Sunday, February 6, 2011

दादोजी कोंडदेव आणि ब्रिगेडचे राजकारण


दादोजी कोंडदेव आणि ब्रिगेडचे राजकारण
-
प्रा. हरी नरके

या देशात ब्राह्मण आणि क्षत्रिय या दोघा उच्चवर्णीयांनी धर्मसत्ता, ज्ञानसत्ता, राजसत्ता, अर्थसत्ता आणि सांस्कृतिक सत्ता यांच्यावरील वर्चस्वासाठी आपसात अनेक लढाया केलेल्या आहेत. शेकडो वर्ष त्यांनी मुत्सद्दीपणे तह किंवा युती करून दलित, आदिवासी, भटके -विमुक्त, इतर मागासवर्गीय आणि स्त्रिया यांना गुलामीत ठेवले आहे. या दोघांच्या युतीत कायम बळी गेला तो दलित-ओबीसींचा!
पुण्यात सध्या सामाजिक कलहाचा राजकीय फड रंगात आलेला आहे. हवेत गारठा असला तरी सामाजिक पर्यावरण मात्र तापलेले आहे. दादोजी कोंडदेव समर्थक आणि विरोधक अशी पुण्याची फाळणी करण्यात आलेली आहे. ह्या प्रश्नावर विवेकी भूमिका घेणारांनाही ब्राह्मणांचे हस्तक ठरवले जात आहे. संभाजी ब्रिगेडच्या प्रत्येक कृतीचे समर्थन केले नाही तर बहुजनविरोधी ठरवले जाण्याच्या दहशतीमुळे पुण्यातील तमाम विचारवंत भेदरलेले आहेत. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड यांच्याविरुद्ध ‘ब्र’ उच्चारणे म्हणजे जगणे असुरक्षित करून घेणे होय. दादोजी कोंडदेव यांचा पुतळा लालमहालातून हटविण्यासाठी ब्रिगेडने ३१ डिसेंबरची अंतिम मुदत दिली होती. पुण्याच्या कारभाऱ्यांनी तत्पूर्वीच २७ डिसेंबरच्या मध्यरात्री २.१५ वाजता दादोजींची लालमहालातून उचलबांगडी केली. दादोजींची हकालपट्टी अटळच होती. लोकशाहीत वर्चस्वाच्या लढाईचा शेवट बहुमताच्या बाजूनेच होणार! या देशात ब्राह्मण आणि क्षत्रिय या दोघा उच्चवर्णीयांनी धर्मसत्ता, ज्ञानसत्ता, राजसत्ता, अर्थसत्ता आणि सांस्कृतिक सत्ता यांच्यावरील वर्चस्वासाठी आपसात अनेक लढाया केलेल्या आहेत. शेकडो वर्ष त्यांनी मुत्सद्दीपणे तह किंवा युती करून दलित, आदिवासी, भटके विमुक्त, इतर मागासवर्गीय आणि स्त्रिया यांना गुलामीत ठेवले आहे. मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर असा छान अभिनय केलेला आहे.
धनुर्विद्येत क्षत्रिय अर्जुनाचा कायम प्रथम क्रमांक राहावा यासाठी ब्राह्मण द्रोणाचार्यानी आदिवासी एकलव्याकडून न दिलेल्या शिक्षणाचे ‘वेतन’ म्हणून त्याचा अंगठा कापून घेतलेला आहे. क्षत्रिय रामाने एका ब्राह्मणाच्या तक्रारीवरून शूद्र शंबूकाची हत्या केलेली आहे. या दोघांच्या युतीत कायम बळी गेला तो दलित-ओबीसींचा! छत्रपती शिवरायांवर हिंदुत्ववादी संघपरिवार, सेना-मनसे यांचे वर्चस्व राहणार की ब्रिगेडचे हा खरा कळीचा प्रश्न आहे. त्यासाठी ही धुळवड चालू आहे.
जेम्स लेनच्या खोडसाळपणानंतर दादोजींचा समूहशिल्पातील पुतळा तेथून काढून टाकण्यासाठी चर्चेतून मार्ग काढणे शक्य झाले असते. संबंधितांना विश्वासात घेऊन शांतपणे हा पुतळा हालविता आला असता. परंतु सामंजस्याने प्रश्न सुटला असता तर जातीय लढाईला सुरवात झाली नसती. त्यावरून वादंग पेटले नसते तर राजकीय श्रेयही मिळाले नसते आणि मतदारांमध्ये प्रक्षोभ निर्माण करून त्यांचे धृवीकरणही घडवता आले नसते. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर साऱ्या भारताचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्याबाबत अमेरिकन लेखक जेम्स लेन याने अत्यंत आक्षेपार्ह आणि निषेधार्ह लेखन केले. जिजाबाईंचे चारित्र्यहनन करणाऱ्या आणि समस्त भारतीयांच्या भावना दुखावणाऱ्या या किळसवाण्या लेखनाचा न्यायालयीन प्रतिवाद करण्याऐवजी या मजकुराची पत्रके छापून ब्रिगेडने गावोगाव वाटली. गावोगाव प्रक्षोभक भाषणे देऊन बदनामीकारक मजकुराची जाहिरात करण्यात आली. अशाप्रकारे जिजाऊ व शिवरायांच्या चारित्र्याचे धिंडवडे लेन, त्याला हा विकृत जोक सांगणारे खबरे आणि ह्या मजकुराला अफाट प्रसिद्धी देणारी ब्रिगेड या तिघानी संयुक्तरीत्या काढले आहेत. हा सामाजिक गुन्हा नाही काय?
इतिहासाचे पुनर्लेखन झालेच पाहिजे. तथापि ते नि:पक्षपाती इतिहासकारांनी पुराव्यांच्या आधारे करावयाचे काम आहे. लोकशाही आणि बहुमताबद्दल आदर असला पाहिजे. मात्र इतिहासातील वादग्रस्त प्रश्न राज्यकर्त्यांनी बहुमताच्या आधारे सोडविण्याऐवजी ते त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांकडे सोपवले पाहिजेत. लोकशाहीला विद्वानांचे वावडे असते काय? दादोजी हे छत्रपतींचे गुरू नव्हते, असा निर्णय ज्या शासकीय समितीने दिला, तिचे स्वरूप यानिमित्ताने समजून घेतले पाहिजे. त्या समितीमध्ये पदसिद्ध अध्यक्ष आणि सचिव यांच्याव्यतिरिक्त जे तेरा सदस्य होते, त्यातील आठ मराठा आणि उर्वरित सर्व ब्राह्मण नेमण्यात आले होते, हा केवळ योगायोग असेल काय? राज्यात इतर जातींमध्ये इतिहासकार नसतील काय? अशा पद्धतीने दोनच जातींचे लोक घेऊन या प्रश्नाला जातीय वळण कोणी दिले? शालेय शिक्षण व क्रीडामंत्री श्री. वसंत पुरके यांच्या अध्यक्षतेखाली इतिहासकारांची ही समिती २ जुलै २००८ रोजी नियुक्त करण्यात आली होती. ज्या संभाजी ब्रिगेडने तक्रार केली होती, त्यांचे पाच प्रमुख पदाधिकारी या समितीवर घेण्यात आले. त्यांचे इतिहासविषयक योगदान महाराष्ट्राला अनभिज्ञ आहे. फिर्यादी ब्रिगेडचे पदाधिकारी बहुसंख्येने समितीत घेतल्यामुळे बहुधा काही तज्ज्ञांनी या समितीच्या कामकाजापासून दूर राहणे पसंत केले. ते सर्वजण नेमके ब्राह्मण होते, हा योगायोग असेल किंवा नसेलही! फिर्यादीच्या हाती न्याय यंत्रणेतील बहुमत देऊन वाद मिटविण्याचा अभिनव मार्ग (ब्रिगेड पॅटर्न) शोधण्यात आला. शासकीय समितीच्या राजमान्यतेची मोहर लावण्यात आलेला हा निर्णय ब्रिगेड तज्ज्ञांचा निर्णय आहे, असा ठपका ठेवायला जागा का करून देण्यात आली? या समितीमध्ये डॉ. राजेंद्र शिंगणे, श्री. जयसिंगराव पवार, डॉ. वसंत मोरे, शिवश्री श्रीमंत कोकाटे, (शासकीय आदेशाप्रमाणे यथामूल), श्री. गंगाधर बनवरे, श्री. चंद्रशेखर शिखरे, श्री. प्रवीण गायकवाड, डॉ. अ. रा. कुलकर्णी, श्री. गजानन मेहेंदळे, प्रा. अनुराधा रानडे, शिवशाहीर विजय देशमुख, श्री. निनाद बेडेकर, डॉ. आ. ह. साळुंखे यांचा समावेश होता. शासनाने समितीचा अहवाल छापून उपलब्ध का करून दिला नाही? शासकीय समितीच्या विश्वासार्हतेला ब्रिगेड पॅटर्नचे वळण देऊन हा प्रश्न सुटला काय? समितीचे अध्यक्ष श्री. पुरके यांना ब्रिगेडने ‘मराठा विश्वभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले. ब्रिगेडचे राज्य आले की पूरकेंनाच मुख्यमंत्री नेमू अशी घोषणा करण्यात आली. तत्पूर्वी हा पुरस्कार शालिनीताई पाटील यांना देण्यात आला होता. समितीच्या नियुक्तीचा आदेश श्री. सतीश जोंधळे या अवरसचिवांच्या सहीने काढण्यात आला असला तरी समिती राज्यपालांनी एका अध्यादेशाने स्थापन केली होती, असा प्रचार ब्रिगेडतर्फे केला जात आहे.
छत्रपती शिवरायांवर हिंदुत्ववादी संघपरिवार, सेना-मनसे यांचे वर्चस्व राहणार की ब्रिगेडचे हा खरा कळीचा प्रश्न आहे. त्यासाठी ही धुळवड चालू आहे.
‘शिवाजी: हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ या लेनच्या वादग्रस्त पुस्तकावर राज्यशासनाने बंदी घातली होती. उच्च न्यायालयाने ती उठवली. सुरुवातीला हा निर्णय बंदीच्या आदेशातील तांत्रीक चुकांमुळे घेण्यात आला. नोटीफिकेशनमध्ये योग्य ते फेरबदल करण्याची संधी सरकारला दुसऱ्यांदा देण्यात आली होती. तिचा फायदा का घेतला गेला नाही? नवीन नोटीफिकेशन काढायला न्यायालयाने मनाई केलेली नव्हती. तांत्रिक मुद्दय़ांवर ही बंदी उठली होती मात्र ती परत घालणे शक्य असूनही घातली गेली नाही. हा खटला चालू असताना ब्रिगेडने खटल्यात पार्टी बनून आपला वकील का दिला नाही? या पाश्र्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात तेव्हा प्रलंबित असलेल्या अपीलात शिवप्रेमी संघटनांनी हस्तक्षेप अर्ज दाखल करणे अपेक्षित होते. पुढे सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठविण्याचा हा निर्णय कायम केला. एखाद्या प्रकाशनावर बंदी घालण्याचा शासन निर्णय हा प्रगल्भ व चिकित्सक असणाऱ्या व्यक्तीसमूहाच्या मतांशी सुसंगत हवा, संकुचित वैचारिक क्षमतेवर आधारित नको, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात म्हटले आहे. ही बंदी उठवण्यातच काही मंडळीना रस होता असे दिसते. प्रकरण मिटवण्याऐवजी चिघळत राहीले तरच मतदारांमध्ये संताप वाढू शकतो आणि मतदारांचे धृवीकरण होऊ शकते.
या प्रकरणाला जातीय रंग देण्यासाठी, ‘‘हे पुस्तक जेम्स लेनने लिहीलेले नसून १४ भांडारकरी भटांनी लिहीलेले आहे.’’ असे ब्रिगेडने घोषित केले. (पहा- दै. मूलनिवासी नायक, पुणे, ११ जानेवारी २०११) ‘‘या चौदा भटांचा पोस्टल अ‍ॅड्रेस शोधून द्या व मोठे बक्षीस मिळवा’’ अशी हेडलाइनच या वृत्तापत्रात देण्यात आलेली आहे. ‘‘हे १४ भट आजही पुण्यात बिनबोभाटपणे हिंडत आहेत. ’’ या १४ भटांना गंभीर स्वरूपाची शिक्षा द्यावी अशी मागणी या दैनिकात वारंवार केली जाते. आणि वाचकांना हल्ल्याची चिथावणी दिली जाते. ( पहा - मूलनिवासी नायक, दि.१ ते ११ जाने. २०११) हे दैनिक ब्रिगेड आणि त्यांची सहकारी बामसेफ यांचे प्रकाशन आहे. या वृत्तपत्रातून जातीय द्वेष पसरवणारा अत्यंत प्रक्षोभक मजकूर सातत्याने प्रकाशित केला जातो. माथी भडकवणाऱ्या अशा प्रचारामुळेच ४ जानेवारी २००४ रोजी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर हिंसक हल्ला करण्यात आला होता. भांडारकरच्या १४ जणांनी गुप्त कट करून ही माहिती लेनला पुरवली ही ब्रिगेडची ‘कॉन्स्पिरसी थिअरी’ ब्रिगेडच्या गोबेल्स तंत्रामुळे आता बहुजन विचारवंत व नेते उचलून धरू लागले आहेत. सत्यशोधक चळवळीचे अभ्यासक डॉ. श्रीराम गुंदेकर यांनी लातूरला १० ऑक्टोबर २०१० रोजी ‘कोंडदेव पुतळा हटाव परिषद’ घेतली होती. सत्यशोधक समाजातर्फे घेण्यात आलेल्या या परिषदेत अनेक मान्यवर प्राचार्य, संपादक, विद्वान यांची भाषणे झाली. परिषदेच्या निमंत्रणपत्रकात म्हटले आहे की, ‘‘कोंडदेव (कुलकर्णी) हा शिवाजीचा आहे. हा विनोद आहे अशी माहिती ब. मो. पुरंदरे आणि त्यांचे वैचारिक वारसदार तसेच पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतील १४ विकृत तथाकथित विद्वांनांनी जेम्स लेनला दिली.’’ ( च्या जागी या पत्रकात छापलेला शब्द जिजाऊंची बदनामी करणारा असल्याने प्रस्तुत लेखकाने वगळून त्याजागी फुल्या मारल्या आहेत.)
जेम्स लेनने आपल्या पुस्तकात असंख्य लोकांचे आभार मानलेले आहेत. त्यात आंतरराष्ट्रीय किर्तीचे विद्वान गुंथर सोन्थायमर, डॉ. एलिनॉर झेलीयट, अ‍ॅन फेल्डहाऊस, अेरिना ग्लुस्कोवा आदिंचाही समावेश आहे. डॉ. झेलीयट यांनी दलित चळवळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यावर केलेले संशोधन जगभर मान्यता पावलेले आहे. सोन्थायमर हे वारकरी चळवळीचे आणि लोकसाहित्याचे अभ्यासक होते. त्यांनी महात्मा फुले यांच्या शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद करण्याच्या कामी पुढाकार घेतला होता. लेनने पंधरा भारतीयांचा आभारात उल्लेख केलेला आहे. १) मिरा कोसंबी २) डॉ. अ. रा. कुलकर्णी ३) डॉ. राजेंद्र होरा ४) नरेंद्र वागळे ५) डॉ. जयंत लेले ६) वा. ल. मंजूळ ७) डॉ. दिलिप पुरुषोत्ताम चित्रे ८) डॉ. श्रीकांत बहुलकर ९) डॉ. सुचेता परांजपे १०) वाय. बी.दामले ११) रेखा दामले १२) भास्कर चंदावरकर १३) मीना चंदावरकर १४) माधव भंडारे १५) अजगर अली इंजिनियर. प्रत्यक्षात यातील अनेकांचा भांडारकर संस्थेशी कधीही संबंध आलेला नाही. यातील डॉ. होरा हे जैन होते. चित्रे हे सीकेपी तर वागळे, भास्कर चंदावरकर व मीरा कोसंबी हे सारस्वत. या चौदातील सहाजणांचा मृत्यू झालेला आहे. (दामले पतीपत्नी, चित्रे, होरा, कुलकर्णी, चंदावरकर) त्यांना आता फासावर कसे द्यायचे? ब्रिगेड मात्र म्हणते, ‘‘हे चौदाजण आजही पुण्यात हिंडत आहेत.’’
यातील अनेकांचे लेखन, संशोधन आणि अन्य योगदान हे बहुजन-दलित चळवळीला उपकारक ठरलेले आहे. जागतिक कीर्तीचे बौद्ध विद्वान धर्मानंद कोसंबी यांची नात आणि डॉ. डी. डी. कोसंबी यांची समाजशास्त्रज्ञ कन्या डॉ. मीरा कोसंबी, संत तुकारामांचे अभंग इंग्रजीत भाषांतरीत करून तुकारामांना वैश्विक स्तरावर प्रथमच घेऊन जाणारे आणि आयुष्यभर प्रागतिक विचारांच्या पुरस्कारार्थ झुंजणारे चित्रे, फुले-शाहू-आंबेडकरवादी राज्यशास्त्रज्ञ डॉ. होरा, थोर सामाजिक इतिहासकार कुलकर्णी, पुरोगामी छावणीचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते जयंत लेले, दया पवारांच्या ‘बलुतं’ वर चित्रपट काढणारे, घाशीराम कोतवालचे संगीतकार चंदावरकर, बहुजनांना इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविता यावे, यासाठी ‘पहिलीपासून इंग्रजी’च्या मोहिमेत हिरीरीने पुढाकार घेणाऱ्या थोर शिक्षणतज्ज्ञ मीना चंदावरकर आदींना लेनचे हस्तक ठरविणे ही कृतघ्नता आहे. सापसाप म्हणून भुई धोपटणे किंवा गैरसोयीच्या जमिनीलाच साप असल्याचे घोषित करून झोडपणे हा अस्मितेच्या राजकारणाचा कळस करणारा ब्रिगेड पॅटर्न आहे.
ब्रिगेडचा ब्राह्मणद्वेष हा केवळ बुरखा असून फुले आंबेडकरी चळवळीवर अवैध कब्जा मिळवण्यासाठीची ती रणनीती आहे.
भांडारकर संस्थेबाबत या मंडळीना इतका तिरस्कार आहे की त्या संस्थेशी ज्यांचा संबंध येतो त्यांना ब्लॅकलिस्ट केले जाते. दोन वर्षांपूर्वी डॉ. आ. ह. साळुंखे व माझी महाराष्ट्र शासनाने ‘शासकीय प्रतिनिधी’ म्हणून भांडारकर संस्थेवर नियुक्ती केली. २४ ऑक्टोबर २०१० रोजी ब्रिगेडने त्यांच्या मेळाव्यात जाहीर ठरावाद्वारे आम्हा दोघांना राजीनामा द्यायला सांगितले. हा ठराव अद्यापपर्यंत आम्हाला पाठविण्यात वा कळविण्यात आलेला नाही. स्वत:च्या वृत्तपत्रातून त्याला भडक प्रसिद्धी देऊन ‘‘राजीनामा का देत नाही?’’ म्हणून धमकावणे मात्र चालू आहे. विचारांची ही नाकेबंदी म्हणजे नवफॅसिझमच आहे.
साक्षेपी इतिहासकार गजानन भास्कर मेहेंदळे यांनी १९९६ साली प्रकाशित केलेल्या ‘श्री राजा शिवछत्रपती’ या शिवचरित्राच्या खंड १, भाग-१, च्या पृष्ठ क्रमांक ६०४ ते ६३८ वर अस्सल दस्तावेजांच्या आधारे दादोजी कोंडदेव यांच्याबद्दल लिहिले आहे. मेहेंदळे यांची तटस्थता आणि संशोधननिष्ठा वादातीत आहे. मेहेंदळे मराठा नसूनही त्यांनी ही चिकित्सक मांडणी केलेली आहे. आजवर दादोजी कोंडदेव हे ब्राह्मणांचे ‘आयडॉल’ नव्हते. पराक्रमी ब्रिगेडने द्वेषाच्या आधारे दादोजींना ब्राह्मणांचा ‘आयकॉन’ बनवण्याचे महत्कार्य केले आहे.
मेहेंदळे, न. र. फाटक, शेजवलकर, पगडी, ग. ह. खरे, य. दि. फडके, बेंद्रे, कमल गोखले आदींनी संभाजी महाराजांबद्दलचे गैरसमज दूर करणारे लेखन केले. त्यांच्याशी मतभेद होऊ शकतात, परंतु त्यांनी हेतूपूर्वक इतिहास बदलला असे म्हणता येत नाही. ब्रिगेडने या साऱ्यांनाच ब्राह्मण म्हणून ‘टार्गेट’ करण्याचा सपाटा लावलेला आहे. मेहेंदळे यांनी शिवचरित्रासाठी केलेला व्यासंग स्तिमित करणारा आहे. त्यांनाही सध्या लेनचे हस्तक ठरवून ‘फासावर लटकवा’ असे ब्रिगेडवाले म्हणत आहेत.
‘६ कलमी शकावली’,‘ ९१ कलमी बखर,’ ‘चिटणीस बखर’ आदींच्या आधारे काही मंडळींनी दादोजींना गुरूस्थानी स्थापित केले. ‘‘मुरार जगदेवाने पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवला होता, त्याठिकाणी दादोजींनी सोन्याचा नांगर फिरवला’’ आदी नोंदींच्या आधारे लालमहालात दादोजी, शिवराय व जिजाऊ यांचे समूहशिल्प २०००च्या आसपास बसवण्यात आले. त्याला कोल्हापूर व सातारा दरबारने तेव्हा उपस्थित राहून आशीर्वादही दिले. आता त्यांची भूमिका बदललेली आहे. त्यावेळी ही राजघराणी राजकीयदृष्टया भाजपा-सेनेबरोबर होती. आता ती विद्यमान सत्ताधाऱ्यांसोबत आहेत, याचा या मतपरिवर्तनाशी अर्थाअर्थी संबंध असेल किंवा नसेलही! हे समूहशिल्प पाहूनच लेनने पुस्तकात बदनामीकारक मजकूर लिहिला असाही दावा ब्रिगेडकडून छातीठोकपणे केला जातोय. प्रत्यक्षात मात्र हे शिल्प लालमहालात बसवण्यात आल्यानंतर आजवर लेन भारतात आलेला नाही.
धनुर्विद्येत क्षत्रिय अर्जुनाचा कायम प्रथम क्रमांक राहावा यासाठी ब्राह्मण द्रोणाचार्यानी आदिवासी एकलव्याकडून न दिलेल्या शिक्षणाचे ‘वेतन’ म्हणून त्याचा अंगठा कापून घेतलेला आहे. क्षत्रिय रामाने एका ब्राह्मणाच्या तक्रारीवरून शूद्र शंबूकाची हत्या केलेली आहे. या दोघांच्या युतीत कायम बळी गेला तो दलित-ओबीसींचा!
लेन हा इतिहासकार नसून तो धर्मशास्त्राचा अभ्यासक आहे. त्याचे भांडारकर अतिथीगृहावरील वास्तव्य ३ आक्टोबर १९८० ते ६ मार्च १९८१ या काळात होते. त्याला महाभारतावर ग्रंथ लिहिण्यासाठी एक शिष्यवृत्ताी मिळाली होती. त्यानिमित्ताने तो भांडारकरमध्ये आला होता. दी डी नोबिली रिसर्च लायब्ररी प्रकाशनाने त्याचा महाभारतावरील ‘व्हीजन्स ऑफ गॉड’ (नॅरेटिव्ह ऑॅफ थिओफेनी इन दी महाभारत ) हा ग्रंथ व्हिएन्नावरून १९८९ साली प्रसिद्ध केला होता. त्यानंतर पुढील अभ्यासाच्या निमित्ताने तो पुण्यात आला तरी भांडारकरवर राहिलेला नाही. त्याने शिवाजीमहारांजाशी संबधित दोन पुस्तके लिहिलेली आहेत. संस्कृतमधील शिवचरित्रांचा तो अभ्यास करीत होता. परमानंद यांच्या संस्कृत शिवकाव्यावर त्याने इंग्रजीत ग्रंथ लिहिला. त्यात संस्कृत भाषेचे तज्ञ डॉ. श्रीकांत बहुलकर यांचा संस्कृत महाकाव्यांवर एक लेख आहे. बहुलकर हे बौद्ध साहित्याचे अभ्यासक असून ते सारनाथच्या ‘सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ तिबेटीयन स्टडीजचे’ चीफ एडीटर आहेत. ते इतिहासाचे किंवा शिवचरित्राचे अभ्यासक नाहीत. त्यांचा व लेनचा संबंध आला तो संस्कृतच्या माध्यमातून. भांडारकर संस्थेने छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेला ‘बुधभूषण’ हा संस्कृतमधील ग्रंथ (संपादक- एच. डी. वेलणकर) १९२६ साली प्रकाशित केलेला आहे. या ग्रंथाचा मराठी अनुवाद अलीकडेच संभाजी ब्रिगेडच्या सौ. शैलजा ज्ञानेश्वर मोळक यांनी श्री. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या हस्ते प्रकाशित केलेला आहे.
ब्रिगेडचा डॉ. भांडारकरांवरचा आणि संस्थेवरचा राग अज्ञान, जातीय आकस आणि दूषित पूर्वग्रहातून आलेला आहे. सर भांडारकर यांनीच लेनला ही माहिती पुरविली असा भ्रम पसरविला जात आहे. ज्यांच्या मृत्यूला ८४ वर्षे झालेली आहेत आणि लेनचे वय ज्याअर्थी ८४ वर्षे नाही त्याअर्थी डॉ. भांडारकर त्याला ही तोंडी माहिती कशी देणार? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि प्रार्थना समाजासोबत आयुष्यभर राहिलेल्या आणि ज्यांचा गौरव खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला आहे त्या प्रागतिक विचारांच्या प्राच्यविद्यापंडीताला झोडपले जात आहे. ‘‘डॉ.भांडारकरांसारख्या हिंदु धर्मशास्त्राचे मंथन केलेल्या थोर विद्वान पुरुषांनी हल्लीची जातीभेदाची पद्धत कृत्रिम, अशास्त्रीय, विषमतामूलक व समाजाच्या प्रगतीला अडथळा आणणारी आहे असे स्पष्टपणे प्रतिपादिले आहे,’’ या शब्दांत डॉ. आंबेडकरांनी त्यांचा गौरव केला होता. (पहा - डॉ. आंबेडकरांचे बहिष्कृत भारत व मूकनायक, पृ.३३८) ‘‘माशांच्या पिल्लांना ज्याप्रमाणे पोहावयास शिकवावे लागत नाही, त्याचप्रमाणे मालीनीबाईला सुधारणेची शिकवण देण्याचे काही कारण नाही. तसे जर नसते तर मालिनीबाईने ही सामाजिक सुधारणेतील अगदी लांबची उडी घेतलीच नसती.’’ असे उद्गार डॉ. आंबेडकरांनी भांडारकरांच्या नातीने केलेल्या मिश्रविवाह प्रसंगी काढले होते. (उपरोक्त, पृ.४८) माशांना पाण्यात पोहायला शिकविण्याची गरज नसते ही प्रतिमा महात्मा फुले शिवरायांसाठी वापरतात, तर डॉ. आंबेडकर भांडारकरांच्या नातीसाठी वापरतात. ‘‘भारतीय समाजसुधारकांच्या यादीत बुद्ध, महावीर, बसव, कबीर, फुले, रानडे, विवेकानंद यांच्या मालिकेत भांडारकरांचा समावेश होतो.’’ असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नोंदवतात. (उपरोक्त, पृ २६२) ब्रिगेडवाले फुले-आंबेडकरांच्या नावांचा गैरवापर करून भांडारकरांना बदनाम करीत आहेत, याचा निषेध चळवळ करणार आहे काय? ब्राह्मण म्हणून मुलाहिजा न करणाऱ्या ज्या शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये अनेक ब्राह्मण होते त्यांनाच ब्राह्मणविरोधी म्हणून प्रोजेक्ट केले जात आहे. सत्यशोधक चळवळ ताब्यात घेऊन तिचे रूपांतर ब्राह्मणेतर चळवळीत केले गेले. बहुजन फुले-आंबेडकरी चळवळीच्या जोरावर मिळालेल्या राजकीय सत्तेचे अपहरण करून तिला एकजातीय मुठीत बंदीस्त करण्यात आले. इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. फुले आंबेडकरी छावणीची परिभाषा अलगद उचलून घुसखोरांनी शासनकर्त्यांना ते शोषणकर्ते असतानाही शोषितांचे नेते म्हणून डोक्यावर बसविले आहे. हे राजकारण उघडे पाडणाऱ्यांना ब्राह्मणांचे हस्तक ठरविण्याचा हातखंडा प्रयोग केला जात आहे. बामसेफसारख्या कट्टरतावादी संघटना भ्रमित होऊन या मंडळींचे प्यादे बनत असल्याची शंका लोकांना येऊ लागली आहे. गोपनीय आर्थिक व्यवहार, लोकशाही व ज्ञान यांच्याविषयीची घृणा आणि संघपरिवाराप्रमाणे एकचालकानुवर्तित्व यामुळे घसरण सुरू आहे.
आज देशात सनातनी व कर्मठ विचाराच्या ब्राह्मणवादाविरोधी एक स्पेस तयार झालेली आहे. तिचे नेतृत्व हायजॅक करण्यासाठी ब्राह्मणद्वेषाची आरोळी ठोकली जात आहे.
२३ जानेवारी २००४ रोजी जेम्स लेनने दिलेल्या माफीनाम्यात म्हटले होते की, I did not get it from any Marathi or English book or Sanskrit text and I have it recorded in field notes from 1987, having heard it on the street from an unknown person. It is an unimportant part of my argument. None of the persons mentioned in my preface told me that joke. Nor were any of the institutions mentioned, namely the Bhandarkar Oriental Research Institute ----- nor any of their personnel responsible for the arguments I develop in the work. Again, I must emphasize that this now infamous report of a street joke and all the opinions expressed in the book have nothing to do with the persons now criticized for helping me in my work. The fact that they arranged for me to get books and materials and have helped with translations should in no way make them responsible for my opinions and arguments.
( मला ही माहिती कोणत्याही मराठी, इंग्रजी किंवा संस्कृत पुस्तकातून मिळालेली नसून मी संशोधनाच्या निमित्ताने १९८७ साली फिरत असताना रस्त्यावरील एका अनोळखी व्यक्तीकडून मी हे ऐकल्याची नोंद माझ्या टीपणांमध्ये आहे. हा माझ्या युक्तिवादातील बिनमहत्त्वाचा भाग आहे. मी ज्यांचे प्रस्तावनेतील आभारात उल्लेख केले आहेत त्यापैकी कुणीही व्यक्ती किंवा संस्था, जसे की भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था किंवा इतर संस्थामधील कोणाही व्यक्तीला माझ्या या युक्तीवादासाठी जबाबदार धरणे उचित होणार नाही. मी पुन्हा एकदा जोर देऊन सांगतो की रस्त्यावरील या कुप्रसिद्ध विनोदासाठी आणि पुस्तकामध्ये व्यक्त केलेल्या मतांसाठी सध्या ज्यांच्यावर मला मदत केल्याचे प्रकरणी टीका केली जात आहे त्यांचा काडीमात्रही संबंध नाही. सत्य हे आहे की ज्यांनी मला पुस्तके व इतर संदर्भसाहित्य पुरविण्याच्या कामी आणि अनुवादासाठी मदत केलेली आहे त्यांना माझी मते वा युक्तिवाद यासाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार धरण्यात येऊ नये.)
तरीही लेनला शिक्षा व्हावी असे न वाटता त्याऐवजी भांडारकर संस्था आणि त्याने ज्यांचे आभार मानलेत त्या पंधरा भारतीयांपैकी चौदा व्यक्तिंना ब्लॅकलिस्ट करावेसे ब्रिगेडला वाटते यामागचे राजकारण समजून घेणे गरजेचे आहे.
ब्रिगेडचे नेते श्री. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या पत्नी भारतीय जनता पक्षाच्या १५वर्षे आमदार होत्या. आजही त्या पदाधिकारी आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. नितीन गडकरी यांचे श्री. खेडेकर यांच्याशी अत्ंयत ‘मधुर संबंध’ आहेत. ते सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना श्री. खेडेकर शासनाचे कार्यकारी अभियंता म्हणून गडकरींचे ‘किल्लेदार’ होते. हिंदूंचे संघटन करीत अहिंदू द्वेषावर आधारीत वाटचाल करणारा संघपरिवार आणि मराठा संघटन करीत अमराठा द्वेषावर उभा असलेला ‘मराठा सेवा संघ’ यांच्या कार्यपद्धतीत आणि विचारधारेत लक्षणीय साम्य आहे. संघपरिवाराचे साहित्य आणि मराठा सेवा संघाने प्रकाशित केलेल्या १००पेक्षा जास्त पुस्तिका यांचा तौलनिक अभ्यास केला असता असे दिसते की संघाने जेथे जेथे ‘मुस्लिम’ शब्द वापरला आहे तेथे तेथे सेवा संघाने ‘ब्राह्मण’ शब्द घातला आहे. बाकी सारे एकसारखेच आहे! गुजरातमध्ये अफझलखान वधाचे चित्र लावून ‘‘धार्मिक दहशतवाद असा नष्ट केला जातो.’’ असा प्रचार संघाने केला होता. त्यात अफजलखानाच्या जागी ‘कृष्णाजी भास्कर कुलकर्णी’ याचे चित्र छापून ‘‘सांस्कृतिक दहशतवाद असा नष्ट केला जातो’’ असा प्रचार सेवा संघाने केला होता. ‘भटोबाचा कर्दनकाळ ज्योतिबा’ अशी पुस्तिका लिहून खेडेकरांनी महात्मा फुले एका भटजीच्या पोटात नांगर खुपशित असल्याचे मुखपृष्ठावर दाखविले होते. सरसकट सर्व ब्राह्मणांना झोडपण्यामागे त्यातील फुले आंबेडकरवादी, परिवर्तनवादी शक्तींचे मित्र असलेल्यांना बहुजनांचे शत्रू म्हणून बदनाम करणे आणि संघ परिवाराच्या काळया बाजूकडून लोकांचे लक्ष या प्रागतिक शक्तींविरुद्ध केंद्रीत करायला लावणे हा डावपेच यामागे आहे.
ब्रिगेड किंवा बामसेफ या संघटनांचा मी कधीही सदस्य नव्हतो. मात्र त्यांच्या काही कार्यक्रमांना उपस्थित होतो. त्यांना बहुजन समाजाची मान्यता मिळवून देण्यात माझा व डॉ. आ. ह. साळुंखे यांचा हातभार लागलेला आहे. त्यांच्या तत्त्वज्ञान आणि कार्यपद्धतीचा मी जवळून अभ्यास केलेला आहे. आज देशात सनातनी व कर्मठ विचाराच्या ब्राह्मणवादाविरोधी एक स्पेस तयार झालेली आहे. तिचे नेतृत्व हायजॅक करण्यासाठी ब्राह्मणद्वेषाची आरोळी ठोकली जात आहे. यामागे संघपरिवाराची लांब पल्ल्याची व्यूहरचना आहे. समझौता एक्स्प्रेस बाँबस्फोट, सुनिल जोशी, इंद्रेश कुमार, प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहित, असिमानंद आदी प्रकरणांमध्ये हे दिसून आले आहे की मुस्लीम मूलतत्तववादी आणि हिंदुत्त्ववादी यांच्या कार्यपद्धतीत अनेक साम्यस्थळे आहेत. ब्रिगेडचा ब्राह्मणद्वेष हा केवळ बुरखा असून फुले आंबेडकरी चळवळीवर अवैध कब्जा मिळवण्यासाठीची ती रणनीती आहे. दररोज जातीय विद्वेष पसरवणारा रतीब घालून भोळ्याभाबडय़ा बहुजनांची माथी भडकावली जातात. त्यांना हल्ले करायला प्रवृत्त केले जाते. हे चळवळीचे तालिबानीकरण आहे.
ब्रिगेडचा आंतरिक हेतू त्यांच्या कृती आणि साहित्यातून शोधावा लागतो.
मराठा तितुका मेळवावा! गुणदोषांसहित स्वीकारावा!
दलित भटका ओबीसी! अमराठा अवघा ठेचावा!
सोयरिकी उच्च! आरक्षणी मागास सांगावा!
ब्राह्मणद्वेष दाखवावा! मराठादेश घडवावा!
ब्रिगेडचा हा अंतस्थ कावा आता उघडा पडला आहे. ब्रिगेडला कोंडदेव विरोधी राजकारणातून जी शक्ती आणि प्रसिद्धी मिळाली, तिचा वापर मराठा ओबीसीकरणासाठी करण्यात आला. अमराठाद्वेष हे सूत्र घेऊन, ‘‘जिभ छाटू, हात तोडू, राजकारणातून उखडून टाकू, वाजवा टाळी हाकला माळी, वाजवा तुतारी हाकला वंजारी, अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट रद्द करा’’ अशी मांडणी उघडपणे केली गेली. आरक्षण मागणारेच अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट रद्द करा, अशी मागणी करीत आहेत, ही विसंगती नव्हे काय? डॉ. आंबेडकरांच्या रिडल्सवर बंदी घालण्याची मागणी करणारे ब्रिगेडचेच बंधू आहेत. बाबासाहेबांना निजामाच्या हस्तक म्हणणाऱ्या शालिनीताई यांच्या मार्गदर्शक आणि ‘मराठा विश्वभूषण’ आहेत. खरलांजी हत्याकांडाचे त्यांनी जाहीरपणे समर्थन केले होते. रमाबाई नगर गोळीबार प्रकरणातील आरोपी मनोहर कदम हा स्वजातीय असल्याने शासनाला त्याच्यावर कारवाई करू दिली जात नाही. ओबीसी नेत्यांना मराठाद्वेष्टे ठरवून राजकीय आयुष्यातून उठविण्याचा ब्रिगेडचा कावा असतो. (पाहा - पुरुषोत्तम खेडेकर, रेखांकन) ब्रिगेडने रमाबाई नगर व खरलांजीप्रकरणी कधीही भूमिका घेतलेली नाही.
ब्रिगेड किंवा बामसेफ या संघटनांचा मी कधीही सदस्य नव्हतो. मात्र त्यांच्या काही कार्यक्रमांना उपस्थित होतो. त्यांना बहुजन समाजाची मान्यता मिळवून देण्यात माझा व डॉ. आ. ह. साळुंखे यांचा हातभार लागलेला आहे.
अफगाणिस्थानातील बामेमियांची प्राचीन बुद्धमूर्ती फोडणे, बाबरी मशीद पाडणे, कुमार केतकरांच्या घरावर आणि भांडारकरवर हल्ला करणे आणि शिवरायांचे इमानी सेवक आणि प्रशासक असलेल्या दादोजींचा पुतळा अध्र्या रात्री कटरने कापून त्यांची हकालपट्टी करणे यामागची मानसिकता एकच आहे. लोकशाही, ज्ञानविश्व, संशोधन, विद्वत्ता या साऱ्यांबद्दलची घृणा यातून पोसली जातेय. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावतोय. आणि म्हणून चळवळीने याबाबत निर्भयपणे भूमिका घेणे, ही काळाची गरज आहे. मराठा समाजातील अनेकांना चाललेय हे मान्य नाही. काही संभ्रमित आहेत. विवेकी आणि ज्ञानी मंडळींनी आता मौन सोडले पाहिजे. आणि वैचारिक फरफट सहन करण्याऐवजी या अपप्रवृत्तींवर भूमिका घेतली पाहिजे. अशा संकुचित विचारांना फुले-आंबेडकरी चळवळीमध्ये थारा मिळू नये, या उद्देशाने हा लेख लिहिला आहे.
harinarke@yahoo.co.in
(प्रस्तुत लेखक हे पुणे विद्यापीठाच्या महात्मा फुले अध्यासनाचे प्राध्यापक व प्रमुख असून त्यांचे फुले-शाहू-आंबेडकर या विषयावर ३५ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.

23 comments:

  1. excellent article.
    Congrates.


    Santosh

    ReplyDelete
  2. research based article
    congrates


    Anil

    ReplyDelete
  3. Ha jo vareel lekh aahe to mee anekdaa vaachalaa aahe. Tyach velees Pra. hari narke yanchyaaviruddh jee dwesh moheem Mulnivaasi Naayak madhun suru aahe tehee vruttant vaachale aahet. Suruvaat Mulnivasee Nayak yaa vruttpatraqane kelee ahee he ughad ahe. Dr. salunkhe keval Maratha samajaache asalyaane tyanchyaashee lago0lag patch-up kele gele aahe. Yacha arth kaay kaadhava?

    Dusare mhanaje, mee vareel lekhaateel kaahee muddyaanshee sahmat naahee. Pan tyaavar vegalee charchaa hovu shakate aani ti swagataarh aahe...pan Prsa. narke vikale gele ha andaaj bandhanaare he upatsumbh kon? Tyannee kharokhar chalvaleesaathee kaay yogdaan dile aahe?

    Mala Khedekar siranchyaa patneebaddalchaa ullekh aavadlelaa naahee. Brigadene bhalehee konatehee rajkaaran karat to vaadgrast putalaa halavalaa yabaddal malaa aakshep nahee. To putala hatavalaa jayalaach havaa hotaa ani yabaddal Pra. Narke suddha sahmat aahet ani hote. paddhateebaddal aakshep asu shakto...tyaacheehi charchaa hovu shakte...

    pan Pra. Narke yanchyaabaddal (Or for anybody else for that matter) atyant ashlaghya bhaashe jar Mulnivasee nayak Chaapat asel...ani tarihee Praa. Narke yanni tyaa ghaneradyaa shivyaa shirodhary maanaavyat ase konala vatat asel tar tyanni aapali aakkl tapasun pahavi.

    ReplyDelete
  4. Tase uttar aalelach aahe hya lekhaacha mulnivasinayak madhye.

    http://www.mulnivasinayak.com/pages/2011/Feb/08/news/2_1.jpg

    ReplyDelete
  5. आदरणीय सर,
    आभिनंदन,डोळ्यात अंजन घालणारा लेख आहे.प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून हा लेख वाचला पाहिजे.बामसेफ तरी कुठे आता मुलनीवास्यांची राहिली आहे.म्हारकी आणखीन चालूच आहे.मंगल हो.साधू! साधू!साधू!

    ReplyDelete
  6. नवी आशा निर्माण करणारा लोकप्रभा
    दादोजी कोंडदेव प्रकरणी सध्या सुरू असलेल्या वादावर प्रा. हरी नरके यांचा अत्यंत मुद्देसूद आणि प्रबोधनात्मक लेख छापून आपण चांगल्या पत्रकारितेचं दर्शन घडवलं आहे. प्रा. हरी नरके यांनी अत्यंत धिटाईनं या प्रश्नाचे बारकावे आम्हा वाचकांसमोर ठेवले आहेत आणि तितक्यात धिटाईनं आपण ते प्रकाशित केले आहेत. त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन.
    ज्या निर्भयतेनं प्रा. नरकेंनी आपले मुद्दे मांडले आहेत ती निर्भयताही अलीकडे दुर्मिळ होत चालली आहे. हरी नरकेंचा या प्रश्नांचा अभ्यास, मांडणीतला प्रांजळपणा आणि स्वच्छपणा दाद द्यावी असा आहे. त्यांच्या विवेचनाशी सर्व वाचक सहमत होतीलच असं नाही, पण या प्रश्नांची एक महत्त्वाची बाजू जनतेसमोर ठेवायचं काम त्यांच्या लेखानं निश्चित केलं आहे. वाचकांना विचार करायला प्रवृत्त करणं हे लेखांचं खरं यश मानलं पाहिजे. महाराष्ट्रातील जातीय पर्यावरणाचं भेदक दर्शन घडवणारा नरकेंचा लेख या दृष्टिनं आदर्श म्हणावा लागेल. आपलं नियतकालिक मुख्य प्रवाहातलं, अधिक खपाचं नियतकालिक असल्यानं हरी नरकेंचा विचारप्रक्षोभक लेख त्यात छापून येणं याला विशेष महत्त्व आहे.
    लोकप्रिय विचारसरणीचा पुरस्कार करण्याचं काम पत्रकार नित्य नियमानं करत आले आहेत. आपलं नियतकालिक लोकांत अप्रिय होईल या भयापोटी संपादकही लोकप्रिय विचारसरणी गोंजारणाऱ्या लिखाणाला आश्रय देत राहातात. त्यामुळे नियतकालिकांची प्रबोधनाची भूमिका लोप पावत चालली आहे. या पाश्र्वभूमीवर लोकप्रभात आपण प्रकाशित केलेला नरकेंचा लेख नवी आशा निर्माण करणारा आहे.
    अवधूत परळकर, माहीम , मुंबई
    ब्रिगेडी मानसिकता
    ‘लोकप्रभा’मध्ये प्रकाशित झालेला दादोजीं कोंडदेव वादावर लिहिलेला प्रा. हरी नरके यांचा लेख मनापासून आवडला. छत्रपती ही कुणा एका समाजाची मक्तेदारी नाही. ब्रिग्रेडसारख्या संघटना या बहुजन समाजाच्या ऐक्याला मारक ठरणाऱ्या आहेत. आणि मुळात हे प्रकरण आता निव्वळ पुण्यापुरते मर्यादित न राहता ब्रिग्रेडी मानसिकता सातासमुद्रापार राहणाऱ्या उच्चशिक्षितांच्या मनावरदेखील रूढ होऊ लागली आहे. आपल्यासारखी माणसंच ही दोन जातींमध्ये निर्माण झालेली दरी दूर करू शकतात.
    मनाली गुप्ते, marathi_ase_amuchi_myboli@yahoo.co.in

    निष्कर्ष कागदपत्रांसह जाहीर व्हायलाच हवेत.
    प्रा. हरी नरके, जरी आपल्या सर्व मुद्दय़ाशी जरी सहमती नसली तरी आपण संभाजी ब्रिगेडचे खरे स्वरूप आपण उघड केले याबद्दल अभिनंदन. आमच्यासारख्या सामान्य लोकांना हा प्रश्न पडला आहे की अचानक कोणती गोष्ट उघडकीला आली की ज्यायोगे दादोजी कोंडदेव हा जुलमी राज्यकर्त्यांसारखा नकोसा झाला. आपण या संदर्भात संभाजी ब्रिगेड आणि संबंधितांनी त्यांचे निष्कर्ष कागदपत्रांसह जाहीर करायला हवे, ही मागणी केली ते योग्यच आहे.
    विद्याधर कुलकर्णी
    vidyadharster@gamil.com

    ReplyDelete
  7. संभाजी ब्रिगेडच्या आतल्या गाठी
    मी स्वत: आजपर्यंत संभाजी ब्रिगेडला सम्यक विचारसरणीची संघटना म्हणून डोक्यावर घेऊन फिरत होतो. ओळखीपाळखीतल्या लोकांमध्ये या संघटनेबद्दल असलेले गरसमज दूर करण्यास मदत करत होत. माझ्या ब्लॉगवर मागे तसा एक लेखही टाकला. पण आज माझ्यावरच अशी वेळ आली आहे की आज मला ब्रिगेडच्या विरोधात हे पत्र लिहावे लागत आहे. याचे मुख्य कारण आहे संभाजी ब्रिगेडचे डबल स्टॅंडर्ड. ब्रिगेडचे दाखवायचे दात वेगळे व खायचे दात वेगळे आहेत. बरं झालं फार लवकर ही गोष्ट आमच्या लक्षात आली. नेटवर खासकरून फेसबुकवर असलेले कित्येक बौद्ध बांधव अजून या खायच्या दातांपासून अनभिज्ञ आहेत. त्या सगळ्यांना जागृत करण्यासाठी मला हे पत्र लिहावे लागत आहे.
    हरी नरकेनी लोकप्रभामधून ब्रिगेडवर टीका केली. त्यातील बरेच मुद्दे वैयक्तिक होते, पण काही मुद्दे मात्र दुर्लक्ष करण्यासारखे नव्हते. त्यातील मला खटकलेला एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे Atrocity. मी लगेच ब्रिगेडी मित्रांना फोना-फोनी केली व या मुद्दय़ावर त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ब्रिगेडवाल्यांनी Atrocity चा गरवापर होतो आहे, ते होऊ नये असं त्यांचं मत असल्याचं सांगून वेळ मारून नेली. म्हटलं हो, पण यापुढे काय? गरवापर होतो आहे यावर तुम्ही काही उपाय सुचविता का? यावर मात्र ब्रिगेड अनुत्तरीत झाली. खरं तर हरी नरकेंच्या त्या लेखाने ब्रिगेडचं िबग फुटलं. Atrocity वर उत्तर देताना ब्रिगेडवाल्यांची पार दमछाक होताना दिसते. खर तर ब्रिगेड ही आतल्या गाठीची आहे, हे इथेच सिद्ध होतं. ब्रिगेडने आंबेडकर व बुद्धाचा मुखवटा लावला आहे. या मुखवटय़ाला भुलून बौद्ध बांधव भरकटला जात आहे. मीही त्याच मुखवटय़ाचा बळी आहे. पण ब्रिगेडचा हा मुखवटा फाडण्याचं काम करणे अत्यंत गरजेचं आहे.
    ब्रिगेडचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांना थेट फोन केला अन् Atrocity बद्दल जे कानी पडलं, त्याबद्दल त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी व्यवस्थितपणे शब्दाचा खेळखंडोबा करून जाणीवपूर्वक उत्तर देणं टाळलं अन् म्हणाले मी यावर एक पुस्तिकाच लिहितो आहे. वैयक्तिकरीत्या प्रत्येकाला उत्तर देणं मला जमणार नाही. मला असे बरेच फोन येत असतात. त्यावर लेखन चालू आहे. पुस्तिकेच्या रूपात लवकरच उत्तर मिळेल. मी त्या पुस्तिकेची वाट बघतोय. जेव्हा ती पुस्तिका येईल तेव्हा ब्लॉगवर तुम्ही माझी समीक्षाही वाचालच. एकंदरीत काय, तर प्रवीणदादांचीही Atrocity च्या मुद्दय़ावर ससेहोलपट होताना दिसली. म्हणजेच या कटात प्रवीण गायकवाडही आहे. अन्यथा त्यांनी अशी टाळाटाळ केलीच नसती.
    ब्रिगेड नावाचा शत्रू आमच्या लोकांचं सोंग घेऊन त्या िपजऱ्याला तोडू पाहात आहे. वेळीच जाग होऊन या ब्रिगेडला दूर नाही सारलं तर आमच्या वाटय़ाला परत एकदा गुलामी आल्याशिवाय राहणार नाही. गुलामी मग ब्राह्मणांची असो वा मराठय़ांची असो. गुलामी ही गुलामीच असते. जर परत एकदा सामाजिक गुलामी नको असल्यास ब्रिगेडचा खरा चेहरा ओळखून त्यांना कायमचा जयभीम करा.
    - मधुकर रामटेके

    ReplyDelete
  8. पुणेरी किस्सा
    नुकताच पुण्यात गेलो असतानाचा हा किस्सा. दुपारी माझा मेव्हणा आणि मी वैशालीत जेवताना एक अनोळखी व्यक्ती आमच्याच टेबलावर येऊन बसली. (पुण्यात चार जणांच्या टेबलावर दोन लोक बसले असतील तर इतर दोन अनोळखी लोक तुमच्या टेबलावर येऊन बसू शकतात.. असो). आमचे लक्ष्य त्या व्यक्तीकडे असण्याचे काही कारण नव्हते. आम्ही आमच्या गप्पात दंग होतो. आमच्या गप्पा राजकारण, भ्रष्टाचार इत्यादी सर्वसाधारण विषयांवर चालल्या होत्या. मध्येच ‘त्या’ समोर बसलेल्या व्यक्तीने ‘‘मी काय म्हणतोय.. मी तुमचे बोलणे मगापासून ऐकतोय..’’ असे म्हणत स्वत:ची गाडी गियरमध्ये घालून आमच्या बोलण्यात घुसला. तेव्हा त्याच्याकडे लक्ष गेले. साधारण पस्तिशीचा, शिकलेला गृहस्थ होता. पांढऱ्या शर्टाच्या खिशावर शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांचा रंगीत बिल्ला लावलेला होता. त्यांनी पुढे बोलणे सुरू केले, ‘‘तर मी काय म्हणत होतो, माझा सामाजिक प्रश्नांवर खूप वर्षांचा अभ्यास आहे..’’ असे थोडे बोलत त्यांनी मुख्य विषयाला हात घातला.
    ‘‘आत्ता बघा, कोण हा जेम्स लेन.. याला काय आपल्या इतिहासाची माहिती? इथे येऊन तो शिवाजी महाराजांबद्दल काहीही बोलतो, पुस्तक लिहितो..’’ थोडा आवाज चढवून पुढे म्हणाले, ‘‘आम्ही हे कसे सर्व सहन करायचे?’’
    मला या प्रकरणाची थोडीफार माहिती होती, पण पूर्ण माहिती नव्हती. म्हणून मी त्यांना विचारले, ‘‘नक्की लेनने काय लिहिले?’’
    त्या समोरच्या व्यक्तीला अंदाज आला कि मी पुण्याचा नाही. त्यांनी विचारले, ‘‘काय हो कुठे राहता तुम्ही?’’ मी उत्तर दिल्यावर त्यांना अजून चेव चढला कारण मला फारसे काही माहिती असणे शक्य नव्हते. मग त्यांनी इत्थंभूत माहिती सांगायला सुरुवात केली.
    मला आता जरा या सर्व घडामोडींचा अंदाज येऊ लागला. मी विचारले, ‘‘तुम्ही हे पुस्तक वाचले आहे का?’’
    ‘‘अहो, त्यात वाचण्यासारखे काय आहे? कशाला वाचून उगाच डोके फिरून घ्यायचे?’’ ते गृहस्थ म्हणाले.
    म्हणजे तुम्ही कोणाच्या तरी सांगण्यावरून हे सर्व बोलत आहात.. बरोबर? तुम्ही चांगले शिकलेले आहात.. तुम्ही ते पुस्तक वाचले पाहिजे.. आवडले नाही तर जरूर सभ्य भाषेत पण कठोर शब्दात निषेध केला पाहिजे. हेच सुशिक्षित समाजात अपेक्षित असते.मुद्दय़ाला, मुद्दय़ानेच उत्तर द्यायचे असते.. गुद्दय़ाने नव्हे. साहेब, शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. त्यांची थोरवी आपण आयुष्यभर गायलो तरी पुरणार नाही. अशा थोर पुरुषांवर कोणी जर िशतोडे उडवायचा प्रयत्न केला तर त्याने शिवाजी महाराजांची बदनामी होत नाही तर असले उद्योग करणाऱ्या लोकांची लायकी कळते!’’
    माझ्या बोलण्याचा त्या गृहस्थावर काही परिणाम झाला नाही. ते गडबड करत पटकन निघून गेले. अशिक्षित लोक असल्या भूलथापांना बळी पडून हाणामारी करतात हे जाणून होतो, पण पुण्यातील सुशिक्षित लोकही याला बळी पडावेत?
    किशोर कट्टी
    kkatti17@gmail.com

    ReplyDelete
  9. Prof. Narke...Jay Bhim Jay Mulnivasi. Ur article in Lokprabha is truely insightful.Ur analysis and interpretation of Maratha Seva Sangh and Bamcef is very contemporary and truely PhuleAmbedkarwadi.The arguement placed by u is the potential one and will guide the movement in future.

    ReplyDelete
  10. Nice article , well researched and insightful for all those who think about socio political aspect of our society.

    ReplyDelete
  11. प्रत्येक सुजाण माणसाने वाचलाच पाहिजे असा हा लेख. हरी नरके यांनी अत्यंत संयत भाषेत महाराष्ट्रातल्या जातीयवादी शक्तीचा समाचार घेतलेला आहे. लोकप्रभेच्या ताज्या अंकात हा लेख प्रसिद्ध झालेला आहे.
    -Mukund Tanksale, on facebook

    ReplyDelete
  12. जातींमध्ये वैरभाव नको!
    ४ फेब्रुवारीचा लोकप्रभा वाचला. दोन लेख चिंतनीय वाटले. प्रा. हरी नरके आणि अॅड. अनंत दारवटक यांचे हे दोन्ही लेख परस्परविरोधी मते व्यक्त करतात. लोकप्रभाने मात्र यात समतोल साधला आहे. दादोजी या विषयावर सध्या महाराष्ट्रात जाती द्वेष माजवायचा प्रयत्न चलला आहे. हा विषय महाराष्ट्रापुरताच मर्यादित आहे. या जुन्या व इतिहासजमा विषयाचे इतके चर्वितचर्वण करणे योग्य वाटत नाही. त्यात जातींमध्ये वैरभाव निर्माण होण्याचीच शक्यता जास्त आहे.
    भाऊराव हेडाऊ, नागपूर

    ReplyDelete
  13. नरके, दारवटक हीच मेहनत या विषयांवर घेतील का?
    २८ जानेवारीचा लोकप्रभा वाचला. हरी नरके व अनंत दारवटक या दोघांनीही लेखासाठी घेतलेली मेहनत कौतुकास पात्र आहे. दुर्दैवाने त्याचा महाराष्ट्र विकासासाठी काहीही उपयोग नाही. दोघांनीही हीच मेहनत खालील विषयावर घेतली तर महाराष्ट्र देशावर अनेक उपकार होतील.
    १. सध्या असलेली रस्त्यांची दुरवस्था व त्यातील भ्रष्टाचार
    २. दूषित व अनियमित पाणीपुरवठा.
    ३. खंडित वीजपुरवठा
    ४. राजे शिवाजी यांनी बांधलेल्या किल्ल्यांची दुरवस्था.
    इतिहासापासून धडा घ्यावा, इतिहासात राहू नये आणि जगू नये हेच खरे. शेजारच्या गुजरात राज्यापासून धडा घ्यावा. तिथे विकासासाठी सर्वजण एकत्र येऊन आपसातील मतभेद, ज्ञातिभेद दूर ठेवून विकास साधत असतील तर आपण एकत्र का येऊ शकत नाही?
    पंकज जोशी,
    pdj14srt@gmail.com

    ReplyDelete
  14. मुळावरच घाव घातला ते बरे झाले
    प्रा. हरी नरके यांचा लेख अत्यंत भावला. आपल्यासारख्या साक्षेपी विचारवंतांनीच आता पुढे येण्याची गरज आहे. अन्यथा, या महाराष्ट्रात अराजक येणे निश्चित आहे. आज ब्राह्मण, उद्या वंजारी, परवा माळी, नंतर आणखी कुणी.. महाराष्ट्र धर्म कुठे जातो आहे? आमच्या लहान मुलांना आम्ही काय सांगणार आहोत? सगळं काही चक्रावणारं आहे.
    मी कुठल्याही संस्थेशी संबंधित नाही. तरीही हे सारं पाहून अत्यंत वाईट वाटतं. अगदी पदवीधर होऊन व्यवसायात स्थिरेपर्यंत आम्हाला आमच्या मित्रांच्या, स्नेह्यांच्या जातीपाती माहिती नव्हत्या. आता परिस्थिती इतकी वाईट बनली आहे, की माणसाच्या कर्तृत्वापेक्षा त्याची जात पाहून त्याची लायकी ठरविली जाते आहे.
    जोतिबा काय किंवा बाबासाहेब काय, दोघांना नेमके काय अपेक्षित होते, याची एक टक्का समज तरी येथील झोटिंगांना आली, तर तो सुदिन म्हणावा.
    सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांनाही त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची पापं लवकरच बाहेर येणार आहेत, याची कुणकुण लागली असावी. त्यातूनच हे सारं राजकारण कटासारखं शिजलं जात आहे, असं राहून राहून वाटतं. खेडोपाडी दलितांवर अत्याचाराचे पाप कोणी केलं, कोण करतं आहे हे उघड गुपित आहे. तरीही, विशिष्ट जातीला सॉफ्ट टाग्रेट करून पुरोगामी चळवळ हायजॅक करणं आणि त्यातही सोयीच्या मंडळींना (ज्यांची इतिहासकार किंवा संशोधक म्हणवून घेण्याचीसुद्धा लायकी नाही) अशांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचा हा डाव आहे, हे आता उघड आहे. म्हणून, अशा प्रवृत्तीवर घाव न घातल्यास इतिहास आपणास माफ करणार नाही! तुम्ही मुळावरच घाव घातला ते बरे झाले.
    संतोष देशपांडे
    santoshdeshpande@gmail.com

    ReplyDelete
  15. नरके सर, आपणही जीभ सैल सोडली होती
    मी स्वत: ब्राह्मण असून जातीव्यवस्थेबद्दल मनातून तिटकारा बाळगणारा आहे. परंतु हेही तितकेच खरे की मी स्वत: िहदू म्हणून स्वत:ला अभिमानाने मिरवू इच्छितो. सर्व प्रकारच्या उपासना पद्धतीला सामावून घेऊ शकणारी आणि उत्तरोत्तर बदल घडवत गेलेली एक संस्कृती म्हणजे िहदू संस्कृती होय. परंतु संभाजी ब्रिगेडच्या ऑर्कुट ग्रुपवरील एका विषयामध्ये आपल्या भाषणाचं रेकॉìडग टाकलं आहे. आपण पण त्यात आतिशय विचित्र तऱ्हेने ब्राह्मणांबद्दल टीका केली आहे. शाहू महाराजांचा पुजारी किंवा व्यंकटेश आबदेव याबद्दल मत मांडताना आपलीही जीभ जरा सुटली आहे. फुले-आंबेडकर विचारधारेचे प्रतिनिधित्व करताना जाहीर भाषणामधून अशी जीभ सल सोडणे आपल्यासारख्या विद्वानाला शोभत नाही इतकेच. मात्र चांगला लेख लिहिलात त्याबद्दल अभिनंदन.
    महेश उकिडवे
    smjukidave@yahoo.com

    ReplyDelete
  16. वर्चस्वाच्या लढाईतील कुचंबणा
    लोकप्रभामधील हरी नरके यांचा लेख आवडला. दोनच दिवसांपूर्वी ऑफिसमध्ये आमची या विषयावर चर्चा झाली. जेव्हा आमचे कुटुंब प्रथम कामानिमित्त पुण्यात आले त्यावेळेस असे जाणवले की, इतर लोकांना राहणे किती अवघड असते. काही लोकांच्या गावातील वर्चस्वामुळे इतर वर्ग १९८० च्या काळात एक आधार म्हणून शिवसेनेकडे वळला. पण तिथेसुद्धा त्याची फरफटच झाली. आपण म्हटल्याप्रमाणे हे सत्य आहे. ओबीसी आणि दलित भटके यांची या दोन वर्चस्वाच्या लढाईत कुचंबणा होत आहे.
    दत्ता चव्हाण, पुणे
    dattachavan23@gmail.com

    ReplyDelete
  17. सर् आपला लेख वाचला.......मनापासून आवडला .........अलीकडे घडणाऱ्या घटनांकडे खरोखरच या दृष्टीने पाहणे फार आवश्यक आहे.....या संदर्भात आपण स्टार माझा वर सुद्दा छान मत मांडलेत.
    -Arvind Ulhamale on facebook.

    ReplyDelete
  18. सर,

    दादोजी कोंडदेव वरिल लेख खूप आवडला. खूप लोकांशी त्या विषयी बोलणे झालं.

    परखडपणे ज्यांचे त्यांचे दोष त्याना दाखवून एक स्पष्ट अशी भुमिका मांडलीत याबद्दल धन्यवाद.प्रसंगी स्वत: केलेली (सं.ब्रि.च्या व्यासपिठावर जाण्याची) चूक कबुल करून टाकलीत,हे फार समाधान देवून गेलं.आमच्या विचारवंतानी नेहमी अशी नितळ्मोकळी भुमिका घ्यायला हवी असं प्रकर्षानं वाटत राहतं.परंतु बोटचेपेपणाचाच अनुभव पदरात पडतो.बोलायचंच नाही, त्यामुळे अनेक हेतू साध्य होतात.पण काळ सोकावतो त्याचे काय?

    सर, फार मोठा वर्ग असा आहे की ज्याला हे सगळं मान्य नाही,त्याला तुम्ही आवाज दिलात..लेखाची इ-प्रत अनेकाना पाठवली त्यांचेही असेच मत पडले.पण यांच्या मराठा राजकारणाला विरोध केला की हे कसं संकुचित आहे हे वर सांगणार..आणि तुम्ही ओबीसी राजकारण वाले आहात असे जातीय वादी आरोप करणार.. असो.कधीतरी बोलता येइलच तुमच्याशी..


    Rajan Kumbhar March 1 at 8:22pm

    ReplyDelete
  19. अप्रतिम लेख!!!!!!!!!!!!!!!!!!!! गोळीबंद-नेटका व लक्ष्यवेधी!!!! अभ्यास, स्पष्टवक्तेपणा आणि तटस्थता या तीनही गोष्टींचा असा मिलाफ दुर्मिळ!! त्यातच लेन-दादोजी व ब्रिगेड या प्रकरणात हेतू,लाभ,व्यक्ती,जात,घटना आणि प्रतिक्रिया यांची इतकी गुंतागुंत झाली आहे कि त्यातून सत्य बाहेर काढणे कठीणच नव्हे `असाध्य' झाले आहे. त्या सर्व `गिच्च' झालेल्या गुंत्यातून हरी नरके यांनी सत्याचा वेध घेतला यासाठी त्रिवार अभिनंदन!! या लेखात योग्य आणि सत्य काय-काय आहे आणि काय पटले हे सांगायचे झाल्यास हाच लेख पुन्हा लिहून काढून द्यावा लागेल........त्यामुळे अधिक काही मुद्दे-तपशील `कॉमेंट' मध्ये मांडण्याची गरजच नाही!!!

    लोकेश शेवडे [ lokeshshevade@hotmail.com ]

    ReplyDelete
  20. प्रिय हरी,
    खूप दिवसांनी पोलिटिकली करेक्ट भूमिका घेतली आहे. आरक्षण हा गरिबी हटावो चा कार्यक्रम नाही..! पुरुषोत्तम खेडेकर आणि वामन मेश्राम यांच्या विषयी केलेल्या विधानाशी मी सहमत आहे.: Dr. Kumar Saptarshi on facebook dated 30th March,2011

    ReplyDelete
  21. हरी नरके यांचा लेख आवडला
    माणसाला आपल्या जातीचा एवढा अभिमान का वाटतो
    तो त्या जातीत जन्माला आला ह्यात त्याची कामगिरी काय
    त्याचे मा बाप त्याला सांगतात आपण जतीन अमुक तमुक
    सगले प्रश्न संपले का फक्त पुतळा हाच प्रश्न
    व्व्व www.cmitra.com

    ReplyDelete
  22. माणसाला जातीचा अभिमान का तो त्या जातीत जन्म्ण्याचा प्रयत्न
    करतो का मा बाप सांगतात आपण अमुक तमुक जातीचे झाली सुरवात सर्व प्रश्न संपले पोट भरले पुतळा हा सर्वात मोठा प्रश्न

    ReplyDelete
  23. DEAR HARIBHAU,
    I READ YOUR ARTICLE IN LOKPRABHA AND ON YOUR BLOG. I ALSO READ COMMENTS BY OTHER READERS. I APPRECIATE THE AWAKENING THIS ARTICLE HAS CREATED. I AM A BRAHMIN BY CASTE BUT NEVER CONSIDERED MYSELF EITHER ABOVE OR BELOW OTHERS . I HAVE VERY DEAR FRIENDS IN ALL CASTES AND RELIGIONS AND MANY OF THEM HAVE HELPED ME IN DIFFICULTIES .HOWEVER ONLY FOR GETTING VOTES SOME POLITICAL PARTIES WHO ARE IN POWER ARE ENCOURAGING SAMBHAJI BRIGADE AND MARATHA MAHASANGH TO VITIATE THE ATMOSPHERE. THEY ARE GIVEN POLITICAL PROTECTION AND MONEY TO RUN THE ACTIVITIES.

    PURSHOTTAM KHEDEKAR WAS EARLIER WITH PWD AND THAT TIME ALSO HE WAS ACTIVE IN THESE NEFARIOUS ACTIVITIES ,BUT THE RULING PARTIES PROTECTED HIM. HOW CAN A GOVT SERVANT DO THESE BLATANT POLITICAL ACTS?HE WAS ALSO RAIDED BY ANTI CORRUPTION BUREAU, BUT THE CASE WAS SUPPRESSED.

    BAMSEF IS ALSO DOING ANTI NATIONAL, ANTI HINDU/ ANTI BRAHMIN ACTIVITIES BUT NO ACTION IS BEING TAKEN. ONE OF THE READERS MR PANKAJ JOSHI HAS GIVEN ADVISE TO YOU TO FOCUS ON MORE CONSTRUCTIVE ISSUES. PEOPLE LIKE MR JOSHI ARE IN MAJORITY IN OUR BRAHMIN COMMUNITY WHO DO NOT UNDERSTAND THE IMMINENT DANGER THEY AND THEIR OFFSPRING'S WILL FACE.

    IN THE ANCIENT TIME WHEN A GROUP OF PEOPLE WERE MADE UNTOUCHABLES ,INSTEAD OF ACCEPTING IT AS FATE HAD THEY RESISTED THEY MAY HAVE HAD TO SACRIFICE A FEW OR MANY LIVES BUT THEIR SACRIFICE WOULD HAVE HELPED HUNDREDS OF GENERATIONS ,CRORES OF PEOPLE WHO WERE THEIR FUTURE WHO HAD TO FACE ATROCITIES AND STIGMA OF UNTOUCHABILITY.

    SAME THING ABOUT MUSLIMS.AFTER INDEPENDENCE THEIR LEADERS MIGRATED TO PAKISTAN SO THEY WERE LEFT AS ORPHANS WITHOUT A GIANT OF A LEADER TO UNITE THEM TO REPRESENT THEM. THE RESULT IS A COMMUNITY WITH HARDLY 2 % PEOPLE IN GOVT SERVICE., MOST IN ABJECT POVERTY AND WITHOUT ANY LUCRATIVE JOB OR BUSINESS.AS MANY CRIMINALS BELONG TO THIS CLASS MUSLIMS ARE IN CONSTANT FEAR OF POLICE.

    AGAIN HAD THEY UNITED , FOUGHT BACK UNITEDLY AGAINST UNJUST ACCUSATION,HAD NOT FELT GUILTY FOR THE PAST THEY WOULD NOT BE IN TODAY,S SOCIAL, ECONOMICAL,POLITICAL BACKWARDNESS.

    BUT PEOPLE LIKE MR JOSHI WANT TO HIDE THEIR HEAD LIKE AN OSTRICH FROM THE REALITY.WHEN A NON BRAHMIN LIKE HARIBHAU TALKS AGAINST THEIR ENEMIES THEY WANT TO CRITICIZE HIM INSTEAD OF PRAISING. I DO NOT AGREE WITH HARIBHAU ON HIS CENTRAL THESIS OF BRAHMIN- MARATHA SECRET PACT TO WEAKEN OBC/SC MOVEMENT BECAUSE I KNOW BRAHMIN PSYCHE.BUT THE ARTICLE DOES GIVE GREAT INSIGHTS ON THE ENTIRE EVIL DESIGN OF SAMBHJI BRIGADE AND THEIR CRONY ORGANISATIONS.THANKS. DILIP ALONI

    ReplyDelete