Saturday, May 14, 2011

संभाजी ब्रिगेड व हरि नरके: प्रा. श्रावण देवरे



संभाजी ब्रिगेड,दादू कोंडदेव व हरि नरके
बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतरानंतर सांस्कृतिक क्षितिजावर बरीच वर्षे शांतता होती. 1988 नंतर फुले बदनामी प्रकरणापासून ब्राह्मणी- अब्राह्मणी छावणीमध्ये पुन्हा सांस्कृतिक युद्धाला तोंड फुटले. त्यानंतर रिडल्स, जेम्स लेन, भांडारकर व आता दादू कोंडदेव अशा चकमकी वारंवार झडायला लागल्या आहेत. जातीअंताचा लढा जसजसा तीव्र होत जाईल तसतशी या सांस्कृतिक लढ्याची गती व तीव्रता वाढत जाणार आहे. या लढ्यात अनेकांच्या कसोट्या लागणार आहेत.पुण्यात दादू कोंडदेव (दादूजी, कृष्णाजी हा `जी' कशासाठी?) पुतळा रातोरात काढून फेकल्यानंतर वादळ उठणे स्वाभाविक होते. दादू कोंडदेव पुतळा प्रकरणात प्रथमच राजकीय पक्ष उघडपणे आकमक झालेले आपण पाहतो आहोत. हे प्रकरण सत्ताधारी जातीशी सरळ जात-संबंधात येत असल्याने सत्तेचा वापर-गैरवापर होणेही स्वाभाविक होते. दोन्ही छावणीतील राजकारणी, अभ्यासक व विचारवंतांशी आपापली शस्त्रे (लेखण्या वगैरे) पाजळली आहेत. जातीव्यवस्था अंताचा लढा हा असा मुख्यत लोकशाही मार्गाने व अंशत ठोकशाही मार्गाने पुढे जात राहणार आहे.साप्ताहिक लोकप्रभाने या विषयावर दोन्ही बाजूने चर्चा सुरू केली व जनप्रबोधनात आघाडी मारली. याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजे. या सर्व लेखात प्रा. हरी नरके यांचा लेख जितका वैचारिक तेव्हढाच परखडही आहे. स्वपक्षातल्या सदस्यांशी मतभेद असले तर ते फारसे गंभीर नसतात. कारण हे मतभेद गाभ्यातील भूमिका कायम ठेवून पक्षविभाजनापर्यंतही जाऊ शकतात. या मतभेदाच्या परिणामी डाव्या व दलित संघटनांचे अनेक तुकडे झालेत तरीपण त्यांच्या गाभ्यातील इझमवर त्याचा काही परिणाम झालेला नाही. परंतु आपल्या पक्षातील सभासद जर शत्रूपक्षातील सदस्यांशी अगदी जवळून नाते-संबंधात, मित्र-संबंधात अथवा हित-संबंधात आला तर मात्र गाभ्यालाच तडा गेल्याची तक्रार होऊ शकते. अशी तक्रार आता हरी नरकेंबाबत व्हायला लागली आहे. याबाबतीत चर्चा काळजीपूर्वक करणे आवश्यक असते. हरी नरके यांनी फुले-आंबेडकरी चळवळीसाठी जे कष्ट घेतलेले आहेत, ते पाहता त्यांच्यावर मुळ फुले-समन्वयाचा काळ अवतरला नसल्याने त्यांचे उदाहरण येथे देता येत नाही. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उदाहरण अवश्य देता येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर ज्या काँग्रेसला शत्रू मानले, त्या काँग्रेसच्या मंत्रीमंडळात त्यांना सामील व्हावे लागले. परंतु त्याचवेळी ते आपल्या अनुयायांना इशारा देतात की, मी आपल्या सामाजिक भुमिकेबाबत खंबीर असल्याने माझ्यात काही एक परिवर्तन होणार नाही. परंतु तुम्ही काँग्रेसच्या या पाण्यात मातीच्या ढेकळासारखे विरघळून जाल.' थोड्याच दिवसांत काँग्रेसच्या मंत्रीपदाला लाथ मारून बाबासाहेबांनी आपला खंबीरपणा व समाजापती आपली निष्ठा सिद्धही केली.हरी नरके व डॉ. साळुंखे यांना ब्राह्मणी छावणीच्या भांडारकर संशोधन संस्थेने संशोधक म्हणून संचालक पदावर घेतले असल्याचे कळाले. याबाबत हरी नरकेंवर बरीच टीका झाल्याचेही कळाले. सोलापूरच्या सत्यशोधक गोलमेज परिषदेत आम्ही जाहीर भाषणातच नरपेंच्या पाठीशी उभे रहात सांगितले की, `नरके कोणत्या संस्थेत वा स्टेजवर जातात हे महत्त्वाचे नसून ते तेथे कोणती भूमिका घेऊन काम करतात हे महत्त्वाचे आहे.'ते भांडारकर संस्थेत गेल्यावर त्यांचा पहिलाच संशोधनपर (?) लेखक म्हणून लोकप्रभाचा दादू कोंडदेववरचा लेख वाचावयासा मिळाला. आता या लेखाचा आधार घेऊन त्यांना काही लेख शत्रूला फितूर झाल्याचा आरोप करीत पिंजऱयात उभे करीत आहेत. शत्रूपक्षांच्या विभाजन रेषेच्या एका बाजूने उभे राहून लढणे तसे सोपे असते. परंतु ही विभाजन रेषा नेहमीच सरळ असेल असे नाही.  कारण या विभाजन रेषेच्या एका बाजूने लढताना आपल्या छावणीच्या प्रस्थापित सिद्धांतांचा आधार घेऊन लढले तरी क्रांतीकारक म्हणून मान्यता मिळते. जुनीच शस्त्रे थोडीशी परजली तरी लढण्याचा आनंद मिळतो. काही महाभाग तर परजण्याचाही त्रास घेत नाहीत. परंतु शत्रूपक्षाच्या समन्वयात आल्यावर मात्र काही प्रस्थापित समज-गैरसमज लक्षात येतात. शत्रू पक्षाशी समन्वय म्हणजे शरण जाणे, अथवा गद्दारी करणे नव्हे. समन्वयांतर्गतही संघर्ष सुरूच असतो. परंतु अशा संघर्षात कमजोर छावणीचा पराभव निश्चित असतो. हरी नरकेंना आपल्या तात्त्चि निष्ठेचा हिरा `न भंगण्याची' खात्री असेल तर त्यांनी भांडारकरी ब्रह्मकोंदणात जरूर बसावे. हरी नरके यांना भांडारकर संशोधन पेंद्रात गेल्यावर तेथील बहुलकर वगैरे मंडळी फारच पुरोगामी अथवा निर्दोष वाटली असतील तर त्यात त्यांचा फारसा दोष नाही. त्यासाठी त्यांनी लेखणीही झिजवली. याबाबत एवढेच म्हटले पाहिजे की, बहुलकर जर खरोखर पुरोगामी वगैरे असतील तर त्यांच्यासाठी लेखणी झिजवण्याची जबाबदारी डॉ.आ.ह. साळुंखे यांची आहे, नरकेंची नव्हे. भांडारकर संस्थेशी लढाईचा संबंध जेवढा साळुंखेचा येतो तेव्हढा नरकेंचा येत नाही.लेखाच्या सुरूवातीसच त्यांनी दादू कोंडदेव प्रकरणी पुणे विभागले गेल्याचे सांगितले व हा सामाजिक कलह असल्याचे म्हटले आहे. केवळ पुणेच का, संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशच ब्राह्मणी-अब्राह्मणी छावणीत विभागला पाहिजे. ब्राह्मणी-अब्राह्मणी छावणीची लढाई अशा वैचारिक विभागणीवरच तर चालू आहे. याच पहिल्या पॅरिग्राफमध्ये हरी नरके यांनी संभाजी ब्रिगेडवर दहशतवादाचा आरोप केलेला आहे. संभाजी ब्रिगेड हिच्या नावातच दहशतार्थी शब्द सामावलेला आहे. परंतु ही दहशत शत्रूपक्षाला वाटली पाहिजे, स्वपक्षातील कार्यकर्त्यांना नव्हे. मी संभाजी ब्रिगेडच्या विरोधात व एकूणच मराठा सेवा संघाच्या `मराठा आरक्षणवादी' भूमिकेच्या विरोधात तर राज्यभर परिषदा घेतल्या व पुस्तकही लिहिले. हे पुस्तक सुगावा प्रकाशनने पुण्यातच छापले. परंतु मला दहशतीचा फोन न येता पुस्तकावर सविस्तर चर्चा करणारे फोन या संघटनेकडून आले. सातारा जिह्यातील एक ओबीसी प्राध्यापक वगळता आणखी कोणावर दहशतीचा वापर ब्रिगेडने केला असल्याचे मला तरी माहिती नाही. परंतु हरी नरकेंना अशा धमक्यांचे फोन येत किंबहुना ती त्यांची जबाबदारीच आहे. ज्या दिवशी संभाजी ब्रिगेड स्वतच्याच छावणीवर दहशतीचा वापर करेल, त्या दिवसापासूनच तिच्या संपण्याची प्रक्रियाही सुरू होईल. तिचे बाब फुले-शाहू-आंबेडकरवादी म्हणविणाऱया साप्ताहिक-दैनिकांची! पुण्यातले एक आंबेडकरवादी म्हणविणारे दैनिक आपल्याच छावणीच्या कार्यकर्त्यांवर अत्यंत कमरेखालची भाषा वापरत टीका करते, असे पुण्यातल्याच काही कार्यकर्त्यांनी मला सांगितले. कमरेखालच्या शिव्या वापरून चळवळ चालविण्याइतके वाईट दिवस अजून तरी आंबेडकरी चळवळीला आलेले नाहीत. बाबासाहेबांनी दिलेली वैचारिक शस्त्रे अजूनही इतकी प्रभावी आहेत की, शत्रूंशी लढण्यासाठी शिव्यांचे शस्त्र उचलण्याची गरजच नाही आणि तरीही ज्यांना आंबेडकरी वैचारिक शस्त्रे निकामी झालेली वाटत असतील, त्यांनी आपल्या आंबेडकरी बुद्धीचा वापर करून नवी वैचारिक हत्यारे शोधून काढावीत. कमरेखालच्या गोष्टी करण्यासाठी डोके वापरावे लागत नाही. कमरे वरच्या गोष्टी (हृदय, मन, मेंदू) वापरण्यासाठी डोके लागते. डोक्याचा वापर माणूस करायला लागला म्हणूनच त्याला माणूसपण प्राप्त झाले. ज्या दिवशी एखादा माणूस वा माणसांचा गट डोके वापरणे बंद करेल, त्यादिवशी ते माणसातून म्हणजे चळवळीतून बाद होतील. ज्यांना आपल्या छावणीतील आपली माणसं ओळखता येत नाहीत, त्यांचा पराभव त्यांनी स्वतच ठरवून टाकलेला असतो. हरी नरके यांनी या लेखात दादू कोंडदेव प्रकरणात मराठा जातीय वळण लागल्याचे म्हटले आहे, तेही चुकीचेच आहे. फुले बदनामीप्रकरणी हरी नरके यांनी पोटतिडकीने पुस्तक लिहिणे व रिडल्स व आंबेडकर बदनामी करणाऱया शौरी प्रकरणी आंबेडकरी जनतेने मोर्चे काढणे जेवढे स्वाभाविक आहे. तेव्हढेच स्वाभाविक शिव-जिजाऊ बदनामी प्रकरणी मराठा सेवा संघाने व संभाजी ब्रिगेडने आक्रमक होणे आहे. हरी नरके तक्रार करतात की, दादू कोंडदेव प्रकरणी स्थापन झालेल्या संशोधकांच्या समितीत फक्त मराठा व ब्राह्मणच होते. त्यांची ही तकार रास्त असली तरी मराठा सेवा संघ व त्यांची संभाजी ब्रिगेड हे काही जातीअंतवादी नाहीत. ते जात्योन्नतीवादी असल्याने ते स्वत ओबीसी, आदिवासी व भटक्या जातीजमातीतून संशोधक प्रतिनिधी घेणार नाहीत. नरकेंनी दादू कोंडदेवांचा पुतळा रातोरात काढला गेला त्यावर आक्षेप घेतला असून चर्चा करून हा निर्णय घेता आला असता, असेही सुचविले आहे. पुतळा रात्रीच का काढावा लागला कारण ही कृती ज्यांच्याविरोधात करावयाची होती तो मनुवादी वर्ग सतत जागृत व सतर्प आहे. त्यामुळे तो  दिवसा काढणे अशक्यच आहे. तसे केले असते तर मनुवाद्यांनी पुतळा काढण्याआधीच दंगल घडवून आणली असती. कारण दंगली घडवून आणण्यात मनुवादी वर्ग माहीर आहे.  दादूंचा पुतळा दिवसा का बसविण्यात आला, कारण समस्त बहुजन सामाजिक-वैचारिकदृष्ट्या झोपलेला आहे. तो जागृत असता तर मनुवाद्यांची दिवसा-ढवळ्या पुतळा बसविण्याची हिंमत झाली असती काय?     मनसेच्या राज ठाकरेंनेही प्रश्न विचारला आहे की, `इतिहासाच्या पानावर काय लिहिले पाहिजे हे पुण्याच्या नगरसेवकांनी ठरवायचे का?' या प्रकरणातील  राजकीय हस्तक्षेप अपरिहार्य आहे. इतिहासाची पाने  बुद्धिजीवीवर्गच लिहित असतो. त्याची अंमलबजावणी मात्र राजकीय सत्ताधाऱयांनाच करावी लागते. दादृ शिवराय व जिजाऊ यांच्या संबंधांबाबत बदनामीच्या इतिहासाची पाने लिहिणारी मंडळी बुद्धिजीवीच होती. मात्र ती दादू कोंडदेवांसाठी बुद्धी पणाला लावणारी होती.  या पानांचा आधार घेऊन दादूंचा पुतळा जिजाऊंच्या शेजारी उभे करण्याचे काम पुणे महानगरपालिकेतील तत्कालीन सत्ताधाऱयांनांच करावे लागले. त्याचप्रमाणे आता हा भांडारकरी इतिहास खोटा ठरविणाऱया इतिहासाची पाने सत्यशोधक बुद्धिजीवींनी लिहिली व त्याचा आधार घेऊन आजच्या मनपातील सत्ताधाऱयांनीच दादूंचा पुतळा काढून टाकला. हे सर्व जे घडले आहे ते सामाजिक लोकशाही मार्गानेच घडते आहे. त्यासाठी राजकीय विरोधकांनी तोडफोड केली तर ते चूकच.ब्राह्मणी छावणीशी मैत्री करण्याची किंमत किती मोजावी याचे भान नरकेंना असायला हवे. ते त्यांना नाही हेच या लेखावरून स्पष्ट होते. भांडारकर संशोधन पेंद्रातील भटांचा गुन्हा केवळ शिव-जिजाऊ बदनामी वा दादू कोंडदेव प्रकरणापूरता मर्यादित नाही, हे आधी नरकेंनी लक्षात घ्यावे. त्यामुळे त्यांची वकीली व बचाव करण्यासाठी कोणी कितीही लेखणी झिजवली तरी ती मान्य होण्यासारखी नाही.  भांडारकरातील भटांना व एकूणच देशातील सर्व ब्राह्मणांना स्वतचा बचाव करण्यासाठी जर प्रायश्चित घ्यायचे असेल तर एकच मार्ग शिल्लक आहे. देशातील सर्व सत्तास्थाने, साधने, संस्था या सर्वांचे लोकशाहीकरण जात्यातीत करणे हाच एकमेव मार्ग आहे. केवळ एखाद्या भांडारकरमध्ये नरके-साळुंखेंची भरती केल्याने व त्यांचा वापर केल्याने ब्राह्मणांचा प्रश्न सुटणार नाही. जातीअंतानेच ब्राह्मणांचाही प्रश्न सुटणार आहे. सत्ता, साधने व संस्थांचे लोकशाहीकरण म्हणजे त्यात जास्तीत जास्त जातींचे प्रतिनिधी असणे. परंतु हे प्रतिनिधी केवळ उचलेगिरींतून (को-ऑप) आलेले नसावेत. असे प्रतिनिधी कितीही हुशार असले तरी ते काँग्रेस-राष्ट्रवादीमधल्या `हरिजनांइतकेच' विश्वासार्ह असतात.कम्युनिस्ट चळवळीच्या राजकीय प्रभावातून सुखदेव थोरात, मुणगेकर व रेणके आदी दलित तज्ञ व विचारवंत  देशाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील सर्वोच्च पदावर गेले आहेत. दलित ओबीसींची चळवळ अजून एवढी प्रभावी नाही की, ज्याच्यामुळे निर्णायक पदांवर व संस्थांवर त्यांचे प्रतिनिधी जाऊ शकतील. नरकेंची भांडारकरवरील नियुक्ती कोणत्या ओबीसी चळवळीच्या कोणत्या राजकीय शक्तीमुळे झाली आहे? समता परिषदेच्या प्रभावातून झाली असेल. तर मग भांडारकरातील भटांच्या बचावासाठी लेखणी कशासाठी झिजवायची?नरपेंनी `ब्राह्मण व क्षत्रिय युतीचा व त्यात दलित-आदिवासी-ओबीसी भरडला जाण्याचा' रास्त सिद्धांत मांडला आहे. ब्राह्मण हे क्षत्रियांशी दोस्ती करत नाहीत. तर ते जागृत असलेल्या वर्ण-जातीशी दोस्ती करतात. वर्णजाती व्यवस्थेच्या काळात त्यांचा दोस्त क्षत्रिय होता. वर्ग व्यवस्थेच्या काळात त्यांनी भांडवलदार-कारखानदारांशी म्हणजे वैश्यांशी दोस्ती केलेली आहे. राजकीय वर्चस्वापोटी क्षत्रियांशी असलेली दोस्ती कायम आहेच. त्यात दलित-ओबीसी भरडले जातात हे खरेच आहे. परंतु आता हेच ब्राह्मण मायावतीपासून नामदेव ढसाळपर्यंतच्या दलितांशीही दोस्ती करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ब्राह्मण जसे मित्र बदलत आहेत तसे क्षत्रियही मित्र बदलत आहेत. मराठा सेवा संघ व बामसेफ यांची मैत्री याच प्रकारातील होय. परंतु हे सर्व मैत्रीचे प्रकार म्हणजे व्यक्ती-उन्नती व जात्योन्नतीसाठी चाललेले उद्योग आहेत, जातीअंतासाठी नाहीत.नरके-साळुंखेंची भांडारकरी मैत्री चांगल्या हेतूसाठी आहे, असे जरी म्हटले तरी तसे स्पष्ट दिसले पाहिजे.  राजकीय, सरकारी व ब्राह्मणी संस्थांवर घेतलेले बहुजन प्रतिनिधी चळवळ मोठी करण्यासाठी काम करतात की, व्यक्तिगत मोठे होण्यासाठी चळवळीला मारण्याचे काम करतात. असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. राजकारणात मोठे झालेल्या दलित व ओबीसी- भटक्यांच्या नेत्यांनी हे सिद्ध केलेलेच आहे. आता वैचारिक व संशोधनाच्या क्षेत्रातील मोठे झालेल्या लोकांनी चळवळीचे काय करायचे ठरविले आहे? भांडारकरसारख्या संस्थांचा उपयोग फुले-आंबेडकरी चळवळीच्या मुलभूत संशोधनासाठी कसा होईल, त्याला भांडारकरच्या माध्यमातून जगभर मान्यता कशी मिळेल, तेथून सरस्वतीचा पुतळा हटविता आला नाही, तरी क्रांतीज्योती  सावित्रीमाई फुले यांचाही पुतळा कसा बसविता येईल, फुले-आंबेडकरी विचारांची बहुसंख्य पुस्तके तेथे कशी ठेवता येतील व बहुजनातून नवे संशोधक निर्माण करण्यासाठी त्यांना भांडारकरी प्रोत्साहन कसे मिळवून देता येईल, अशा काही मोजक्या गोष्टी जरी करता आल्यात तरी खूप मोठे काम साळुंखे-नरकेंनी केले असे म्हटले जाईल. कमिशनच्या सल्लागारपदावरही त्यांनी बरेच समाधानकारक काम केलेले आहे. देशाच्या इतिहासात नरके हे पहिले ओबीसी विचारवंत आहेत की जे सर्वोच्च आर्थिक सत्ता असलेल्या प्लॅनिंग कमिशनचे सल्लागार झालेत. ओबीसी चळवळीसाठी ही गर्वाची बाब आहे.  फुले व आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे कामही त्यांनी चोखपणे चालविले आहे. मध्यंतरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे खंड प्रकाशनाचे काम बरेच वर्षे बंद पडले होते. नरकेंच्या प्रयत्नांनी ते पुन्हा सुरू झाले ही आनंदाची बाब आहे. त्यात काही चूका होतही असतील, परंतु त्या दुरूस्त करता येऊ शकतात. प्रस्थापित शासनाच्या सर्व अडचणींवर मात करून त्यांना हे काम करावे लागते, हे आपण सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. भांडारकरमध्येही ते असेच काम करतील अशी अपेक्षा करूया!महाराष्ट्रभर नरकेंचा फॅन असलेला मोठा वर्ग आहे. यात सर्व जाती-धर्माचे, सर्व थराचे लोक आहेत. लोकप्रभामधील नरकेंच्या या लेखाने अनेक कार्यकर्ते, मित्र व हितचिंतक चकीत व दुःखी झाले आहेत. मला व्यक्तिश असे वाटते की, त्यांची लिखित भुमिका काहीही असली तरी त्यांची प्रत्यक्ष कृतीशिल भूमिका काय असेल याकडे लक्ष दिले पाहिजे. ते भांडारकर संस्थेत काही बदल करून चळवळीला मोठे करतात की, स्वतला मोठे करण्यासाठी (आणखीन वरच्या पदाच्या शिड्या चढण्यासाठी) भांडारकरचा उपयोग करतात, ते येता काळ सांगेल. अर्थात त्यांनी मोठे व्हावेच, परंतु आपण फुले-आंबेडकरी चळवळीमुळे मोठा होतो आहे, भांडारकरी भटांमुळे नाही, याचे भान त्यांनी कायम ठेवले पाहिजे.
प्रा. श्रावण देवरे
महासचिवओबीसी सेवा संघ
9422788546

No comments:

Post a Comment