Saturday, June 25, 2011

शाहुजयंतीचे जनक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर


शाहुजयंतीचे जनक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

माणगाव, जि.कोल्हापुर येथील परिषदेनंतर डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांनी "मुकनायक"चा राजर्षी शाहु महाराज विशेषांक काढायचे ठरवुन महाराजांना पत्र लिहिले. हेच पत्र हा अभ्यासकांसाठी पुरावा म्हणुन पुढे महत्वाचा दस्तावेज ठरले.माणगाव परिषदेत बाबासाहेबांनी शाहुराजांचा वाढदिवस सनउत्सव म्हणुन साजरा करण्याचा ठराव केला होता. शिवजयंती सुरु करणारे महात्मा फुले आणि शाहुजयंती सुरु करणारे बाबासाहेब ही वैचारिक विण समजुन घेतली पाहीजे.


कोल्हापुर सोडुन अन्यत्र शाहुजयंती होत नसे. मी स्वत: राज्यात सर्वत्र शाहुजयंती करण्याची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री श्री. विलासराव देशमुख यांना समक्श भेटुन ११ वर्षांपुर्वी दिले.त्यांनी त्याचा जी. आर. काढावा यासाठी मी पाठपुरावा केला. मला त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातील तत्कालीन ज्येष्ट सनदी अधिकारी श्री. भुषण गगराणी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तेव्हा शाहुमराजांची जन्मतारिख २६ जुलै मानली जात असे.त्याप्रमाणे पहिला जी. आर. निघाला. शाहुजयंती शासनातर्फ़े सुरु झाली.


आम्हाला खुप आनंद झाला.

श्री. सुशिलकुमार शिंदे मुख्यमंत्री व श्री. छगन भुजबळ उपमुख्यमंत्री असताना मी मागणी करुन शासनाला हा दिवस "सामाजिक न्यायदिवस" म्हणुन घोषित करायला लावला. त्याकामी ज्येष्ट आय.ए.एस.अधिकारी श्री. संजय चहांदे जे तेव्हा मुख्यमंत्री सचिवालयाचे सचिव होते, त्यांची फ़ार मदत झाली.


पुढे डॉ. बाबासाहेबांचे हे पत्र वाचताना लक्षात आले की, बाबासाहेबांनी शाहुमहाराजांची जन्मतारिख २६ जुन नोंदवली आहे. डॉ. बाबासाहेब लिहिताना फार काटेकोर असत. महाराजांचे अधिक्रुत चरित्रकार लठ्ठे, कीर,जाधव,पवार आदी सर्वांनी नोंदवलेली २६ जुलै ही जन्मतारिख चक्क चुकली होती. एकटे डॉ. बाबासाहेब तेव्हढे बरोबर होते, हे संशोधनातुन सिद्ध झाले. माझे मित्र श्री. खान्डेकर यांनी त्यासाठी अपार परिश्रम घेतले. आम्ही त्यांचा त्यासाठी कोल्हापुरात भव्य सत्कार केला होता. माझ्याच हस्ते हा कार्यक्रम पार पडला होता.

पुन्हा शासनदरबारी हेलपाटे मारुन आम्ही जी. आर. बदलुन घेतला व शाहुराजांची जयंती २६ जुनला करु लागलो.

या सर्व कामात कोल्हापुरचे श्री. बाबुराव धारवाडे यांचा उल्लेख केला पाहीजे.तसेच आमचे मित्र भिकशेट पाटील, डॉ.  रमेश जाधव, डॉ. जयसिंगराव पवार, खराडे, डॉ. कणबरकर यांचा व सध्याचे श्री. शाहुमहराज यांचाही ऋणनिर्देश केला पाहिजे

Friday, June 17, 2011

फुले साहित्य गाळल्याचा हेत्वारोप आणि वास्तव!


"महात्मा फुले समग्र वाद्मय" या ग्रंथाच्या चौथ्या आव्रुत्तीमद्धे संपादक डा. य.दि. फडके व मांडणीकार प्रा. हरी नरके यांनी सामाजिक द्रुष्ट्या क्रंतिकारी असलेला महत्वाचा मजकुर वगळल्याचा आरोप नागपुरचे श्री. प्रकाश बनसोड यांनी केला आहे. सदर आरोप निराधार असून तो द्वेषापोटी केलेला आहे.
प्रा. फडके यांचे निधन झालेले असल्याने व सदर हेत्वारोपाचा रोख माझ्यावर असल्याने त्याबाबतची सत्यस्थिती वाचकांपुढे मांडली पाहिजे. सध्याच्या काळात अर्धशिक्षित, अर्धवट आणि आर्थिक द्रुष्ट्या नाडलेल्या लोकांना हाताशी धरून चळवळीतील अभ्यासकांना बदनाम करण्याच्या मोहिमा चालवल्या जात आहेत. या बदनामीच्या मोहिमेचे केंद्र पुण्यातुन चालवले जाते. यासाठी सर्वप्रथम श्री. प्रकाश बनसोड यांनी ४० पानी पुस्तिका प्रकाशित केली. त्यानंतर ७०,००० रु. खर्च करुन २०० पानी पुस्तक प्रकाशित केले. अशाच प्रकारचे तिसरे पुस्तक मुंढव्याच्या एका संपादकानेही लिहून प्रसिद्ध केले. या तिन्हींचा आर्थिक स्त्रोत एकच आहे. या तिन्हींमद्धे केलेले सर्व आरोप अर्धसत्य आणि विपर्यस्त आहेत. आकसापोटी सतत खोटे आरोप करीत रहाणे हे त्यांच्या कार्यप्रणालीचे ठळक वैशिष्ट्य आहे. आजवर अनेक वर्तमान पत्रांतुन खुलासे करून सत्य मांडले तरीही त्याकडे दुर्लक्ष करुन निर्ढावलेपणाने पुन्हा-पुन्हा तेच तेच आरोप केले जातात.
श्री बनसोड यांनी २० वर्षांपुर्वी प्रकाशित झालेल्या पुस्तकातुन मी महत्वाचा मजकुर गाळला असा आरोप आता केला आहे. यामागचे राजकारण लक्षात घेतले पाहिजे. महात्मा फुने समग्र वाद्मयाच्या ४थ्या आव्रुत्तीमधुन डा. वि.रा. घोले व डा. यशवंत फुले यांचे लेख गाळल्याचा बनसोड यांचा आरोप आहे. याचा अर्थ हे लेख तिस-या आव्रुत्तीपर्यंत होते आणि चवथ्या आव्रुत्तीत ते नरके/फडकेंनी गाळले असे बनसोड म्हणत आहेत. प्रत्यक्षात बनसोड व त्यांचे गुरु एन.जी. कांबळे (जे स्वत:च्या नावापुढे आय.पी.एस. असे लावुन आपण इंडियन पोलिस सेर्व्हिसमद्धे होतो असा भास निर्माण करतात, पण ते कधीही पोलिस सेवेत नव्हते.) या दोघांची संशोधन विषयातील समज शाळकरी असून त्यांचे या बाबतचे प्राथमिक द्न्यानही हास्यास्पद आहे. त्यांनी हा गंभीर हेत्वारोप करण्यापुर्वी समग्र वाड्मयाच्या पहिल्या तीन आव्रुत्त्या पाहिलेल्याही नाहीत, याला काय म्हणावे? समग्र वाड्मयाची पहिली आव्रुत्ती डा. धनंजय कीर व डा. स.गं. मालशे यांनी संपादित करून १९६९ साली साहित्य संस्क्रुती मंडळातर्फे प्रकाशित केली. पुढे दुसरी आव्रुत्ती १९८० साली तर तिसरी आव्रुत्ती १९८८ साली प्रकाशित झाली.
१९९०-९१ मद्धे फुले-आंबेडकर शताब्दिनिमित्त डा. य. दि. फडके संपादित चवथी आव्रुत्ती प्रकाशित झाली. जो मजकुर पहिल्या तीन आव्रुत्त्यांमद्धे नव्हताच तो नरके/फडके यांनी चवथ्या आव्रुत्तीत गाळल्याचा जावईशोध कांबळे/बनसोड यांनी लावला आहे. या घोर अद्न्यानाला (कि सामाजिक निर्ढावलेपणाला?) काय म्हणावे?
अर्थात कांबळे/बनसोडांचा नरकेद्वेष एवढा टोकाचा आहे कि आता पहिल्या आव्रुत्तीतुनच नरकेंनी मजकुर गाळला असे म्हणायलाही हे इसम कमी करणार नाहीत. या निमित्ताने वाचकांच्या माहितीसाठी सांगायचे म्हणजे १९६९ साली मी यत्ता पहिलीत होतो...तेंव्हा हे पुस्तक प्रसिद्ध झालेले आहे. डा. फडके यांनी आयुष्यभर फुले-आंबेडकरांच्या साहित्य संशोधनाला वाहुन घेतले होते. ते जन्माने ब्राह्मण होते म्हणुन त्यांनी मजकुर गाळला असे सुचवणा-या या महाभागांनी हे पुस्तक वाचण्याचे सोडा पहाण्याचेही कष्ट घेतलेले नाहीत, हे संतापजनक नाही काय? केवळ जन्माच्या आधारे जे कांबळे/बनसोड फुले-आंबेडकरवादी असल्याचा दावा करतात त्यांनी किमान पहिल्या ३ आव्रुत्त्या पहायचे तरी कष्ट घ्यायला हवे होते. अडानीपणाचा आणि अहंकाराचा हा कळस चळवळीला कोठे घेवुन जाणार आहे? दु:खाची गोष्ट म्हणजे गेले वर्षभर हे प्रायोजित आरोप केले जात आहेत आणि ते धादांत खोटे आहेत याची खात्री असुनही तमाम फुले-आंबेडकरवादी अभ्यासकांनी मौनाचा कट केलेला आहे. चळवळीतील अनेक संपादक बनसोडांचे खोटे लेख छापत आहेत.
ज्या ग्रंथाचा मी कधीही संपादक नव्हतो त्यातील मजकुर मी गाळला असा आरोप करणे भंपकपणाचे नाही काय? तो आरोप ठळकपणे छापणे आणि तो वाचणे ही चळवळीतील संपादक आणि वाचकांची कोनत्या दर्जाची संवेदनशीलता आहे? चळवळीत आयुष्यभर काम केलेल्या माणसांना कोणीही भुरटे उठतात आणि त्यांच्यावर हेत्वारोप करुन त्यांची बदनामी करत सुटतात यावरुन चळ्वळीच्या विवेकबुद्धीबद्दल तटस्थ माणसाने काय मत बनवावे?
"महात्मा फुले समग्र वाड्मय" या शिर्षकाचा अर्थही ज्यांना कळत नाही असेच महाभाग या पुस्तकात डा. घोले व डा. यशवंत यांचे लेखन का नाही असे विचारु शकतात. फुले-आंबेडकर साहित्यावर समर्पितपणे गेली ३० वर्षे काम केल्यानंतर जर असे खोटारडे आणि निराधार हेत्वारोपच वाट्याला येणार असतील तर नवीन पिढीने यातुन काय संदेश घ्यावा? कोणताही अभ्यास न करता केवळ जन्माच्या अपघातालाच कर्तुत्व मानुन कोणीही लुंगासुंगा आयुष्य वाहुन घेणा-या अभ्यासकाला आरोपीच्या पिंज-यात उभा करुन झोडनार असेल व बाकी सर्व गंम्मत पहात बसणार असतील तर या देशातील संशोधनाला काय भवितव्य राहील?

Thursday, June 16, 2011

हुतात्म्यांची पुजा: एक सत्यशोधन

Thursday, June 9, 2011

छ्त्रपती शिवाजीराजे,जेम्स लेन आणि भांडारकर


(श्री.संग्राम भोसले यांच्या फ़ेसबुकवरून साभार)



छ्त्रपती शिवाजीराजे,जेम्स लेन आणि भांडारकर

गेली ७-८ वर्षे आपल्याकडे छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या जेम्स लेन या विक्रुत माणसाने केलेल्या बदनामीची चर्चा होत आहे.लेनचा निषेध करावा तेव्हढा थोडाच आहे. २५वर्षांपुर्वी लेन भांडारकर संस्थेत ८ दिवस राहीला होता, यावरुन या बदनामीच्या मागे भांडारकर संस्था आहे असा आरोप केला जातो, त्यात कितपत तथ्य आहे?
१.भांडारकर संस्थेत प्रामुख्याने धर्मशात्रविषयक संशोधन चालते, शिवरायांचा काळ हा संस्थेचा अभ्यासविषय नाही.लेन हा ईतिहासकार नाही. त्याचे सदर पुस्तक धर्मशात्रीय शाखेतील आहे.शिवरायांच्या राज्यनिर्मितीला धर्माचा कसा उपयोग झाला यावर त्याने लिहिले आहे. त्याने केलेल्या बदनामीच्या चुकीबद्दल त्याला कठोर शिक्षा मिळायलाच हवी.
२.मात्र साप साप म्हणून भुइच धोपटण्याचे जे काम चालू आहे, त्यामागचे राजकारणही समजून घेतले पाहीजे. एक खोटी गोष्ट १०० वेळा रेटून सांगितली की ती लोकांना ती खरी वाटू लागते या गोबेल्स नितिचा अचुक वापर करुन या प्रकरणाची मांडणी करण्यात आली आहे. शिवराय हे लोकांच्या श्रधेचा विषय आहेत, हे हेरुन हा सापळा रचण्यात आला आहे.
३.भांडारकर संस्थेचा या बदनामी प्रकरणाशी काडीमात्रच संबंध आहे. कारण लेन गेली २५ वर्षे महाराष्ट्रात येतोजातो, परन्तु तो २५ वर्षापुर्वी भांडारकर अतिथी ग्रुहात राहीला होता .एव्हढाच तो काडीमात्र संबंध होय.त्याला ही माहिती कोणी दिली ते शोधता आलेले नाही.त्याने ज्या १५ जणांचे आभारात उल्लेख केले त्यातील १४ जण ब्राह्मण आहेत असे सांगून, तेच या बदनामीमागे आहेत असा जोर्दार प्रचार केला गेला.खरेतर यातील अनेकजण ब्राह्मण नाहीत.डा. राजेन्द्र होरा हे जैन होते.दिलिप चित्रे सीकेपी, तर कोसंबी. वागळे. भंडारे.चंदावरकर आदि सारस्वत. यातील ६ जण वारलेले आहेत. यातील ब्राह्मणांपैकी अ.रा.कुलकर्णी, जयंत लेले, मीना चंदावरकर,{मीनाताईंचा आंतरजातीय विवाह आहे} बहुलकर अश्या अनेकांनी कायम बहुजनांच्या बाजुने उभे राहात सनातनी व्रुतीला विरोध केलेला आहे. त्यांना शत्रुच्या गोटात ढकलणे अन्यायकारक आहे,बहुजन चळवळीची रसद तोडणारे आहे.अश्याने पुढे कोणीही बहुजनांच्या बाजुने उभेच राहणार नाहीत.
४.वर्णवर्चस्ववादी व्रुतीला विरोध केलाच पाहीजे. जे विषमतेचे समर्थक आहेत ,लोकशाहीविरोधी असुन ब्राह्मणवादाचे पुरस्कर्ते आहेत, त्यांना आमचा विरोधच आहे,राहिल.ही एक व्रुती आहे, ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर या सर्वांमध्ये ती असु शकते असे डा. बाबासाहेब आंबेडकरांचे मत होते.
५.आरोप करणे आणि गुन्हा सिद्ध होणे यात फ़रक असतो, हेच ज्या मंडळींना समजत नाही, किंवा समजुनच घ्यायचे नाही,ते वारंवार भांडारकर संस्थेवर आरोप करीत आहेत. तो सिद्ध करण्याचे कष्ट त्यांना नको आहेत, की तो सिदधच होवु शकत नाही याची खात्री आहे ?लेनवर हायकोर्टात आणि सुप्रिम कोर्टात खटला चालु होता तेव्हा या संघटनांनी त्यात भाग घेतला नाही,की कोणतेही पुरावे दिले नाहीत, हे फ़ार अर्थपुर्ण आहे.
६.या संघटनेचे एक नेते आपले पुस्तक जेम्स लेनला अर्पण करतात.
७.ते ब्लेकमेलिंग, हुजरेगिरी, चमचेगिरी हिच खरी चळवळ होय असे दुसर्या पुस्तकात लिहितात, हे सारे गंभीर आहे.
८. आतातायीपणा, कार्यकर्त्याला वेठबिगार समजणे,संशोधकांना आपले स्पर्धक बनतील या भितीने शत्रुचे हस्तक ठरविणे,हिटलरचा आदर्श माणुन चळवळ चालविणे यासार्यांमुळे लोक दूर जात आहेत.अतिरेक वाढत आहे.त्यातुन आलेले नैराश्य लपविण्यासाठी अधिकाधिक एकांगी लेखण, प्रचार चालु आहे.विवेकी लोक दोन हात दुर गेले आहेत. विनाशकले विपरीत बुध्धी......