Saturday, October 6, 2012

उपेक्षित गुणाबाई गाडेकर

पहिली दलित  महिला आत्मकथाकार
{जन्म:१९०६,  मृत्यु:१६ मे १९७५}

"असे म्हणतात की ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली होती!
चार भिंतींचे घर मी एकटी चालवते!"

कवि भिमराव गोपनारायण यांनी एका कर्तबगार महिलेचे मनोगत अवघ्या १३ शब्दात आपल्यासमोर चित्रशैलीतुन रेखाटले आहे.स्वता:च्या हिंमतीवर आकाश पेलावे तसे घर पेलणा-या कोट्यावधी स्त्रिया भारतात आहेत.बालपणात वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी वैधव्य वाट्याला आलेले असताना बाई खचुन गेल्या नाहीत.सेवासदनमध्ये त्यांनी उच्चशिक्षण घेतले.ट्रॆंड शिक्षिका आणि पुढे मुख्याध्यापिका बनल्या. पुनर्विवाह केला. नव-याला उच्च शिक्षणासाठी स्कोटलंडला पाठवले.राज्य सरकारच्या समाज कल्याण विभागाचे उपसंचालक म्हणुन त्यांनी काम केले.आपल्या पतीला बाईंनी फार मोठे अधिकारी म्हणुन नावारुपाला आणले. एम.एससी.ला विद्यापिठात पहिला क्रमांक मिळवणा-या  मुलाला अमेरिकेतील केलीफोर्नियामधील बर्कले विद्यापिठात पाठवुन पीएच.डी.करायला लावली.त्याला जागतिक दर्जाचा जिआलाजिस्ट बनवले.पुढे हा मुलगा डा.बाबासाहेब आंबेडकर विद्यापिठाचा कुलगुरु बनला.बाईंनी मुलीला डाक्टर करुन मेडिकल ओफिसर बनवले.बाई आयुष्यभर सामाजिक काम करीत राहिल्या.अश्या गुणवती परंतु तरिही संपुर्ण उपेक्षित महिलेला  आज आपण भेटणार आहोत.
अस्पृश्य मानल्या गेलेल्या चर्मकार समाजात गुणाबाईंचा १०६ वर्षांपुर्वी {१९०६ साली}जन्म झाला.६९ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी डा.बाबासाहेब आंबेडकर,कर्मवीर भाऊराव पाटील,गाडगेबाबा,महर्षि विठ्ठल रामजी शिंदे, श्री.म.माटे,मेहरबाबा यांच्या सोबत कर्तबगारीच्या आणि मेहनतीच्या जोरावर फार मोठे क्षेत्र उभे केले.बाबासाहेबांनी भरवलेल्या महिला परिषदांची अध्यक्षपदे बाईंनी भुषवली.पुर्वास्पृष्य चर्मकार समाजाच्या विकासासाठी शिक्षणसंस्था,वसतीगृहे,उभारुन कामे केली.दुष्काळनिवारण,महिला जागृती,बचत योजना, दलित परिषदा, आल इंडीया डिप्रेस्ड क्लासेस लीग, जातीनिर्मुलन संस्था, महाराष्ट्र सामाजिक परिषद, हरिजन सेवक संघ, रिमांड होम,महिला मंडळ,कांग्रेस पक्ष, आदिंचे कार्य, महानगर पालिका, जिल्हा स्कूल बोर्ड, विधानसभा अश्या विविध निवडणुका लढवणे या नानाविध कामात बाई झिजत आणि झुंजत राहिल्या.बाई अतिशय जिद्दी होत्या.लढावुपणा हा त्यांचा स्वभाव होता.
आज सत्ताधारी पक्षाचे कोणतीही निवडणुक लढवणारे उमेदवार म्हटले की काय चित्र डोळ्यांपुढे येते? पक्षाचे तिकीट मिळण्यासाठी निवडणुकीत कोट्यावधी रुपये खर्च करण्याची क्षमता हा पहिला निकष असतो! बाई १९५७ साली पुण्याच्या हवेली विधानसभा मतदार संघातुन कांग्रेसच्या उमेदवार होत्या.त्यावेळचे एक चित्र त्यांच्याच शब्दात वाचुया."हवेलीच्या ३ सीट होत्या.लोकसभेला काकासाहेब गाडगीळ आणि विधानसभेला मला आणि अण्णासाहेब मगर अश्या आम्हा दोघांना पक्षाने उमेदवारी दिली.ह्यांनी{बाईंचे पती रामचंद्र गाडेकर यांनी}लगेच प्रचारासाठी १ गाडी घेतली.निवडणुक प्रचार म्हणजे एक दिव्य आहे.मामासाहेब देवगिरीकर तेव्हा महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस समितीचे अध्यक्ष होते.त्यांनी एक पैसाही मला दिला नाही.काही व्यक्तींना खुपच मदत केली.एक हरीजन उमेदवार होते.त्यांनाही काही दिले नाही.ते प्रचाराला गेले असता सभेत भाषण करीत असताना मरण पावले.इतका ताण त्यांच्यावर पडला.मगरही पैसे मागु लागले.मग त्यांनाही एक हजार रुपये दिले.दोन गाड्या तुमच्या प्रचारासाठी पाहिजेत असे म्हटल्यानंतर पुन्हा ५० रुपये रोजाची एक गाडी भाड्याने घेतली.अश्या दोन गाड्या माझ्यातर्फे सकाळी ७ वाजताच तयार असायच्या.दहा पंधरा माणसांचे जेवण बरोबर घ्यावे लागे.डाळ,चुरमुरे यांच्या पिशव्या भरुन ठेवाव्या लागत.शिवाय कोठे होटेल लागले तर चहा ठरलेला असे.सबंध हवेली तालुका प्रचार केला.प्रत्येक खेड्यात जावुन सभा,भाषणे घेतली.बरोबर माणसेही खेड्यातील.मगर नेहमी बरोबर असायचे.त्यांची एक गाडी असायची.सर्व आटोपुन रात्री बारा एकला घरी परत येत असू.
..त्याच सुमारास मोरारजीभाईंचे द्वैभाषिक निघाले आणि कांग्रेसचे पुणे जिल्ह्याचे तात्यासाहेब जेधे सोडुन सर्व उमेदवार घरी बसले.आमचा खर्च फार झाला.पेट्रोलचे ३०००रुपये बिल झाले.इतर सर्व बिले द्यायची होती.आमचे शुक्रवार पेठेत एक घर होते.ते विकले.संगमवाडीला दोन प्लाट होते तेही विकले आणि सर्वांची बिले चुकती केली.मामा देवगिरीकरांनी एक पैसासुद्धा दिला नाही.आम्ही त्यांना भेटलो तर कानावर हात ठेवले.मनाचा घाव मनात ठेवुन पुन्हा नेटाने कामास लागले."
या निवडणुकीतील बाईंचे सगळे अनुभव ही एक चित्रकथाच आहे.
आजवर अनेक दलित महिलांनी आत्मकथने लिहिलेली आहेत.बेबीताई कांबळे,शांताबाई कांबळे,कुमुद पावडे,उर्मिला पवार, सुनिता अरळीकर,मुक्ता सर्वगौड,मल्लिका अमरशेख,विमल मोरे, जनाबाई गि-हे यांची आत्मकथने गाजलेली आहेत.हे प्रत्येक पुस्तक म्हणजे  जगण्याची विलक्षण धडपड टिपणा-या पराक्रमाच्या कहाण्या आहेत.गुणाबाईंनी आपले आत्मकथन लिहिले आहे.९ एप्रिल १९५९ ते १९७४ याकाळात त्यांनी लिहिलेल्या या सर्व आठवणी त्यांच्या मुलाने ग्रंथरुपाने प्रकाशित केलेल्या आहेत."स्मृतिगंध" या त्यांच्या आत्मकथनाला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची प्रस्तावना आहे.बड्योद्याला मुद्रीत केलेला हा ग्रंथ पुण्याच्या मेहेरचंद्र प्रकाशनाने १९९२ साली प्रकाशित केलेला आहे. आज या घटनेला २० वर्षे पुर्ण झालीत.दलित आत्मकथनांवर आणि त्यातही दलित महिलांच्या आत्मकथनांवर विपुल समिक्षा लेखन झालेले आहे.यातील अनेक पुस्तके अभ्यासक्रमाला लावण्यात आलेली आहेत.मात्र  कोणाही विचारवंताने किंवा समिक्षकाने बाईंच्या या पहिल्या दलित महिला आत्मकथनाची अजिबात दखल घेतलेली नाही.दलित लेखिकांनीही या पुस्तकाकडे दुर्लक्ष करावे हे खेदजनक आहे.दलित चळवळीचा सामाजिक लेखाजोखा आणि समाजशास्त्रीय दस्तावेज म्हणुन या पुस्तकाला अनन्यसाधारण महत्व आहे.पुण्याजवळच्या चोराची आळंदी या गावच्या रामजी बाबाजी ढवळे या आपल्या आजोबांच्या चटका लावणा-या  आठवणींनी हे पुस्तक सुरु होते.१८९६ सालच्या प्लेगच्या साथीने माजवलेला हाहा:कार बाई मोजक्या शब्दात समर्थपणे चित्रित करतात आणि  पुस्तक पकड घेत. आजोबांचे सगळे नातेवाईक या प्लेगमध्ये मरण पावतात. बाईंचे वडील, बाई आणि नातेवाईक यांना   अस्पृश्यतेचे अनेक चटके सोसावे लागतात. तरिही बाईंच्या लेखनात कटुता नाही की या अनुभवांचे भांडवल करुन सहानुभुती मिळवण्याची धडपड नाही. बाईंचा वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी आफ्रिकेतील मोठ्या श्रीमंत घरातील मुलाशी बालविवाह होतो. पण  लगेच आलेल्या वैधव्यापुढे बाई झुकत नाहीत. खंबीरपणे कंबर कसुन उभ्या राहतात.  न्या. म.गो.रानडे यांच्या पत्नीने सुरु केलेल्या सेवासदनात जिद्दिने  उच्च शिक्षण घेतात. बाई बुद्धीमान,कर्तबगार आणि देखण्या असल्याने अनेक ब्राह्मण घरातील स्थळे चालुन आलेली असतानाही त्या विचारपुर्वक समाजातीलच एका होतकरु तरुणाशी पुनर्विवाह करतात.त्याचे फाटके घर स्वता:च्या पदराने सजवतात.उभे करतात.महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, देवधर, महात्मा गांधी यांच्या विचारातुन बाईंना उर्जा मिळते. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमवेत बाई अनेक महिला परिषदांचे अध्यक्षस्थान भुषवतात. बाबासाहेबांचे १९५० च्या दशकातील निवडणुकीतील विरोधक सदोबा काजरोळकर यांच्यासमवेतही त्यांनी कार्य केले.बाबासाहेबांना राजर्षि शाहुंची भेट घडवणारे कोल्हापुरचे दत्तोबा पवार तसेच बाबासाहेबांचे सहकारी राजभोज यांच्याशी गाडेकर घराण्याचे घनिष्ट संबंध होते.चर्मकार समाजातील पहिल्या उच्चशिक्षित महिलेचा जीवनसंघर्ष टिपणारे हे आत्मकथन मराठी साहित्यातील महत्वाचे पुस्तक आहे.बाईंनी पतीनिधनापर्यंतचाच प्रवास या पुस्तकात सांगितलेला आहे. खरे तर पतीच्या मृत्युनंतरही बाईंनी मुलामुलीला शिकवले.मोठे केले.बाई समाज कल्याण मंडळ, जिल्हा शिक्षण लोकल बोर्ड यावर सदस्य म्हणुन काम करीत.बाई अत्यंत शुर होत्या. पंढरपुरला एका चोराचा पाठलाग करुन त्यांनी दिलेली झुंज बघुन पोलीस अधिकारीही चकीत झाले होते.
१६४ पृष्ठांच्या या पुस्तकाची किंमत अवघी ६० रुपये आहे. ८८५/५, भांडारकर इन्स्टिट्युट रोड, डेक्कन जिमखाना, पुणे ४११००४ या पत्त्यावर या पुस्तकाबाबत अधिक चौकशी करता येईल.माझे मित्र आणि बाईंचे नातु मेहर गाडेकर यांच्यामुळे मला हे पुस्तक उपलब्ध झाले.
पुस्तकातील काही भाग अगदी धावता आहे. घटनांची जंत्री देणारा आहे. स्मरणाच्या आधारे केलेले हे लेखण असल्याने काही विसंगतीही राहुन गेलेल्या आहेत.बाई कसलेल्या लेखिका नसल्याने पुस्तकावरुन जाणकार समिक्षकाचा हात फिरण्याची गरज होती.तसे झाले असते तर एक अव्वल दर्जाचे मराठी आत्मकथन म्हणुन या पुस्तकाची गणना करावी लागली असती.तरिही जे आहे ते लक्षनीय आहे.या पुस्तकात गुणवती गुणाबाई गाडेकरांचे  आकाशवाणीवरील एक भाषण देण्यात आलेले आहे. त्यात त्या म्हणतात "दलित  वर्गातील  विशेषत: स्त्रियातील अज्ञान व वेडगळ कल्पना घालविण्याची व त्यांच्यामध्ये विद्येचा प्रसार करण्याची खरी आणि भरिव कामगिरी स्त्रियाच करु शकतील.उच्च आचार व विचार यांची कल्पना त्या आपल्या नैसर्गिक प्रेमळपणामुळे या वर्गास सहज करुन देतील.कुटुंबात स्त्री हा महत्वाचा घटक आहे.त्या सुविद्य व सुगृहीणी  झाल्या की कुटुंबे सुधारतील आणि दलितवर्गाची सुधारणा होवुन "दलित" हा शब्दच ईतिहासजमा होवुन नामशेष होईल.भारतात खरीखुरी लोकशाही, समतेचे राज्य आणि स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी  महिलांनी नेटाने प्रयत्न करायला हवेत."