यात वर्षाला बाराशे ते दीड हजार मराठी शाळा बंद पडतात. या पार्श्‍वभूमीवर मराठीला प्रतिष्ठा मिळवून देणे, मराठी भाषा रोजगारनिर्मितीशी जोडून घेणे, यासाठी आग्रह धरला पाहिजे. मराठीभाषकांनी विमानतळावर मराठी का बोलू नये? किती मराठी घरांमध्ये मराठीचा सन्मान हा पुस्तकांच्या, लेखकांच्या छायाचित्रांच्या रूपाने करण्यात येतो? अन्य राज्यांत तेथील लेखकांना जो सन्मान मिळतो; तो मराठीतील साहित्यिकांना का मिळत नाही? हे सर्व साध्य करण्यासाठी मराठी माणसांची मानसिकता बदलली पाहिजे. अन्य सर्व भाषांमध्ये राष्ट्रगीत आहे. विश्‍वगीत असलेली मराठी ही एकमेव भाषा आहे; मग आपण न्यूनगंड का बाळगायचा? आपण 364 दिवस मराठी व अन्य भाषेला एक दिवस, असे केले; तर बघा काय होते ते. मराठी आपला श्‍वास आहे. ओळखपत्र आहे; मग हे ओळखपत्र एक दिवसच का बाळगायचे?

बोलीभाषांना गावंढळ म्हणून हिणवल्याने मराठी भाषेचे नुकसान झाले आहे का? 
कोणतीही भाषा शुद्ध किंवा अशुद्ध नसते. प्रमाणभाषा असावी की नाही, याबाबत दुमत आहे. मात्र, प्रमाणभाषा म्हणजे प्रतिष्ठित भाषा नव्हे. वऱ्हाडी, अहिराणी, कोकणी, असा भेद करून आपण त्यांच्या लेखनस्वातंत्र्यावर बंदी घालतो. हिणवल्यावर संबंधितांमध्ये अपराधीपणाची भावना निर्माण होऊन त्यांचे व्यक्त होणे थांबले. गावंढळपणाच्या नावाखाली हा भाषिक दहशतवाद आहे. भाषेची विविधता हे मराठीचे वैभव असून, त्याचा अभिमान बाळगला पाहिजे. त्याला प्रमाणभाषेचे लेबल लावून मिटवून टाकणे, हा वेडेपणा आहे. या भेदाचा दोष धुरिणांकडे जातो. त्यांनी आतातरी सुधारले पाहिजे; नाहीतर फार उशीर झालेला असेल. दलित साहित्यामुळे मराठीची पताका जगात फडकली, तसेच बोलीभाषेतील साहित्य खूप सकस आहे.

कला शाखा वगळता उच्च शिक्षणात मराठी भाषा व साहित्याचा संबंध तुटत असल्यामुळे विद्यार्थी मराठीपासून दूर जातात... 

त्यासाठी, मराठी कुटुंबांमध्ये मराठीबद्दल प्रेम निर्माण झाले पाहिजे. आपल्या साहित्याचे घरात सामुदायिक वाचन झाले पाहिजे. मराठी साहित्याविषयी प्रेम, जिव्हाळ्याचे वातावरण प्रत्येक कुटुंबामध्ये असले पाहिजे. जी. ए. कुलकर्णी, विजय तेंडुलकर, पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर, महेश एलकुंचवार, भालचंद्र नेमाडे आदी दिग्गज साहित्यिकांची मोठी फळी क्‍वचितच अन्य भाषेमध्ये असेल. प्रत्येक घरात त्यांचे साहित्य जपले पाहिजे. ज्या घरात फक्त माणसे राहतात, त्याला मी गोठा म्हणेन; तर जेथे माणसांबरोबर पुस्तके राहतात, त्यालाच मी घर म्हणेन. जगातील ज्ञानाच्या सर्व शाखा मराठीत आल्या पाहिजेत, एवढी मराठी सक्षम झाली पाहिजे.

बृहन्महाराष्ट्रातील संस्थांनाही मराठीचे जतन करण्यासाठी अडचणी येत आहेत..
.
महाराष्ट्राबाहेरील 15 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवली जाते. हे काम पाचशे विद्यापीठांमध्ये होऊ शकते. विविध राज्यांमध्ये मराठी बोलणारे लोक आहेत. जेथे महानुभाव आहेत, तेथे मराठी भाषा आहे. सातवाहन, राष्ट्रकूट तसेच पेशव्यांचे राज्य ज्या ठिकाणी होते; तेथे मराठी भाषा असून, त्यांना आपण ताकद दिली पाहिजे. तेथील संस्थांना मदत केली पाहिजे. भाषासंवर्धनासाठी राज्यात 70 टक्के, तर राज्याबाहेरील संस्थांना 30 टक्के, या प्रमाणानुसार मदत केली पाहिजे. महाराष्ट्राबाहेरील मराठी संमेलनाला गावेच्या गावे येतात. तेथे मराठीविषयी फार प्रेम व आस्था दिसते. लंडनमधील मराठीभाषकांमध्येही ही भावना दिसली.

राज्य लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा मराठीसह हिंदी व उर्दू भाषेतूनही घेण्याचा आग्रह होऊ लागला आहे... 

जो निकष दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये आहे; तो आपणही पाळला पाहिजे. तेथे त्यांची भाषा न येणाऱ्यांना कोणी नोकरीही देत नाही. तसे केले नाही, तर आपण आपल्या हाताने मराठी संपवू. मराठीच्या संवर्धनासाठी दक्षिणेच्या राज्यांतील नागरिकांप्रमाणे कडवेपणा आपल्यात आला पाहिजे. त्यांचे अनुकरण आपण केले पाहिजे. पण, अन्य भाषकांबद्दल आकस, द्वेष नको.
 — 

 Interview of Prof. Hari Narke, Sakal, Today,PUNE 5FEB2013.

No comments:

Post a Comment