Tuesday, May 2, 2017

भीमसेन जोशी

वसंत पोतदारांनी सांगितलेली एक हृद्य आठवण - एके काळी भीमसेन जोशी गाण्याच्या मैफली करण्यासाठी भारतभर दौरे करत होते. त्यांची ड्रायव्हिंगची आवड तर प्रसिद्धच आहे. तबले, तानपुरे घेऊन साथीदारांसह स्वत:च मैलोनमैल गाडी चालवायचे. गुलबर्ग्यात कुठंतरी त्यांचं गाणं होतं. ते आटपून अण्णांची गाडी परतीच्या प्रवासात होती. रात्रीची दोनची वेळ असेल. गाडी चालवता चालवता अण्णांनी मुख्य रस्ता सोडला आणि एका आडगावाच्या वाटेला लागले. लवकरच ते एका गावात शिरले. साथीदारांना कळेचना की हे कुठे चाललेत. तेवढ्यात अण्णा म्हणाले, "आमचे एक गुरुजी इथून जवळच राहतात. आता अनायसे या वाटेनं चाललोच आहोत तर त्यांना भेटू या..!" रात्री दोनची वेळ असल्यामुळे गावात सामसूम होती. थोड्या वेळाने एका अंधार्‍या खोपटापुढे अण्णांची गाडी उभी राहिली.. मंडळी गाडीतून उतरली. अण्णांनी खोपटाचं दार ठोठावलं. एका वयस्कर बाईनं दार उघडलं. चिमणी मोठी केली आणि खोपटात प्रकाश पसरला. खाटेवर एक वयस्कर गृहस्थ पहुडला होता. त्याचं नाव रामण्णा..! अण्णा त्यांच्यापाशी गेले आणि त्यांना हात देऊन बसतं केलं.. अण्णा म्हणाले, 'काय, कसं काय? ओळखलंत का? बर्‍याच दिवसांनी आलो, अलीकडे वेळच मिळत नाही..' अण्णा कानडीतनं बोलत होते. रामण्णाही ओळखीचं हसले..थोड्या गप्पा आणि विचारपूस झाल्यावर अण्णांनी रामण्णाच्या पायांवर डोकं ठेऊन त्यांना नमस्कार केला आणि खिशातलं २०-२५ हजारांचं बिदागीचं पाकिट त्यांच्या हातात दिलं.. आणि त्यांचा निरोप घेतला.. साथीदार मंडळींना हा प्रकार काय आहे, हेच कळेना. तेव्हा अण्णांनीच खुलासा केला - "इथून जवळच्याच एका रेल्वे स्थानकात (होटगीच्या आसपास) एके काळी मी बेवारशी राहायचो. सायडिंगला जे डबे लागत त्यातच झोपायचो. तिथेच रेल्वेच्या थंडगार पाण्याने आंघोळ उरकायचो. खिशात दमडा नव्हता. गाणं शिकण्यासाठी घरातून पळालो होतो. कानडीशिवाय दुसरी कोणतीही भाषा येत नव्हती. भिकारी अवस्थाच होती. स्टेशनच्या बाहेरच तेव्हा हा रामण्णा त्याची हातगाडी लावत असे. मुगाची पातळ उसळ आणि चपात्या तो विकायचा. मस्त वास यायचा त्याच्या गाडीभोवती. मी तिथेच घुटमळायचा.. आमची ओळख झाली. गदगच्या जोशी मास्तरांचा मुलगा. गाणं शिकायचं आहे.. इतपत जुजबी ओळख मी त्याला दिली". "उसळ-चपाती पाहिजे काय?", असं तो मला विचारायचा. माझ्या खिशात दमडा नव्हता. रामण्णा म्हणायचा, "तुला गाणं येतं ना? मग मला म्हणून दाखव. तरच मी तुला खायला देईन. फुकट नाही देणार..!" "घरी माझी आई जी काही कानडी भजनं आणि अभंग गायची, तेवढीच मला गाता येत होती. रामण्णाला दोन भजनं म्हणून दाखवली की तो मला पोटभर खायला द्यायचा..!" "जो पर्यंत त्या स्टेशनात मुक्काम ठोकून होतो, तोपर्यंत मला रामण्णा खायला द्यायचा. पण फुकट कधीही नाही. रामण्णा म्हणायचा, "तुला गाणं येतं ना? मग कशाला उगाच चिंता करतोस पोटाची?" रामण्णाचा निरोप घेऊन गाडी पुन्हा परतीच्या वाटेवर भरधाव वेगाने निघाली होती.. साथीदार मंडळी गप्प होती.. गाडीमध्ये शांतता होती. धीरगंभीर चेहेर्‍याचे स्वरभास्कर गाडी चालवत होते.. रामण्णाच्या खोपटात भविष्यातला भारतरत्न येऊन मुगाची उसळ आणि चपातीच्या खाल्ल्या अन्नाला नमस्कार करून गेला होता..! --Forwarded

Sunday, April 30, 2017

"मुक्ता"फळं --

1. देशासाठी सैनिक सीमेवर एव्हढा त्रास सोसतात आणि हे देशप्रेमी भारतात आरक्षण आहे म्हणून विदेशात जातात. किती अव्वल दर्जाची देशभक्ती! लोकमान्य टिळक इंग्रजांना म्हणाले होते, तुम्ही कितीही गुणवान असाल, बुद्धीमानही असाल पण आम्हाला सुराज्य नको तर "स्व"राज्य हवे आहे आणि "स्वराज्यात" सर्वांना प्रतिनिधित्व द्यायचे तर आरक्षण आणखी काही काळासाठी तरी आवश्यक आहे. ज्या घटनापरिषदेने सर्वप्रथम आरक्षण दिले त्या परिषदेत 90 टक्के लोक उच्चवर्णीय होते.
2. जे कोणी उच्चशिक्षण किंवा चांगल्या करियरसाठी परदेशात गेले, स्वत:ची प्रगती करण्यासाठी गेले त्यांना माझा विरोध नाही. ही पोस्ट त्यांच्याविरोधात नाही.
3. मात्र जे लोक आम्ही आरक्षणामुळे देश सोडला असं सांगतात त्यांच्या गुणवत्तेचे परदेशात कोणते दिवे लागलेत? असे जे परदेशात गेलेत त्या "स्वयंघोषित बुद्धीमानांनी" कोणते नवे शोध लावलेत? त्यांनी जगाला नवे काय दिलेय? कोणती क्रांती केलीय? त्यांच्यापैकी कितींना नोबेल पुरस्कार मिळालेत?
4. हे लोक महागडे उच्च शिक्षण भारतात फुकटात घेऊन मग परदेशात जातात. असल्या आप्पलपोट्यांची काळजी आपल्याला कशाला हवी?
मुळात हे लोक बुद्धीमान असतात याला पुरावा काय? असे कोणते कौशल्य यांच्याजवळ असते किंवा कोणते ज्ञानार्जनाचे, ज्ञाननिर्मितीचे झेंडे यांनी फडकवलेत? नाचता येईना तर म्हणे अंगण वाकडे!
5. आपण अणुबॉम्ब बनवला. औद्योगिक क्रांती केली. आज आपण जगातली तिसरी सत्ता बनण्याच्या मार्गावर आहोत. आपले यांच्यावाचून काय अडलेय? या पोटार्थी लोकांची भारताला खरंच गरज आहे काय?
6. भारत सरकारच्या NSSO नुसार देशात 40 कोटी रोजगार आहेत आणि त्यातले असंघटित क्षेत्रात [ हमाल, ड्रायव्हर, शेतमजूर इ. ] सुमारे 37 कोटी लोक आहेत आणि त्यात आरक्षण नाही.
7. उर्वरित तीन कोटींपैकी एक कोटी रोजगार केंद्र व राज्य सरकारांकडे असून त्यातल्या निम्म्या म्हणजे 50 लक्ष जागा आरक्षित आहेत. खाजगी क्षेत्रात 2 कोटी रोजगार असून त्यात आरक्षण नाही. सैन्यातही आरक्षण नाही.
8. ओबीसी आरक्षणातील सात लाख सरकारी जागा रिक्त आहेत. [ भारत सरकारच्या डी.ओ.पी.टी. नुसार] अनु. जाती, अनु. जमातीच्या काही लाख जागाही भरलेल्या नाहीत. 130 कोटी लोकसंख्या असलेल्या देशातील हे "बुद्धीमान लोक" भ्रष्टाचार, दहशतवाद, कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा, जातीयवाद, महागाई, बेरोजगारी, महिला अत्त्याचार यामुळे हा देश सोडत नाहीत. मात्र अवघ्या एक ते सव्वा टक्के [ 40 कोटी रोजगारातील अर्धा कोटी] जागा राखीव असल्याने देश सोडतात?
9. या सन्माननीय भगिनी महिला आरक्षणातूनच पुण्याच्या महापौर झाल्या ना? त्यांनी आधी या आरक्षित पदाचा राजीनामा द्यावा आणि मगच ही मुक्ताफळं ऎकवावीत.
10. गुणवत्तेच्या शिखरावर असलेले नोबेल पुरस्कार विजेते डॉ. अमर्त्य सेन, संपर्क क्रांतीचे जनक डॉ. सॅम पित्रोदा, परममहासंगणक बनवणारे डॉ. विजय भटकर, आधारचे जनक डॉ. नंदन निलेकणी, इन्फोसिसचे डॉ. नारायण मुर्ती, उद्योगाचे एव्हरेस्ट जेआरडी टाटा, भारतीय जागतिकीकरणाचे जनक डॉ. मनमोहन सिंग, जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, खगोलशास्त्रातले विश्वमान्य संशोधक डॉ. जयंत नारळीकर, मिसाईलमॅन ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी कुणीही आरक्षणाला विरोध केलेला नाही - प्रा. हरी नरके Prof. Hari Narke

Thursday, April 20, 2017

बाबासाहेबांचे विचार

https://www.youtube.com/watch?v=3m0N0smWGa4
साडेनऊच्या बातम्या, दूरदर्शन सह्याद्री वाहिनी (१४ एप्रिल २०१७)
मुलाखत संपादीत अंश,
Published on Apr 15, 2017
घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ वी जयंती, आज सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे. देशाची सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती पाहता,
बाबासाहेबांचे विचार कसे महत्वाचे ठरतात आणि येणाऱ्या पिढीसाठी ते कसे मार्गदर्शक आहेत. या विषयी अधिक चर्चा करण्यासाठी, प्राध्यापक हरी नरके १४ एप्रिलला साडेनऊच्या बातमीपत्रात सहभागी झाले होते.... त्यांच्याकडून जाणून घेऊया....

विचारधारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर...

https://www.youtube.com/watch?v=57Kd4RXzytI
Mahacharcha Live 13 April 2017 '
विचारधारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर... '
सहभाग - प्रा. हरी नरके, अ‍ॅड. भास्करराव आव्हाड, योगिनी बाबर, निर्माता: जयू भाटकर
गुरूवार दि.13 एप्रिल, 2017 सायं. 7:30 ते 8:30वा. Live
Published on Apr 19, 2017
DD Sahyadri Doordarshan Mumbai Sahyadri Marathi
Show : Mahacharcha

मौनाचा कट?

समाजाच्या संवेदना आरपार बधीर झाल्यात काय?
शीतल वायळनं बापाकडं हुंडा द्यायला पैसे नाहीत म्हणून आत्महत्त्या केली. प्रसार माध्यमांनी थोडी चर्चा केली. नवे विषय पुढे येताच हा विषय मागे पडला.
मध्यंतरी म्हैसाळच्या घटनेत मुलींची गर्भातच अवैध हत्त्या करण्याचा विषय पुढे आला, थोडी चर्चा झाली, मग तोही मागे पडला.
खरा प्रश्नाय तो हा की अशावेळी लोकमानस का हलत नाही? का ढवळत नाही?
स्त्रीप्रश्न, [लिंगभाव] वर्ग, जात, पर्यावरण, कुटुंबनियोजन अशा अनेक बाबतीत समाजमन बधीर का?
या मुद्द्यांवर प्रमुख राजकारणी, जाणते नेते, त्यांचे चेलेचपाटे साधी प्रतिक्रियासुद्धा देत नाहीत. राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर असे विषय नसतातच. यावर काम करणारांना कसलीही राजकीय प्रतिष्ठा नाही असं परवा डॉ. नीलम गोर्‍हे या शिवसेनेच्या प्रवक्त्या एका वाहिनीवर जाहीरपणे म्हणाल्या.
कोपर्डीची घटना निषेधार्ह आणि संतापजनक होती. धिक्कारार्हच होती. त्याबाबत समाजमन चवताळून उठलं, हे योग्यच झालं, पण मग सोनई, खर्डा, निमखेडी, मलकापूर, बुलडाणा, मनिषा हिंगणे अशी हत्त्याकांडं नी शीतल वायाळ आत्महत्त्या झाली तेव्हा समाज का संतापत नाही?
कुटुंब नियोजन, आर्थिक विषमता, हुंडा, सोकॉल्ड ऑनर किलींग, पर्यावरणाचे प्रश्न यावर बहुजन मौन बाळगतात आणि जात, लिंगभाव, वर्गीय विषमता यात बुद्धीवाद्यांना रस नाही.
अशा प्रश्नांवर बोलायचीही त्यांची तयारी नसेल तर अवघड आहे. हा आप्पलपोटेपणाय की सोयिस्कर स्विकारलेला शहामृगी पवित्राय?
अवघा समाज एव्हढा बथ्थड का बरं झाला असावा?
@ प्रा. हरी नरके

लालदिवे गाडीवरचे आणि ---

लोकप्रतिनिधींच्या वाहनांवरचे लाल दिवे हटवले याचे स्वागतच आहे.
लाल दिवे काढणार ही बातमी भलतीच उचलून धरली गेलीय.
आपल्या देशात एकुणच प्रतिकात्मक कृतींवर सारा भर असतो. हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट राहायचा नसेल तर खालील प्रश्नांची उत्तरं मिळायला हवीत.
जणू काही लालदिवेमुक्त भारत झाल्यानं क्रांतीच झाल्याचा गाजावाजा केला जातोय, प्रत्यक्षात तो खरा नाहीये.
सैन्यातील अधिकारी, न्यायाधिश यांच्या गाड्यांवर लाल दिवे राहणार की तेही जाणारेत?
लाल दिवे गेले तरी जोवर सिक्युरिटीच्या नावावर सोबत असलेला पोलीसफाटा असणारच आहे, तो तेच काम करील जे दिवा करायचा.
परदेशात लोकप्रतिनिधी रेल्वे, बस अशा सार्वजनिक वाहनातून प्रवास करतात ते आपल्याकडं कसं आणता येईल याचाही विचार व्हायला हवा.
ज्यांना खरंच धोका आहे अशा मोजक्या पदांचं ठिकाय, पण आज जे सरसकट कमांडो आणि पोलीस दलातील फौजा सोबत बाळगल्या जातात त्यांची खरंच गरज असते काय?
मंत्र्यांच्या ताफ्यात [कन्हाँयमध्ये] सतत पाचपन्नास गाड्या कशाला लागतात?
अधिकारी निळे दिवे वापरणार म्हणजे लाल गेला निळा आल्यानं कसलं डोंबलाचं परिवर्तन होणारेय?
दिवे गेले, आता टेबलाखालून आणि वरून चालणारी देवघेव थांबवण्यासाठी खरंच काही होणारेय का?
सतत लोकप्रतिनिधींच्या पगार नी भत्त्यात बेसुमार वाढ करायची नी दिवे वगैरे काढल्याचा गाजावाजा करायचा हा दांभिकपणा झाला. उद्या दिवे काढल्याचाही भत्ता सुरू व्हायचा.
अ‍ॅंब्युलन्स आणि फायर ब्रिगेड वगळता बाकी सगळेच दिवे काढायला काय हरकत आहे?
@ प्रा. हरी नरके

अजानचे भोंगे, महाआरत्या आणि धार्मिक उत्सवाचे डिजे -

सध्या देशभर उष्णतेच्या लाटांनी तापदायक हवामान निर्माण केलेलं असतानाच सोनू निगमच्या अजानच्या भोंग्याविषयीच्या ट्विटनं वातावरण आणखीच तापलंय.
सोनूचं काय चुकलं? आणि त्याला हे आत्ताच का सुचलं असे दोन्हीबाजूनं प्रश्न विचारले जात आहेत आणि ते स्वाभाविकही आहेत.
वरवर पाहता हा खुपच निरागस आणि निष्पाप मुद्दा त्यानं उपस्थित केलाय असं वाटतं. कायदे आणि नियम निमुटपणे पाळणारे मध्यम व उच्च मध्यमवर्गीय लोक म्हणतील त्याचं बरोबरच आहे.
1. ध्वनी प्रदुषणानं उच्चतम पातळी गाठलेली असताना आणि मा.सर्वोच्च न्यायालयानं याबाबत आदेश दिलेला असताना तो का पाळायचा नाही अशी एक बाजूय.
2. यात धर्माचा प्रश्न न आणता एक आरोग्यविषयक बाब म्हणून याच्याकडं  का पाहू नये?
3. सर्वच धर्माच्या धांगडधिंगा करणार्‍या मिरवणुका, लग्नाच्या वराती, जयंत्या, आरत्या, महाआरत्या, गणपती, नवरात्री, गरबा, अजान आणि इतर धार्मिक उत्सव आणि राजकीय सभांमध्ये लाऊडस्पीकर, डि.जे. व फटाके वाजवून ध्वनीप्रदुषण करायला बंदी असावी.  यात कोणालाच सूट द्यायचं कारण नाही.
4. सोनूची ही सुचना आत्ताच का आली? त्याच्यामागं कोण आहेत? म्हणजे त्याचे बोलवते धनी कोण आहेत? यामागच्या राजकारणाचं काय? त्याचा हा प्रश्न पाॅलीटिकली करेक्ट आहे की नाही यातही मला रस नाही.
5. आपण अनेकदा साध्यासरळ आरोग्य आणि पर्यावरण विषयक बाबींना जात, धर्म, संस्कृती, श्रद्धा, परंपरा, रितीरिवाज असं वळण देऊन ते प्रश्न अवघड करून टाकतो.
6. जात, धर्म, लिंगभाव, वर्ग, वंश, प्रांत आदींची विविधता असलेल्या आपल्या भारतीय समाजात काही बाबी शिक्षण, संवाद, शिस्त, कठोर नियम आणि कायदे यांच्या माध्यमातूनच निपटाव्या लागतील.
7. अशावेळी सर्वांचे [विशेषत: कट्टरतावाद्यांचे ] समाधान करण्याच्या नादात किंवा अनुनयात भयानक समस्या किंवा दुखणी तयार होतात.
8. फक्त आणि फक्त पर्यावरणाचा आणि सामाजिक सलोख्याचा विचार करून न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा सन्मान करायलाच हवा.
@ प्रा. हरी नरके